अनुभव माझ्या सोबत आणि माझ्या एका मित्रासोबत २०१६ मध्ये घडला होता. आम्ही दोघं ही सिनेमा पाहायला गेलो होतो. दोघांनाही हॉरर सिनेमा पहायची खूप आवड आहे. त्यामुळे रात्री ८.३० च्या शो ला जाणार होतो. आम्ही जवळचे मित्र असल्यामुळे माझा घरचे त्याच्या सोबत कुठे ही पाठवायचे. कधी काळजी नसायची त्यांना. त्यामुळे सतत फोन करून कुठे आहेस, निघालास का वैगरे ही विचारायचे नाहीत. इतकंच नाही तर मला कधी घरी यायला उशीर झाला तर मी त्याच्या घरीच झोपत असे. आणि मग सकाळी उठून माझ्या घरी येत असे. ८.३० चा शो असल्यामुळे ११.३० पर्यंत संपणार होता आणि साहजिकच घरी यायला १२ वाजून जाणार होते. त्यामुळे मी आधीच घरी सांगून ठेवले होते की उशीर होणार आहे आणि मी मित्राच्या घरी झोपायला जाईन. त्या दिवशी ८ लाच जेवण आटोपून घेतले आणि सिनेमा पाहायला बाहेर पडलो. सिनेमा होता १९२१. रात्रीचा शो असल्यामुळे सिनेमा घरात फारशी गर्दी नव्हती. त्यात असा होरर सिनेमा असल्यामुळे सगळे धरून जेमतेम ५ ते ६ जण होते. या आधी आलेल्या १९२० नावाच्या सिनेमा पेक्षा हा सिनेमा तितका चांगला नव्हता पण असो. सिनेमा संपला आणि आम्ही ११.३० ला निघालो. बाईक आणल्या मुळे जायला वाहन मिळेल की नाही याची चिंता नव्हती. त्या सिनेमा गृहापासून मित्राचे घर सुमारे ९-१० किलोमिटर वर होते. म्हणजे २०-२५ मिनिटांचा रस्ता.. आम्ही दोघे ही तसे जरा भीती होतो त्यात होरर सिनेमा पाहून रात्रीचा प्रवास म्हणजे काही वेगळे सांगायला नको. 

नको ते भास होणार या भीतीने जरा रस्त्याला चौफेर नजर फिरवत होतो की कोणी दिसतंय का, एखादी हालचाल जाणवतेय का वैगरे. ४-५ किलोमिटर नंतर आम्ही शहर मागे टाकले आणि गावाकडचा रस्ता सुरु झाला. तिथून रस्त्याला दोन फाटे फुटत होते. एक रस्ता चांगला होता पण खूप मोठे वळण घेऊन गावात जायचा. साधारण ४ किलोमिटर अजुन प्रवास. आणि दुसरा रस्ता त्याच्या तुलनेत लवकर गावात पोहोचवणार होता. तसे आम्हाला दोन्ही रस्ते काही नव्हते.. आमचा नेहमीचा मार्ग असल्यामुळे मित्र म्हणाला की आज दुसऱ्या रस्त्याने जाऊ कारण उशीर झालाय. मी ठीक आहे म्हणालो आणि त्याने बाईक त्या रस्त्याला घेतली. प्रत्येक गावात असणाऱ्या भाकड कथा प्रमाणे आमच्या गावात ही अश्या काही गोष्टी होत्या. आणि त्यातल्या काही या रस्त्या बद्दल च्या. आम्ही गावातल्या लोकांकडून ऐकले होते की हा रस्ता चांगला नाही. पण आम्ही तरणी ताठी पोरं अश्या गोष्टींकडे नेहमीच कानाडोळा करायचो. पण त्या दिवशी राहून राहून वाटत होते की काही तर घडणार आहे. कधी कधी काहीच कारण नसताना वेगळाच अस्वस्थपणा जाणवतो ना अगदी तसे काहीसे. सतर्क राहायला म्हणून मी मित्राला म्हणालो की तुला काही जाणवले, काही दिसले तर तू घाबरून जाऊ नकोस.. माझे बोलणे संपत नाही तितक्यात त्याला एक व्यक्ती रस्त्या कडेला सिगारेट ओढत उभा दिसला. त्याने घाबरून झटकन बाईक चा ब्रेक मारला. 

जे सांगितले त्याच्या अगदी विरुद्ध केले. मी त्याला म्हणालो ” अरे वेड्या मी तुला आत्ताच बोललो ना.. लगेच काय एवढा घाबरतो फट्टू..” पण त्याच्या चेहऱ्यावर चे हावभाव बदलले होते. तो जरा दबकत च म्हणाला ” अरे पण इतक्या रात्री हा माणूस असा काय उभा आहे, १२ वाजून गेले आहेत.. “

मी त्याच्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणालो ” चल पुढे.. कोणाला ही घाबरतो..” त्याने जोरात बाईक त्याच्या जवळून घेतली आणि आम्ही पुढे निघून आलो. जोरात असल्यामुळे मित्राला बाईक वर नियंत्रण ठेवता येत नव्हते. त्यात रस्ता खडकाळ होता. मी त्याला सांगत च होतो की वेग कमी कर तितक्यात एका मोठ्या दगडा वरून आमची गाडी स्लीप झाली. वेगात असल्यामुळे दणका लागून ती काही सेकंदा साठी हवेत उडाली आणि पुढे जे घडले ते अविश्वसनीय होते. त्या १-२ सेकांदासाठी जेव्हा गाडी रस्त्यापासून वर हवेत होती तेव्हा मला असे वाटले की मला कोणी तरी अलगद उचलून बाजूला उभे केले. इतरांचे माहीत नाही पण मला स्वतःला ही या गोष्टीवर विश्वास बसला नाही. मला अलगद बाजूला रस्त्याकडे ला कोणी तरी उभे केले. आणि मी समोरचे दृश्य पाहिले. माझा मित्र हातावर आणि गुडघ्यावर फरफटत च जात होता. गाडीचा वेग च तितका होता. रस्त्यावर घासत जात असताना त्याचे लक्ष माझ्याकडे गेले आणि तो पाहतच राहिला. मी पटकन त्याचे शर्ट पकडले तसे तो जागीच थांबला. आणि बाईक काही फूट अंतरा पर्यंत घासत निघून गेली. त्या ६-७ सेकंदात त्याच्या हाताला आणि पायाला बरेच खरचटले. 

तो कसा बसा उठला पण माझा कडे पाहतच राहिला. त्याला घडलेला प्रकार काही कळलाच नव्हता. त्याचीच काय पण माझी ही मनस्थिती तशीच होती. मी त्याला म्हणालो ” अरे बघतोस काय.. गाडी उचल आणि चल इथून.. ” तो तसाच बाईक कडे चालत जाऊ लागला.. मी त्याला पाहतच होतो. त्याला नीट चालता येत नव्हत. अस वाटत होत की त्याला काही तरी होतय. मी त्याच्या दिशेने चालत निघालो. त्याने कशी बशी बाईक उचलली आणि स्टार्ट केली. सुदैवाने ती एका स्टार्टर मध्ये सुरू ही झाली. मी मागे बसलो आणि आम्ही त्या भागातून पुढे गावाकडे जायला निघालो. पुढच्या १० मिनिटांच्या रस्त्यावर आम्ही एक मेकांशी काहीच बोललो नाही. आम्ही घरी पोहोचलो पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते कारण जाताना आम्ही दोघे गेलो असलो तरीही येताना आम्ही दोघे च आलो नव्हतो. आणि या सगळ्या बद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. घरी आल्यावर मित्राने दार उघडुन लाईट लावला. मला दिसले की त्याच्या दोन्ही हातातून आणि पायातून खूप रक्तस्त्राव होतोय. मी पटकन फर्स्ट एड आणले आणि त्याच्या पायाला मलम पट्टी केली. जास्त काही न बोलता झोपून गेलो. सकाळी उठून बाईक पाहिली तर जाणवले की एक आरसा तुटला होता. बहुतेक तो तुटून तिथेच त्या रस्त्यावर पडला असावा जिथे आमचा अपघात झाला होता.. माझा मित्र म्हणाला की आपण जाऊन पाहून येऊ त्या रस्त्यावर. आता दिवस उजाडला आहे त्यामुळे काही भीती नाही. मला ही त्या ठिकाणी जाऊन पाहायचे होते. 

सकाळी उठल्या उठल्या आम्ही पुन्हा त्या रस्त्या कडे जायला निघालो. काही वेळात तिथे पोहोचलो आणि दिसले की आरसा तुटून तिथेच पडलाय पण आतल्या काचेचा पूर्ण भुगा झालाय. मित्राने तो तुटलेला आरसा बाईकच्या डिकीत ठेवला. मी त्याला म्हणालो की कशाला घेतोय तो आता.. फेकून दे इथेच.. अश्या काच तुटलेल्या वस्तू जवळ बाळगायच्या नसतात.. पण त्याने माझे ऐकले नाही. तिथून तो थेट मला माझ्या घरी सोडायला आला. मला सोडून, माझा निरोप घेऊन तो घरी जायला निघाला. त्या दिवशी संध्याकाळी मला त्याच्या घरून फोन आला की तुला सोडून येत असताना त्याचा अपघात झालाय. जशी बातमी कळली मी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्याला विचारले की काय झालं, कसा अपघात झाला पण तो काही सांगत नव्हता. त्या दिवसा पासून अंथरूण पकडले. सतत आजारी असायचा. बरेच दिवस उलटले पण त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा दिसत नव्हती. शेवटी आम्ही एका बाहेरच्या बघणाऱ्या माणसाकडे गेलो. त्याने आम्हाला समोर बसवले आणि अवघे २-३ मिनिट डोळे बंद करून बसून राहिला. आल्यापासून त्याने आम्हाला एक प्रश्न ही विचारला नव्हता आणि आम्ही सुद्धा त्याच्याशी काही च संवाद साधला नव्हता. त्याने डोळे उघडले आणि पहिला प्रश्न विचारला.. ” कुठे पडला होतास..? अपघात झाला होता..?” आम्ही दोघं ही त्याच्या कडे पाहतच राहिलो. मी विचारात पडलो की मित्राच्या हाता पाया वरच्या जखमा ही बऱ्या झाल्या आहेत त्यामुळे असा अंदाज त्याने कसा बांधला असावा. 

मित्राने होकारार्थी मान हलवली आणि मी घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली. त्याने अगदी शांतपणे सगळे काही ऐकून घेतले. पुढे तो म्हणाला की तुझ्यावर देवाची कृपा आहे म्हणून ती तुला काही करू शकली नाही पण तुझा मित्र.. तो मरणाच्या दारातून बाहेर आलाय. तुम्ही नेहमी त्या रस्त्यावरून जात असाल ते ठीक आहे पण त्या रात्री ज्या वेळेला तुम्ही तिथून गेलात त्या वेळेला तिच्या फेऱ्यात अडकलात. गावातली लोक बोलतात ते खर आहे. एका विशिष्ट वेळेला तिचा फेरा असतो. त्या वेळी तिच्या वाटेत कोणी आडवे आले तर ती त्याला सोडत नाही. तिच्या बद्दल फार कोणाला माहीत नाही. पण गेल्या कित्येक पिढ्या पासून तिचा वास आहे त्या जागेवर.. मला एक सांगा की तुम्ही तिथून एखादा काच तुटलेला गॉगल, चष्मा, घड्याळ किंवा कोणतीही अशी वस्तू तुमच्या सोबत घेऊन आला आहात का..? त्यावर मी मित्राकडे पाहिले आणि त्याला म्हणालो ” तुला बोललो होतो की तो तुटलेला आरसा घेऊ नकोस..” त्या व्यक्तीने आम्हाला सांगितले की आत्ताच्या आत्ता जाऊन तो आरसा लांब फेकून या. आम्ही त्याचे ऐकून तसे केले. नंतर त्या व्यक्तीने माझ्या मित्राला त्याच्या पुढ्यात बसवून एक विधी केला. आम्ही त्याचे आभार मानून घरी आलो. त्या नंतर मात्र रात्री ९ नंतर त्या रस्त्यावर आम्ही साधे फिरकलो सुद्धा नाही. 

Leave a Reply