लेखिका – अनुश्री

बऱ्याचदा एखादी घटना घडते आणि आपल्याला वाटतं की ही घटना, हा प्रसंग या आधीसुद्धा घडून गेलाय. आपल्याला असं वाटलं की आपण दुर्लक्ष करतो नाही?.. अशीच ही एक वेगळी आणि विचार करायला भाग पाडणारी कथा..

ही गोष्ट आहे तुमच्या आमच्या सारख्याच एका साध्या मुलीची कॉलेज गोइंग हिची! रश्मी तशी एकदम हॅपी गो लकी काइंड ऑफ मुलगी! कॉलेजमध्ये तसा अगदीच थोड्या मैत्रिणी तिला होत्या, पण ज्या होत्या त्यांना ती बरीच करमणूक करून द्यायची. कधी कविताच वाचून दाखवेल तर कधी गाणी गाईल. अभ्यासात फार काही हुशार नव्हती पण मैत्रिणीच्या सपोर्ट मुळे पासिंग पुरते मार्क मिळवायची. तिचे छंदही काहीसे निराळे होते. अद्भुत गोष्टींबद्दल वाचायला तिला फार आवडायचं. या जगात काही मिस्टीरियस गोष्टी आहेत, मग ती जूनी रहस्य असोत नाहीतर, जादूटोणा बद्दल, मंत्रतंत्र बद्दलची माहिती असो या सगळ्या गोष्टींबद्दल तिचा विश्वास होता. आणि बऱ्याच वाटणाऱ्या गोष्टी या जगात असतात असं तिला वाटायचं. मैत्रिणी समवेत असताना एखादी घटना घडली की हीच एकच म्हणणं असायचं, कुठलीही घटना पहिल्यांदा घडत नसते ती घटना ह्या आधी घडलेली असते आणि ती घटना परत घडावी यासाठी कुठली तरी शक्ती कार्यरत असते.

तिचं हे वाक्य ऐकलं की सगळ्या मैत्रिणी चक्रावून जायच्या. तिच्या या अशा विचित्र वाक्याकडे सगळेच दुर्लक्ष करायचे. पण एक दोन वेळा त्यांच्याच कॉलेज मध्ये घडलेले प्रसंग याआधी कधी आणि कुठे घडले हे तिने सांगितलं होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर कॉलेजच्या एका प्रोफेसर दुसऱ्या कॉलेजने चांगला जॉब ऑफर केला म्हणून सोडून गेल्या, तेव्हा रश्मी म्हणाली होती हीच सेम घटना नऊ वर्षांपूर्वी या कॉलेजमध्ये घडलेली आहे आणि आज नंतर परत परत अशा घटना घडतच राहणार. ‘हिस्ट्री रिपीट’ म्हणतात ना तसं काहीसं! रश्मीचे अजून एक खासियत म्हणजे.. खासियत कसली! विक्षिप्तपणा! तिला फोटो त्यामुळे सुद्धा आवडत नसे. तिला घरूनही फार ऑब्लिगेशन असतील असं वाटत नव्हतं.बाकी मैत्रिणींना कधी कॉलेजमध्ये उशीर झाला तर घरून फोन यायचे, परीक्षेच्यावेळी पालक सोडायला यायचे , तसे हिला कधीच फोन आले नाहीत किंवा कधी कोणी सोडायला आल नाही. सगळ्यांच्या बर्थडे पार्टीज ना त्यांच्या घरी बोलवायचं पण रश्मीने कधीच कोणालाच घरी नेले नाही. कायम “घरी नाही जमणार, मी कॉलेजमध्ये देते पार्टी” असं सांगायची. रश्मीच्या स्वभावाची आता तिच्या मैत्रिणींना सवय झाली होती. एखादी घटना घडल्यावर त्यानंतरच्या तिच्या मैत्रिणींच्या रियाक्शन काय असतील हे सुद्धा ते एकदम करेक्ट सांगायची. आणि तुला कसं कळलं असं विचारल्यावर ठरलेलं उत्तर द्यायची “हिस्टरी रेपीटस”.

तर अशा या रश्मीच्या कॉलेजची एकदा ट्रिप ठरली. ट्रीप होती, एका सुंदर बीच असलेल्या ठिकाणी. सगळ्या मैत्रिणी ट्रीपला जाणार होत्या. त्यामुळे रश्मीलाही ट्रीपला चल ना असा आग्रह करू लागल्या. सुरुवातीला नाही नको म्हणत म्हणत अखेर रश्मी सुद्धा ट्रीपला जायला तयार झाली. दोन तीन दिवसांची ही ट्रीप निघाली. बस मध्ये मस्त गाणी बजावणी सुरू होती. रश्मीच्या मैत्रिणीवर एका त्यांच्याच कॉलेजमधल्या मुलांची वाईट नजर पडली. तेव्हा रश्मीने बाकी मैत्रिणींना सांगितलं की, या मुलाने आधी एका मुलीकडे वाईट नजरेने बघितलं होतं आणि त्या मुलीने न राहवून त्याच्या कानफटात लगावली होती. आणि योगायोग म्हणा किंवा दुसरं काही, या मुलीने म्हणजेच रश्मीच्या मैत्रिणीने सुद्धा त्या मुलाच्या कानफटात लगावली आणि रश्मीचे पेट वाक्य परत एकदा खरं ठरलं,” हिस्ट्री रिपीट.”

तरीही कॉलेज ट्रिप डेस्टिनेशनवर पोहोचली. सगळ्या मुला-मुलींनी कपडे बदलले. सगळे फ्रेश झाले आणि बीच वर निघाले. बीच म्हणजे तरुण-तरुणींसाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे बीच वर जाण्यासाठी सगळेच एक्साईटेड होते. बीच वर पोहोचल्यावर मुलामुलींचे ग्रुप्स केले गेले, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून स्टुडंट कौन्सिलच्या काही विद्यार्थ्यांना नेमलेले होतं. रश्मी आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा पाण्यात उतरल्या. हसत खेळत टाईमपास करत, सेल्फी काढत त्या मस्त रंगल्या होत्या. पण रश्मी काही फोटोत यायला तयार झाली नाही. नेहमीसारखच तुमचे फोटोस मी काढते असं म्हणत कॅमेरा हातात घेत फोटो काढत होती. इतक्यात तिच्या मैत्रिणीला स्टूको मधल्या कोणीतरी हाक मारली. काही तरी काम असेल म्हणून वर्षा गेली आणि ह्या बाकीच्या परत टाईमपास मजा-मस्ती करू लागल्या. बराच वेळ झाला पण वर्षा काही यायचं नाव घेईना. रश्मी आणि तिच्या मैत्रिणी स्टुको मेंबर्सना विचारायला गेल्या तेव्हा त्यांना तिच्याबद्दल काहीच माहित नाही असं त्यानी सांगितलं. त्या मैत्रिणी आता वर्षाला शोधायला लागल्या होत्या.

स्वतः जुजबी शोध घेऊन ती सापडत नाही म्हटल्यावर त्या सरळ शिक्षकांकडे गेल्या. त्यांना याबद्दल सांगितलं तेव्हा सगळ्या मुलांना शीट्टीचा कॉल देऊन त्यांनी गोळा केलं. हळूहळू सगळी मुले जमा होत होती. अजूनही काही मुले यायची बाकी होती. इतक्यात ” सर , सर लवकर इकडे या, ते बघा पाण्यात काय आहे”. कोणीतरी ओरडत आले.. सगळे जण तिकडे धावले आणि बघतात तर काय! पाण्यात वर्षा पडली होती. सुरुवातीला त्यांना वाटलं किती पाण्यामुळे बेशुद्ध झाली असेल पण तिला पाण्याबाहेर काढले तेव्हा समजलं तिचा जीव गेला होता. रश्मी आणि तिच्या मैत्रिणींना खूप वाईट वाटलं. तिच्या मैत्रिणींना तर राहून राहून गोष्टींचा उलगडा होत नव्हता, पाण्याचा धोका वाटला तर वर्षा ओरडली असती हाका मारल्या असत्या पण यातलं काहीच झालं नाही. तिच्या मैत्रिणी ओक्साबोक्शी रडत होत्या पण रश्मी तशीच शांत होती. त्यातल्या एकीने रश्मीला विचारलं “तू एवढी शांत कशी राहू शकतेस, आपली मैत्रीण आपल्याला कायमची सोडून गेली आहे. की आता ही हिस्टरी रिपीट असं म्हणून तू गप्प बसणार आहेस?

रश्मी आत्तापर्यंत शांत होती पण आता बोलायला लागली. “होय, हिस्टरी रीपीटस. वर्षाचा जीव गेला, खूप वाईट झालं. पण तिचा मृत्यू झाला नाहीये, तो घडवून आणलाय. तिचं हे वाक्य ऐकून तिच्या मैत्रिणी भूत बघितल्यासारखं तिच्याकडे बघू लागल्या. आपण येताना बसमध्ये त्या मुलाने वाईट नजरेने तिच्याकडे पाहिलं. तेव्हा तिने त्याच्या कानाखाली खेचली तेव्हा तो शांत झाला असला तरी सगळ्यांसमोर अपमान झाल्यामुळे तो भयंकर चिडलेला होता. सुडाग्नीत जळत होता. ज्या मुलीने माझा अपमान केला तिला मी सोडणार नाही असं त्याने ठरवलं. आज आपण पाण्यात मस्ती करत असताना वर्षाला कोणीतरी बोलावलं. स्टूकोमधल्या मुलांना मॅनेज करून त्यानेच तिला बोलावलं होतं. तिला जाब विचारण्यासाठी! त्यांच्यात थोडी झटापट झाली. तिच्या मानेवर त्याने हातानेच वार केला पण एका पॉईंटला मार बसल्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने कोणालाही न कळता चार पाच मुलांची मदत घेऊन तिला पाण्यात आणलं. ती बेशुद्ध असल्यामुळे तिच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि त्यातच…

“अगं पण हे सगळं तुला कसं माहित आणि तुला हे माहित होतं तर वर्षाचा जीव का नाही वाचवलास तू!” “कारण मी तुम्हाला आधीच सांगितले, कुठलीही घटना पहिल्यांदा घडत नसते. ही घटनासुद्धा या आधी घडून गेलेली आहे. अगदी अशीच.. अगदी याच जागी.. तिला सगळे एक टक पाहतच राहिले.. ती चालत समुद्राच्या आत पाण्यात जाऊ लागली आणि हळु हळू नजरे आड झाली. त्या सगळ्या मैत्रिणी धावत आपल्या शिक्षकांकडे गेल्या. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि म्हणाले की रश्मी चालत पाण्यात निघून गेली आणि दिसेनाशी झाली. रेस्क्यू करणाऱ्या टीम ला बोलवून रश्मी चा बराच शोध घेतला, तब्बल २-३ दिवस तिचा शोध चालू होता पण पण ती कुठेच सापडली नाही. त्यांच्यातल्या एका मैत्रिणीला काय सुचले काय माहित.. तिने इंटरनेट वर त्याच तारखेच्या पण काही वर्षांपूर्वीच्या वृत्त मान पत्राची पाने काढून काही तरी शोधू लागली.. तिचा संशय खरा ठरला.. तिला एक नाही तर २ वृत्त मान पत्रात बातमी सापडली. चार वर्षांपूर्वी ची!. ‘तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू’. आणि त्या दुर्दैवी तरुणीचं नाव काय होतं माहितीये? ‘रश्मी टोके’..

हे सांगून रश्मी गूढ हसली आणि तिथून निघून गेली ती कायमचीच..

Leave a Reply