अनपेक्षित – मराठी भयकथा

Reading Time: 4 minutes

लेखक – विनीत गायकवाड

महेशला जाऊन आज साडे तीन वर्षे झाली. मला अजून ही विश्वास बसत नाही की तो माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय. किती आशेने मी त्याच्याशी लग्न करून या घरात आले होते. आमचा संसार सुखाने चालला होता, आणि का कोण जाणे कुणाची नजर लागली आम्हाला. त्या दिवशी ऑफिसमधून घरी येताना एका दुर्दैवी अपघातामध्ये महेशचा मृत्यू झाला. मी एकटे पडले. आई बाबांनी खूप समजावलं की हा बांगला सोडून परत माहेरी ये राहायला, पण मी नाही गेले. महेशच्या आठवणी आहेत इथे. त्यांना सोडून मी कशी जगू शकेन? मला माहिती आहे की इतक्या मोठ्या बंगल्यात कुणीही एकटं घाबरून जाऊ शकतं, पण मी नाही. माझच घर आहे ना हे. मग घाबरण्या चा प्रश्नच येत नाही. 

मला स्वतःबद्दल फार विश्वास होता पण तरीही मी किती चुकीची आहे याची मला कालच्या अनुभवामुळे जाणीव झाली. आपण कितीही नाही म्हटलं तरी मनाच्या एका कोपऱ्यात थोडी का होईना भीती ही असतेच आणि ती फक्त बाहेर निघण्याची संधी बघत असते. काल, संध्याकाळी मी कामावरून परत घरी आले, हातपाय धुवून चहा करायला घेतला. चहा घेत असताना अचानक दारावरची बेल वाजली. या वेळी कुणी येणं अपेक्षित नव्हतं तरी कोण आलं आहे बघायला मी दाराकडे वळले. इतक्यात बंगल्याच्या मागच्या खोलीची खिडकी अचानक उघडली. मी परत मागे वळले आणि खोलीची खिडकी नीट बंद करून पुढच्या दाराजवळ आले. दार उघडताच समोर कृष्णा मावशी घाबरलेला चेहरा करून उभ्या होत्या. कृष्णा मावशी माझ्या शेजारच्या बंगल्यामधल्या मोलकरीण होत्या. त्या अधून मधून काही ना काही मागायला माझ्याकडे येत असत पण त्यांचा चेहरा बघून मी विचारले

“काय झालं मावशी? घाबरलेल्या का दिसता?”

“ताई..तुम्ही घरातच आहात का..का कुठं बाहेर जाणार आहात?”

“का काय झालं?”

तशी ती सांगू लागली “ताई..मगाशी पोलीस आले होते..त्यांनी आपल्या कडच्या सगळ्यांना सावध राहायाला सांगितलं आहे..कुठली तरी माथेफिरू बाई जवळच्या दवाखान्यातून फरार झाली आहे आणि आपल्या भागातच तिला कोणी तरी शेवटचं बघितलंय. पोलीस म्हणत होते की तिने वेड्याच्या नादात एक खून पण केला य..”

“अरे बापरे !”

“हो..तुम्ही मगाशी नव्हता म्हणूनच तुम्हाला सांगायला आले मी..”

“दारं खिडक्या बंद करून ठेवा..काही लागलंच तर आवाज द्या.. पण एकट्या बाहेर पडू नका किंवा पटकन दरवाजा ही उघडू नका..”

इतकं म्हणून कृष्णा मावशी झपाझप पावले टाकत तिथून निघून गेल्या. बाहेर अंधार पडला होता आणि पोलिसांनी ताकीद दिल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट होता. मी दार लावून आत आले. आता बाहेर जायचा प्रश्न नसल्यामुळे मी टीव्ही लावून बघत बसले. टीव्ही बघता बघता कधी डोळा लागला कळलंच नाही. काही वेळानंतर अचानक जाग आली. मी डोळे चोळून पहिले तर रात्रीचे अकरा वाजले होते.

“बाप रे ! किती वेळ होऊन गेला”, मी स्वतःलाच म्हटले.

जेवण ही नाही केलं अजून. मी तशीच उठले आणि इतक्यात मागच्या खोलीची खिडकी पुनः एकदा वाजली.

माझ्या छातीत एक्दम धस्स झालं. मगाशीच मी खोलीची खिडकी बंद केली होती मग परत कशी काय उघडली?

कृष्णा मावशीने दिलेल्या बातमीची आठवण होताच माझा जीव घाबरु लागला होता. मी दबक्या पाउलांनीच खोलीकडे वळाले. दाराच्या अलीकडे ठेवलेला फ्लावरपॉट उलटा करून हातात धरला आणि हळूच खोलीचा दरवाजा उघडला. आत मिट्ट अंधार होता. मी भिंतीवर हात चाचपडत ट्यूबलाईटचं बटण दाबलं पण ट्यूब पेटलीच नाही. खोलीत अंधारच होता. मनात नको नको ते विचार येत होते. भीती काय असते हे आज मला कळले होते. मी लगेच खोलीच्या बाहेर येऊन दाराला कडी लावली आणि माझा फोन शोधू लागले. मला जाणीव झाली की फोन मी खोलीतच विसरले होते. कामावरून आल्यावर मी खोलीत फोन चार्जिंगला लावला आणि नंतर तो काढायचा राहून गेला.

आता काय करू? काही समजेना..मी घराच्या प्रमुख दाराकडे वळले पण खोलीत जर कोणी असेल तर ते खिडकीतून परत समोर येईल असं वाटलं कारण मागच्या खोलीपासून पुढच्या दाराकडे यायला बंगल्याच्या बाजूने बोळ होती. एका क्षणासाठी महेशची खूप उणीव भासली. आई बाबांनी परत माहेरी यायचा केलेला आग्रह ही आठवला पण आता धाडस दाखवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

मी काही क्षण विचार केला आणि लॅन्डलाईन वरून पोलिसांना फोन लावला. पोलिसांना मी सांगितलं की, मी घरी एकटी आहे पण घरात कोण तरी अजून आहे याची मला शंका आहे. पोलीस माझं नाव आणि पत्ता विचारतच होते की इतक्यात मला खोलीतून मांजरीचा आवाज आला. तोच आवाज खोलीतून बाहेरच्या बोळी कडे वळल्याचा भास झाला आणि बंगल्याच्या शेजारून तो आवाज कमी होत होत शांत झाला.

माझा जीव भांड्यात पडल्यासारखं मला वाटलं. मला कळून चुकले होते की, परी नावाची एक मांजर खूप जणांच्या खिडकीतून घरात घुसत होती आणि आज तिने माझं घर निवडलं होत.

उगाच घाबरले आणि पोलिसांना कळवले म्हणून पुन्हा त्यांना फोन केला आणि म्हणाले की घरात मांजर शिरली होती आणि त्यामुळे माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करायची विनंती केली. बोलून मी फोन ठेवून दिला आणि परत खोलीकडे वळाले. सगळी भीती ओसरली होती. मी खोलीच्या आत बेधडकपणे गेले. लाईटचं बटन पुनः एक दोनदा दाबलं तरी खोलीत अंधारच होता.

“ट्यूब गेली असावी..”, म्हणत मी फोन चार्जिंगवरून काढला आणि दार पुनः लावून किचनकडे आले.

मी गॅस पेटवला आणि इतक्यात पुढच्या दारावरची बेल वाजली.

पुनः एकदा माझ्या छातीत धस्स झालं..आता या वेळेस कोण? मला काहीही सुचेना, तरी मी हिम्मत करून पुढच्या खोलीमध्ये आले आणि दाराला साखळी लावून दार अलगद उघडलं. समोर दोन तीन पोलीस उभे असलेले मी पाहिले. त्यांनी तोंडावर बोट ठेवून मला गप्प राहायचा इशारा केला. त्यांच्या इशाऱ्यावर मी हळूच दाराची साखळी काढली आणि दार उघडले. चार पोलिस एकदम घरात घुसले. मी भांबावून जाऊन बाजूला उभी राहिले. त्यातल्या दोघांनी जिन्यावरून पळत जाऊन बंगल्याच्या वरच्या खोल्या तपासल्या आणि परत खाली आले. त्यांच्यातला एक ज्येष्ठ पोलीस कर्मचारी होता जो खालीच थांबला. त्याच्याकडे त्यांनी नाकार्थी इशाऱ्याने बघून मान हलवली. 

त्याने माझ्याकडे पाहिले तसे मी मागच्या खोलीच्या दिशेकडे बोट दाखवले. तसे २ पोलीस खोलीत गेले आणि तेवढ्यात खोलीतून एका बाईच्या किंचाळ्याचा आवाज आला. ते ऐकताच माझं संपूर्ण अंग गळून पडलं.

“साहेब, इकडे आहे ही..”, असं जोरात म्हणत त्यांनी तिला खेचत बाहेर आणलं.

अतिशय अशक्त, बारीक कापलेले केस आणि अंगात मळलेला रुग्णांचा गणवेश घातलेला..ती मनोरुग्ण बाई ओरडत किंचाळत माझ्या समोरून पुढच्या खोलीतून फरफट जात होती. मला विश्वासच बसेना की ती आणि मी इतका वेळ एकत्रच एका घरात होतो.

माझी आणि तिची नजरानजर होताच ती आणखीन जोराने ओरडू लागली.

“सांग ना गं यांना.. मला सोडायला..काय केलं का मी तुला..गुपचूप खोलीच्या कोपऱ्यात अंधारात बसले होते ना..”, असं काही तरी बरळत होती.

घडलेला प्रसंग पाहून माझ्या अंगावर काटा येऊन गेला. काळीज अजूनही भीतीने धडधडत होते. लटपटत्या पायाने मी बंगल्याच्या बाहेर येऊन पाहिलं तर आजूबाजूचे लोक ही जमले होते. पोलिसांच्या जीप सोबत एक रुग्णवाहिका ही आली होती. पोलिसांनी तिला सोबत आलेल्या हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांच्या हवाले केले. त्यांनी तिला दोरीने बांधून गाडीत चढवले. गाडीचा दरवाजा बंद होण्याआधी तिची आणि माझी पुनः एकदा नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात मला कितीतरी वेदना आणि मदतीसाठी आस दिसत होती. पण मी काहीच करू शकत नव्हते. भीतीने माझी दमछाक झाली होती. पुढच्या काही वेळात ती रुग्णवाहिका तेथून निघून गेली.माझी परत बंगल्याकडे जाण्याची हिम्मतच होत नव्हती. मी अशीच बंगल्याबाहेर व्हरांड्याच्या पायरीवर बसून राहिले. तितक्यात पोलिसांचा तोच ज्येष्ठ कर्मचारी माझ्याकडे आला.

“मॅडम, तुम्ही थोडक्यात बचावल्या आज..ह्या बाईने आता पर्यंत खूप लोकांवर हल्ला करून जखमी केलेलं आहे..”

“..आणि खून? केलाय कधी कुणाचा तिने ?”

त्याने काहीच उत्तर नाही दिले.

“..तरी, तुम्हाला कसं कळलं की ती बंगल्यातच होती..कारण मी फोनवर तर तुम्हाला माझ्या तक्रारी कडे दुर्लक्ष करायला सांगितले होते..”

त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यानंतर मी परत काहीच बोलू शकले नाही. 

ते म्हणाले “मॅडम, तुम्ही फोन ठेवला त्याच्या थोड्याच वेळात तुमच्या पतींनी आम्हाला फोन करून ताबडतोब बोलावून घेतलं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares