अनुभव – स्नेहा

मे महिना चालू होता आणि मी माझ्या गावी आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गाव. लग्न सराईचा महिना होता. माझी आई मला गावात सोडुन कामानिमित्त पुन्हा मुंबई ला आली होती. त्यामुळे मी आणि माझी आत्त्याच घरी होतो. बाकीचे फॅमिली मेंबर्स नंतर येणार होते. 

माझ्या वाडीचे नाव ठुकरुळ वाडी आहे. लग्न 2 तारखेला होते आणि हळद आदल्या दिवशी म्हणजे 1 तारखेला. दुपार झाली होती आणि साधारण 12 वाजत आले होते. घरी बसून बसून मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी वाडीतून फिरून यायचे ठरवले. वाडीतून चालत गेल्यावर एक बस स्टॉप लागतो आणि आम्ही तिथे गेलो की गावात जाऊन आलो असच म्हणतो. त्यामुळे गावात जाऊन दुकानातून काही खाऊ घेऊन यावे असे ठरवले. खूप ऊन होत आणि मी तशीच निघाले. एकटी असल्यामुळे खूप कंटाळा ही येत होता.

अधून मधून झाडांच्या सवलीतून जाताना थंडगार वाटत होतं. त्यातच हळूच एखाद्या वाऱ्याची झुळूक यायची. एरवी पेक्षा आज मात्र त्या वाटेवर कोणीही नव्हतं. एकदम शांत. हा परिसर जरी ओळखीचा असला तरी इतकी शांतता मी यापूर्वी इथे कधीच अनुभवली नव्हती. नेहमी प्रमाणे गुरांना चारायला घेऊन येणारेही कुठे दिसत नव्हते. बहुतेक ते रानात अगदी आत गेले असावेत असा विचार करून मी पुढे चालत होते.

आमच्या गावातले स्मशान आले. आजीचे सगळे अंतविधी इथेच झाले होते. त्यामुळे आजीला आठवून त्या जागेला नमस्कार करून मी पुढे निघाले. त्या वाटेवरून खालच्या बाजूला एक नदी आहे. आणि तिथून पुढे गेलं की महालक्ष्मी देवीचं मंदिर. पण खालच्या बाजूची जागा चांगली नाही असं सगळे लोक म्हणतात आणि नकळतपणे माझी नजर तिथे गेली. तिथून 2 मुली येताना दिसल्या.

मी त्यांना पाहून न पाहिल्यासारखे केले आणि पुढे जात राहिले पण त्यांनी मला हाक दिली. त्यांनी मला विचारले की वाडीच्या वाटेवरून बाहेर पडायचे आहे मग कुठून जायचे. मी म्हणाले की मी ही तिथेच गावात चाललेय चला माझ्या बरोबर. पण त्या म्हणाल्या की आम्हाला याच वाटेने जायचे आहे. मी त्यांना सांगितले की इथून जाताच नाही येणार कारण पुढे रस्ताच नाहीये. 

त्यातल्या एकीने बोट करून म्हंटले ‘या दिशेने सोड आम्हाला आम्ही जाऊ’. मी पाहिले तर स्मशानाच्या दिशेने बोट दाखवत होती. मी पुन्हा त्यांना सांगितले की ती वाट चुकीची आहे. पण त्या दोघीही हट्ट करू लागल्या. मला थोडं वेगळंच वाटलं काहीसं चुकल्या सारखं. मी पुढे निघणार तोच त्यातला एकीने माझा हात पकडला आणि पुन्हा त्या वाटेने जाण्याचा हट्ट करू लागली. आता मात्र मला खरच राग आला. ओळख पाळख नसताना ही माझा हात धरून मला खेचू लागली. 

त्यामुळे माझ्या हातातली पिशवी खाली पडली. मी पिशवी उचलायला खाली वाकले आणि प्रचंड घाबरले. त्या रखरखत्या उन्हात फक्त माझीच सावली दिसत होती. त्या 2 मुलींची सावली मात्र नव्हती. त्यात त्या दोघीही मला त्या दिशेने खेचत होत्या म्हणत होत्या चल आमच्या बरोबर आम्ही पुढे जातो तू थांब हवे तर तिथेच. 

मी धीर एकटवून त्यांना म्हंटले की तुम्ही मंदिराजवळ चला तिथून वाट आहे. मी त्यांच्या डोळ्यात किंवा चेहऱ्याकडे न पाहताच म्हणाले. मला आतापर्यंत कळून चुकले होते की हा काही तरी वेगळाच प्रकार आहे. 

पाय तिथून निघत नव्हते कारण भीतीने अंगात त्रणच उरला नव्हता. सगळी ताकद एकटवून मनातल्या मनात देवीचा धावा करू लागले. पुढच्या क्षणी एक वृद्ध व्यक्ती मंदिराच्या मागून काही गुरांना घेऊन चालत येताना दिसला. मी त्यांना आजोबा अशी जोरात हाक मारली. तसे ते धावतच माझ्यापाशी आले. त्यांनी विचारले तू इथे काय करतेस आणि या दोघी कोण आहेत. मी त्यांना सर्व सांगितले. ते म्हणाले की ठीक आहे तू थांब इथेच मी याना त्या वाटेने सोडून येतो.

ते स्मशानाच्या दिशेने चालत जात होते आणि मी तिथेच उभी राहून त्यांना पाहत होती. ते दृष्टी आड झाले आणि जोरात आवाज आला. ते आजोबा धावत आले आणि मला म्हणाले पोरी तू निघ इथून आणि काही झाले तरी मागे वळून पाहू नकोस. मी कसलाही विचार न करता सरळ धावत सुटले. धावत असताना मी नकळत मागे पाहिले आणि आश्चर्य म्हणजे मागे कोणीही नव्हते, ते आजोबाही नाही आणि त्यांची गुर ही. एका क्षणात ते नाहीसे झाले होते.

मी त्या दिवशी इतके घाबरले होते की जेवले ही नाही. घडला प्रकार आत्याला सांगितला. त्या रात्री मला भरपूर ताप भरला होता. दुसऱ्याच दिवशी आई बाबा आले. गावात बातमी पसरली होती की मी चेटकीणीच्या तावडीतून जेमतेम सुटले. मी जे अनुभवले ते मरेपर्यंय विसरू शकणार नाही.

बाबा त्या आजोबांसाठी जवळपास 5 दिवस तिथे मंदिरात थांबले पण ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. मी बाबाना म्हंटले की त्या आजोबांच्या रुपात देवीच माझ्या मदतीला धावून आली. आणि बहुतेक आजीने देवीला सांगितले असेल की माझ्या नातीची रक्षा कर. खरच आपण देवाला हाक दिली की तो कुठेही असला तरी आपल्या मदतीला धावून येतोच. फक्त श्रद्धा महत्वाची.

Leave a Reply