मी मूळचा पुण्याचा राहणारा पण वडील हे पोखरण रेंज मध्ये इंजिनिअर असल्या कारणाने आम्ही गेल्या 6 वर्षांपासून पोखरण, राजस्थान येथे वास्तव्य करत आहोत. मला दोन बहिणी आहेत. दोघीही माझ्यापेक्षा वयाने लहान च आहेत. आम्ही तिघही कोटा ह्या शहरात नीट या परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता गेलो होतो. आता नवीन शहर म्हटल की तिथे आम्हाला खोली करून राहणं भाग होत. आम्ही खूप फिरलो, खूप विचारपूस ही केली पण कोणताच घरमालक आम्हाला रूम देत नव्हता. त्याच कारण असं की, आम्हा तिघांना एकाच खोलीत रहायची इच्छा होती पण सगळी कडे मात्र एकच अट होती की मुलं आणि मुली हे वेगवेगळे राहतील. पण खूप प्रयत्नानंतर आम्हाला एक खोली मिळाली, साधारणत: वयाची साठी ओलांडलेल एक जोडप होत ते.. म्हणजे घराचे मालक.. ते खालच्या मजल्यावर असायचे व सर्व खोल्या ह्या वर होत्या.

साधारणः ५ मजली इमारत होती ती. पण सर्वात विचित्र प्रकार म्हणजे तिथे आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. म्हणजे दुसरे भाडेकरू म्हणून तिथं कोणीच नव्हत. पण असो.. आम्हाला खोली मिळाली म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष च केले, आम्हाला पहिला मजला राहायला मिळाला. म्हणजे घर मालक राहायचे त्याच्या वरचा.. अधून मधून हा विचार मात्र यायचा की इथे दूसर कोणी का राहत नाही.. त्या इमारतीचे वरचे सगळे मजले रिकामी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परिसरात सगळे लोक एकमेकांशी बोलायचे फक्त या वृध्द जोडप्याशी सोडून.. कोणी घरी यायचे सोडा पण रस्त्यावरून जाताना दिसले तरी तिथली लोक वाट बदलायची, नजर फिरवायची. मला या गोष्टी खूप खटकायच्या, विचित्र वाटायच्या. पण परीक्षेला अवघे दोन महिने बाकी होते म्हणून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही चिकाटीने अभ्यासाच्या तयारीला लागलो. 

माझ्या दोन्ही बहिणी वयाने सारख्या होत्या, मी ड्रॉप घेतल्या कारणाने पुन्हा त्यांच्या सोबत परीक्षा देणार होतो. सर्व काही सुरळीत चालले होते. आमची दिनचर्या ठरली होती. सकाळी लवकर उठायचे व अभ्यासाला बसायचे. नंतर दिवसभर क्लासेस करून सायंकाळी परत येऊन अभ्यासाला बसायचे. रात्री तासाभरात जेवण अटोपायचे आणि नंतर २ तास अभ्यास करून लवकर झोपायचे. हा आमचा नेहमीचा दिनक्रम. तो दिवस मला अजूनही आठवतोय जिथून भयानक गोष्टी घडायला सुरुवात झाली. मला काही कारणास्तव जवळच्या शहरात जावे लागणार होते म्हणून मी माझा बहिणींना विचारले की तुम्ही दोघीच राहणार का.. मी उद्या संध्याकाळी लगेच परत येईन. त्यावर त्यांनी होकार दिला.

त्या संध्याकाळी मी त्यांचा निरोप घेऊन घरा बाहेर पडलो. त्या रात्री जेवण वैगरे आटोपून नंतर तास दीड तास अभ्यास केला आणि ११ च्या सुमारास त्या झोपून गेल्या. गाढ निद्रेत असताना माझ्या एका बहिणीला जाणवू लागले की कोणी तरी तिच्या पायाला घट्ट धरून ठवेलय. तिची झोपमोड झाली पण तिने पाय झटकला आणि पुन्हा झोपून गेली. काही वेळानंतर पुन्हा तशीच पकड जाणवली आणि आधी पेक्षा खूपच मजबूत. तिला झोपेतच तस जाणवलं म्हणून ती उठून बसली आणि झटकन पायाकडे पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. आपल्याला कदाचित स्वप्न पडले असावे असे समजून ती परत झोपी गेली. रात्र पुढे सरकत होती.  बहुतेक १-१:३० तास उलटून गेला असेल. पुन्हा एकदा तसच घडायला सुरुवात झाली. या वेळी मात्र ती पकड फक्त घट्ट च नव्हती तर जणू कोणी नख पायात ऋतवू पाहत होत. पायाची त्वचा नखाने ओरखडत होत. आता मात्र तिला हे असह्य झालं आणि कळून चुकलं की हे स्वप्न नक्कीच नाही. 

ती झटकन उठली आणि पायाकडे पाहत जोरात किंचाळली. तिची किंचाळी ऐकून तिच्या बाजूला झोपलेली बहीण दचकून जागी झाली. तिला विचारू लागली की एवढ्या मोठ्याने ओरडायला काय झालं. तेव्हा तिने पायांकडे इशारा केला. ते पाहून ती सुद्धा घाबरली कारण ते नखाने ओरखडलेले निशाण तिच्या पायांवर स्पष्ट दिसत होत. अस वाटत होत जणू एखाद्या हिंस्र प्राण्याचे काम असावे. या भयाण प्रसंगांनंतर त्या दोघी ही खोलीतला लाईट सुरू ठेऊन तश्याच बसून राहिल्या आणि पूर्ण रात्र जागून काढली. सकाळ झाली. त्यांनी या बद्दल कुठेही वाच्यता केली नाही. तयारी वैगरे करून क्लासेस ला गेल्या. त्या दिवशी दोघांचं लक्ष अजिबात लागलं नाही. संध्याकाळी घरी आल्या. सूर्य मावळायला लागला..

अंधार गडद होऊ लागला तशी त्यांना धडकी भरू लागली. या सगळ्यात मी संध्याकाळी ७ वाजता घरी पोहोचलो. मला पाहून त्यांना धीर आला आणि त्यांनी घडलेला पूर्ण प्रकार मला सांगितला. एका क्षणासाठी मी ही थोडा घाबरलो च. पण मला घाबरून चालणार नव्हत. मी त्यांना धीर दिला तसे त्यांना थोड हायस वाटलं. रात्र झाली. त्यांना झोप येत नव्हती त्यामुळे मी जागाच होतो. पण नंतर त्यांना झोपायला सांगितले आणि म्हणालो की मी जागा राहतो काळजी करू नका. रात्री चा दीड वाजला होता. त्या दोघी ही गाढ झोपी गेल्या होत्या. प्रवासाच्या थकव्यामुळे मला ही थोडी डुलकी येत होती म्हणून मी एका कानात हेडफोन घालून मोबाईल मध्ये सिनेमा पाहत बसलो होतो. तितक्यात मला जाणवलं की वरच्या मजल्यावर अचानकपणे काही तरी अपटण्याचा, सरकविण्याचा आवाज येतोय. जसं कोणी तरी अवजड सामान इकडून तिकडे सरकवतेय. 

बराच वेळ झाला तो आवाज येत होता म्हणून मग मी त्या आवाजाचा कानोसा घेत वर जाण्याचे ठरवले. बहिणीकडे पाहिले तर त्या दोघी ही शांत पणे झोपल्या होत्या. मी खोलीचा दरवाजा अलगद बाहेरून बंद करून वर गेलो. वर आल्यावर पाहिलं तर अगदी भयाण शांतता जाणवली. वाटलं की बरेच वर्ष इथे कोणी फिरकल ही नसावं. मग तो आवाज कसला होता. मी तो परिसर न्याहाळत च होतो तितक्यात मला तिथं एक खोली दिसली जी एका वेगळ्याच कुलुपाने बंद केली होती. म्हणजे त्या कुलुपाला एका लाल रंगाच्या विशिष्ट कापडात गुंडाळले होते. दरवाजा ही खूप मोठा होता. मी ते पाहून समजून गेलो की ही खोली काही तरी वेगळीच दिसतेय. म्हणून मी बाकी परिसर सोडून त्या एका खोली कडे जास्त लक्ष देऊ लागलो. दबक्या पावलांनी चालत त्या रूम जवळ गेलो आणि आतून काही आवाज ऐकू येतोय का ते तपासू लागलो.

अवघे पाच मिनिट झाले असतील आणि मला आतून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. ते रडणे साधे नव्हते त्यात खूप वेदना जाणवत होत्या. त्याच सोबत काही तरी पुटपुटण्याचा आवाज येऊ लागला. मी हा प्रकार काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतच होतो तेवढ्यात अचानक तो आवाज यायचा बंद झाला आणि दारावर आतून एखाद्या अवजड वस्तू ने प्रहार करावा तसा आवाज आला. आता मात्र मी एक क्षण ही तिथे न थांबता सरळ खाली आपल्या रूम वर पळत आलो. मी खूप घाबरलो होतो. रूम मध्ये आल्या आल्या पाहिली नजर बहिणीकडे गेली. त्या अजूनही तश्याच झोपून होत्या हे पाहून जरा बरे वाटले. मी खोली चा दरवाजा आतून बंद केला आणि देवाचे नाव घेऊन तसाच बसून राहिलो. दिवस उगवण्याची वाट पाहू लागलो. मी इतका घाबरलो होतो की रडू येत होत. अशी परिस्थिती होती की हात पाय थरथरत होते पण मी मन घट्ट करून सतत देवाचे नाव घेत होतो. 

अधून मधून विचार यायचा की बहिणी सोबत जे झाले आणि आता मी जे वर अनुभवलं ते पुन्हा परत आले तर .? हा नक्की काय प्रकार आहे. या सगळ्या विचारात मला कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी ७ च्या सुमारास बहिणीने उठवले. मी उठताच त्यांना प्रश्न विचारू लागलो की त्यांना रात्री काही त्रास तर झाला नाही ना? त्यांनी नाही म्हणून उत्तर दिले ते ऐकून जरा बरे वाटले. काल रात्री माझ्यासोबत काय घडले हे त्यांना सांगणे मला योग्य वाटले नाही म्हणून मी तो विषय तिथेच सोडून दिला.  उठून फ्रेश झालो व विचार केला की ही खोली आता सोडायची. कारण मला कळून चुकले होते की इथे भलतेच काही तरी आहे. मी त्या दिवशी लगेचच शोधाशोध सुरू केली व सुदैवाने मला एक खोली मिळाली की जिथं आम्ही तिघही राहू शकत होतो.

परंतु आम्हाला २ दिवस वाट पाहावी लागणार होती. म्हणून आता २ दिवस परत त्याच खोली मधे रहाव लागणार होत. ती अशीच एक रात्र होती, मंतरलेली, अजून एक प्रसंग आमच्या सोबत घडणार होता. त्या रात्री आम्हाला झोपायला जरा उशीरच झाला. रात्रीचे साधारणतः १२:३० वाजले असावे. आम्हाला झोपून अर्धा तासच झाला असेल तितक्यात कोणाचा तरी एकदम जड स्वरामधे गाणे गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला (ते गाणे होते – सनम जान मेरे… सनम जान मेरे) हे एकच वाक्य पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले. पण आता हा आवाज फक्त मलाच नाही तर माझ्या दोन्ही बहिणींना ही येऊ लागला. आम्ही तो आवाज ऐकून जरा दाचकलोच व एका मेकाकांकडे पाहू लागलो. पण जशी वेळ पुढे सरकत होती तसा तो आवाज अधिकच तीव्र होत चालला होता. आता मात्र आम्ही खूप घाबरलो व घाबरून तिघेही बेड खाली एका कोपऱ्यात बसून राहिलो.

तिघेही जणू घाबरून रडतच होतो पण तो आवाज काही बंद होण्याचे नाव घेत नव्हता. तो आवाज आमच्याच खोलीतल्या बाथरूम मधून येत होता. बस.. आम्हाला कळून चुकले की हे जे काही आहे ते आता आमच्या खोलीत आलंय असे समजून आम्ही जोरात ओरडायला सुरुवात केली. आमच्या ओरडण्याचा आवाज ऐकून खाली राहणारे काका काकू वर धावत आले. त्यांनी आमचे दार ठोठावले आणि आवाज दिला तसे मी कशी तरी हिम्मत करून जाऊन दरवाजा उघडला. काकू जश्या आत आल्या तसे माझ्या दोन्ही बहिणी त्यांना जाऊन बिलगल्या आणि भीती मुळे रडूच लागल्या. पण त्या वेळी त्यांचे वागणे खूप विचित्र वाटले. त्यांनी माझ्या दोन्ही बहिणींना जणू ढकलत च दूर केले. काका आणि काकू अगदी रागाने बोलू लागले की काय झाले तुम्हाला इतक्या मोठ्याने ओरडायला. त्यावर आम्ही त्यांना सगळे सांगितले.

तसे ते पुन्हा चिडले आणि म्हणाले ” तुम्ही आज कालची मुले चित्र विचित्र व्हिडिओ पाहून डोक्यात नको ते भरवून घेता आणि मग त्याचे भास होतात तुम्हाला.. इथे काहीच नाही.. उगाच आमच्या घराची बदनामी करू नका.. ” ते त्यांची बाजू स्पष्ट करत म्हणाले. पण मग अचानक मला तो वरच्या माजल्या वरील प्रसंग आठवला जिथे मला भयानक अनुभव आला होता. त्या बद्दल मी त्यांना विचारायला सुरुवात केली. त्यावर ते एकदम गप्प झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा मात्र मला कळून चुकले की काही तरी गूढ नक्कीच आहे. त्यांनी कशी बशी सारवा सारव करत आम्हाला धीर दिला व निघून गेले. मी विचार केला की आता घाबरून चालणार नाही  हे प्रकरण काय आहे हे जाणून घ्यावे लागणारच! 

म्हणून मी त्यांच्यामागे गेलो. आणि त्यांच्या खोली जवळ जाऊन खिडकीपाशी लपून ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. अधून मधून हळूच वर डोकं करून काय करत आहेत ते पाहू लागलो. मी तिथे जे पाहिले ते पाहून मला आणखीन एक मोठा धक्का बसला. माझे डोके जणू सुन्न च झाले. ते काका – काकू कोणाला तरी रागावत होते व दीपक ह्या नावाने उद्देशून बोलत होते. “दीपक तुला किती वेळा सांगितलय की तू तुझ्या खोलीच्या बाहेर पाय नको ठेवत जाऊ बाहेर भटकत नको जात जाऊ.. तरीही तुला समजत कस नाही, आज त्या मुलांचा आवाज बाहेर गेला असता म्हणजे…का त्यांना त्रास देत होतास?” मी हळूच पाहण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या समोर कोण आहे, ते नक्की कोणाला सांगत आहेत. पण ते ज्याला रागवत होते तो त्यांच्या समोर नव्हताच मुळी.. त्यांच्यासमोर कोणीच नव्हत.. 

मग हे सर्व कोणाला बोलत आहेत हे सर्व पाहून डोके बधीर होण्याची पाळी आली. काही कळत नव्हत काय करावं. पण एवढं मात्र नक्की समजल होत की हा प्रकार कल्पना शक्तीच्या पलीकडचा आहे. मी तश्याच थरथरत्या पायाने वर चढत गेलो. एकदा विचार आला की आता वर जाऊच नये पण माझ्या बहिणी तिथे होत्या. मी हिम्मत एकवटली आणि वर खोलीत गेलो. बहिणींना धीर दिला. ह्या सगळ्यात रात्रीचे ३:३० कुठे वाजून गेले कळलंच नाही. आम्ही त्या रात्रीही तसाच लाईट चालू करून बसून राहिलो. सकाळ झाली आणि कुठून तरी थोड्या अंतरावरून आम्हाला मंदिराच्या घंटा नादाचा आणि आरतीचा आवाज येऊ लागला. आम्ही तिघांनीही मंदिरात जायचे ठरवले. कसलाही जास्त विचार न करता आम्ही तसेच उठून मंदिरात जायला निघालो. या आधी आम्ही तिथे एकदाही गेलो नव्हतो.

मंदिरात पोहचल्यावर समजले की ते गणेश मंदिर आहे. आम्ही तिथे एका कोपऱ्यात बसून होतो. आज क्लास ला जाण्याची ही इच्छा नव्हती. गणपती बाप्पा ला पाहून अस वाटल की बस इथेच बसून रहाव. थोड का होईना पण बर वाटत होत. ह्या सर्वात आम्हाला एका तिथल्या पुजारी काकांनी पाहिले. ते आमच्या जवळ येवून म्हणाले की तुम्ही फार चिंतेत दिसत आहात काही झालय का? मी तुम्हाला गेल्या २ तासांपासून पाहतोय तुम्ही इथेच बसून आहात. आत पण नाही आलात दर्शनाला. त्यावर माझी बहीण त्यांना अडखळत  म्हणाली ” हो… ते काहीं नाही असच…हा ते अंघोळ केली नाही ना आजुन म्हणून ” त्यावर पुजारी काका म्हणाले की नाही.. हे कारण असूच शकत नाही तुम्ही शून्यात हरवल्या सारखे चेहरे करून आहात काय झालय बाळांनो सांगा मला. हे ऐकून मी त्यांना पहिल्या प्रसंगापासून ते काल रात्री च्या प्रसंगापर्यंत सविस्तर सांगितले.

त्यावर ते म्हणाले की तुम्ही कोणाच्या घरात खोली घेतलीये ते मला सांगा. मग मी त्यांना त्या मालकाचे नाव सांगितले. त्यावर ते ताडकन उठले व आत मंदिरात गेले व परत येताना काहीतरी अंगाऱ्या सारखे घेऊन आले व आम्हा तिघांना डोक्याला लावले. काहीतरी मंत्र उच्चारले. आम्ही त्यांच्याकडे पाहत च राहिलो. हे सगळं झाल्यावर ते आम्हाला सांगू लागले की बाळांनो तुम्ही फार मोठी चूक केली आहे. त्या घराजवळ गेल्या १०-१२ वर्षांपासून कोणीही रात्री जात नाही. त्या घरात राहणाऱ्या त्या दोघांशी सुद्धा कोणीच बोलत करत नाही. ते दिसतात तर सर्वांनाच पण तरीही कोणी त्यांच्याशी साधी नजर ही मिळवत नाही. म्हणतात की ते घर भुताटकी आहे! हे ऐकून आम्ही विचारात पडलो मला लगेच समजले की ह्या कारणामुळे यांच्याशी कोणी काही बोलत नाही! 

नंतर ते पुजारी काका आम्हाला सांगू लागले बाळांनो मी तुम्हाला याच्याव्यतिरिक्त काहीही सांगू इच्छित नाही. फक्त एकच विनंती की रूम लवकरात सोडा नाहीतर उगाच काही अनर्थ व्हायचा. यावर मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटला म्हणून मी विचारले की काका तो बाथरूम मधे त्या भरड्या आवाजात तो गाणे म्हणणारा आणि त्या वरच्या बंद खोलीत तो रडणारा कोण होता. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? त्यावर ते काका म्हणाले की हे सांगणे मी तुम्हाला योग्य समजत नाही तुम्हाला सांगतोय ते करा आणि दूर निघून जा त्या घरापासून. नाहीतर तो सोडणार नाही तुम्हाला… मी एकदम त्यांना थांबवले एक मिनिट काका.. तो? तो म्हणजे कोण..? नाही काका तुम्हाला संगावच लागेल.. यावर ते म्हणाले ” बाळांनो तुम्हाला हे खूप हिंमतीने ऐकावं लागेल.. ” आम्ही त्यांना हो म्हणालो तसे त्यांनी सगळ उलगडून सांगायला सुरुवात केली.

जे तुमचे रूम मालक आहेत त्यांना एक मुलगा होता. दीपक नाव होत त्याच. मला लगेच तो प्रसंग आठवला त्या रात्रीचा.. हा दीपक जैसलमेर ह्या शहरात एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता. का कुणास ठाऊक त्याने एके दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा निरोप इकडे घरी त्याच्या आई वडिलांना मिळाला व ते वेडेच झाले. कारण त्यांना दीपक हा एकमेव मुलगा असल्याने ते त्याला खूप जीव लावत. त्याचे प्रेत पाहून ते जणू बेशुध्द च झाले. नंतर त्याच्या अंतविधीनंतर त्याच्या आईने एका मांत्रीकाला बोलावून त्याच्या आत्म्याला पुन्हा बोलावण्याचा विधी करण्यास सांगितला. त्या मांत्रीकाने त्यांना सांगितले की ह्याच्या अस्थी विसर्जित होता कामा नये. ठरल्या प्रमाणे सगळे झाले आणि त्या मांत्रिकाने त्याच्या आत्म्याला घरात प्रविष्ट केले. त्या मोठ्या दरवाज्याच्या बंद खोलीत त्याच्या अस्थी ठेवल्या आहेत अगदी सुरक्षित पणे.

त्याचा आत्मा आज ही त्या घरात फिरतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यात उठतो बसतो. पण बाळांनो एक आहे त्याला त्या घरात कोणी दुसर आलेले आवडत नाही. ४ वर्षापूर्वी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी इथे राहत होता. रात्रीच्या वेळी टेरेसवर फिरताना अचानक खाली पडून त्याचा मृत्यू झाला. सर्वाँना तो अपघात किंवा आत्महत्या वाटली. पण मला समजले होते की हे त्यानेच केले होते. निव्वळ पैश्याच्या लोभापायी त्याचे आईवडील तुमच्या सारख्या भोळ्या विद्यार्थ्यांना रूम भाड्याने देतात. त्या घरात काय आहे हे सर्व माहीत असून सुद्धा.. आम्ही सगळे ऐकून सुन्न झालो होतो. यावर माझ्या बहिणीने त्यांना प्रश्न विचारला ” मग काका ती आत्मा त्याच्या आई वडिलांना अस केल्यामुळे त्रास देत नाही का ” त्यावर ते काका म्हणाले ” ते फार हुशार लोक आहेत त्यांनी स्वतः साठी त्याला जवळ केले हे नक्की.. पण त्याच्यापासून आपल्याला काही इजा नको म्हणून तशी ही एक खास पूजा करून घेतली आहे. जेणेकरून ती आत्मा त्यांच्या आदेशाबहरे जाणार नाही आणि म्हणूनच ते आता तुम्हाला त्रास देत आहे.

तुमचे असे राहणे त्याला असह्य होत आहे. बाळांनो हा प्रकार फार भयंकर आहे. देव न करो पण काही दुर्घटना तुमच्यासोबत घडू शकते. तुम्ही आजच आपली खोली रिकामी करा आणि निघा इथून. त्यादिवशी आम्ही जराही विलंब न करता थेट मंदिरातून दर्शन घेऊन निघालो व खोलीत आलो. सर्व सामान वैगरे घेतल आणि निघायचा निर्णय घेतला. तसे ही आम्ही दुसरी खोली पाहून ठेवलीच होती त्यामुळे प्रश्नच नव्हता. पण राहून राहून एकच विचार यायचा की कोणी अस ही करू शकत. या थराला जाऊ शकत. असो आम्ही फायनली तयार झालो व तिथून निघू लागलो. पण निघताना मात्र त्याच बाथरूम मधून मला कुत्सित पणे हसण्याचा आवाज येऊ लागला. ते हसणं अस होत की जणू कोणाला खूप आनंद झाला असाव. 

मी समजलो की कदाचित त्याला कळून चुकले असावे की आम्ही ही खोली आणि घर कायमचे सोडून चाललो आहोत. खाली उतरलो तेव्हा ते काका काकू आमच्या समोर तोंड करून थोड दूर एका सोफ्या वर बसले होते. आमच्याकडे पाहून स्मित हास्य करत होते. त्याच्या नजरा काही वेगळंच सांगत होत्या. जेव्हा मी नीट निरखून पाहिले तेव्हा धडकीच भरली. त्यांचे डोळे आता लाल भडक झाले होते जसं कोणी तरी त्यांना जखडून ठेवलंय. ते एकटक माझ्याकडे आणि वर आमच्या खोली कडे पाहत होते. मी लगेच मागे पाहिले तर माझी एक बहीण तिथे दिसली नाही. मी ते पाहून पुन्हा समोर त्या दोघांकडे पाहिले. आता त्यांचे हसणे जरा वाढले होते. मी काहीच विचार न करता माझ्या सोबत जी बहीण होती तिला म्हटले की तू थेट देवळाकडे जा मी आलोच तिला घेऊन. मी गणपती बाप्पाच नाव घेतल आणि सरळ वर गेलो. पण ह्यावेळेस मी घाबरलो नव्हतो.

का कुणास ठाऊक माझ्यात एक नवीन ऊर्जा आली होती. खोली चा दरवाजा तसाच उघडा होता. मी धावतच आत गेलो आणि माझ्या बहिणीला हाका मारू लागलो. मला अचानक बेड खालून तिची हाक ऐकू आली. मी तिला बाहेर यायला सांगितले. तिला जवळ घेतले व तिला काहीच प्रश्न न विचारता सरळ खाली घेऊन आलो. हो पण जाताना मात्र ह्यावेळी ते दोघेही तिथं बसलेले दिसले नाहीत. तिथून थेट मंदिरात गेलो. मी मागे राहिलेल्या बहिणीला विचारले तू मागे कशी काय राहिलीस.? त्या वर तिने जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन च सरकली. ती म्हणू लागली तुम्ही दोघं माझ्यापेक्षा जरा लवकर रूम मधून बाहेर पडलात. 

मी माझे शेवटचे सामान ठेऊन निघतच होती तितक्यात मला बाथरूम मधून एकदम भरडा असा आवाज आला ” कुठे चाललीस.. तू आता इथून जाऊ शकत नाहीस.. ” तो आवाज ऐकल्यावर माझे पाय जणू जागीच खिळले. मी पळायचा प्रयत्न केला पण मला त्या खोलीतून बाहेर जाताच येत नव्हत. मी घाबरून तिथेच पडले आणि सरकून बेड खाली जाऊन लपले. आणि देवाचा धावा करू लागले. हे ऐकून आम्ही तिघही जणू रडूच लागलो. मी तिला माझ्या मिठीतच घेतले आणि विचार येऊन गेला की जर मी मागे वळून बघितलं नसत, मला जायला उशीर झाला असता तर आज काहीतरी अनर्थ नक्कीच घडला असता.

हे सर्व तेच पुजारी काका ऐकत होते त्यावर ते म्हणाले “माफ करा बाळांनो मी तुम्हाला एक सांगायचे विसरलो की जो कोणी इथे राहायला येतो एकटा असेल तर त्याचा किंवा समूहात असेल तर कोण एकाचा मृत्यू नक्की होतो. पण तुम्ही खूप चांगल नशीब घेऊन आला आहात म्हणून तुम्हाला काही झाले नाही. आम्ही देवाचे मनोमन आभार मानले व त्या पुजारी काकांनाही धन्यवाद सांगितले. त्यानंतर आम्ही त्या जागेवर कधीच फिरकलो. नाही २ महिन्यांवर परीक्षा होती, ती आम्ही दिली. आणि देवाची जणू कृपाच म्हणावी लागेल आम्ही तिघेही ती परीक्षा खूप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. आज आम्ही तिघेही खूप चांगल्या गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस ही डिग्री संपादन करीत आहोत…..

Leave a Reply