अनुभव – प्रथमेश साळुंखे

हा प्रसंग माझ्या मामा सोबत घडला होता. मामा तेव्हा १७,१८ वर्षा चा असेल. त्या वेळी त्याला पोहण्याचे खूप वेड होते. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत नदीवर पोहायला जायचा. सकाळ असो, दुपार असो वा ‌‌संध्याकाळ. ते नेहमी नदीवर पोहायला जात. एके दिवशी त्यांचा असाच पोहायला जायचा बेत ठरला. मित्र मंडळी ही तयार झाली. दुपारी जायचे ठरले. ‌‌‌‌‌त्त्या दिवशी नदीच्या पाण्याचा वेग ही मंद होता. मुलांच ठरल की नदीच्या पलीकडच्या काठावर जाऊन परत यायच. मग काय वेळ न घालवता सगळे पाण्यात उतरले. जवळपास सगळेच पोहण्यात पटाईत असल्यामुळे सगळ्यांनी नदी पार केली. दुसऱ्या काठावर येऊन थोडा आराम केला. आणि गप्पा करत ते तिथेच किनाऱ्यावर बसले. बराच वेळ उलटला. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. संध्याकाळ झाली आणि अंधार पडायला सुरुवात झाली. पोहायला आलेल्या ५ जणांपैकी २ जण घराकडे निघून गेले होते. दोघं अजूनही पाण्यात पोहत होते. मामा त्यांच्या सोबत पोहून नुकताच बाहेर येऊन एका मोठ्या दगडावर बसला होता. तो थोड्या उंचावर होता, जिथून मित्रांच्या हालचाली त्याला नीट पाहता येत होत्या. छान वारा सुटला होता, आणि सूर्यास्त होताना तो पाहत होता. 

तितक्यात त्याला कसला तरी आवाज आला आणि त्याचे लक्ष पाण्याकडे गेले. त्याला दिसले की त्याचा एक मित्र पाण्यात बुडतो य. पण पुढच्या क्षणी त्याला जाणवले की हा आपली मस्करी करतोय, कारण त्याला खूप चांगले पोहता येत होते. त्याला पाहतच दुसरा मित्र पाण्या बाहेर आला. ते त्याच्याकडे पाहून म्हणालो “अरे ए बस कर नाटक, चल बाहेर ये. उशीर झालाय..” पण त्यांना वाटणारी ही चेष्टा नव्हती, त्यांचा मित्र मस्करी करत नव्हता. तो जोरात ओरडायला लागला. मामा ने त्याला पाहिले तेव्हा कळले की तो काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधी च तो आत पाण्यात खेचला जातोय. तो म्हणत होता की कोणी तरी माझा पाय पकडला आहे आणि मला आत ओढतय. तो पर्यंत दुसऱ्या मित्राने पाण्यात उडी घेतली होती. मामाने दगडावर चढून जेव्हा पाण्यात नीट निरखून पाहिले तेव्हा त्याच्या काळजात अगदी धस्स झाले. कारण त्या नदी पात्रात खरंच काही तरी होत, एखाद्या काळपट सावली सारखं जे मित्राला आत ओढायचा प्रयत्न करत होत. अंधार पडत चालला होता त्यामुळे त्याला स्पष्ट असे काही दिसू शकले नाही पण पाण्यात त्या मित्रा व्यतिरिक्त दुसरे काही तरी होते एवढे मात्र नक्की. 

त्याला वाचवण्याचा प्रयत्न असफल ठरला. आत पाण्यात जे काही होते त्याने मामाच्या मित्राला आत खोल नेले. त्यांनी गावात येऊन हा सगळा प्रकार सांगितला. त्या काळी या सर्व प्रकारामुळे गावात भीती चे वातावरण पसरले होते. मामा ने हे सगळे पाहिल्यामुळे ४-५ दिवस तापाने फणफणला होता. काही दिवसांनी तो बरा झाला पण हा एक प्रसंग त्याला आयुष्य भर लक्षात राहिला. हा प्रसंग सांगताना आजही त्याच्या डोळ्यात भीती जाणवते.

Leave a Reply