मी ती रात्र कधीही विसरू शकणार नाही. त्या रात्रीने माझे आयुष्य कायमचेच बदलून टाकले. नुकताच जॉब स्विच करून दुसऱ्या राज्यात आलो होतो. पॅकेज खूप चांगले मिळाले होते म्हणजे कधी विचार ही केला नव्हता इतके. त्यामुळे कसलाही विचार न करता शिफ्ट झालो होतो. राहायचा, जाण्या येण्याचा सगळा खर्च कंपनी करणार होती त्यामुळे सगळे सेट होते. माझी जुनी कार घेऊन आलो होतो म्हणजे ऑफिस ला जाता येताना बरे पडेल. फक्त एकच त्रास होता की जिथे रूम भाड्यावर मिळाली तिथून माझे ऑफिस जवळपास १ तासावर होते. आणि त्या भागात नवीन असल्यामुळे रस्ते माहीत नव्हते. पहिलाच दिवस होता. सकाळी लवकर निघालो आणि जीपी एस वापरुन तर रस्त्यात काही लोकांना विचारत विचारत ऑफिस मध्ये येऊन पोहोचलो.

पहिल्या दिवशी काही काम नव्हतं फक्त ओळखी झाल्या, कामाचं थोड स्वरूप कळलं. संध्याकाळी नेमका फन फ्रायडे इव्हेंट होता त्यामुळे तो आटोपून निघायला रात्र झाली. खूप थकायला झालं होत, का ते माहीत नाही. कदाचित नवीन जागा, नवीन लोक त्यामुळे असावं. बिल्डिंग मधून खाली उतरलो, पार्किंग मध्ये जाऊन कार मध्ये बसलो आणि जिपी एस सुरू केलं. आता खरी तारेवरची कसरत होणार होती कारण गुगल मॅप च्या मदतीने घरी पोहोचायचे होते. पार्किंग लॉट मधून कार बाहेर काढली आणि रस्त्याला लागलो. शहराचा भाग असला तरी मध्य रात्र उलटून गेल्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. अधून मधून एखादी चार चाकी जोरात बाजूने निघून जायची. एकांत जाणवू लागला तसे पटकन मी कार च्या म्युझिक सिस्टीम वर गाणं लावलं. तेच गुणगुणत ड्रायव्हिंग करत होतो. 

येताना ज्या रस्त्याने आलो तो रस्ता जी पी एस दाखवत नव्हत. कदाचित शॉर्ट कट असेल किंवा कमी वर्दळीचा असेल असा विचार करून मी थेट कार त्या रस्त्याला वळवली. रस्ता सरळ होता, ३-३४ किलोमिटर चा आणि मग पुढून एक वळण होत. त्या वळणावर आलो तसे मला जाणवले की लाकडाचा मोठा ओंडका माझ्या उजव्या बाजूने येतोय आणि तो आता कारवर आदळणार. मी घाबरून करकचून ब्रेक मारला. एक वेगळाच आवाज करत कार थांबली आणि त्या वातावरणात भयाण शांतता पसरली. तो लाकडाचा ओंडका कुठे गेला. की मला फक्त भास झाला. मी आजूबाजूला पाहिले पण तिथे काहीच दिसलं नाही. पुन्हा इग्निशन देऊन कार चालू केली तर इंजिन मधून वेगळाच आवाज येऊ लागला. बाहेर येऊन पहायची इच्छा नव्हती.

म्हणून त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून टी भागातून पुढे निघालो. साधारण ४५ मिनिट झाली असावीत तरीही जी पी एस अजुन ५५ मिनिट पोहोचायला लागतील असे दाखवत होत. त्यामुळे मला जरा गोंधळायला झालं होत. परिसर पूर्णपणे अनोळखी होता. पहिल्यांदाच त्या भागात आलो होतो. कोणाला विचारायचे म्हंटले तर ते ही शक्य नव्हते. बहुतेक दुकान एव्हाना बंद झाली होती. रस्त्यावर ही कोणी नजरेस पडत नव्हते ज्याला रस्ता विचारू शकेन. ऑफिस मधल्या कोणाला विचारायचे म्हंटले तर आधीच खूप उशीर झाला होता. इतक्या उशिरा फोन केला तर काय विचार करतील. म्हणून ते ही शक्य नव्हते. मी गप गुमान त्या जी पी एस च्या हिशोबाने पुढे जात राहिलो. काही वेळा नंतर लक्षात आले की आपण ज्या रस्त्याने जात आहोत त्याच्या डाव्या बाजूला समुद्र किनारा आहे. कारण समुद्राच्या लाटांचा मंद आवाज कानावर पडू लागला.

आपण नक्की कुठे आलोय. रूम वरून ऑफिस ला येताना तर हा रस्ता लागलाच नाही. मी विचार केला की कार रस्त्याकडे ला पार्क करून उतरून पहावे की नक्की कोणता परिसर आहे. मी बाहेर आलो आणि नकळत लाटांच्या आवाजाचा माग काढत आत जाऊ लागलो. सुरुवातीला खुरटी झुडूप नंतर मोठी सुरुची झाड आणि मग नंतर किनाऱ्यावरची वाळू. मोबाईल फ्लॅश लाईट सुरू केला तर समोर समुद्राच्या फुटणाऱ्या लाटा नजरेस पडल्या. वातावरण अगदी शांत होत. आवाज होता तो फक्त समुद्राच्या लाटांचा. का कोण जाणे पण काही वेळ तिथेच थांबावेसे वाटले. शुज काढले तसे पायाला वाळूचा थंडगार स्पर्श जाणवला. काही वेळ तिथेच उभा राहिलो. वारा असा नव्हता पण तरीही थंडावा जाणवत होता. तितक्यात मागून सुरूच्या झाडांमध्ये कसलीशी सळसळ जाणवली.

मी पटकन मागे वळून पाहिले तर त्या अंधारात दोन पिवळे डोळे चमकले. कळलं नाही काय आहे. एखादा प्राणी पण मग तो असे झाडावर कसा काय चढेल. मी मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू केला आणि त्या दिशेला फिरवला पण त्या झाडा पर्यंत तो प्रकाश पोहोचत नव्हता. तितक्यात ते जे काही होत ते सरपटत खाली येत असल्यासारखे जाणवू लागले. मी श्वास रोखून ते दृश्य पाहू लागलो. एक विचित्र आवाज कानावर पडू लागला. झाडाच्या फांद्या सारखे बारीक पण लांबसडक हात आणि शरीर.. तोंडातून गळणारा चिकट लाळे सारखा पदार्थ.. आणि पिवळसर डोळे.. जणू नर पिशाच्च त्या झाडाच्या खोडवरून उलट सरपटत खाली येत होत. मी काय पाहतोय हेच कळत नव्हत. भीती ने बोबडीच वळली होती. माझे दोन्ही पाय जणू त्या वाळूत रुतल्या सारखे झाले होते.. मी पाळायचा प्रयत्न केला पण मला जागच हलता ही येत नव्हत. 

तेवढ्यात धपकन आवाज आला आणि ते जे काही होत ते झाडावरून खाली उतरून माझ्या दिशेने तसेच सरपटत येऊ लागलं. माझे सर्वांग भीती ने शहारले होते.. काळीज जोर जोरात धडधडत होते. बहुतेक उद्याचा दिवस आपण पाहू शकणार नाही याची खात्री झाली. ते माझ्या समोर येऊन उभ राहिलं आणि जोर जोरात श्वास घेऊ लागलं. ते भयाण दृश्य पाहवत नव्हत म्हणून मी डोळे घट्ट मिटून घेतले. तितक्यात जोरात एक बाईक आली.. माझ्या समोर जे काही उभ होत ते दूर फेकल गेलं.. त्या आवाजाने मी भानावर आलो. मला हाक ऐकू आली.. बघतोस काय पळ इथून… अंधारात दिसलं नाही कोण होत पण जणू देवासारखे धावून आले होते. मी जास्त विचार न करता तिथून धावत सुटलो आणि माझ्या कार जवळ आलो.

खिशात हात घालून चावी चाचपू लागलो पण सापडतच नव्हती. तितक्यात मागून पुन्हा तो विचित्र आवाज येऊ लागला आणि तितक्यात हाताला चावी लागली. पटकन कार उघडुन मी आत बसलो आणि तिथून निघालो. अजूनही काळजाची धड धड थांबली नव्हती. रस्ता दिसेल तिथे जात होतो कारण मला त्या भागापासून दूर जायचे होते.. आता मात्र मी कसलाही संकोच न बाळगता ऑफिस मधल्या एका कलिग ला फोन केला पण त्याने तो उचलला नाही. आता काय करायचे हा विचार करत असताना एक जोरात आवाज झाला. तो आवाज कार च्या टपावर काहीतरी आदळण्याचा होता. मी कार चा वेग अजुन च वाढवला कारण मला वाटतं होत कदाचित तेच नर पिशाच्च आहे. कारण ते सहजा सहजी मला सोडणार नाही. नखाने ओरबाडण्याचा आवाज येऊ लागला जो जणू माझे काळीज चिरत होता. 

हळु हळु ते माझ्या काचे समोर येऊ लागले. मी पहिल्यांदाच असे काही भयानक पाहिले असेल. काही कळायच्या आत ते पिशाच्च जोरात ओरडले आणि माझा स्टिअरिंग वरचा ताबा सुटला. या नंतर काही सेकंद फक्त कानठळ्या बसविणारे आवाज ऐकू येत होते. कारण माझी कार खूप वेगात होती आणि त्या वेगात ती आदळत होती. साधारण मिनिटानंतर सगळ काही शांत झालं. हातापायाला जबर मार लागला होता. डोकं फुटून रक्तस्त्राव झाला होता. स्टिअरिंग व्हील वर जखमेतून वाहणारे रक्त थेंब थेंब पडत होतं. तसे माझ्या काना जवळ गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला आणि हळु हळू करत माझी शुद्ध हरपली. डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटल च्या बेड वर होतो. कोणी आणले होते माहीत नाही मला..

मी डॉक्टरांना विचारून पाहिले पण त्यांना ही त्या व्यक्तीचे नाव माहीत नव्हते. फोन पाहिला तर झालेल्या अपघातात त्याचा जवळजवळ चुराडा झाला होता. त्यामुळे कोणाला संपर्क करायचा मार्ग नव्हता. एका नर्स ला विनंती करून फोन घेतला. घरी आणि ऑफिस मध्ये कळवले. हॉस्पिटल रूम मध्ये एकटाच झोपून होतो. बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहत होतो. तितक्यात पुन्हा एकदा काचेवर ओरबडण्याचा आवाज येऊ लागला…

Leave a Reply