मी मुंबई मध्ये वास्तव्यास आहे. हा अनुभव साधारण चार ते साडे चार वर्षांपूर्वीचा आहे. मी एका मोठ्या कॉलनी मध्ये राहते आणि त्याच्या बाजूचा परिसर मोकळा आहे. जिथे बऱ्याच वर्षांपासून कसलेही बांधकाम झाले नाही. त्यामुळे तो परिसर पडीक आहे. पावसाळा आला की ती जागा झाडी झुडपांनी व्यापली जाते. ती जागा नक्की कोणाची आहे हे माहीत नाही पण त्याची देखरेख ही नीट केली जात नाही. तिथे जास्त कोणी फिरकत नसल्यामुळे गवत, झाडी खूप उंच वाढतात. म्हणजे आत चालत गेले तर बाजूचा परिसर ही दिसणार नाही इतके. ७ नंतर त्या परिसरात कोणी दिसत नाही. मुंबई शहरात राहत असलो तरी आमचा तो भाग वर्दळी पासून वंचित असतो. एके दिवशी जेवण आटोपल्यावर मी आमच्या कॉलनी मध्ये खाली शतपावली करत होते. इयर फोन घालून माझ्याच धुंदीत फेऱ्या मारत होते. साडे नऊ पावणे दहा झाले असतील. चालत चालत मी त्या झुडपाच्या भागात कधी गेले माझे मलाच कळले नाही. एकदम गारवा जाणवू लागला. जसा मुंबई शहरात मी पहिल्यांदा अनुभवला असेल. पण मी जास्त लक्ष दिले नाही. गाणी ऐकत मी तिथेच फेऱ्या मारू लागले.
तितक्यात अचानक एक थंडगार वाऱ्याची झुळूक स्पर्श करून गेली आणि माझे सर्वांग शहारले. त्याच सोबत मोगऱ्याचा सुगंध आला. मला वाटले की इथेच जवळ कुठे तरी मोगऱ्याचे झाड असेल. वळून पाहिले तर तिथे फक्त जळालेल्या गवताचे काळे ठीक्कर पडलेले अवशेष होते. मला लक्षात आले नाही की हे असे गवत जाळले का आहे. मला जरा भीती वाटू लागली म्हणून मी तिथून काढता पाय घेतला. आजीने सांगितलेले ही आठवले की असे रात्री या भागात एकटीने फिरायचे नाही. जिथे लोकं असतील तिथे फिरायचे. मी झपाझप पावले टाकत तिथून घराकडे जायला वळले. पण तितक्यात मला जाणवले की माझ्या मागून कोणी तरी चालत येतय. इयर फोन कानात च होते आणि गाणी सुरू होती त्यामुळे थोडा आधार वाटत होता. पण अचानक गाणी प्ले व्हायची थांबली. बहुतेक नेटवर्क गेले असेल असे वाटले. तितक्यात लांबून एका कुत्र्याचे विचित्र रडणे कानावर पडले आणि अंगावर सरसरून काटा आला. मग मात्र मी घराच्या दिशेने सरळ धावतच सुटले. जसे त्या भागातून बाहेर आले मला पुन्हा वातावरण पहिल्यासारखे वाटले. तो गारवा कुठच्या कुठे निघून गेला. आता माझ्या मागे खरंच काही होत की तो फक्त माझा भास होता हे माहीत नाही..