आम्ही रोज रात्री मित्रांबरोबर चालायला जायचो. ते आमचा एक ठरलेलं काम होतं. गावा बाहेरचा एक रस्ता होता जिथे आम्ही नेहमी चालायला जायचो. त्या रस्त्यावर एक पूल होता आणि त्याच्यासमोर एक मोठ जांभळाचं झाड होतं. काही दिवसांनी आम्हाला त्या झाडाबद्दल एक विचित्र बातमी समजली. एका व्यक्तीने त्या झाडाला लटकून आत्महत्या केली होती. ही गोष्ट ऐकून आम्हाला धक्काच बसला कारण हा रस्ता आणि ते झाड आमच्यासाठी नेहमीच होतं. त्या घटनेनंतर गावात चर्चा सुरू झाली की रात्रीच्या वेळी त्या झाडाच्या आसपास काहीतरी विचित्र घडतं. काहींनी सांगितलं की रात्री तिथे चित्र विचित्र भास होतात. हे ऐकून आम्ही थोडे सावध झालो आणि दोन-तीन दिवस रात्री चालायला जाणं बंद केलं. पण नंतर असं वाटू लागलं की या गोष्टीत किती तथ्य आहे हे पाहिलं पाहिजे. शेवटी आम्ही ठरवलं की त्या रस्त्यावर पुन्हा जाऊन त्या झाडाच्या आणि पुलाच्या जवळून जाऊ.
त्या घटनेनंतरचा तो तिसरा दिवस होता. आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो आणि नेहमीप्रमाणे चालायला निघालो. जरा भीती होती पण मनात धैर्य ही होतं ही कदाचित काहीच नसेल. जसजसे आम्ही त्या पुलाजवळ पोहोचलो तसतसं काहीतरी वेगळच वाटू लागलं. अचानक वातावरणातला गारवा वाढू लागला आम्ही जागीच थांबलो एकमेकांकडे पाहू लागलो. वातावरणातला बदल सगळ्यांना जाणवू लागला. आम्ही आजूबाजूला पाहिलं पण तिथे कोणीही नव्हतं. आम्हाला वाटलं की बोलल्या जाणाऱ्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत. म्हणून आम्ही माघारी फिरून तिथून जायला निघालो पण अचानक त्या झाडाची फांदी तुटून खाली पडली. त्या आवाजाने आम्ही सगळे दचकून थांबलो. आम्ही झटकन वर पाहिलं पण वर झाडावर कोणीच नव्हतं.
ही फांदी तुटून खाली कशी पडली हा विचार करू लागलो. पण तितक्यात एक वेगळाच आवाज येऊ लागला. म्हणजे कोणी तरी जीव वाचवण्यासाठी तडफडतय असा. आम्ही सगळी कडे पाहू लागलो पण आवाजाची दिशा कळतं नव्हती. आमच्यातले एक दोन जण म्हणाले कि इथे खूप अस्वस्थ वाटतेय. म्हणून आम्ही तिथून चालायला सुरुवात केली. पाच-दहा मिनिट चालून आम्ही पुढे आलो. जेव्हा आम्ही आजूबाजूला पाहिलं तेव्हा आम्हाला धक्काच बसला कारण आम्हाला समजलं की इतकं अंतर चालून ही., आम्ही अजूनही त्या पुलाजवळच उभे आहोत. हे पाहून आमचं डोकं चक्रावलं कारण आम्ही तर पुढे चालत गेलो होतो मग पुन्हा इथेच कसे आलो.
सगळेजण घाबरून एकमेकांकडे पाहू लागलो कोणालाही काही कळत नव्हतं. एक विचित्र भय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं. आम्ही घाबरून देवाचं नाव घेतलं आणि तिथून बाहेर पडायचं ठरवलं. आम्ही कसेबसे शेवटी घरी पोहोचलो. पण त्या रात्रीची आठवण अजूनही मनात घर करून बसली होती. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आतापासून त्या रस्त्यावर कधीही फिरकायचं नाही. इतकच काय पण त्या रस्त्याकडे पहायचं ही टाळायचं. त्या दिवसानंतर आमच्यापैकी कोणीच पुन्हा त्या रस्त्यावर गेलं नाही. गावातल्या चर्चाही काही दिवसांनी थांबल्या. पण आम्हाला मात्र ती एका रात्रीची घटना कधीही विसरता आली नाही.