अनुभव – आशुतोष शर्मा

ही घटना माझ्या सोबत सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती. मी मुंबईत राहतो. माझे लहानपणापासून आर्मी ऑफिसर बनायचे स्वप्न होते. त्यामुळे माझ्या करिअर ची वाटचाल त्याच दिशेने चालली होती. मी ३ वर्षांचे ट्रेनिंग मुंबईतून पूर्ण केले आणि पुढच्या शिक्षणासाठी माझ्या एका मित्रासोबत देहरादून ला गेलो. मी खूप खूष होतो पण माझ्या घरचे घरापासून लांब गेल्यामुळे माझी काळजी करायचे. मी देहरादून ला पेईंग गेस्ट म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या सोबत अंकित नावाचा माझा मित्र ही होता. मला नवीन जागा, नवीन गोष्टी अनुभवायला खूप आवडतात. तसेच नवीन लोकांच्या ओळखी, मैत्री करायला ही आवडते. तिथं राहायला गेल्यावर अवघ्या काही दिवसात तिथल्या स्थायिक ३ मुलांबरोबर माझी चांगली मैत्री झाली. तिथं खूप थंडी असायची त्यामुळे मग आम्ही ४-५ जण गच्चीवर जाऊन रात्री शेकोटी करायचो. गप्पा, गोष्टी त्यात खासकरून भुताच्या गोष्टी करायचो. 

गच्ची वरून काही किलोमिटर वर असलेल्या मसुरी हील स्टेशन वरच्या लाईटस दिसायच्या. असे वाटायचे की जणू आकाशात च तारे चमकत आहेत. तिथं जाऊन काही महिने झाले होते. आम्ही दिवसभर अभ्यास करून आणि त्या रूम मध्ये राहून कंटाळलो होतो म्हणून कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करू लागलो. माझ्या ३ नवीन मित्रांपैकी एकाचा म्हणजे अनमोल चा वाढदिवस अवघ्या काही दिवसांवर आला होता. त्यामुळे मग आम्ही ठरवले की बाईक भाड्यावर घेऊन दुपारी मसुरी ला जाऊ आणि तिथे हील स्टेशन वर फिरून वैगरे रात्री किंवा पहाटे घरी येऊ. पण अंकित मात्र तिथे यायला तयार नव्हता. मी त्याला सोबत यायला खूप मनवले, विनंती करून पाहिली पण तो फक्त एकच कारण सांगत होता की रात्री चा प्रवास धोकादायक असतो त्यातून घाटाचा प्रवास आहे म्हणून मी येणार नाही. त्यात तो आम्हाला ही जाऊ नका असे सांगू लागला. पण आम्ही जाण्यासाठी इतके उत्सुक होतो की त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जायला निघालो. 

दुपारी निघायचे ठरले होते पण निघता निघता संध्याकाळ चे ४ वाजले. आम्हाला मसुरी हील स्टेशन च्याच टॉप वर पोहोचायचे होते. तिथं पोहोचायला साधारण अडीच तास लागले. आम्ही तिथे पोहोचल्यावर खूप मस्ती केली, फिरलो. माझा हा तिथला पहिलाच अनुभव होता म्हणून मी खूप खूष होतो. फिरण्यात आणि खाण्यात इतके गुंतलो की आम्हाला तिथे बराच वेळ झाला. तिथून पुढे अवघ्या १० मिनिटांवर एक प्रसिद्ध जागा आहे तिथे जायचे होते. तो भाग अजून थोडा उंचावर होता म्हणून आम्ही इथल्या एका माणसाला जायचा मार्ग विचारून घेतला. त्याने आम्हाला रस्ता तर सांगितला पण हे ही म्हणाला की संध्याकाळी ६ नंतर त्या भागात कोणी जात नाही, त्यामुळे तुम्ही ही जाऊ नका. आम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ती आमची सगळ्यात मोठी चूक झाली. अंधार एव्हाना गडद झाला होता. त्या रस्त्यावर आमच्या २ बाईक आणि आम्ही ४ जण. तो घाटाचा सामसूम होता. तिथं एक विचित्र प्रकारची बोचरी थंडी आणि वेगळीच शांतता होती. 

आजूबाजूला गर्द झाडी आणि घाटाचा वळणावळणाचा रस्ता. आम्ही १५-२० मिनिटात त्या भागात येऊन पोहोचलो. पण तिकडे कोणीही नव्हते. अगदी निर्मनुष्य परिसर. आम्हाला वाटले की तिथे दुकाने वैगरे दिसतील पण सगळे काही बंद झाले होते. आम्ही फक्त चौघे जण वेड्यासारखे बाईक वर बसून आजूबाजूला पाहत होतो. आम्ही बाईक तश्याच पार्क केल्या आणि खाली उतरलो. अनमोल ने बॅगेतून मोठे चिप्स चे पॅकेट काढले आणि आम्हाला विचारू लागला की तुम्ही खाणार का..? आम्ही त्याला काही सांगणार तितक्यात एक विचित्र आवाज कानावर पडला. आम्हा चारही जणांची चांगलीच तंतरली तसे ऐकमेकांकडे घाबरून पाहू लागलो. आवाज एखाद्या प्राण्याचा तर नक्कीच नव्हता. मी मित्रांना काही बोलणार तितक्यात तो आवाज पुन्हा आला आणि या वेळेस तो आमच्या अगदी जवळून आला. अंधार असल्यामुळे जास्त काही नजरेस पडत नव्हते. आम्ही प्रसंगावधान राखत पटकन बाईक जवळ आलो आणि बाईक चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो. 

थंडी असल्यामुळे मी किक मारली तसे माझी बाईक एका किक मध्ये स्टार्ट झाली. पण आमची दुसरी बाईक स्टार्ट च होत नव्हती. तो आवाज क्षणोक्षणी जवळ येत असल्यासारखे भासू लागले. तितक्यात माझ्या मागे बसलेल्या मित्राने मोबाईल वर हनुमान चालीसा प्ले केली तितक्यात बाईक ही स्टार्ट झाली. आम्ही क्षणाचाही विलंब न करता तिथून निघालो. रस्ता अतिशय कच्चा होता पण काहीही विचार न करता आम्ही बाईक पळवू लागलो. हा सगळा प्रकार इतक्यावरच थांबणार नव्हता. आम्ही घाटाच्या दिशेने बाईक वळवली. आमच्यातल्या एकाला सगळा रस्ता माहीत होता कारण तो तिथलाच स्थायिक होता. त्यामुळे त्याच्या बाईक च्याच मागे मी होतो. त्या बाईक च्याच मागची लाईट पाहत मी त्याच्या मागून जाऊ लागलो. एका बाजूला घनदाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. त्या रस्त्याने खाली जाताना मला कडेला एक छोटी झोपडी दिसली. नक्की सांगता येणार नाही पण त्या झोपडीवर जसा बाईक चा हेड लाईट पडला तसे एक काळपट सावली उभी दिसली. अतिशय उंच आणि भरदार शरीरयष्टी असलेल्या माणसाची. खर तर उंची सामान्य माणसापेक्षा खूप जास्त होती त्यामुळे माणूस च आहे की अजुन काही हे कळले नाही. 

मी घाबरून गाडीचा वेग वाढवला तसे काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा तीच झोपडी दिसली आणि पुन्हा तीच सावली. आमच्या दिशेने पाहत होती. पुन्हा दिसल्यावर भीतीने अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी मागे बसलेल्या मित्राला काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो कारण काही वेळा पूर्वी घडलेल्या घटनेने आम्ही आधीच खूप घाबरलो होतो. कधी एकदा आमच्या रूम वर पोहोचतो असे झाले होते. पण पुन्हा तेच झाले..सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला ती सावली आमच्या दिशेने पुढे सरकत होती. मी मित्राला सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच बोलला नाही. मसुरी ला यायला आम्हाला अडीच तास लागले पण खाली उतरताना ३ तास उलटून गेले होते. आम्ही त्याच रस्त्यावर त्याच वळणावर पुन्हा पुन्हा येऊ लागलो. त्यात समोरची मित्राची गाडी दिसेनाशी झाली. आता मात्र मी दिशाहीन झालो. दिसत असलेल्या रस्त्यावरून फक्त बाईक चालवत होतो. तितक्यात पुन्हा एकदा ती झोपडी दिसली आणि या वेळेस त्यामागून तपकिरी रंगाचा एक मोठा ससा बाहेर आला आणि आमच्या बाईक च्याच बाजूला येऊन धावू लागला. त्याचे लाल डोळे मला स्पष्ट दिसत होते. तो साधारण सस्याच्या आकारापेक्षा बराच मोठा होता. 

वळणाचा रस्ता असला तरीही बाईक चा वेग ताशी ५०-६० चा होता. तरीही इतक्या वेगात तो ससा धावू लागला. हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते. माझ्या मागे बसलेला मित्राला काय झाले काय माहित. कोणीतरी मोहिनी घातल्या सारखा करू लागला. अचानक ओरडू लागला “भैया.. चखलो.. गाडी रोको ओर उसको चखलो.. मुझे वो चाहिए..” माझा बाईक वरचा तोल सुटू लागला कारण तो मागे मला घट्ट पकडुन बसल्या बसल्या उड्या मारू लागला. मी त्याला हाका मारून शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकत नव्हता. मी माझे सगळे लक्ष बाईक संभाळण्यावर केले. तितक्यात अचानक तो ससा दिसेनासा झाला. मागे बसलेला मित्र ही शांत झाला. मला हवेतही एक वेगळाच फरक जाणवला. जे काही होत त्याची हद्द संपली होती बहुतेक. तितक्यात समोर आमची दुसरी गाडी दिसली. तो पुढे जाऊन आमच्या साठी थांबला होता कारण बराच वेळ झाला तरी त्यांना मागे माची बाईक दिसत नव्हती. 

मी त्याच्या जवळ येऊन बाईक थांबवली. त्याला काही विचारणार तेवढ्यात त्यानेच सगळे काही सांगितले. आमच्या सोबत जे घडले तेच अगदी तसेच त्यांच्या सोबत ही घडले होते. तो ससा ही अचानक दिसेनासा झाला. मी माझ्या मागे बसलेल्या मित्राला विचारले की काय झाले होते तुला.. पण त्याला काहीच आठवत नव्हत. तिथं जास्त वेळ न थांबता आम्ही घाटातून खाली आलो. रूम वर आल्यावर दुसऱ्या दिवशी मी हा अनुभव सगळ्या मित्रांना सांगितला. त्यावर त्या भागात राहणारा एक मित्र म्हणाला की बर झाले तू बाईक नाही थांबवली. जर तू कोणाचे ऐकून बाईक थांबवली असती तर तो त्या सस्याच्या मागे धावत सुटला असता आणि मग तुमचे काही खरे नसते. असे बरेच प्रकार तिथे घडले आहेत. हा अनुभव मी विसरायचा कित्येक वेळा प्रयत्न केला पण मी अजिबात विसरू शकलो नाही.

Leave a Reply