अनुभव – यश सुर्वे
मी दहावी इयत्तेत शिकत असताना आमच्या शिकवणीच्या मॅडम ने सांगितला होता. अभ्यासक्रम बऱ्यापैकी शिकवून झाला होता आणि मराठीचा शेवटचा तास होता. आणि सकाळपासून ३ तास विज्ञान आणि गणिताचे तास झाल्यामुळे सगळी मूल खूप कंटाळून गेली होती. म्हणून सगळ्या मुलांनी मॅडम ना एखाद्या वेगळ्या विषयावर गोष्ट सांगा म्हणून हट्ट करायला सुरुवात केली. आधी त्या अजिबात तयार नव्हत्या पण मुलांच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. शेवटी इच्छा नसताना ही त्या तयार झाल्या आणि त्यांनी आम्हाला ती गोष्टी सांगायला सुरुवात केली. आम्ही सगळी मुलं ही अगदी उत्सुकतेने ती ऐकू लागलो. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. प्रसंग माझा सख्ख्या काकी बरोबर घडला होता. माझे आजी आजोबा, आई बाबा, काका काकी, मी आणि माझा भाऊ आम्ही सहले एकत्र एका १० बाय १० च्या खोलीत राहायचो. तेव्हा मी खूप लहान होते. आमचे घर जर छोटे असेल तरी सगळे अगदी आनंदाने राहायचो. तेव्हा माझ्या काकी ला एक गोंडस बाळ झालं होत. आम्ही दिवसभर त्याच्या सोबत खेळायचो. माझे काका मर्चंट नेव्ही मध्ये होते. ६ महिने ते ड्युटी वर असायचे आणि ६ महिने घरी. त्या वेळी ५ महिने ते घरी होते आणि त्याच वेळी त्यांनी ठाण्यात एक फ्लॅट घेतला होता. तसे आमच्या घरात कुठलेच वाद वैगरे व्हायचे नाहीत. पण शेवटी किती ही म्हंटले तरी १० बाय १० च्या छोट्याश्या खोलीत एवढी माणसं राहणे जरा अवघडच होत. कोणी काही बोलत नसले तरी सगळ्यांना अडचण व्हायची. पण एकही जण कधी कोणाला बोलून दाखवायचा नाही. आणि या सगळ्यात आता घरी लहान बाळ ही होत. त्याला ही जरा मोकळे पणा आणि शांतता हवी होती.
या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन काका ने नवीन फ्लॅट वर शिफ्ट व्हायचे ठरवले. आधी आजी आजोबा नको म्हणत होते पण नंतर परिस्थिती पाहता त्यांनी ही होकार दिला. पुढच्या काही दिवसातच काका काकी नवीन फ्लॅट वर राहायला गेले. अवघा एक दिवस उलटला आणि काकी ला खूप अस्वस्थ वाटू लागलं. खर तिला काही गोष्टींची चाहूल लगेच लागायची आणि या वेळी ही तसेच झाले. काहीच कारण नसताना अचानक डोकं जड व्हायचं. पण तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. नवीन जागा आहे त्यामुळे रुळायला थोडा वेळ लागेल असे तिला वाटले. आणि काही दिवस झाले की मग जागेची सवय होईल अशी स्वतःच्या मनाचीच समजूत काढली. दुसऱ्याच दिवशी काका ने घरात छोटीशी पूजा ठेवली होती. पुजे ला आम्ही सगळे गेलो होतो. काकीच्या माहेरची माणसं ही आली होती. कार्य नीट पार पडले. ते ज्या बिल्डिंग मध्ये राहायला आले होते तिचे बांधकाम नुकताच झाले होते त्यामुळे तिथे जास्त कोणी राहायला आले नव्हते. आजकाल बांधकाम सुरू होण्या आधीच सगळे फ्लॅट्स विकले जातात पण त्या काळी तसे नव्हते. काका काकी तिथे राहायला गेले असले तरी अगदी मोजक्याच फ्लॅट मध्ये लोक राहायला आलो होती. त्यात त्यांच्या मजल्यावर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीच राहायला आले नव्हते. काही दिवस उलटून गेले. तस सगळं ठीक होत पण काकी ला अजुन पण अस्वस्थता जाणवायची अधून मधून. तीच अवेळी डोकं दुखणं वैगरे ठीक होतं पण नंतर तो त्रास बाळा ला ही होऊ लागला. बाळ अचानक खूप जोरात रडत उठायचं. कधी कधी तरी गाढ झोपेतून. त्याच दरम्यान माझ्या काका ला परत ६ महिन्यासाठी ड्युटी जॉईन करावी लागणार होती.
काकी ला खर तर खूप टेन्शन आलं होत. कारण एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये तिला आता एकटीला राहावे लागणार होते. आणि त्याची तिला सवय ही नव्हती. काका ने तिला खूप समजावले, धीर दिला. पण तरीही ती ऐकत नव्हती म्हणून काका ने पुढच्या सहा महिन्यांसाठी बाळाला घेऊन आई बाबांकडे राहायला जा असे सांगितले. पण काकी ते ही ऐकायला तयार नव्हती. मी बाळा ला घेऊन इकडेच राहीन असा सल्ला दिला. थोड्याच दिवसांनी काका ड्युटी वर रुजू झाला. काकी आणि तीच बाळ आता दोघच फ्लॅट वर राहत होत. काकी ला खूप विचित्र वाटायचं. सतत अस वाटायचं की आपल्या अवती भोवती कोणी तरी आहे. आपण या घरात एकटे नाही. बाळाचं वेळी अवेळी रडणं सुरूच असायचं. त्या दिवशी पावसाचा जोर खूप होता. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातली लाईट ही गेली होती. रूम मधला पडदा बंद असला तरीही बाहेर वीज कडाडली की रूम प्रकाशाने काही क्षणासाठी उजळून निघायची. रूम मध्ये एक मेणबत्ती तेवत होती. तितक्यात एक वीज कडाडली आणि त्यामागून जोरात गडगडाट ऐकू आला. त्या आवाजाने बाळ उठून रडू लागले. काकी त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती. तिला वाटले की बाळाला भूक लागली असेल म्हणून ती किचन मध्ये दुधाची बॉटल आणायला गेली. बॉटल मध्ये दूध भरतच होती की तितक्यात बाळ रडायचं थांबल. तिला आश्चर्य वाटल. कारण इतक्या वेळ ती बाळाला शांत करायचा प्रयत्न करत होती तेव्हा ते शांत होत नव्हत आणि आता अचानक स्वतःहून रडायचं कसं थांबल. ती थेट बेडरूम मध्ये आली आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला.
मेणबत्ती च्या मंद प्रकाशात बेड वर तिच्या बाळा शेजारी दोन पांढरट अमानवीय आकृत्या बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्याला आकार नव्हता पण लाल भडक डोळे जे त्यांनी बाळा वरच रोखले होते. त्या आकृत्या एकटक त्या बाळाकडे पाहत होत्या. ते बाळ ही त्या आकृत्यांकडे आलटून पालटून पाहत होते. यावरून तिला ही खात्री पटली की आपण जे पाहतोय ते खरंच आहे. काकी ने तिच्या हातातली बाटली तशीच खाली टाकली आणि बाळाकडे धाव घेतली. हिम्मत करून बाळाला उचलले आणि थेट धावत घराचा मुख्य दरवाजा उघडून बाहेर आली. त्यांच्या मजल्यावर दुसरे कोणीही नव्हते म्हणून काय करावे काय नाही तिला काहीच कळत नव्हते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे बाहेर जाणे ही तिला शक्य नव्हते. त्यात बिल्डिंग मध्ये तिला कोणीही ओळखत नव्हते. रात्र भर आपल्या बाळाला घेऊन बिल्डिंग च्या पेसेज मध्ये च बसून राहिली. तिचे डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती. बाळ कुशीत गाढ झोपले होते. ती हिम्मत करून पुन्हा घरात गेली आणि हळूच बेडरूम मध्ये आली. पण सगळ काही शांत आणि पूर्ववत वाटत होत. तिने अंघोळ केली आणि नंतर बाळाला ही अंघोळ घातली. काका ला फोन करून सर्व काही सांगितले. पण त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे साहजिक त्याने काकी ला समजवायचा प्रयत्न केला आणि म्हणाला की या सगळ्याचा विचार करू नकोस. असेच दिवस पुढे सरकत होते. तिच्या मनात भीती बसली होती त्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटायचं. पण तरीही ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची. बाळ मोठ होत होत. त्याला खेळण्यासाठी काकी ने त्याला झोपाळा बांधून दिला होता.
कधी कधी बाळाला ती त्या झोपाळ्यावर खेळायला बसवायची. त्या दिवशी असेच त्याला बसवून ती किचन मध्ये जेवण करायला गेली. तितक्यात बाळ हसू लागले. त्याच्या आवाजाने ती पटकन बाहेर आली आणि तिला दिसले की ते बाळ खोलीच्या एका कोपऱ्यात बसून हसतय. तिने पटकन बाळाला तिथून उचललं. तसे तो झोपाळा जोरात हेलकावे घेऊ लागला. जसे त्यावर कोणी तरी बसलय. ती खूप घाबरली आणि बाळाला घेऊन जुन्या घरी आले. असेच काही महिने उलटले. काका ६ महिने घरी असायचे आणि ६ महिने ड्युटी वर. ते घरा बाहेर असले की काकी बाळा ला घेऊन कधी माहेरी आई कडे तरी कधी जुन्या घरी राहायला जायची. तेव्हढीच काय ती तिच्या जीवाला शांती. या सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे काका जेव्हा घराबाहेर असायचा तेव्हाच या सगळ्या गोष्टी जास्त व्हायच्या. त्यामुळे त्याला वाटायचं की आपल्या बायकोला नवीन जागेत राहायला आल्यापासून भास होतात आणि एकदा सवय झाली हळु हळू हे कमी होत जाईल. पण काकी मात्र अश्या बऱ्याच जीवघेण्या प्रसंगातून नेहमी जात होती आणि कसे बसे दिवस पुढे ढकलत होती. याचा काळात बाळाचे बारसे झाले आणि मुलाचे नाव ठेवले “राज”. तो ही आता मोठा झाला होता आणि नुकताच बोलायला ही शिकला होता. एके दिवशी जेव्हा काका काही कामा निमित्त आपल्या मित्राबरोबर बाहेर गेले होते आणि काकी घरी आतल्या खोलीत काम करत बसली होती. राज ला पहिल्या खोलीत टिव्ही लाऊन दिला होता म्हणून तो हसत खिदळत टिव्ही पाहत बसला होता. तितक्यात तो त्याच्या आई ला हाक मारत म्हणाला ” अग आज या पांढऱ्या काकांना सांग ना टिव्ही वरून खाली उतरायला. बघ ना कसे टिव्ही वर बसले आहेत ते. मला टीव्ही दिसतच नाहीये..” त्याचे ते बोलणे ऐकून काकी च्या काळजात अगदी धस् झालं.
राज असा काय विचित्र बोलतोय हे पाहायला ती बाहेर हॉल मध्ये आली आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या अंगातला होता नव्हता त्राण च संपला. समोर एक नाही तर २-३ पांढरट आकृत्या टिव्ही वर रेंगाळत होत्या. राज लहान असल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हतं म्हणून ती त्यांना हुसकावून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. हा सगळा प्रकार पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती प्रचंड घाबरली आणि राज ला घेऊन घराबाहेर आली आणि जिना उतरू लागली. घाबरली असल्यामुळे पाय अडकून तिचा तोल गेला आणि तो जिन्यावरून खाली आपटली. ती इतक्या जोरात पडली की डोक्याला जोरदार मार लागून जागीच बेशुद्ध पडली. राज तिला पाहून रडायला लागला. बराच वेळ झाला त्याचे रडणे थांबत नाही हे ऐकून खालच्या मजल्यावर राहणारे एक एक गृहस्थ वर पाहायला आले. काकी ला असे बेशुद्ध पडलेले पाहून त्यांनी पटकन हॉस्पिटल मध्ये फोन केला. राज ला त्यांनी त्यांच्या घरीच ठेवले आणि सोसायटी मधील अजुन २ जणांना घेऊन ते हॉस्पिटल मध्ये गेले. काका रात्री घरी आले तेव्हा त्यांना सगळा प्रकार कळला. ते थेट हॉस्पिटल मध्ये गेले. काकी ने घडलेला भयानक प्रकार त्यांना सांगितला पण तरीही त्यांचा या सगळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काका ने राज ला आमच्याकडे म्हणजे जुन्या घरी राहायला पाठवले. कारण काकी ला काही दिवस ऍडमिट करून घेणार होते असे आम्हाला कळले. ती रात्र तशीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी काका म्हणाला की मी घरी जाऊन जरा आवरून येतो. संध्याकाळी साडे सात आठ च्या दरम्यान तो घरी यायला निघाला. अर्ध्या पाऊण तासात तो घरी पोहोचला. खालच्या मजल्यावर राहणाऱ्या गृहस्थांनी फ्लॅट ला कुलूप लावले होते, ते उघडून तो घरात शिरला. पहिल्या खोलीत अंधार असला तरी खिडकीतून येणाऱ्या ऊजेडा मुळे पुसटसे दिसत होते. लाईट लावला त्याने हात वर केला तसे त्याचे लक्ष वर गेले.
आणि विजेचा एक तीव्र झटका लागावा तसा तो जागच्या जागीच खिळला. समोर जे दिसत होत ते खूप भयंकर होत. तब्बल ४-५ अमानवीय पांढरट आकृत्या सीलिंग वर उलट चालत होत्या. तो दबक्या पावलांनी मागे सरकू लागला पण तितक्यात त्यांचे लक्ष त्याच्यावर गेले. आणि त्या कर्ण कर्कश आवाजात ओरडल्या आणि पुढच्या क्षणी डोळ्यांदेखत नाहीश्या झाल्या. आता पर्यंत आपली बायको सांगत असलेले प्रसंग हे तिचे भास नव्हते हे त्याला कळून चुकले होते. तो थेट धावतच हॉस्पिटल मध्ये आला आणि काकी ची माफी मागू लागला. तिच्या बोलण्यावर विश्वास न ठेवल्याचा त्याला पश्र्चाताप झाला होता. त्याने घरच्यांना जे काही घडले ते सगळे सांगितले. काकी बरोबर घडलेले प्रसंग ही सांगितले. त्या नंतर माझ्या आजोबांनी एका पुजाऱ्याला बोलवून घरात विधी करवून घेतला. तेव्हा त्यांना खूप विचित्र गोष्टी कळल्या. त्या घरात एक नाही तर बऱ्याच भुतांचा वास होता. कारण ती बिल्डिंग होण्या आधी तिथे एक स्मशान भूमी होती. तो विधी त्या अतृप्त आत्म्यांना मुक्त करण्यासाठी केला गेला. त्या नंतर काका आणि काकी ला तसे अनुभव पुन्हा कधीच आले नाहीत. अगदी आज ही माझे काका आणि काकी त्या घरात राहत आहेत आणि माझा भाऊ म्हणजे राज सुद्धा आता चंगल्या कंपनी मध्ये नोकरी करतोय. आम्ही सगळे अधून मधून त्या घरी एकत्र भेटतो.
आमच्या मॅडम नी गोष्ट संपवली पण आम्ही सगळी मुलं अगदी शांत होतो. कारण ते प्रसंग अजूनही आमच्या मनात घर करून होते.