अनुभव – साक्षी गायकवाड

मी मुंबई उपनगरात वास्तव्यास आहे. हा भयानक अनुभव माझ्या मोठ्या बहिणीचा आहे. या आधी मला भूत, पिशाच्च, आत्मा यावर अजिबात विश्वास नव्हता पण या प्रसंगामुळे मला या सगळ्यांवर विश्वास ठेवायला भाग पाडले. घटना आहे २०१५ मधल्या फेब्रुवारी महिन्यातली. माझ्या बहिणीने घरच्यांच्या इच्छे विरुद्ध जाऊन लग्न केलं. तिच्या शी घरातील कोणीही बोलत नव्हत. ते साहजिक च होत म्हणा. फक्त माझच तिच्या शी फोन वर बोलणे व्हायचे. बरेच महिने झाले आम्ही भेटलो सुद्धा नव्हतो. त्या दिवशी सहज तिचा फोन आला तेव्हा मी तिला म्हणाले की आई बाबांनी तुला तुझ्या सगळ्या वस्तू आणि कपडे घेऊन जायला सांगितले आहे. माझे असे बोलणे ऐकून तिला वाईट वाटले असावे पण ती मला काहीच बोलली नाही. ती येण्यास तयार झाली. मी तिला त्याच संध्याकळी यायला सांगितले त्यावर ती हो म्हणाली. माझ्या घराजवळच्या दत्त मंदिरात भेटायचे ठरले.

तसे तर ती कामावरून येणार होती त्यामुळे तिला उशीर होणार होता पण मी हट्ट केला म्हणून ती तयार झाली. तिला यायला जवळ जवळ ११.३० झाले. आम्ही बऱ्याच महिन्यानंतर भेटत होतो त्यामुळे आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. काही वेळा नंतर माझ्या लक्षात आले आणि मी वेळ पाहिली तर १२.३० होऊन गेले होते. तिला देखील तिच्या घरी परतायचे होते. तिने एक घर भाड्यावर घेतले होते. आणि ते घर वस्ती पासून बऱ्याच आतल्या भागात होते. मी तिला आग्रह की करू शकत नव्हते की घरी चल कारण तिने सगळ्यांच्या मना विरुद्ध लग्न केले होते. माझी इच्छा नसताना सुद्धा मी तिचा निरोप घेऊन घरी आले. साधारण १.३० वाजता तिचा फोन आला मी पोहोचले हे सांगायला. ठीक आहे, काळजी घे म्हणत मी फोन ठेवला आणि झोपून गेले. 

ती फेश झाली आणि आत बेडरूम मध्ये झोपायला गेली. ती आणि भाऊजी घरात दोघच राहायचे. रोज झोपताना आतल्या खोलीतला दरवाजा उघडाच ठेऊन झोपायचे. नेहमी प्रमाणे त्या दिवशी ही ती आत येऊन झोपली. आमच्यात झालेल्या बोलण्याचा विचार करत होती. तितक्यात तिचे लक्ष दरवाज्यातून पहिल्या खोली तील भिंतीवर गेले. बाहेरच्या स्ट्रीट लाईट चा हलकासा प्रकाश खिडकीतून आत येत होता. त्या पुसट प्रकाशात समोरच्या भिंतीवर एक सावली उमटताना दिसू लागली. हळु हळु तिला जाणवू लागले की तिथे कोणी तरी बसले आहे. ती झटकन उठून बसली. तिने नीट निरखून पाहायचा प्रयत्न केला पण तिला जाणवले की आपल्याला भास झाला असेल.  

ती जास्त विचार न करता झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली पण तिला रात्रीचा प्रसंग नीट सा काही आठवत नव्हता. पण तिला अस्वस्थ वाटत होतं. कळत नव्हत काय झालंय पण अगदी निरू त्साही वाटू लागले जसे ती आजारी पडणार आहे. त्या दिवशी तिने ऑफिस ला फोन करून एक दिवस सुट्टी चे कळवले. भाऊजी ऑफिस ला गेल्यामुळे ती घरी एकटीच होती. दिवसभर फक्त झोपून राहिली. त्या रात्री झोपल्यावर तिला साधारण १.३० नंतर अचानक जाग आली. तसे तिचे लक्ष समोर पहिल्या खोलीतल्या भिंतीवर गेले. तिला पुन्हा ती सावली दिसू लागली. या वेळेस मात्र ती हळु हळु स्पष्ट होऊ लागली. एका माणसासारखी भासू लागली. फरक फक्त इतकाच होता की तो माणूस अतिशय विद्रूप होता. हाताची नख खूप मोठी आणि घाणेरडी भासत होती, मळकटलेले कपडे.. म्हणजे त्याच्याकडे पाहून कोणालाही घाण वाटेल..

तिने विचार केला की आपल्याला काल रात्री सारखा भास पुन्हा होतोय. तिने कुस बदलून झोपायचा प्रयत्न केला आणि तिला काही मिनिटात गाढ झोप लागली सुद्धा. पुढचे बरेच दिवस तिला तो भास होत राहिला. आणि प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्या मनाचे खेळ आहेत असा विचार करून ती दुर्लक्ष करत राहिली. तिने यातले काहीच भाऊ जींना देखील सांगितले नाही. काही दिवस उलटले. त्या रात्री तिला त्याच वेळेला जाग आली आणि तिचे लक्ष समोर गेले. या वेळेस मात्र तिथे कसलीही सावली नव्हती. इतके दिवस आपल्याला होणारा भास एकदाचा संपला असा विचार करत तिने सुटकेचा निःश्वास सोडला. तिने कुस बदलली आणि तिचे लक्ष समोर गेले. एक विजेचा तीव्र झटका लागावा तशी ती शहारली. कारण तो माणूस तिच्या अगदी जवळ बसला होता. डोके गुडघ्यात घुसवून कसलीही हालचाल न करता शांत बसला होता. 

तिने भाऊ जिंना उठवायचा प्रयत्न केला पण ते कामावरून इतके थकून आले होते की त्यांना खूप गाढ झोप लागली होती. ते झोपेतच आपण उद्या बोलू असे बडबडले आणि पुन्हा झोपून गेले. तिने डोक्यावरून चादर घेतली आणि झोपायचा प्रयत्न करू लागली. पण अश्या प्रसंगी कोणाला झोप येणार म्हणा.. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा भाऊजी ऑफिस ला जाण्याच्या गडबडीत होते. तिने एक दोन वेळा सांगायचा प्रयत्न केला पण नंतर तिलाच काही तरी वाटले. आपल्याला जर खरेच फक्त भास होत असतील तर हे मला वेड्यात काढतील. आणि यांनी सांगून उगाच टेन्शन देण्या पेक्षा सध्या तरी न सांगितलेले बरे. असा विचार करून ती शांत राहिली. पण दिवेसंदी वस हा प्रकार वाढतच चालला होता. हळु हळु दिवस सरू लागले तसे तो तिला दिवसा ही दिसू लागला. तिने यावर उपाय म्हणून त्या घरात राहायचे टाळणे सुरू केले. म्हणजे जरी ती कामावरून घरी आली तरी ती तासंतास बाहेरच थांबायची. 

जेव्हा बाहेर जास्त वेळ थांबणे शक्य नसायचे तेव्हा ती शेजारी राहणाऱ्या लहान मुलांना घरी बोलवायची म्हणजे तिला कोणाची तरी सोबत होईल. भाऊजी घरी येत नाहीत तो पर्यंत ती बाहेरच थांबू लागली. हा सगळा प्रकार बरेच महिने चालत राहिला. हळु हळु त्यांच्यात वाद होऊ लागले. एके दिवशी त्यांच्यात खूप भांडण झाले आणि चिडून तिच्या हातून जीवदानी मातेचा फोटो खाली पडून तुटला. त्या नंतर मात्र घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. तिच्या घरात कुठल्याच देवाचे फोटो लागत नव्हते. काही ना काही विपरीत व्हायचे. तिला कळत नव्हते की तो जो कोणी होता त्याला खर तर तिला आणि भाऊजी ना सोबत राहू द्यायचे नव्हते. त्या दिवशी रात्री अचानक लाईट गेली आणि नेमके भाऊजी बाहेर मित्रांसोबत बोलत बसले होते. तिने एक मेणबत्ती पेटवून खिडकी शेजारी लावली. 

भाऊजी ना बोलवायला म्हणून ती बाहेर जाणार तितक्यात तिने जे दृश्य पाहिले ते ऐकून तिचे सर्वांग शहारले. एक बाई स्वयंपाक घरातून बाहेर आली आणि तशीच उलट्या पावली चालत स्वयंपाक घरात गेली. आता मात्र या सगळ्या गोष्टी एक भयानक वळण घेऊ लागल्या होत्या. ती धावतच घराबाहेर पडली आणि माझ्या भाऊ जीना बोलवून आणले. गेल्या काही महिन्यांपासून घडत असलेला सगळा प्रकार तिने त्यांना सांगितला. ते तिला धीर देत म्हणाले की तू काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचे ते. त्यांनी त्यांच्या गावी एका नावाजलेल्या पुजारी काकांना फोन करून सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी फक्त नाव आणि कुठे राहता असे साधे प्रश्न विचारले आणि मी कळवतो असे सांगून फोन ठेऊन दिला. काही वेळानंतर त्यांचा पुन्हा फोन आला आणि ते अश्या काही गोष्टी सांगू लागले जे ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही. 

ते म्हणाले की तिला जो माणूस दिसतोय तो तिला सोबत घेऊन जाण्यासाठी आलाय. त्यांनी एक प्रश्न विचारला “ती गेल्या काही महिन्यांपूर्वी खूप रात्री अपरात्री घरी आली होती का..?” तसे भाऊजी म्हणाले की “हो.. तुम्हाला आमचे सगळे माहीत च आहे.. हिच्या घरच्यांनी सगळे समान घेऊन जायला बोलावले होते तेव्हा ही गेली होती, हिच्या लहान बहिणीबरोबर बोलत बसली आणि बराच उशीर झाला, मग बहुतेक दीड – दोन च्या सुमारास घरी आली.” तसे ते पुजारी काका म्हणाले “ठीक आहे. तिथल्या एखाद्या जाणकार व्यक्ती ला बघा म्हणजे त्यांना मी एक उपाय सुचवू शकतो. भाऊजी नी आजूबाजूच्या परिसरात बरीच विचारपूस केली तेव्हा त्यांना एका बाई बद्दल कळले जी हे असे बाहरचे बघते. 

त्यांनी विनंती करून त्या बाईला बोलावले. त्यांनी त्या बाई ला काहीच सांगितले नाही. तिने आल्यावर एक सुपारी हातात दिली आणि काही तरी मंत्र पुटपु टू लागली. त्या नंतर त्या बाई ने जे सांगितले ते अगदी तंतोतंत पुजारी काकांनी सांगितलेल्या गोष्टींशी जुळत होते. त्यांना खूप आश्चर्य वाटले. ती म्हणाली की जो उपाय करायचा आहे त्यासाठी मला १ दिवस तयारी करायला लागेल. तो पर्यंत हिच्या कडे लक्ष द्या. तिला एकटीला सोडू नका. त्या दिवशी रात्री त्या दोघांनाही झोप लागली नाही. पहाट झाली तेव्हा तिचा डोळा लागला. पण काही मिनिटात तिची झोपमोड झाली. तिच्या समोर एक बाई उभी होती. तिने नीट पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला तिचा चेहरा दिसला. कपाळावर अगदी लाल भडक असे मोठे कुंकू लावले होते. लांबसडक केस अगदी भयाण वाटत होते. ही तीच बाई होती जी ताई ला काही दिवसांपूर्वी दिसली होती. तिचे ते भयानक रूप पाहून ताई जोरात किंचाळली.

तसे भाऊजी धावतच आत आले आणि तिला सावरू लागले. तसे तर ते संपूर्ण वेळ ताई सोबतच होते फक्त सकाळी उठून फ्रेश व्हायला गेले तेव्हा ताई काही मिनिट एकटी होती. तिची तब्येत खूप खालावली होती. ती खूपच अशक्त झाली होती. मध्यान होण्याआधी ती बाई आली. विधी वैगर करून ताई वरून उतारा काढला गेला. जाताना ती म्हणाली की जे काही या घरात तिला दिसत होते ते पूर्वी याच घरात राहायचे. या घराची कधीच वास्तू शांती झाली नव्हती, साधी एक पूजा ही घातली नव्हती. हा सगळा प्रकार माझी ताई ३-४ महिने सहन करत होती. मला जेव्हा या सगळ्या प्रकाराबद्दल मला कळले तेव्हा मी घरी सांगितले. आईंबाबा नी त्या नंतर तिला घरी बोलावून घेतले होते. 

Leave a Reply