अनुभव – यश वांगाने
अनुभव माझ्या काकी सोबत घडला होता. तिला बरेच विचित्र आणि भयानक अनुभव आले आहेत. हा त्यातला पहिला अनुभव आहे जो सगळ्यात भयाण आहे.. प्रसंग साधारण २४ ते २५ वर्षांपूर्वीचा आहे १९९८ ते १९९९ च्या काळातला. माझे काका काकी तेव्हा गुजरात राज्यात राहत होते कारण कामा निमित्त त्यांना तिकडे शिफ्ट व्हावे लागले होते. त्या काळी ते एका भाड्याच्या खोलीत राहायचे. माझा मामा ही काकांच्या कंपनी मध्ये कामाला होता. त्यांना कधी कधी नाईट शिफ्ट ही करावी लागत असे. एके दिवशी काकी ची तब्येत अचानक बिघडली. तिला खूप अशक्तपणा आला होता आणि डॉक्टरांनी तिला ऍडमिट करायला सांगितले. म्हणून मग जवळच्या एका हॉस्पिटल मध्ये २ दिवसांसाठी तिला ऍडमिट केलं.
मामा आणि काकांची नाईट शिफ्ट असल्याने त्या दोघांनाही तिच्या जवळ थांबत येणार नव्हत. म्हणून शेजारी राहणाऱ्या काकू तिच्या सोबत हॉस्पिटल मध्ये राहणार होत्या. ऍडमिट झाल्यावर पहिला दिवस असाच गेला. पण दुसऱ्या दिवशी रात्री अचानक काकी ला जाग आली. घड्याळात वेळ पाहिली तर २ वाजून गेले होते. तिने बाजूला पाहिलं तर शेजारच्या काकूंना देखील गाढ झोप लागली होती. काकी पाणी पिण्यासाठी उठली आणि खिडकी जवळ ठेवलेल्या तांब्यातील पाणी प्यायला गेली. नकळत तिची नजर खिडकी मधून बाहेर गेली. हॉस्पिटल च्या आवारात पूर्ण शांतता होती.
होता तो फक्त रातकिड्यांचा आवाज. ती पाणी पिऊन मागे वळली तितक्यात तिला जाणवले की हॉस्पिटल च्या गेट जवळ कोणी तरी उभ आहे. जाणवतच तिने झटकन मागे वळून पाहिले तर तिथे खरंच एक बाई उभी होती. नजर वर काकी जिथे उभी होती त्या खिडकीत च होती. ती काकी ला तशीच बघत त्या दिशेने चालत येऊ लागली. का कोण जाणे पण ते दृश्य खूप अस्वस्थ करणारे होते. तिच्या अंगावर भीतीने शहारा उमटून गेला. त्या दोघींची नजरा नजर झाली तसे काकी घाबरून एकदम २ पावलं मागे झाली आणि शेजारच्या काकूंना उठवायला गेली. पण त्या खूप गाढ झोपेत होत्या. तिने पुन्हा त्या खिडकीतून बाहेर पाहिलं पण या वेळेस तिथे कोणीही नव्हत. ती बाई कुठे निघून गेली ते तिला कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी काकी ला डिस्चार्ज दिला. पुढचे काही दिवस तिला आराम करायला सांगितला होता. त्या दिवशी ही काका आणि मामा ची नाईट शिफ्ट होती. काकी एकटीच घरी होती. जेवण आटोपून ती झोपून गेली. रात्रीचा एक वाजून गेला होता. तसे अचानक तिला तिच्या नावाने कोणी बाई आवाज देतेय असे वाटू लागले.. तिला वाटले की शेजारच्या काकू बोलवत असतील म्हणून ती उठून पाहायला गेली आणि हादरली च. हॉस्पिटल च्या खिडकीतून दिसलेली तीच बाई आता त्यांच्या घराजवळ आली होती. काकी ने लांबूनच विचारले “ कोण आहेस तू..? “ त्यावर ती बाई म्हणाली “ चल माझ्यासोबत.. मी तुला न्यायला आले आहे..” काकी घाबरून आत आली. त्या बाई चे हाका मारणे सुरूच होते.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आवाजाने शेजारचे कोणीच जागे झाले नव्हते. कदाचित फक्त काकी लाच ती बाई दिसत होती, तिचा आवाज ऐकू येत होता. जवळपास १ तास ती हाका मारत राहिली आणि नंतर तो आवाज हळु हळू कमी होत बंद झाला. दुसऱ्या दिवशी काकीच्या मनात आले की काका ला सांगून टाकावं पण कदाचित आपल्याला भास झाले असतील असा विचार करून तिने सांगणे आवर्जून टाळले. पण दुसऱ्या दिवशी रात्री काका आणि मामा कामावर गेल्यानंतर तसाच प्रकार घडायला सुरुवात झाली. या वेळेस काकी ने कसलाच प्रतिसाद दिला नाही, संपूर्ण रात्र जागून काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने त्या दोघांनाही सगळा प्रकार सांगून टाकला. काकांना समजायला वेळ लागला नाही की काकी ला बाहेरची बाधा झाली आहे. त्यांनी काही ठिकाणी चौकशी केली आणि एका बाहेरचे बघणाऱ्या व्यक्तीला दाखवले. आणि काकांची शंका खरी ठरली. त्या व्यक्ती ने काकी ला काही वस्तू दिल्या आणि सोबत ठेवायला सांगितल्या. आणि हे ही म्हणाला की ती रोज रात्री हिला न्यायला येईल, दरवाजा उघडू नका. ही बाधा दूर व्हायला काही अवधी जाईल. पण जो पर्यंत मी दिलेल्या वस्तू सोबत आहेत ती तुम्हाला काहीही करू शकणार नाही.
नंतर हळु हळू प्रकरण कमी होत गेलं. बरेच महिने उलटले. कालांतराने काकी ला काही या गोष्टींचा विसर पडू लागला. एके दिवशी काकी नेहमी सोबत ठेवायच्या वस्तू जवळ न घेताच झोपून गेली. मध्य रात्र उलटली असेल तेव्हा अचानक काकी ला अस्वस्थ वाटू लागलं. काही कळेनासं झालं. अचानक तिचा श्वास कोंडू लागला. तिने झटकन आपले डोळे उघडले तर ती बाई काकी च्या अंगावर बसून किळसवाण्या आवाजात हसत होती. काकी तिच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करू लागली पण तिला जागेवरून हलताच येत नव्हतं. त्या दिवशी मामा घरी होता जो दुसऱ्या रूम मध्ये झोपला होता. ती त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा आवाज त्याच्या पर्यंत पोहोचतच नव्हता.
जणू तिचे ओरडणे तिचा आवाज त्याच खोलीत विरून जात होता. तिने देवाचा धावा सुरू केला आणि दचकून जागी झाली. तिला जणू धाप लागली होती. कदाचित तिला हे भयाण स्वप्नं पडलं होत. तिला काही महिन्यापूर्वी घडलेल्या गोष्टी आठवल्या तसे तिने झटकन उठून त्या व्यक्तीने दिलेल्या वस्तू घातल्या व तशीच बेड वर बसून राहिली. इतकं भयानक स्वप्न पाहून तिची झोप उडून गेली होती. पण तितक्यात तिला बाहेरून हाक ऐकू आली “ येतेस ना मझ्या सोबत.. “ त्या बाई ने काकी चा माग सोडला नव्हता. या घटने नंतर काकी ला बऱ्याच देवस्थानात नेऊन आणले तेव्हा कुठे तिला हे विचित्र आणि जीवघेणे अनुभव यायचे कायमचे बंद झाले.