राञी चे 1:30 वाजले होते. वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली असल्यामुळे वातावरण अगदी सामसूम झाले होते. संपूर्ण परिसर निद्रेच्या आहारी गेला होता. तितक्यात बाहेरचे कुञे विचित्र आवाजात रडु लागले आणि भुंकु लागले. तो आवाज त्या शांततेत घुमू लागला. त्यांच्या आवाजाने छातीमध्ये धडधडू लागले. गेल्या 3 दिवसा पासुन हे रोज घडत होत. आधीच मी तापाने फणफणतोय आणि त्यात ह्या कुञयाचं भेसुर रडणे एक अनामिक भीती निर्माण करायचं. अंगात ताप असल्याने अंग खूप दुखत होत आणि त्यामुळे 3 दिवसा पासुन नीट झोप ही झाली नव्हती. रोज दीड पावणे दोन झाले की हा प्रकार सुरू व्हायचा आणि मला खूप अस्वस्थ वाटायचं. आज थांबेल उद्या थांबेल असा विचार करत आज तिसऱ्यांदा हे घडत होत. ठरवलं की काय आहे ते बघायचच. अंथरुणातून उठलो तसे अशक्तपणा अधिकच जाणवू लागला.
पण मनाशी पक्क केलं होत की घराच्या बाहेर जाऊन बघायचे की नक्की काय आहे. घरातले सगळे गाढ झोपले होते. मी आवाज न करता टेबल चा ड्रॉवर उघडुन टॉर्च घेतली आणि घरा बाहेर पडलो. कुत्र्यांचे रडणे, भुंकणे अजूनही थांबले नव्हते. त्या आवाजाचा माग काढत मी चालू लागलो. मनात भीती होतीच पण त्याहून जास्त कुतूहल होत ते विशिष्ट वेळेला रडणाऱ्या कुत्र्यांचं. घरापासून साधारण ५० मीटर लांब चालत आलो होतो. तिथे एक चिंचेचे झाड होत आणि त्या झाडाखाली काही भटक्या कुत्र्यांचा समूह भुंकत होता. आजूबाजूला तुरळक घर असल्यामुळे तिथे हवा तसा उजेड नव्हता. रस्त्यापासून ते झाड बरेच आत असल्याने स्ट्रीट लाईट चा प्रकाश ही तिथपर्यंत पडत नव्हता. काही पावलं त्या दिशेला चालत जाऊन मी त्या दिशेने टॉर्च फिरवली. तसे जाणवले की ते कुत्रे झाडावर पाहून भुंकत आहेत.
तितक्यात मला आठवले की मुक्या प्राण्यांना एखाद्या वाईट गोष्टींची चाहूल लवकर लागते. त्या विचाराने मी दोन पावलं मागे सरकलो. पण तरीही मी टॉर्च च्या प्रकाश हळु हळू त्या झाडाच्या खोडा कडून वर नेऊ लागलो. हाताला कंप सुटला होता पण भीती सोबत अंगात असणारा अशक्तपणा ही त्याला तितकाच कारणीभूत होता. टॉर्च चा प्रकाश जसा त्या फांद्यांवर पडला माझ्या सर्वांगातू न जणू विजेचा तीव्र प्रवाह वाहत गेल्या सारखा मी शहारलो. हात पाय थंड पडले. काळीज भीती ने धड धडू लागले. कारण समोरच दृष्य खूप भयाण होत. एक काळसर अमानवीय आकृती माझ्याच दिशेने एकटक पाहत होती. सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे लाल भडक डोळे त्या प्रकाशात चमकत होते. मी प्रचंड घाबरलो होतो पण अजूनही भानावर होतो. माझी पावलं जड झाली होती पण तरीही हळु हळू मी मागे सरकू लागलो.
कदाचित ते जे काही होत ते झाडाखाली असलेल्या कुत्र्यांमुळे खाली येत नसेल असं वाटत असतानाच ते सरपटत खाली येऊ लागले. त्याच सोबत ते एक विशिष्ट आवाज करत खाली येत होत.. आणि त्या आवाजाने ते कुत्रे मागे सरकत होते. एके क्षणी वाटून गेलं की ते माझ्याच मागावर आहे कारण नजर फक्त माझ्या वर खिळली होती. आता मात्र मला तिथून पळण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ओरडावेसे वाटत होत पण आवाजच फुटत नव्हता. अंगातला होता नव्हता त्राण एकवटला आणि जिवाच्या आकांताने धावत सुटलो. कसा बसा घरात आलो आणि अंथरुणात पडलो. पडल्या पडल्या माझी शुध्द हरपली. सकाळी डोळे उघडले तेव्हा अंग इतकं जड झाल होत की मला हलताही येत नव्हत. रात्रीचा सगळा प्रसंग मी घरच्यांना सांगितला. ते मला बोलले की तब्येत ठीक नसताना रात्री अपरात्री बाहेर का गेलेलास ? त्यावर मी त्यांना विशिष्ट वेळेला कुत्र्यांच्या रडण्याबद्दल सांगितले.
पण त्यांना वाटले की मी ३-४ दिवसांपासून तापाने फणफणतोय, खूप अशक्तपणा आलाय म्हणून मला भास होत असेल. पुढचे २-३ दिवस रोज रात्री हेच घडतं होत. आठवडा उलटून गेला म्हणून मी घरीच होतो त्यामुळे कंटाळून गेलो होतो. घरच्यांना विचारून मी जवळच राहणाऱ्या एका मित्राकडे गेलो. खूप दिवसांनी आल्यामुळे मित्राच्या घरच्यांनी तिथेच जेवायचा आणि राहायचा आग्रह केला. मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. जेवण झाल्यावर त्याच्या घराच्या टेरेस वर गेलो आणि गप्पा करत बसलो. वेळेचं भान च राहील नाही. तितक्यात कुत्रे रडण्याचा आवाज येऊ लागला. मी झटकन वेळ पाहिली तर १.३० वाजून गेले होते. या वेळी मलाच नाही तर मित्राला ही तो आवाज ऐकू आला.
विशेष म्हणजे तो आवाज त्याच्या घराच्या अगदी जवळून येत होता. आम्ही टेरेस वर असल्याने मी त्या आवाजाच्या दिशेने पाहायला गेलो. तर समोरच्या झाडावर तीच अमानवीय आकृती बसली होती. मी मित्राला हाक मारायला गेलो तर पुन्हा भीती ने माझी वाचाच बसली. या वेळेस मी ते जे काही होत ते अगदी जवळून पाहिलं. लाल भडक चमकणारे डोळे, चेहऱ्यावर जखमा, तोंडातून निघणारा चिकट द्रव पदार्थ. या वेळेस मीच नाही तर माझा मित्र ही तो सगळा प्रकार पाहत होता. तो किळसवाणा भयाण प्रकार पाहून माझी शुध्द हरपली. मित्राने मला कसे बसे खाली घरात आणले. त्याच्या घरच्यांना शंका आली की म्हणून त्यांनी सकाळी लगेच एका मांत्रिकाला बोलावलं. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. तो पर्यंत माझ्या घरचे ही तिथे आले होते. जशी मला शुद्ध आली तसे त्याने मला प्रश्न केला “ तू काही दिवसांपूर्वी कुठे गेला होतास का.? “ मी जरा आठवून त्याला सांगू लागलो.
हो, काही दिवसांपूर्वी आम्ही ५-६ मित्र जवळच्या जंगलातून नदीच्या दुसऱ्या टोकाला गेलो होतो, तिकडे कोणी फिरत नाही दिवसा ही. कारण तो भागच तसा आहे मी ऐकले होते. पण आम्हा मित्रांना एकांत हवा होता म्हणून आम्ही तिथे गेले होतो. त्या ठिकाणी रस्त्याकडे ला पूजा केल्या होत्या, हळद कुंकू टाचण्या टोचलेले लिंबू, शिजवलेला भात अश्या बऱ्याच गोष्टी दिसत होत्या. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून नदीत पोहायला उतरलो. बऱ्याच वेळा नंतर बाहेर आलो तर माझ्या लक्षात आले की ही वाट आपल्या जुन्या स्मशान भूमी कडे जाते. तिथे लोकांना नेत नाहीत आता कारण गावाचे स्थलांतर झाल्या पासून दुसऱ्या स्मशान भूमीचा जास्त उपयोग केला जातो. मी पोहून बाहेर आलो तर मला त्या वाटेवर झाडाच्या पानावर भात ठेवलेला दिसला. मित्रांचं लक्ष नव्हत हे बघून मी तो पाना सकट उचलला आणि नदीमध्ये नेऊन टाकला.
तेवढाच माशांसाठी उपयोगी येईल हा विचार करून. मग आम्ही सगळे घरी निघून आलो, तेव्हा पासून हे घडतंय. त्यावर तो मांत्रिक म्हणाला “ तू एक उतारा फेकून दिला पाण्यात.. एका साध्या मृत पावलेल्या व्यक्ती साठी ठेवलेला उतारा नव्हता तो.. त्या भागात जे उतारे ठेवले जातात ते सगळे अतृप्त आत्म्यांसाठी असतात, तर कधी अश्या शक्तिंसाठी ज्यांनी या भूतलावर कधी जन्मच घेतला नाही. अशीच एक अमानवीय शक्ती तुझ्या मागे आहे, तिला तुझ शरीर हवंय मानवी शरीर हवंय. येत्या अमावस्येला ते तुझ्यावर पूर्णपणे ताबा मिळवेल. कारण त्या वेळी अश्या शक्ती ना आटोक्यात ठेवणं अशक्य असतं. हे सगळं ऐकल्यावर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो पण माझ्या घरच्यांनी यावर उपाय विचारला.
तसे त्यांनी थोडा विचार करून एक उपाय सांगितला. याचा उतारा काढून त्याच जागी नेऊन ठेवायचा म्हणजे ती अमानवीय शक्ती याचा पाठलाग सोडेल. हे तुम्हाला मध्य रात्रीच करावे लागेल आणि ते ही एक तर पौर्णिमेला किंवा अमावस्येला.. हा दोरा घ्या आणि जे हा उपाय करणार आहेत त्या सगळ्यांनी उजव्या हातात बांधा. जो पर्यंत हा धागा तुमच्या हातात आहे तो पर्यंत कोणतीच शक्ती तुम्हाला काही करू शकणार नाही. घरच्यांनी कॅलेंडर पाहिले तर दुसऱ्याच दिवशी पौर्णिमा होती. जाणार कोण हा प्रश्न नव्हता कारण त्या वेळी जे ३ मित्र माझ्या सोबत होते त्यांनाच माझ्या बरोबर यायला लागणार होते. त्या मांत्रिकाने हेही बजावून सांगितले की एकदा उतारा त्या वाटेवर ठेवला की पुन्हा मागे वळून पाहायचे नाही मग काही ही झाले तरी सरळ घरी निघून यायचे. माझ्या घरच्यांनी तिन्ही मित्रांना बोलावून घेतले.
त्या मांत्रिकाने काही मंत्र पूट पुटून सगळ्यांच्या हातात एक धागा बांधला आणि म्हणाला “काही झाले तरी हा दोरा काढायचा नाही आणि उतारा ठेवून आल्यावर हा आगीत जाळून टाकायचा. मी माझ्या घरी आलो, दुसऱ्याच दिवशी पौर्णिमा होती आणि ती दिवस ती रात्र चुकवून चालणार नव्हत. मी माझ्या सगळ्या मित्रांचे आभार मानले कारण ते एकदाही न विचारता ते माझ्या सोबत यायला तयार झाले होते. दुसऱ्या दिवशी रात्री १० च्या सुमारास सगळे मित्र माझ्या घरी आले आणि आम्ही १०.३० च्या सुमारास उतारा घेऊन निघालो. अर्ध्या तासात त्या जंगलात पोहोचलो. वातावरण अतिशय गूढ होत चाललं होत. आम्ही त्या वाटेवर पोहोचलो. मित्राने इशारा केला तसे मी हातातला उतारा खाली ठेवला. आणि जसे मागे वळलो तसे गुर्गुरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तिथे आम्हा मित्रांशिवाय ही कोणी तरी होत. तीच अमानवीय आकृती..
आम्ही झपाझप पावले टाकत तिथून दूर जाऊ लागलो. तितक्यात मागून एक कर्ण कर्कश किंचाळी ऐकू आली. पण मागे बघायचे नाही हे ठरले होते, आम्ही सगळ्यांनी जीवांच्या आकांताने धाव घेतली. पण सतत अस वाटत होत की आमचा पाठलाग केला जातोय. कसे बसे पडत धडपडत घरी आलो. त्या मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे आम्ही हातातले धागे काढून आगीत जाळून टाकले. सगळ्यांनी मला त्या रात्री पासून ते अनुभव यायचे बंद झाले. पण २ दिवसांनी मला एका मित्राचा फोन आला की तो खूप आजारी आहे. म्हणून आम्ही त्याला भेटायला गेलो. तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून आम्ही सगळेच हादरून गेलो. तो म्हणाला की त्या रात्री माझ्याकडुन खूप मोठी चूक झाली. तो उतारा ठेवल्यावर जेव्हा तो आवाज आला तेव्हा मी मागे वळून पाहिले होते. तेव्हापासून मला रोज रात्री ती अमानवीय आकृती दिसते, ती आता माझ्या मागावर आहे.
मी पटकन म्हणालो त्या मांत्रिकाला बोलावू तेच आपली मदत करू शकतात. मी पटकन त्यांना फोन केला तर फोन दुसऱ्या व्यक्तीने उचलला आणि त्याचे बोलणे ऐकून मी सुन्न च झालो. तो माणूस म्हणाला की गेल्या पौर्णिमेच्या रात्री ते अचानक झोपेतून उठून ओरडू लागले “ माफ कर मला, त्या मुलांची मदत करणार नाही.. आणि त्यातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते जागीच मरण पावले… “ ज्यांनी मला यातून बाहेर निघण्यासाठी मदत केली होती ते आता या जगात नव्हते. माझ्या मित्राचे काय होईल या विचाराने मन सुन्न झाले होते. आता मात्र उतारा आम्हालाच घेऊन जायचा होता. फरक फक्त इतकाच होता की तो धागा आमच्या सोबत नव्हता आणि अमावस्येला अमानवीय शक्तींची ताकद किती तरी पटींनी वाढलेली असेल…