अनुभव क्रमांक – १ – अनिकेत शेट्ये

मी एका नावाजलेल्या हॉस्पिटल मध्ये जॉब करायचो. तिथल्या माझ्या को-वर्कर्स कडून एक गोष्ट नेहमी मला ऐकायला मिळायची. या हॉस्पिटल मध्ये असा एक वॉर्ड आहे ज्या ठिकाणी नाईट शिफ्ट ला जर कोणी नवीन व्यक्ती थांबला तर त्याला बरोबर रात्री ३ च्या सुमारास भयानक अनुभव येतात. तसे मला या आधी कधीच नाईट शिफ्ट करावी लागली नव्हती. त्यामुळे या फक्त भाकड कथा असतील अशी मनाची समजूत घातली होती. माझी ड्युटी फिरतीची असायची. त्यामुळे मला याची जास्त चिंता नव्हती. मी कोणत्याही वॉर्ड ला जाऊ शकत होतो. पण नेमके जे व्हायला नको होते तेच झाले. मला नाईट शिफ्ट लागली. आणि बघतो तर काय त्याच वॉर्ड ला माझी ड्युटी लागली होती. आता जाण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता. 

मन जरा धास्तावत होत. माझ्या सोबतीला जो होता तो मला ड्युटी वर जाण्याआधी बजावून सांगू लागला की आज त्या वॉर्ड मध्ये रात्री थांबणार आहेस तर जरा सांभाळून रहा. तुझी पहिलीच वेळ आहे. मी त्याला जास्त काही विचारायला गेलो नाही. विचार केला की उगाच तो नको ते काही सांगायचा आणि मग तोच विचार आपल्या डोक्यात घोळत राहील. त्यामुळे या ऐकीव कथा पुन्हा न ऐकलेल्या बऱ्या. त्या रात्री नाईट शिफ्ट ला वेळेवर पोहोचलो. माझे काम आटोपे पर्यंत जवळपास २ वाजले. त्या नंतर थोडा वेळ विरंगुळा म्हणून आम्ही अगदी लहान आवाजात टिव्ही पाहत बसलो. मध्य रात्रीची वेळ असल्यामुळे हॉस्पिटल मध्ये अगदीच शुकशुकाट होता. त्या रात्री कोणती इमर्जंसी केस ही आली नव्हती. थोड्या वेळाने माझे सहकारी म्हणाले की बराच उशीर झालाय आपण थोडा वेळ झोपुया. पण मला टिव्ही पाहायचा हुरूप आला होता म्हणून मी म्हणालो की थांबा थोड्या वेळ.. मग झोपतो मी.. तसे ते म्हणाले “तू नवीन आहेस, तुला माहित नाहीये, माझे ऐक आणि झोप आता. नंतर घाबर शील..”.

त्यांच्या अश्या बोलण्यातले गांभीर्य मी ओळखले. त्यांचे ऐकणे मला गरजेचे वाटले कारण ते त्या वॉर्ड ला गेल्या बऱ्याच वर्षांपासून होते. त्यामुळे त्यांना तिथला बराच अनुभव होता. मी उठून टिव्ही बंद केला. तिथलाच एक लाकडी बाक घेऊन त्यांच्या शेजारी ठेवला आणि त्यावर आडवा झालो. तशी सवय नसली तरी रात्र ही बरीच झाली होती त्यामुळे मला अवघ्या काही मिनिटांत झोप लागली. पण अर्धा तास होत नाही तितक्यात कसलासा आवाज येऊ लागला. डोळ्यांवर झोप होतीच. मी थोडेसे डोळे उघडले आणि समोरच्या भिंतीवरच्या घड्याळात वेळ पाहिली. बरोबर ३ वाजले होते. खाडकन डोळे उघडले. माझी झोप कुठच्या कुठे निघून गेली. या वार्ड बद्दल इतरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. पण तितक्यात मी त्या आवाजाने पुन्हा भानावर आलो. 

मी ज्या लाकडी बाकावर झोपलो होतो त्याच्या खालून कोणी तरी बाकावर दणके देत होत. मला तर धडकीच भरली. जागे वरून हलायची हिम्मत ही होत नव्हती. तो आवाज हळु हळु वाढू लागला तसे माझ्या बाजूला झोपलेले सहकारी ही झोपेतून जागे झाले. ते मला विचारू लागले की हा आवाज कसला येतोय. मी दबक्या स्वरात म्हणालो “माहीत नाही पण माझा बाका खालून येतोय.. तुम्ही बघता का खाली कोण आहे..” त्यांनी वाकून पाहिले पण त्या बाका खाली कोणीही नव्हते. अगदी खर सांगतो “तो बाक खालून कोणी तरी वाजवत होत, त्यावर दणके देत होत आणि ते माझ्या शरीराला जाणवत होत.. अस वाटत होत की बाका खाली कोणी तरी आहे आणि तेच बाक वाजवतंय”. मी प्रचंड घाबरलो होतो. काय करावे काही सुचत नव्हते. खाली वाकून बघायची तर माझी हिम्मत ही होत नव्हती. इतके दिवस फक्त ऐकणारे प्रसंग मी आज अनुभवत होतो. जवळपास ३.३० पर्यंत तो आवाज येत राहिला आणि नंतर एका क्षणी तो यायचा पूर्णपणे थांबला. तसा माझा जिवात जीव आला. संपूर्ण वेळ मी जागा होतो. माझे सहकारी तेवढ्या पुरता उठून पुन्हा झोपूनही गेले होते.

इतके दिवस मी ज्या बद्दल ऐकून होतो त्याचा मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी मी या बद्दल चे कारण शोधायचा प्रयत्न केला. असे भयानक अनुभव येण्या मागचे काही तरी कारण नक्कीच असावे. मला जे कारण कळले ते ऐकून मला अजूनच भीती वाटू लागली. त्या वॉर्ड मधल्या एका सिस्टर ने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे तिथे रात्री असे बरेच अनुभव येतात. कधी कधी लोकांना ती त्या वॉर्ड मध्ये दिसते सुद्धा. त्या दिवसापासून मी नाईट शिफ्ट आणि तो वॉर्ड टाळायचा खूप प्रयत्न करतो..

अनुभव क्रमांक – २

ही घटना माझ्या चुलत काका सोबत घडली होती. माझा काका एका क्लब मध्ये जॉब करत होता. क्लब म्हंटले की रात्री ही चालू असतात. त्याला रोटेशन ल शिफ्ट असायच्या. ३ शिफ्ट – तो बहुतेक तर १स्ट किंवा २एंड शिफ्ट मध्ये काम करायचा. त्याला थोडी फार ड्रिंक करायची ही सवय होती. त्या दिवशी नेहमी प्रमाणे तो क्लब मध्ये गेला. त्याची शिफ्ट संपल्या नंतर तो ड्रिंक करायला बसला आणि त्या दिवशी त्याला जरा जास्तच झाली. आता लगेच घरी जाण्या ऐवजी इथेच थोडा वेळ झोपतो आणि मग जातो असा विचार केला आणि तो क्लब मध्ये आतल्या रूम्स असतात तिथे जाऊन झोपला. त्याला वेळेचे भान राहिले नाही. रात्री जाग आली तसे तो उठला आणि चालतच घरी जायला निघाला. बरीच भूक लागली होती त्यामुळे घरी जाऊन पाहिले जेवायला बसू असा विचार डोक्यात सुरू होता.

त्याचे घर क्लब पासून तसे काही लांब नव्हते. चालत गेले की साधारण अर्धा पाऊण तास लागायचा. त्याला निघून बराच वेळ झाला असेल, जवळ जवळ त्याचे घर अर्धा किलोमिटर वर राहिले असेल. जाताना रस्त्यात एक मंदिर लागायचे. तिथून जात असताना त्याला एक तरुण मुलगी उभी दिसली. चेहरा त्याला साधारण ओळखीचा वाटला म्हणून तो तिच्याकडे पाहत होता. तितक्यात त्या मुलीने हाक मारून त्याला जवळ बोलावले आणि म्हणाली “कुठे चाललात?” तसे तो म्हणाला “इथून पुढे एक अपार्टमेंट आहे जिथे मी राहतो तिथेच चाललो आहे..” तसे ती पुढे म्हणाली “मी डॉक्टर बाईंच्या घरा पर्यंत जाणार आहे तेवढीच सोबत होईल..” काका ला वाटले की डॉक्टरांची मुलगी असेल आणि तसे ही लहानपणी त्याने तिला पाहिले होते म्हणून च तिचा चेहरा ओळखीचा वाटला त्याला. तिने सांगितल्यामुळे काका ला तिची ओळख पटली

ते दोघे गप्पा मारत निघाले. रस्त्यावर बराच अंधार होता. ते चालत त्या डॉक्टरांच्या घराजवळ आले तसे ती मुलगी काही न सांगताच गेली. डॉक्टरांच्या घरा बाहेरचा लाईट ही नेमका बंद होता त्यामुळे त्याला नीट दिसले नाही. त्याला वाटले की तिचेच घर आहे म्हंटल्यावर ती बरोबर घरी गेली असेल. त्याने थांबून एक दोन वेळा पाहण्याचा प्रयत्न केला पण नंतर जास्त लक्ष न देता घराकडे चालत निघाला. पुढच्या काही मिनिटात तो घरी पोहोचला. दारावरची बेल वाजवली तसे आई ने दरवाजा उघडला आणि त्याच्याकडे पाहतच राहिली. तो घरात शिरल्या शिरल्या बोलला “आई मला जेवायला वाढ खूप भूक लागली आहे..” आई त्याला विचारणार होती पण तिला वाटले असावे की आधी याला जेवायला वाढू मग बोलू याच्याशी. तिने जेवण गरम केले आणि त्याला वाढले. तो ही पटकन जेवायला बसला. 

जेवत असताना तो आई ला सांगू लागला “अग येताना आता मला डॉक्टरांची मुलगी भेटली होती रस्त्यात. आम्ही एकत्र बोलतच आलो.. पण तिच्या घराजवळ आल्यावर ती निरोप न घेता काही न सांगताच निघून गेली. मला जरा वेगळेच वाटले ग..” त्याचे असे बोलणे ऐकताच त्याच्या आई ने घाबरून रडायलाच सुरुवात केली. ती अतिशय घाबरत सांगू लागली “अरे राजा काय बोलतोयस तू..? कोण मुलगी भेटली तुला इतक्या रात्री..? घडाळ्यात वेळ तरी पाहिलीस का..? त्याने सहज म्हणून भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर फिरवली आणि तो दचकला च. रात्री चे ३ वाजत आले होते. इतक्या रात्री ती अशी रस्त्यावर का म्हणून थांबेल. त्याच्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले. आपण नक्की कोणासोबत चालत आलो. आपल्याला वेळ कशी कळली नाही. 

या सगळ्या प्रश्नांना आई च्याच बोलण्याने विराम मिळाला. आई घाबरतच सांगू लागली “तुला मी सांगायला विसरले.. परवा डॉक्टरांची मुलगी एका अपघातात गेली, आज तिचा तिसरा दिवस आहे.. तू नक्की कोणाला भेटलास..” आई चे बोलणे ऐकताच त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. पण हे कसे शक्य आहे. ती तर माझ्या शी चांगली बोलली सुद्धा. हो पण जेव्हा तिचे घर आले तेव्हा मात्र ती अचानक अंधारात दिसेनाशी झाली. पुढचे काही दिवस काका ला ताप भरून आला होता. त्या नंतर मात्र काकाने दारू पिणे कायमचे सोडून दिले.

Leave a Reply