लेखिका – नेहा प्रकाश जाधव

केशव बसमधून खाली उतरला . खूप वर्षांनी आपल्या गावी आला होता . त्याच्या पुढ्यात दोन रस्ते होते. खूप वर्षांनी आल्यामुळे तो फार गोंधळात पडला. कारण सात वर्षांचा असताना त्याने या गावाला राम राम ठोकला होता आणि आता तर तो तीस वर्षांचा झाला होता. शिवाय बस स्टँडवर कुणी नव्हतं , विचारणार तरी कुणाला. त्याच्या मावशीने त्याला सांगितलं होतं की डावीकडे जायचं की उजवीकडे पण तो पुरता विसरला होता. शेवटी त्याला मावशीने सांगितलेली दुसरी गोष्ट आठवली . ज्या रस्त्यावर कुठली चहाची टपरी दिसेल, तो रस्ता आपल्या घराकडे जातो. पण त्या दोन्ही रस्त्यावर कुठलीच चहाची टपरी नव्हती . त्याने विचार केला कदाचित एवढी वर्ष झाली आहेत नसेल ही आता इथे टपरी . म्हणून त्याने श्यामकाकांना फोन लावावा असा विचार केला पण तेवढ्यात तिथे एक बाई आली . तिने केशवला विचारलं ” पाहुणं , कुठं हरवलात ? “. त्याने त्या बाईकडे पाहिलं. ती साधारणतः पंचवीस वर्षांची असेल . लावण्यवती. तिचा शृंगार पाहून कोणीही घायाळ होईल असा होता . केशव म्हणाला ” मला चांदवाडीमध्ये जायचं आहे. पण चांदवाडीकडे हा रस्ता जातो की दुसरा ते माहीत नाही “.

त्यावर ती बाई म्हणाली ” एवढंच, मला पण तिथेच जायचंय. चला माझ्याबरोबर. आमचा कालच इथे कार्यक्रम झाला “.

केशव ” तुम्ही शुद्ध मराठी बोलता? “. केशव त्या बाईबरोबर चालू लागला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. 

बाई ” हो मराठी बोलता येते मला , तीही शुद्ध बरं का . तुम्ही मुंबईचं पाहुणं वाटतं” . 

केशव ” हो, तेवीस वर्षांनी या गावात परत आलोय . आई बाबा गेल्यानंतर मावशीनेच मला वाढवलं , तेही मुंबईत” . 

बाई ” मग आज अचानक गावी का? “. 

केशव ” चांदवाडीमध्ये माझा नक्षत्र नावाचा बंगला आहे. त्याचा सौदा करायचा आहे , तसंही माझं इथे कुणीच नाही . व्यवहारासाठी आलोय .” 

बाई ” अच्छा , असं हाय तर .”

केशव ” हो, आणि तुमचा फड वैगरे आहे का.. “. 

बाई ” हो, इथे काल आमचा कार्यक्रम झाला . आज गाव सोडणार आहे मी, कायमची “. 

केशव ” कायमची म्हणजे? “. 

बाई ” आहो म्हणजे इथे कमाई नाही ना होत नीट म्हणून म्हटलं “. 

केशव “अच्छा”. 

बाई ” पण मला एक सांगा दोन रस्त्यांमध्येच तुमची तारांबळ उडाली होती , तर बंगला कुठे आहे ते कसं कळणार तुम्हांला .” 

केशव ” मावशीने सांगितलंय की सात मिनिटांवर आमचा बंगला आहे. शिवाय आमचे केअरटेकर श्यामकाकाही बंगल्यावरच असतील “. 

बाई ” तुम्हाला ओळखतील ते?” . 

केशव ” हो त्यांनी माझ्या हातात ही बॅग बघितली की ओळखतीलच ते , शिवाय मी लाल कलरचा शर्ट आणि काळ्या कलरची पॅन्ट घातली आहे असं सांगितलंय त्यांना फोनवर, हे बघा आलं माझं घर, चला माझ्या घरी, थोडा चहा नाश्ता करा ” . 

बाई ” नोको राहूदे, मला जायचं आहे दुसरीकडे, आवराआवर करायची आहे “. 

केशव ” बरं” . ती बाई आपल्या मार्गाने परत गेली. केशवने श्यामकाकांना फोन केला .

केशव ” काका मी पोहोचलो, बंगल्याच्या बाहेरच आहे .” 

श्यामकाका ” केशव, अरे मी बंगल्यातच आहे ये लवकर “. 

केशव ” हो आलोच काका म्हणत तो बंगल्यात आला. 

बंगला खूप सुंदर होता शिवाय केशव येणार म्हणून तो लक्ख केला होता. श्यामकाका ” केशव , किती वर्षांनी पाहतोय तुला, खूप मोठा झाला आहेस, तुला बघून आनंद झाला “.

केशव ” हो, मलाही आनंद झाला . पण काका उद्याचा दिवस फक्त मग मी मुंबईलाच तोही कायमचा . परवा हा बंगला त्या मंडळींचा , तोही कायमचा .” 

श्यामकाका ” तेही खरंच आहे , इथे राहून तरी काय करणार तू . असो , तू हात पाय धु आणि हा नाश्ता करून घे . थोडा आरामही कर . ” 

केशव ” हो काका करतो नाश्ता, पण आराम दुपारी आता काम आहे ना “. म्हणून त्याने आपले हात पाय धुतले, नाश्ता केला आणि आपल्या कामाला लागला . बंगल्याची कागदपत्रे पाहू लागला . बंगल्याचे निरीक्षण करू लागला . सोबत श्यामकाकाही होतेच . संध्याकाळी श्यामकाका आपल्या घरी गेले . आता केशव बंगल्यात एकटाच होता. बघता बघता रात्र झाली .

बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता . बंगल्यातही भयाण शांतता पसरली होती . पण केशवला त्याची काहीच पर्वा नव्हती . त्याने रात्रीचे जेवण केले. तो जेवणाची भांडी धुण्यासाठी स्वयंपाकघरात आला . त्याने भांडी घासली . बाहेरच्या खोलीत जाणार तेवढ्यात त्याला गाणं ऐकू आलं .” ” तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल “. त्याला आश्चर्य वाटलं कारण तो आवाज स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीतून येत होता आणि त्या खोलीत ना टीव्ही (tv) होता ना रेडिओ (radio) . त्याला आता थोडी भीती वाटू लागली . पण काहीच वेळात त्याच्या दारावर कुणी तरी थाप देतंय असं वाटलं .

तो बाहेर आला, दार उघडलं. समोर तीच बाई, त्याला सकाळी भेटलेली . थोडी भिजली होती . त्याला आश्चर्य वाटलं की ही इथे रात्रीची काय करतेय. त्याने तिला घराच्या आत घेतलं आणि विचारलं ” बाई, तुम्ही एवढ्या रात्री आणि तेही पावसात काय करताय?” .

बाई ” ते नंतर सांगते, आधी माझी गोष्ट ऐका”. केशव मनातल्या मनात बोलला ” काय बाई आहे, एवढ्या रात्री तिला गोष्ट सांगायची आहे “. केशवने तिला टॉवेल देऊ केला पण तिने तो नाकारला, तिला फक्त गोष्ट सांगायची होती . केशवने तिला परत विचारलं ” ते गाणं तुम्हीच गात होता ना बाहेर ?”. बाई ” ते राहूदे आधी माझी गोष्ट ऐका”. ती बोलू लागली . ” ही तेवीस वर्षांअगोदरची गोष्ट आहे . ह्याच गावात रेणुका नावाच्या लावण्यवतीचं आगमन झालं. तिची लावणी पाहण्यासाठी लोक उतावळे असायचे. तिच्यावर पाण्यासारखे पैसे उधळायचे .” केशव ” पण हे तुम्ही मला आता का सांगताय ?”.

बाई ” मध्ये मध्ये बोलू नका, माझी गोष्ट सांगून झाली की मग बोला “. केशव ” बरं, बोला ” . 

बाई ” याच गावातील एक इसम तिच्यावर फिदा झाला . एवढा की तो आपल्या बायकोलाही विसरला . त्या बाईच्या घरी येऊ लागला . त्या इसमाने तिला वचन दिलं की तुला मी सुखात ठेवीन . आपण दोघं एकत्र राहू . पैसेवाला होता तो . त्याने तिला लावणी सोडायला सांगितली . तिनेही ती सोडली, पण कार्यक्रम मंडळींना पैश्याचा आणि स्वाभिमानाचा फटका बसला. रेणुकाने आयत्या वेळेला कार्यक्रमामधून माघार घेतली . ती मंडळी तिच्यावर खूप नाराज झाली. पण आपलं चांगलं आयुष्य आता सुरू होणार म्हणून ती निर्धास्त राहिली. याउलट नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्या इसमाला एक मुलगा होता. तो एक दिवस त्याच्या वडिलांकडे आला आणि म्हणाला ” बाबा, तुम्ही वाईट आहात , तुमच्यामुळे मला गावातील पोरं चिडवतात. मला खेळायला घेत नाहीत . छळतात मला . बोलतात की तुझे बाबा बाहेर रंग उधळतात . दुसऱ्या बाईबरोबर असतात.

तुम्ही त्या बाईबरोबर नका राहत जाऊ मग मला गावातील पोरं चिडवणार नाहीत “. 

त्याचे बोलून झाले की त्याची आईही बोलू लागली ” अहो, निदान माझं नाही, पोराचं तरी ऐका. त्या बाईचा नाद सोडा नाहीतर आपल्या पोरावर याचा परिणाम होईल . त्याला वाळीत टाकल्यासारखं वाटतंय “.

हे ऐकून तो इसम विचारात पडला. आपल्या कृत्याचे वाईट परिणाम आपल्या पोराला भोगायला लागतयात हे त्याला सहन झाले नाही . पोरावर त्याचा जीव होता, तो थेट रेणुकाकडे गेला आणि बोलला की आजपासून तू आणि मी अनोळखी , त्याने तिला पैश्याची एक बॅग दिली आणि म्हणाला की तू पुन्हा तुझ्या कामात मन रमवं, तुझ इथे काहीच काम नाही. रेणुकाच्या पायाखालची जमिनचं सरकली. त्याच्या भरवशावर तिने लावणी सोडली होती .

तिने त्याला विचारलं हे असं अचानक का? त्यावेळी त्याने तिला सांगितलं की आपल्या नात्यामुळे माझ्या पोराला त्रास होतोय. आणि मला ते सहन होणार नाही . पुढे त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली . पण शेवटी रेणुका एकटी पडली . तो बंगला तिने सोडला, सोडला कुठे त्या इसमानेच सोडायला लावला. ती परत आपल्या कार्यक्रम मंडळींना भेटली, पण त्यांनी तिला परत घेतले नाही. तिचं आयुष्य बेचिराख झालं. फुढे काय करावं तिला कळत नव्हतं . पण एक मात्र होतं तिला सूड घ्यायचा होता. ती घराबाहेर पडली. शुन्यात पाहून रस्त्यावरून चालत होती. तिच्यावर जणू आभाळच कोसळलं होत. तिच्या साठी सगळं काही संपल होत. ती विचारात नैराश्यात इतकी गुंतली होती की तिच्या पाठून एक ट्रक वेगाने येत आहे तेही तिला कळलं नाही. ट्रकवाला जोरात हॉर्न वाजवू लागला, तिने तो ऐके पर्यंत वेळ निघून गेली होती. तो ट्रक तिच्यावरून गेला . देहाचे दोन तुकडे झाले. रस्त्यावर तड फडत तिचा काही क्षणात मृत्यू झाला. . पण तिचा सूड अपूर्ण होता. ती जरी या जगात नसली तरी तिच्या सुडाची भावना तिला इथून जाऊ देत नव्हती. काही दिवसानंतर तो इसम आणि त्याची पत्नी बाहेरगावी जात होते. तेव्हा त्या अतृप्त आत्म्याने शेवटी आपला सूड घेतला. एका अपघातात ते दोघे ही गेले. 

पण इतके करूनही तिच्या मनात एक सल राहिली की ज्याच्यामुळे हे घडलं तो तर अजूनही जिवंत आहे. त्या इसमाचा लेक आपल्या नातेवाईकाकांकडे गेला होता. त्या इसमाचं नाव माहितेय तुम्हाला?. 

केशव ” नाही, पण हे सगळं मला माहितेय असं वाटतंय, ही गोष्ट थोडी”. 

त्या इसमाचं नाव होतं ” वसंतराव पाटील”. त्या बाईचं हे वाक्य ऐकून केशवच्या पायाखालची जमिनचं सरकली . 

केशव ” तू, म्हणजे तू जिवंत नाहीस , आणि तो मुलगा मी आहे “. 

बाई ” हो, शेवटी मला तुझा जीव घेतल्यावर च मुक्ती मिळेल . किती वर्षे वाट पाहिली तुझी . तुझी मावशीही आली होती गावी पण तीही एकटीच जमिनीच्या व्यवहारासाठी . तुझ्याच भेटीसाठी माझा आत्मा तळमळत होता. शेवटी ही रात्र आलीच. ” 

केशव ” तुझा असा अंत , तुझ्या कर्मामुळे झाला आहे . लग्न झालेल्या माणसाशी नातं जोडलंच नसतं तर असं झालंच नसतं.” 

केशव घाबरतच पण ठामपणे बोलत होता.. आपला जीव वाचवण्यासाठी त्याने दारापाशी धाव घेतली.. दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला . पण दार उघडता येतं नव्हते. दुसरीकडे रेणुकाने हातात सूरी घेतली आणि केशवच्या दिशेनी फेकली. पण त्याच वेळेत दरवाजा उघडला. बंगल्यापाशी लोक जमा झाले . लोकांना काहीच कळत नव्हतं की हा काय प्रकार आहे . श्यामकाकांच्या पत्नी ढसाढसा रडत होत्या. शेवटी नवरा गमावला होता त्यांनी . पोलीस केशवला जेलमध्ये घेऊन गेले . त्याची आरडाओरड चालूच होती की ” मी श्यामकाकांना नाही मारलं, तिनेच मारलं. .” पण त्याचं कुणी काही ऐकत नव्हतं कारण त्या सुरीवरती त्याच्याच अंगठायाचे निशाण होते . केशव जेलमध्ये एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि त्याला ते भयंकर दृश्य आठवलं.” कसंतरी त्याच्याहातून रात्री दार उघडलं. तो बाहेर पळतच सुटणार होता पण दार उघडलं आणि समोर श्यामकाका उभे, कदाचित वस्तू फेकत असताना त्यांना त्यांच्या घरातून आवाज आला असेल . बाजूलाच राहत होते ना शेवटी.

रेणुकाने फेकलेली सूरी केशवला न लागता थेट श्यामकाकांच्या छातीत रुतली. ते तिथेच ठार झाले. हे बघून केशवलाही भोवळ आली . सकाळी तो उठला तर पाहतो काय की त्याच्या हातात सूरी होती . तो दचकला. पण काहीच क्षणात तिकडे श्यामकाकांच्या पत्नी आल्या . कदाचित त्यांना हे माहीत नव्हते की रात्री काका इथे आले होते आणि त्यांनाच शोधायला त्या आल्या होत्या.” केशवला हे सहन होत नव्हतं. तो परत बडबडू लागला. शेवटी त्याच्या कानाजवळ काहीतरी ऐकू आलं ” काय पाहुणं, मरणार तर तुम्ही आहातच, पण थोडं सोसावं असं वाटलं म्हणून हा खटाटोप”. केशव हे ऐकून बधिर झाला. पोलिसांना वाटलं की हा वेडा आहे म्हणून त्याने श्यामकाकांवर हल्ला केला. पण कारण काहीतरी वेगळंच होतं. शेवटी पाखरू पिंजऱ्यात अडकलं होत..

Leave a Reply