अनुभव – प्रणित कुबल
हा अनुभव माझ्या आई ने मला सांगितला होता जो माझ्या मावशीला आला होता. घटना साधारण १९७२ ते १९७४ ची आहे. तेव्हा माझ्या मावशीचे वय १९ असेल बहुतेक. त्या काळी घरो घरी टिव्ही वैगरे आले नव्हते. त्यामुळे सिनेमा पाहायला सिनेमागृ हातच जावे लागायचे. असेच एके दिवशी माझी मावशी तिच्या काही मैत्रिणीसोबत चित्रपट पाहायला गेली. रात्री चा शो होता त्यामुळे घरी यायला उशीर होणार होता. सिनेमा संपला आणि त्या घरी यायला निघाल्या. साधारण १२.१५ झाले असावेत. मावशीच्या मैत्रिणी आप आपल्या घरी निघून गेल्या. मावशी चे घर अजुन थोडे पुढच्या बाजूला होते. ती आपल्याच धुंदीत चालत निघाली होती.
तितक्यात चालत असताना रस्त्या कडेला तिला एका उतारा दिसला. ती पाहून थोडी घाबरली च. कारण तिने या आधी उतारा का काढून ठेवतात या बद्दल ऐकले होते. तिने पाहून न पाहिल्या सारखे केले आणि त्या उताऱ्या कडे दुर्लक्ष करत झपा झप पावले टाकत घराची वाट धरली. ती काही मिनिटातच घरी येऊन पोहोचली. काही दिवस उलटले. तिला चित्र विचित्र स्वप्न पडू लागली. ती दचकून झोपेतून जागी व्हायची. तिच्या सोबत नक्की काय घडतंय हेच तिला कळत नव्हत. स्वप्न च असतील असे समजून ती त्या कडे दुर्लक्ष करत राहिली. पण त्या रात्री जे घडले ते स्वप्न होते की अजून काही हे मात्र तिला कळले नाही. त्या रात्री ती जरा उशिरा झोपली. खूप गाढ झोप लागली होती. तसे तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा होऊ लागले. आपल्याला नक्की काय होतंय ते तिला कळत नव्हत. डोळे बंद असले तरी तिला कसलीशी चाहूल जाणवू लागली.
तिच्या खोलीत तिच्या व्यतिरिक्त अजुन कोणी तरी होत. तिला पुसट से दिसू लागले. माणसाच्या आकारातली एक काळपट आकृती खोलीच्या एका कोपऱ्यात उभी होती. बघता बघता ती तिच्या जवळ येऊ लागली. मावशी हलायचा, ओरडायचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडातून आवाज च फुटत नव्हता. ती आकृती तिच्या अगदी जवळ येऊन पोहचली आणि तिचा गळा दाबू लागली. तिचा श्वास गुदम रू लागला. ती हात पाय हलवायचा प्रयत्न करत होती पण ते तिला शक्य होत नव्हत. शेवटी संपूर्ण ताकदीनिशी तिने प्रयत्न केला आणि अंथरुणात उठून बसली. मोठ मोठ्याने श्वास घेऊ लागली. तिला धाप लागली होती. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली कारण ती प्रचंड घाबरली होती. तिची नजर खोलीत त्या अकृतीला शोधू लागली. खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात तीची ती भेदरलेली नजर जाऊ लागली. पण तिथे कोणीही नव्हते. स्वप्न होते की सत्य.. गळ्यावरची पकड तर अगदी स्पष्ट जाणवली होती तिला.. आपल्याला नक्कीच स्वप्न पडले असेल असा विचार करून ती पुन्हा झोपून गेली.
१०-१२ दिवस झाले असतील. त्या रात्री पुन्हा तिला तेच जीवघेणे स्वप्न पडले आणि स्वप्नाचा एक जीवघेणा क्रम सुरू झाला. तीच काळपट आकृती येऊन तिचा गळा दाबायची. मावशी ला काहीही करता यायचे नाही. बराच वेळ तिचा श्वास गुदम रायचा आणि ती झोपेतून घाबरून उठायची. शेवटी न राहवून तिने आईला म्हणजे माझ्या आजीला ला सांगितले. आजीने तिला मागच्या काही महिन्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी विचारल्या. आजी ने विचारल्यानंतर तिने त्या रात्री घरी येताना ऊतारा उताऱ्या जवळून गेल्याचे, तो पाहिल्याचे सांगितले आणि आजीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आजी ला समजले की हा काहितरी वेगळा प्रकार आहे. त्यानंतर मावशी ची ही स्वप्ने थांबवण्यासाठी आजी आजोबांनी खूप प्रयत्न केले. देवळात नवस केले. एवढेच नाही तर तांत्रिक-मांत्रीक उपचार सुद्धा केले. पण कशाचाही उपयोग झाला नाही. तिला तर आता झोपेची भीती वाटू लागली होती.
बघता बघता तब्बल २ वर्षे उलटली. मावशी ला होणारा त्रास सुरूच होता. आजीला ही आपल्या मुलीला होणारा त्रास बघवत नव्हता. तिचे ही वय झाले होते. कालांतराने ती ही आजारी पडली. मावशी आजी ला बिलगून खूप रडायची आणि म्हणायची “आई कधी संपणार ग माझा हा त्रास…?” पण आजीकडे या गोष्टीचे काहीच उत्तर नसायचे. आपल्या मुलीला होणारा त्रास ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती पण तो थांबवण्यासाठी, निदान कमी करण्यासाठी तिला काहीच मार्ग मिळाला नव्हता. आणि एक घटना घडली ज्याने मावशी च आयुष्य बदलल. 20 एप्रिल 1974. दीर्घ आजारा मुळे माझ्या आजीला देवाज्ञा झाली. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आजी ला नेण्या पूर्वी तिला पलंगावर ठेवले होते. सगळे नातेवाईक वैगरे आल्यावर आजी चा अंत्यविधी झाला. घरी आल्यावर सगळ्यांनी आटोपून झोपायची तयारी केली. झोपायला ही बराच उशीर झाला. साधारण १.३० वाजले असावेत.
मावशीला पुन्हा तो त्रास होऊ लागला. गळ्यावर तीच पकड जाणवू लागली. ती काळपट आकृती स्पष्ट दिसत होती. तितक्यात तिचे लक्ष बाजूच्या पलंगावर गेले. तिथे आजी झोपली होती. मावशीला अश्या अवस्थेत पाहून आजी पलंगावरून खाली उतरली. त्या आकृती ला धरले आणि थेट आतल्या खोलीत घेऊन गेली. मावशी ला पुसट शे दिसत होते. बघता बघता आजी आणि ती काळपट आकृती एका क्षणी दिसेना श्या झाल्या. मावशी झोपेतून खडबडून जागी झाली. ती भानावर आली होती. आपली आई तर आता या जगात नाही मग आता पाहिलेले दृश्य.. झटकन तिचे लक्ष पलंगावर गेले, तिथे आजोबा झोपले होते. त्या रात्री नंतर मावशी ला तसा त्रास पुन्हा कधीच झाला नाही. आजी हयात असताना काही करू शकली नाही पण नंतर का होईना तिने आपल्या मुलीला त्या त्रासा पासून कायमचे दूर केले. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी एक आई काय करू शकते ह्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही..