अनुभव – शुभम सुर्वे

ही गोष्ट माझ्या वडिलांसोबत घडली होती. त्यांच्या एका मित्राचे लग्न ठरले होते. त्यामुळे वडिलांना आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुप ला लग्नाचे आमंत्रण होते. लग्न कोकणातल्या एका गावात होते आणि सगळ्यांनी जायचे नक्की केले होते. वडिलांनी एक कृजर गाडी बुक केली. लग्नाच्या दिवशी सकाळीच ते मुंबई हून निघाले आणि ठरलेल्या वेळेत लग्न समारंभात पोहोचले. लग्न अगदी मोठ्या धामधुमीत झाले. जेवण उर कायला जरा उशीरच झाला. संध्याकाळी वरात निघणार होती आणि काही तासात घरी पोहोचणार होती. वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी ठरवले की वरातीत मस्त एन्जॉय करून आपल्या मित्राला घरी सोडून मग परतीच्या प्रवासाला निघायचे. 

पण नेमकी एक वाईट गोष्ट घडली. मित्राच्या घरा शेजारील एक वयोवृद्ध आजीबाई वारल्या. वरात निघणार होती पण बातमी ऐकून निघाली नाही. बराच वेळ चर्चा झाली. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार ही पडायला सुरुवात झाली. शेवटी निर्णय झाला. अश्या परिस्थितीत वरात घेऊन जाणं बरे दिसणार नाही म्हणून वरा तिचा सगळा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तसे यांनी मित्राचा निरोप घेऊन निघायचे ठरवले. जिथे राहिले होते तिथून सगळे आटोपून निघायला अपेक्षे पेक्षा जरा जास्तच उशीर झाला. त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला. गावातून बाहेर पडून त्यांनी काही किलोमिटर चे अंतर पार केले. एव्हाना ११ वाजत आले होते. गावाचा परिसर असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. अधून मधून एखादे वाहन नजरेस पडायचे आणि पुन्हा रस्ता अगदी सामसूम व्हायचा. 

प्रवासात असताना च अचानक ड्रायव्हर म्हणाला की गाडी पंक्चर झाली असे वाटतेय. त्यातल्या एका मित्राने गाडी थांबवायला सांगितली. वडिलांनी घड्याळात वेळ पाहिली तर १२ वाजायला आले होते. गाडी थांबवून तपासले तेव्हा कळले की गाडी चे मागचे एक टायर पंक्चर झालेय. वडिलांनी गाडीत पाहिले पण नेमकी स्टेपनी ही नव्हती. ड्राय वर ने पटकन जॅक लाऊन पंक्चर झालेले टायर काढले आणि म्हणाला की इथून पुढे काही अंतरावर एक गाव आहे, तिथे जाऊन कोणी पंक्चर काढून देतय का ते बघतो.. माझ्या बरोबर एकाने चला म्हणजे म्हणजे मला सोबत होईल. त्यांच्यातल्या एक मित्र तयार झाला आणि ते दोघे त्या गावाच्या दिशेने निघून गेले. बराच वेळ उलटून गेला. वडिलांनी सहज म्हणून वेळ पाहिली तर १.३० वाजायला काही मिनिट बाकी होती. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या मित्रांनी जोरदार दारूकाम केले होते त्यामुळे ते गाडीत अगदी गाढ झोपले होते.

बसून बसून कंटाळा आला म्हणून ते एकटेच गाडी बाहेर येऊन उभे राहिले आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागले. अगदी गडद अंधार पसरला होता. गाडीचा हेड लाईट चालूच . त्याच प्रकाशात रस्त्या जवळ असलेली काही झाड दृष्टीस पडत होती. त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर फिरवली. परिसर अगदी निर्मनुष्य वाटत होता. नजर जाईल तिथपर्यंत कोणीही दिसत नव्हते. कसलीही वस्ती नाही. त्यात रस्त्यावरून गेल्या २ तासात एकही वाहन दिसले नव्हते. बराच वेळ वडील जागे राहून पंक्चर काढायला गेलेल्या ड्रायवर ची आणि त्याच्या सोबतीला असलेल्या मित्राची वाट पाहत होते. वातावरणात गारवा कमालीचा वाढला होता. तितक्यात सगळे काही एकदम शांत झाले. अधून मधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याची झुळूक ही एका एकी थांबली. 

गाडीच्या हेडलाईट च्या पडणाऱ्या प्रकाशा त समोरच्या एका झाडामागे कसलीशी हालचाल जाणवली. ते निरखून पाहू लागले. ते झाड आंब्याचे असल्यासारखे भासत होते. तितक्यात त्या झाडा मागून एक सावली बाहेर आली. ते दृश्य पाहून त्यांच्या अंगावर भीतीने शहारे येऊ लागले. ती एका बाईची सावली वाटत होती. ती त्यांच्या कार जवळ चालत येऊ लागली तसे तिचे रूप तिचा पेहराव स्पष्ट दिसू लागला. अंगात हिरवी नव्वारी साडी , हातात हिरवा बांगड्यांचा चुडा होता. शिवाय एका हातात परडी घेतली होती. केस लांब लचक मोकळे सोडलेले. वडिलांनी समोरचे दृश्य बघून इतर मित्रांना उठवले. त्यातले काही मित्र जरा वैतागत च उठले. वडिलांनी त्यांना बाहेर यायला सांगितले तसे त्यातले २-३ जणं बाहेर आले आणि समोरचे ते दृश्य पाहू लागले. 

ते पाहून त्यांची चढलेली एका क्षणात उतरली. त्यातला एक जण म्हणाला “अरे कोण आहे ही.. वाजलेत बघ किती.. इतक्या रात्री ही अशी इथे काय करतेय”. त्यावर कोण काही बोलणार तसे जाणवले की ती जरा वेगात च त्यांच्या दिशेने चालत येतेय. सगळ्यात विचित्र आणि भयानक गोष्ट म्हणजे तिची उंची अगदी अतिसामान्य होत होती. ६ फूट, ७ फूट, ८ फूट.. ते पाहून त्यांच्यातला एक हळूच पुटपुटला “काय प्रकार आहे हा..” ती बाई जवळ येऊन त्यांच्या गाडी भोवती फेऱ्या मारू लागली. सगळ्या मित्रांची तर भीतीने गाळण उडाली होती. चढलेली नशा तर कुठच्या कुठे निघून गेली होती. वडील मनातल्या मनात देवाचा धावा करू लागले. तिने ४-५ फेऱ्या मारल्या असाव्यात. आणि ब्रम्ह मुहूर्ताची वेळ झाली. तसे ती हळू हळू चालत जात पुन्हा त्या झाडाकडे जाऊ लागली आणि एके क्षणी डोळ्यांदेखत दिसेनाशी झाली. 

वडील आणि त्यांचे मित्र धड धड त्या काळजाने तो प्रकार पाहत राहिले. कोणीही काहीच न बोलता गाडीत जाऊन बसले. पुढच्या तासाभरात ड्रायवर आणि मित्र आले. त्यांचा असा घाबरलेला अवतार बघून ड्रायवर ने त्यांची विचारपूस केली. तेव्हा वडिलांनी घडलेला प्रकार सांगितला. तिचा असामान्य आकार, गाडी भोवतीच्या फेऱ्या वैगरे सगळे सविस्तर सांगितले. त्यावर ड्रायव्हर म्हणाला की हडळ होती ती. तिची वेळ संपली असणार म्हणून ती तुम्हाला काही करू शकली नाही बहुतेक. त्यांनी ड्रायव्हर ला त्या भागातून लवकरात लवकर निघायची विनंती केली. पुढचे काही दिवस वडील आणि त्यांचे ते मित्र आजारी पडले होते. 

Leave a Reply