ही एक घटना नाही तर ही एका मागोमाग एक आलेल्या अनुभवांची साखळी आहे. अगदी विश्वास न बसण्यासारखे अनुभव. जसा काळ पुढे सरकत होता तसे ते अनुभव गडद होत जात होते. आपल्याच चॅनल च्या एका सबस्क्राईब र ने पाठवले आहेत. पण त्यांनी काही कारणामुळे त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे.

माझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे. तिचे वडील कलेक्टर सोबत नोकरीला होते. त्या वर्षी त्यांची बदली एका नवीन ठिकाणी झाली होती. आणि तिथे राहायला एक आलिशान बंगला दिला होता. राहायला आल्यापासून २-३ दिवस झाले असतील आणि त्यांना चित्र – विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली. 

पहिला अनुभव. त्या दिवशी तिची आई पहाटे लवकर उठली. मुलांच्या शाळेत तिला काही कार्यक्रमानिमित्त जायचे होते. शाळा बरीच लांब होती. त्यामुळे सगळे आवरून लवकर निघायचं होते. साधारण ४ वाजले असावेत. तिची आई अंघोळीला बाथरूम मध्ये शिरली. बाथरूम चा दरवाजा बंद केला तितक्यात बाथरूम च्या मागच्या खिडकीतून अचानक टाळी वाजल्याचा आवाज आला. तशी ती दचकली आणि बाहेर आली. इतक्या पहाटे असा विचित्र आवाज येण साधी गोष्ट नव्हती. ती बाहेर जाऊन मागच्या खिडकी बाहेर कोणी आहे का हे पाहू लागली पण तिथे कोणीही दिसले नाही. त्या नंतर त्या दिवशी पुन्हा काही विचित्र घडले नाही.

दुसरा अनुभव. अश्याच एका रात्री ते टिव्ही वर सिरीयल पाहत बसले होते. माझ्या बहिणीची मैत्रीण, तिची आई आणि बाबा. ती तेव्हा बरीच लहान होती. टिव्ही वर नेमकी भुताची सिरीयल चालू होती. आणि ती नेहमी घाबरायची. त्या दिवशी ही सिरीयल मधले भयानक चेहरे पाहून ती घाबरली आणि टिव्ही बंद करायला सांगू लागली. तसे वडिलांनी उठून टिव्ही बंद केला. तितक्यात अचानक हॉल च्याच खिडकीतून एक आवाज ऐकू आला “का बंद केला, मी पाहत होते ना”. तो आवाज इतका स्पष्ट होता की असे वाटले अमच्यातलेच कोणी तरी बोलतेय. वडिलांनी झटकन दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन पाहू लागले. पण त्या परिसरात कोणीही नजरेस पडले नाही. 

तिसरा अनुभव. नेहमीप्रमाणे त्या रात्री सगळे गाढ झोपेत होते. पहाटे ४ च्या सुमारास दारावरची बेल वाजली. तसे तिचे वडील उठले आणि दरवाजा उघडायला बाहेर आले. दारावर एक माणूस आला होता. पाव हवे आहेत का विचारात होता. तिच्या वडिलांना काही नवल वाटले नाही कारण पाव, खारी, बटर विकणारे बहुदा सकाळी कधी कधी पहाटे येत असत. या परिसरात तो नवीन आला असावा असा विचार करून त्यांच्याकडून पाव घ्यायचे ठरवले. कारण तसे ही किराणा मालाचे दुकान वैगरे त्या बंगल्या पासून बरेच लांब होते. त्या माणसाने त्याच्या पिशवीत हात घातला पाव बाहेर काढू लागला. त्याने डोकावून पाहिले तर पिशवी संपूर्ण रिकामी होती. त्यांनी झटकन हातातले पाव खाली टाकून दार लाऊन घेतले. आणि आतल्या खोलीत जाऊन कोणाला काहीही न बोलता सरळ झोपी गेले. 

चौथा अनुभव. त्या नंतर च्या एका रात्री तिचे आई बाबा लाईट गेली असल्याने बाहेर बसले होते. त्याच्या गप्पा सुरू होत्या. पण भर रात्री त्यांनी पाहिले की अचानक एक १२-१३ वर्षांची मुलगी त्याच्या दिशेने चालत येतेय. त्यांनी हाक दिली की इतक्या रात्री इथे काय करतेय. पण तिने काहीही प्रतिसाद न देता त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि त्यांच्यापासून दूर चालत जात अंधारात दिसेनाशी झाली. 

सुरुवातीला येणाऱ्या या अश्या विचित्र अनुभवांबद्दल घरात जास्त बोलणे व्हायचे नाही. पण जेव्हा बोलणे झाले तेव्हा अजुन एक भयानक गोष्ट कळली. त्या बंगल्यात एक बाई दिसायची. ती बाथरूम मधून बाहेर यायची, कीचेन मध्ये जायची आणि काही वेळाने पुन्हा बाथरूम मध्ये जाताना दिसायची. तिच्या वडिलांनाच ती दिसायची. इतके सगळे घडत असताना ही ते जवळपास ४ वर्ष तिथे राहिले. जेव्हा तो बंगला सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी तिथल्या काही जणांना घडत असलेल्या घटनांबद्दल सांगितलं. त्यावर त्यांना बऱ्याच भीतीदायक गोष्टी कळल्या.

हा बंगला बांधण्याआधी या ठिकाणी एका हॉस्पिटल ची इमारत होती. आणि तिथे पोस्ट मॉर्ट म व्हायचे. त्यात भर म्हणून बंगल्याच्या मागच्या बाजूला लहान मुलांची स्मशानभूमी होती. तिथे लहान मुलांना मृत्यू झाल्यावर गाढायचे. 

https://www.youtube.com/watch?v=8_EuiDkj9d4

Leave a Reply