अनुभव – महेश डुंबरे

ही गोष्ट 2010 मधील आहे. मी एका नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो. तेव्हा मला फिल्ड विझिट साठी प्रत्येक महिन्यात साधारण 10 दिवस कर्नाटकला जावे लागत असे.

कर्नाटकमधील एका गावात पहिल्यांदाच जावे लागले. तो महिना नोव्हेंबर चा कडाक्याच्या थंडीचा होता. तस कर्नाटक हे सुंदर निसर्गाचे देण असलेले गाव आहे म्हणून नेहमीच मी उत्साहाने तिकडे जात असे. पण ह्यावेळीच्या ट्रिप मध्ये मला तब्बल 15 दिवस राहावे लागणार होते कारण माझ्या डिस्त्रीबुटर ला तिथे नवीन शाखा उघडायची होती. आणि त्याच adminstration व कामाचे सुपरविजन करायची जबाबदारी माझ्यावर होती. त्या ठिकाणी डायरेक्ट बस नसल्यामुळे मला मुंबई ते हुबळी व हुबळी पासुन ते गाव असे साधरण 32 तासाचा प्रवास करायचा होता. प्रवास हा खूपच लांबचा आणि कंटाळवाणा होता. पण कसे बसे अंतर कापत मी त्या गावी पोहोचलो. पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ७ वाजत आले होते.. ठरलेल्या लॉज वर पोहोचलो. त्या लॉजवर मी पहिल्यांदाच आलो होतो. तिकडे आमच्या डिस्त्रीबुटरचे तिथले लोकल कानडी कर्मचारी आधीच येऊन थांबले होते. त्यांच्या सोबत च मला राहायचे होते. त्यांना मी वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे व मुंबईचा मुख्य शाखेचा असल्यामुळे विशेष आदर होता. आणि त्यात गेल्या एक वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत वेगवेगळ्या लोकेशनवर काम केले होते. संध्याकाळी गेल्यावर थोडे फ्रेश झालो आणि मग रात्री जेवण करून रूम वर झोपायला जाऊ लागलो. माझी रूम पहिल्याच मजल्यावर होती. तसे तिथले माझे सहकारी कर्मचारी मला म्हणू लागले “सर बघा, इथे वरच्या माळावरून विचित्र आवाज येतो.” मी त्यांना मुर्खात काढून तिथून रूम वर आलो. 

प्रवासात खूप थकलो असल्यामुळे लगेच गाढ झोपे लागली. कारण प्रवासात अजिबात नीट झोप मिळाली नव्हती. सकाळी उठताच ते माझ्या रूम वर येऊन मला विचारू लागले की सर तुम्ही आवाज ऐकला का ? हे विचारत असताना मी त्यांच्याकडे पाहिले. त्यांचे डोळे हे रात्रभर व्यवस्थित न झोपल्यामुळे लाल झाले होते. मी त्यांचे बोलणे हसण्यावर नेले आणि त्यांना शहाणपण दाखवत पुन्हा मुर्खात काढले. सरळ आणि अगदी स्पष्ट म्हणालो की मला कसलाही आवाज आला नाही. कारण मला खरंच कसलाच आवाज आला नव्हता. त्या लॉज बद्दल बोलायचे झाले तर त्याचे एका दिवसाचे भाडे हे फक्त ३५० रुपये होते. आणि त्याच्या सोबत च असलेल्या लॉज चे भाडे हे ७०० रुपये होते. म्हणजे दुप्पट भाडे. एवढी मोठी तफावत का असा प्रश्न पडला असेल तर ते लॉज हे छान, रंगरंगोटी केलेले व नीटनेटके होते. त्याच्या तुलनेत आम्ही राहत असणारे लॉज हे अगदीच पडीक, बरीच वर्ष कसलीही डागडुजी न केलेले, अंधारलेले असे होते. दोन मजल्याचे आणि एकूण १२ रूम्स असलेले ते लॉज. तिथे बाहेरचे गेस्ट मोजकेच असायचे. म्हणजे इतक्या रूम्समधून १-२ रूम भरलेल्या असायच्या. खालच्या मजल्यावर एकमेव केअर टेकर असायचा, तो तिथेच रात्री झोपायचा. अतिशय रागीट आणि उद्धट व्यक्ती होता. असो. दुसऱ्या दिवशी कामावरून पुन्हा रूम वर आलो. दिवसभर फिरते काम असल्यामुळे रात्री अगदी गाढ निद्रेच्या आहारी गेलो. 

पण मला जाग आली ती थेट सकाळी उजाडल्यावर. उठून फ्रेश होत नाही तितक्यात पुन्हा त्या कर्मचाऱ्यांनी येऊन तक्रार केली. तसे ते माझ्या ४ दिवस आधी येऊन तिथे राहत होते आणि विशेष म्हणजे रोज रात्री त्यांना तो आवाज ऐकू यायचा. त्यांना आता काहीही करून लॉज बदलायचे होते. मग कसे तरी करून कंपनी चे एक गेस्ट हाऊस मीच फायनल केले. तसे ते सगळे लगेच तिथे शिफ्ट व्हायला तयार झाले. अगदी त्याच दिवशी. मी कंपनी चा अधिकारी असल्याकारणाने त्यांच्या सोबत त्यांच्या भाड्याच्या जागेत राहणे हे माझ्या प्रतिष्ठेच्या विरोधात होते. आणि मी केलेल्या नोकरीत नेहमी चांगल्या लॉज किंवा हॉटेल मध्ये राहायचो, जेवायचो. पण ते गाव छोटे असल्याने तिकडे फक्त दोनच लॉज होते. ते गेल्यावर मी त्यांना माझी २ बेडरूम ची रूम बदलून एक बेडरूम ची रूम मागितली कारण मला इतक्या मोठ्या रुमची गरज नव्हती. मला नंतर कळले की एक बेडरूम असलेली एकच रूम आहे आणि ती ही दुसऱ्या मजल्यावरच्या अगदी कोपऱ्यात. का कोण जाणे पण मनात शंकेची पाल चुकचुकली. एक अनामिक भीती दाटून आली. पण त्या विचारांना बाजूला सारून मी सगळे सामान शिफ्ट केले. त्या मजल्यावर फक्त एक बल्ब होता. त्यात त्या संपूर्ण लॉज मध्ये मी एकटा आणि खालच्या मजल्यावर चा केअर टेकर. तो ही असून नसल्यासारखा. कारण त्याच्याच धुंदीत असायचा. 

त्या रात्री जरा रिलॅक्स व्हायला मी मोबाईल वर मुवी पाहत बसलो. हळु हळु मनात भीती दाटून येत होती. कारण मी आता त्याच मजल्यावर होतो जिथून तो आवाज यायचा. जवळपास रात्री २ वाजेपर्यंत जागा राहून बाहेर कसला आवाज येतोय का त्याचा कानोसा घेऊ लागलो. शेवटी कंटाळून झोपायची तयारी केली आणि अंथरुणात येऊन पडलो. सव्वा दोन झाले असावेत. डोळा लागतो ना लागतो अचानक रूम च्या बंद दरवाज्या बाहेरून जोरात कोणी तरी धावत गेले. मी खाडकन अंथरुणात उठून बसलो. तो आवाज त्या माझ्या रूम पासून त्या मजल्याच्या अगदी दुसऱ्या टोकाला गेल्याचे जाणवले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. माहीत नाही कोण पण अगदी माझ्या रूम च्या जवळून धावत गेले. काळीज भीतीने धड ध डू लागले. अंगावर भीतीने शहारे उमटू लागले. नकळत पणे मी रामनामाचा आणि हनुमानाचा जप करू लागलो. राम नमातली विलक्षण ताकद मी अगोदर ही बऱ्याच वेळी अनुभवली होती. त्या नामाचा जप केल्यामुळे मनातील भीती कमी होऊ लागली आणि एक धीर मिळाला. लागलीच मी माझ्या मोबाईल वर मोठ्या आवजात हनुमान चालीसा लावली. उठून रूम ची सगळी लाईट चालू करून बेडवर येऊन बसलो. त्याचा आवाजात मला झोप कधी लगली कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी घडला प्रकार त्या कर्मचाऱ्यांना सांगितला. ते मला सांगू लागले की आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितले पण तुम्हाला विश्वास नव्हता आमच्या बोलण्यावर. त्यांना मुर्खात काढणे मला चांगलेच पथ्यावर पडणार आहे हे मला कळून चुकले. ह्या वेळी माझी ट्रिप मोठी असल्यामुळे मला दुसरे लॉज महाग पडणार होते. कारण संपूर्ण ट्रीप चे बजेट कंपनी कडून असले तरी हवा तसा खर्च करता येणार नव्हता. त्यामुळे मी त्याच लॉज मध्ये राहायचा निर्णय घेतला. रात्र झाली. त्या रात्री ही मी डोळ्यात तेल घालून २.१५ पर्यंत जागा राहिलो. पुन्हा तोच प्रसंग वाट्याला आला. मी जीव मुठीत धरून रूम मध्ये बसून राहिलो. रात्र जवळजवळ मी जागून च काढली. पण तिसऱ्या दिवशी मनात वेगळाच विचार आला की बाहेर काही तरी वेगळेच असावे. आपण उगाच गैरसमज करून घेतोय. म्हणून त्या रात्री मी दरवाजा उघडून बाहेर काय आहे हे पाहायचे ठरवले. ११ वाजत आले आणि भीती ने कापरच भरल. पण माझ्यात अचानक तो जुना निडर पणा कुठून आला काय माहित. जे होईल ते पण आज या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचाच असा ठाम निर्णय केला. २.२० होत आले आणि पुन्हा बाहेरून कोणी तरी चालत जाण्याचा आवाज आला. या वेळेस ती आवाज पैंजनाचा होता. मन घट्ट केले, सगळी ताकद एकवटली आणि झटकन रूम चा दरवाजा उघडला, सरळ बाहेर आलो. व्हरांड्यात त्या बल्ब चा मंद प्रकाश पसरला होता. हळु हळु पुढे सरकू लागलो. प्रत्येक रूम जवळ जात कानोसा घेऊ लागलो. कसला आवाज येतोय का. 

पण सगळीकडे भयाण शांतता होती. हिम्मत करून दुसऱ्या मजल्यावरून खाली डोकावून पहिले तर खालच्या मजल्यावर तो केअर टेकर एकदम गाढ झोपला होता. जास्त वेळ न थांबता माझ्या रूम मध्ये आलो आणि झोपून गेलो. पुढची जितकी रात्र मी तिथे थांबलो तितक्या रात्री २.१५ पासून ते ३ पर्यंत कधी चालण्याचे तर कधी जोरात पळण्याचे आवाज येत राहिले. पण तो आवाज सुरू झाला की मी रामनामाचा जप सुरू करायचो. त्याची खरंच खूप मदत झाली आणि त्या प्रसंगाला तोंड देऊ शकलो. १५ दिवस संपले, चेक आउट करून बाहेर निघताना पुन्हा एकदा त्या लॉज कडे नजर टाकली आणि पुन्हा कधीही इथे येणार नाही असा मनाशी निर्णय केलं केअर टेकर ला एक रुपया ही जास्तीचा देण्याची इच्छा झाली नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर ही मला काही मिळणार आहे याचे कसले ही हावभाव नव्हते. जे प्रकार इथे घडतात त्याची याला ही खात्री असावी. माझ्या पुढच्या ट्रीप मध्ये मी समोरच्या महागड्या लॉज मध्ये ७०० रुपये वन रूम चे भरले आणि तिथेच राहिलो. मुद्दामून तिथल्या मालकाला समोरच्या लॉज बद्दल विचारणा केली. तसा तो मितभाषी आणि आपल्या कामात मग्न होता. पण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायला मी भाग पाडले. त्याने तिथे घडत असणाऱ्या बऱ्याच गोष्टींना दुजोरा दिला. तिथे राहत असताना कधी-कधी तिकडच्या केअरटेकर सोबत नजरानजर होत असे पण मी कटाक्षाने त्याला टाळत असे. हा अनुभव माझ्या आयुष्यातील सगळ्यात विचित्र, कधीही न विसरता येण्यासारखा आहे. अगदी हे सांगताना लिहिताना ही मला रामनामा चे आणि हनुमानाचे नुसते नाव घेणे ही किती प्रभावी ठरू शकते याचे कुतूहल वाटते.

Leave a Reply