अनुभव क्रमांक – १ – साहिल साळुंखे
त्या दिवशी संध्याकाळी घरच्यांसोबत असेच बसलो होतो. कंटाळा आला होता म्हणून टिव्ही पाहत बसलो होतो तर टिव्ही वर एक हॉरर सिनेमा लागला होता. सहज म्हणून माझ्या बहिणीने आई ला विचारले “आई तुला काय वाटतं ग.. भूत खरच असतात..?” आई काही बोलणार तितक्यात बाबांनी उत्तर दिले ” हो मग..”. तसे आई जरा रागातच म्हणाली “काही ही काय सांगता तिला”. तो विषय तिथेच थांबला पण मला काही राहवले नाही. नंतर मी आई ला लाडी गोडी लाऊन विचारू लागलो की तू बाबांना असे का ओरडुन बोललीस. काय झाले ते सांग मला. मला असे वाटले की तू काही तरी लपवते आहेस. तसे आई मला सांगू लागली. तुला माहितीये ना आपले डोंगरावर वसलेले गाव..
त्याच डोंगराच्या पायथ्याशी आपले कुलदैवत आहे. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा आमचे नुकताच लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही कुल दैवतेच्या दर्शना ला गेलो होतो. आपल्या गावापासून तिथपर्यंत जायला पायवाट होती. दोन्ही बाजूला घनदाट झाडी. तेव्हा शेती व्हायची तिथे. अर्ध्या – पाऊण तासात आम्ही खाली देवळात येऊन पोहोचलो. पूजा वैगरे केली आणि पुन्हा गावाच्या दिशेने वर जायला निघालो. खूपच अंधार पडला होता. आई म्हणाली की खूप उशीर झालाय आपण पुजाऱ्या च्याच घरी थांबुया आणि पहाटे निघुया. तुझी आजी वैगरे हो म्हणाली पण हे ऐकतात कुठे. हे सरळ जायला निघाले. शेवटी आम्ही पुजाऱ्या कडून कंदील घेऊन त्यांच्या मागून निघालो.
तस बघायला गेलं तर आठ च वाजले होते पण त्या काळी अंधार पडायला सुरुवात झाली की सगळी कडे अगदी शुकशुकाट व्हायचा. त्या मानाने आम्ही ज्या वेळेला निघालो होतो तेव्हा ती पायवाट अगदीच निर्मनुष्य होती. रातकिड्यांचा किर्र आवाज चारही बाजूने येत होता. आम्ही हातात धरलेला कंदील त्या अंधारातून वाट दाखवत होता तसे आम्ही वर चढू लागलो. तितक्यात मला घंटी वाजयचा आवाज येऊ लागला. मी जरा दचकलेच. मी तुझ्या आजीला विचारले “तुम्हाला ही आवाज येतोय का?”. तसे ती म्हणाली “हो.. असेल कोणीतरी.. जाऊ दे तू लक्ष नको देऊस”. खर सांगायचे तर मला त्यांच्या आवाजातली भीती स्पष्ट जाणवली. तो आवाज आमच्या सोबतच आहे असे वाटू लागले. म्हणजे कोणी तरी आमच्या सोबत चालत होते फक्त दिसत मात्र नव्हते.
आम्ही थोड पुढे गेल्यावर एक लहान ओढा लागला. त्याच्या पाण्यात पाय देताच अचानक कंदील एकाएकी विझला. आम्ही सगळेच घाबरलो. पण तरीही शांत होतो. अंदाज घेत ओढा पार करून पुढे आलो तसा कंदील अचानक सुरू झाला. मी तर भीतीने कापू लागले होते. कदीलाची वात आपोआप कशी पेटली हेच मला उमगत नव्हत. आम्ही कसे बसे घरी आलो. त्या संपूर्ण प्रवासात कोणी तरी आमचा सतत पाठलाग करत होत पण ते कोण होत हे आम्हाला कोणालाही कळले नाही. दुसऱ्या दिवशी मला ताप भरला होता.
अनुभव क्रमांक – २ – अनन्या पालकर
मावशी तिच्या मिस्टर सोबत आमच्या कडे काही दिवस राहायला आली होती. खूप वर्षांनी भेटल्यामुळे माझी आई आणि मावशी घरातले सगळे काम आटोपून गप्पा मारायला बसल्या. बोलता बोलता गप्पा कधी भुतांच्या गोष्टीवर गेल्या कळलेच नाही. दोघीही आप आपल्या सोबत घडलेले अविस्मरणीय अनुभव सांगू लागल्या. माऊ शी सांगू लागली. साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत म्हणजे शीतल सोबत फिरायला गेले होते. तेव्हा आम्ही संध्याकाळी त्याच भागातल्या एका मंदिरात जण्याचे ठरवले. आई आम्हाला म्हणाली की जास्त वेळ बाहेर फिरू नका आणि अंधार पडायच्या आत येता आले तर बघा. पण मी आई चे बोलणे पूर्ण पणे विसरून गेले. जवळपास ७.३० व्हायला आले होते. आम्ही मंदिराच्या बाहेर रांगेत उभे होतो.
बरीच मोठी रांग होती. गर्दी असल्यामुळे मला खूपच गरम होत होते म्हणून मी शीतल ला सांगितले की तू इथेच रांगेत थांब मी जरा बाहेर जाऊन थांबते, मला गुद्मरल्यासारखे होतंय इथे उभ राहून. तिने ठीक आहे म्हंटले तसे मी तिथून थोडे बाहेरच्या बाजूला चालत आले. एका मोठ्या भिंती जवळ येऊन थांबले. त्याच भिंती ला टेकून डोळे बंद करून काही सेकंद शांत पणे उभी राहिले. गर्दी पासून लांब आल्यामुळे क्षणभर का होईना एकदम शांत वाटले. तितक्यात माझ्या हातावर एक हळुवार स्पर्श जाणवला आणि मी झटकन डोळे उघडले. माझ्या जवळपास कोणीही नव्हते. मी शीतल कडे जाऊन तिला विचारले की तू येऊन गेलीस का किंवा तू मला पाहिलेस का माझ्या जवळून कोणी गेलं का.? ती माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिली की ही अशी का बोलतेय.
मी खरंच घाबरले होते. तितक्यात आमच्या बाजूने तिरडीवर कोणाचे तरी प्रेत घेऊन जाऊ लागले. मी पाहिले तर एका कोण्या बाईचे प्रेत होते. ते पाहून सर्वांग शहारले. काही वेळा पूर्वी आजू बाजूला कोणीही नसताना झालेला स्पर्श आणि आता ही अंत यात्रा. मला आता तिथे क्षणभर ही थांबायचे नव्हते. मी शीतल चा हात पकडला आणि तिला म्हणाले घरी चल आत्ताच्या आत्ता. ती मला काय झालेय ते विचारात होती पण मी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचलो. आईला मी सगळे सांगितले. आई मला सांगू लागली की तुला म्हणाले होते लवकर घरी ये पण तू ऐकले नाहीस माझे. इतक्यावरच मी थांबले नाही. काही दिवसांनी मी त्या जागे बद्दल चौकशी केली. त्या जागेत मंदिर असून सुद्धा त्या भिंती जवळ असे भास खूप लोकांना होतात.
माऊशीचे सांगून झाल्यावर मी फुशारक्या मारतच म्हणाले “मला नाही वाटत कसली भीती..” तसे माऊशी म्हणाली अनन्या थांब अजुन एक गोष्ट आहे ती ऐक आणि मग सांग मला..
माझे वडील आणि भाऊ किरण काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. लगेच यायचे असल्यामुळे बाईक घेऊन गेले होते. काम आटोपून घरी परतायला बराच उशीर झाला. येताना वाटेत जंगल पट्टीचा रस्ता लागणार होता. तेव्हा त्या भागात वस्ती अगदीच तुरळक असायची. त्यात रस्त्यावर लाईट ही नव्हते. त्यामुळे बाईकच्या हेडलाइट चा प्रकाश तेव्हढाच काय तो आधार होता. भाऊ गाडी चालवत होता त्यामुळे सरासरी वेग ६० च्याच वरच होता. ते त्या जंगलाच्या रस्त्याला लागले तेव्हा १.३० वाजून गेला होता. तितक्यात भावाला रस्त्या कडेला एक लहान मुलगी उभी दिसली. बाईक जस जशी जवळ गेली तसे त्याला जाणवले की ती आपल्या कडेच पाहतेय. तो पटकन वडिलांना म्हणाला “पप्पा ती मुलगी बघा..”
त्यांनी ही तिला पाहिले आणि म्हणाले “गाडीचा वेग वाढव आणि समोर लक्ष दे.. आजूबाजूला पाहू नकोस”. बरीच रात्र झाल्यामुळे रस्ता अगदी सामसूम होता. आमच्या बाईक व्यतिरिक्त गेल्या तासाभरात एकही वाहत दिसले नव्हते. त्यामुळे त्याने बाईक चा वेग वाढवला. ७०,८०,९० च्या वेगात बाईक चालवू लागला. तितक्यात एके क्षणी मागून धापा ऐकू आल्या आणि त्याने बाजूला पहिले. बाजूचे ते दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला. ती लहान मुलगी अगदी वाऱ्याच्या वेगाने बाईक सोबत धावत होती. तिच्या पायकडे पाहिले तर ते इतक्या वेगात फिरत होते की त्याला काही दिसतच नव्हते. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की आपण हे नक्की काय पाहतोय. तितक्यात वडील म्हणाले “तुला म्हणालो ना समोर बघ, बाजूला पाहू नकोस..” तसे तो भानावर आला. ते दोघेही प्रचंड घाबरले होते.
त्याने बाईक चाई वेग अजुन वाढवला. ११०-१२० च्याच वेगात घेतली. एव्हाना ते बरेच पुढे आले होते. तो जंगल पट्टीचा भयाण परिसर आता मागे पडला होता. बहुतेक तिची हद्द ही संपली होती. वस्तीचा परिसर दिसू लागला तसे जरा जिवात जीव आला. भाऊ गाडी थांबणार होता पण त्याला वाटले की आता थेट घरी पोहोचल्यावर च गाडी थांब वायची. ते पुढच्या तासाभरात घरी आले. ती मुलगी नक्की कोण होती आणि त्यांचा पाठलाग का करत होती हे एक न उलगडलेले कोडेच आहे.
माउशीचे बोलणे संपल्यावर माझी बहिण म्हणाली “बापरे.. ही गोष्ट तर पहिल्या अनुभवा पेक्षा खूप भयानक होती माऊ शी..” त्यावर मी म्हणाले “मला नाही असल्या गोष्टींनी भीती वाटत” पण खरे सांगायचे तर माऊशिचे दोन्ही अनुभव ऐकुन माझ्या मनात खोलवर कुठे तरी भीतीने घर नकीच केले होते.