अनुभव – तुषार

ही घटना याच वर्षात जानेवारी महिन्यात घडली होती. आम्ही ५ मित्र मी, उजेफ, शिवम, विवेक आणि स्वप्निल एकत्र एका फ्लॅट मध्ये र हायचो. आमच्यापैकी काही जण क्लास ला जायचो तर काही नोकरी करायचो. पण राहायला आल्यापासून काही महिन्यातच अपरिहार्य कारणामुळे आम्हाला तो फ्लॅट सोडावा लागला. आता त्याच भागात आम्हाला राहायला दुसरी जागा हवी होती त्यामुळे आम्ही दुसरा फ्लॅट किंवा एखादी रूम मिळतेय का हे पाहायला सुरुवात केली. काही दिवसातच आम्हाला अगदी स्वस्त दरात एक जागा मिळाली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० डिसेंबर ला सगळे समान वैगरे शिफ्ट करून आम्ही तिथे राहायला आलो. 

२ मजल्यांची बिल्डिंग होती आणि प्रत्येक मजल्यावर ५ फ्लॅट होते. आम्ही ग्राउंड फ्लोअर वरचा एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. एक विचित्र गोष्ट म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये आमच्या शिवाय दुसरे कोणीही राहत नव्हते. पण ही गोष्ट आम्हाला तिथे राहायला आल्यावर कळली. त्या रात्री मला बरेच अस्वस्थ वाटतं होते, अगदी कोंडल्या सारखे झाले होते पण मी कोणाला काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी ३१ तारीख होती. आम्ही नेहमी प्रमाणे क्लास ला जायला निघालो. स्वप्निल ला ३१ डिसेंबर असल्यामुळे हाफ डे सुट्टी मिळाली त्यामुळे तो फ्लॅट वर यायला निघाला. बिल्डिंग च्या खाली त्याच परिसरात राहणाऱ्या एका बाईने अडवून त्याला विचारले “तुम्ही इथे राहायला आलात का ?.. तुम्हाला काही माहीत नाहीये का?”. त्या बाईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती दोन्ही प्रकर्षाने जाणवत होते. तसे स्वप्निल म्हणाला “नाही.. का काय झालं?”. 

तसे ती बाई सांगू लागली “अरे.. इथे एका मुलीने आत्महत्या केली आहे.. तुम्ही या फ्लॅट मध्ये राहायला येण्याआधी काही चौकशी नव्हती केली का”. स्वप्निल “नाही” म्हणतच तिथून निघून गेला. पण फ्लॅट वर आल्यावर त्याला जरा अस्वस्थ वाटू लागले. अनोळखी जागा, पूर्ण बिल्डिंग मध्ये आपण फक्त एकटे आणि त्यात त्या बाईचे बोलणे. कोणाच्याही मनात शंका निर्माण होणे साहजिक होते. याच विचारात तो सगळ्यांची वाट पाहत बसला होता. तितक्यात अचानक दार वाजवण्याचा आवाज आला. आमच्या पैकी कोणी तरी आले असेल असे समजून त्याने दार उघडले पण दारात कोणीही नव्हते. 

आता मात्र त्याच्या मनात भीती ने घर करायला सुरुवात केली होती. इथे एकटे थांबण्या पेक्षा बाहेर पार्किंग लॉट मध्ये जाऊन वाट बघू असा विचार करत तो तिथून बाहेर पडला. त्याला बराच वेळ वाट पाहावी लागली. नेहमी प्रमाणे क्लास आटोपून साधारण ६ च्या सुमाराला आम्ही सगळे तिथे आलो. आम्ही सगळे ३१स्त पार्टी च्या मुड मध्ये होतो त्यामुळे सगळी प्लॅनिंग चालू होती. स्वप्निल ने सांगायचा प्रयत्न केला खरा पण आम्ही त्याचे बोलणे ऐकूनच घेतले नाही. नंतर पार्टी चा विषय निघाल्यामुळे तो विसरूनही गेला. 

काय आणायचे काय नाही याची सगळी यादी करून आम्ही पुन्हा तिथून बाहेर पडलो. ९-९.३० च्याच सुमाराला पुन्हा घरी आलो आणि १० वाजता आम्ही खाण्यापिण्याचा कार्यक्रम सुरू केला. आमच्या गप्पा रंगात आल्यामुळे १२ कधी वाजले कळलेच नाही. तितक्यात उजे फ ला वरच्या मजल्यावरून कोणी तरी धावत गेल्याचा आवाज आला. तसे त्यांनी आम्हाला म्हंटले “कोणी तरी आहे रे वरती”. 

तसे त्याचे बोलणे ऐकुन आमच्यात चांगलाच हशा पिकला. विवेक म्हणाला “अरे ड्रिंक आम्ही करतोय आणि चढते य तुला”.. पण स्वप्निल अगदी शांत होऊन विचारात पडला होता. तसे मी त्याला विचारले “काय रे.. काय झाले?”.. तसे स्वप्निल ने त्या बाईचे बोलणे आणि त्या नंतर त्याला आलेला अनुभव सांगितला. पण काही होत नाही, लक्ष देऊ नको असे म्हणत आम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळा नंतर जेवण वैगरे आटोपून आम्ही झोपूनही गेलो. पण स्वप्निल मात्र जागाच होता. त्याला काही झोप येत नव्हती. म्हणून युट्यूब ओपन करून “how to check if ghost is around” आणि “how to talk with ghost” असे व्हिडिओज सर्च करुन पाहू लागला. तसे त्याला काही माहिती मिळाली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाश्ता वैगरे आटोपून क्लास ला जायला निघालो पण स्वप्निल मात्र फ्लॅट वरच थांबला. आमच्या तिघांचा पेपर असल्यामुळे क्लास आटोपल्यावर लायब्ररी मध्येच बसलो होतो. रात्री साधारण ९ वाजता विवेक भूक लागली आहे सांगून फ्लॅट वर जायला निघाला. बिल्डिंग च्या गेट मधून आत शिरल्यावर त्याला विंग च्याच पेसेज मधून पहिल्या मजल्यावर एक लहान मुलगा खेळताना दिसला. त्याकडे दुर्लक्ष करत तो फ्लॅट मध्ये शिरला. लाईट वैगरे सगळे बंद होते. स्वप्निल ला हाक देणार तितक्यात त्याला आतल्या खोलीतून येणारा थोडा प्रकाश दिसला. तसे तो त्या दिशेने चालत गेला. स्वप्निल एक मेणबत्ती लाऊन आरश्या समोर उभा होता आणि काही तरी बडबडत होता. 

त्याला पाहून विवेक चा राग अनावर झाला आणि त्याला जोरात एक फटका मारतच सांगू लागला “हे काय विचित्र वागणे चालू आहे, काय करतोय तू हे कळते य तरी का तुला?.. तुला माहितीये मला आता एक लहान मुलगा पहिल्या मजल्यावर खेळताना दिसला. त्याचे बोलणे ऐकून स्वप्निल प्रचंड घाबरला. पण विवेक निडर असल्यामुळे पहिल्या मजल्यावर खरच कोणी आहे का हे पाहायला वर गेला. त्याने सगळे नीट निरखून पाहिले, वरचे पाचही फ्लॅट बंद होते पण मग तो लहान मुलगा नक्की कोण होता..?? हा प्रकार काही तरी वेगळाच आहे हे त्या दोघांनाही कळू लागले होते. जास्त विलंब न करता ते दोघेही त्यांचा फ्लॅट बंद करून बाहेर पडू लागले तसे त्यांना मागून कोणी तरी धावत येत असल्याची चाहूल जाणवली. त्यांनी मागे न पाहता सरळ जात मित्राची रूम गाठली. 

तिथून लगेच मला फोन केला आणि तिथे बोलवून घेतले. तसे मी आणि माझा अजुन एक मित्र आम्ही त्या रूम वर येऊन पोहोचलो. तिथे विवेक आणि स्वप्निल ने घडलेला प्रकार सांगितला. त्या रात्री आम्ही मित्राकडेच झोपायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही हिम्मत करून फ्लॅट वर गेलो आणि क्लास ला जाण्यासाठी सगळी तयारी करू लागलो. फ्रेश होण्यासाठी म्हणून स्वप्निल बाथरूम मध्ये गेला आणि ओरडतच बाहेर आला. त्याला आम्ही विचारले “अरे एवढ्या जोरात ओरडायला काय झाले”. तसे तो म्हणाला “मी बाथरूम मध्ये शिरून दरवाजा बंद केला आणि तितक्यात बाथरूम च्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक आकृती उभी दिसली, म्हणून मी ओरडतच बाहेर आलो. आपण इथून निघायला हवे, इथे थांबणे बरे नाही”. आम्ही कसे बसे आवरून तिथून बाहेर पडलो. कशातच लक्ष लागत नव्हते. आजही फ्लॅट वर न झोपता मित्राकडे च रात्र काढायची असा बेत ठरला. 

पण असे करून चालणार नव्हते. सगळ्या गोष्टींचा सोकश मोक्ष लावणे गरजेचे होते. मित्राच्या ओळखीने एका तांत्रिकाला बोलवायचे ठरले. त्यांना घडलेल्या घटना क्रमाने सांगितल्या. त्यांना सगळी माहिती दिली. ते म्हणाले की सध्या त्या फ्लॅट वर कोणीही जाऊ नका, माझा एक शिष्य आहे त्याला मी तुमच्या मदतीसाठी पाठवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस मित्राच्या रूम वर आला. त्याला आम्ही पुन्हा सगळे सांगितले. त्यावर तो म्हणाला “मला बऱ्याच गोष्टी तुमच्या कडून कळल्या पण जे हवे आहे ते अजुन कळले नाही. मला काही वस्तू लागतील त्या आणायला मी जातोय. आपण आता थेट रात्री तुमच्या फ्लॅट वरच भेटू”. इतके सांगून तो माणूस निघून गेला.

आम्ही संध्याकाळी बिल्डिंग च्या खाली त्याची वाट पाहत थांबलो होतो. साधारण ६ वाजता तो माणूस तिथे आला. आम्ही त्याला आत फ्लॅट वर घेऊन गेलो. त्याने त्याच्या सोबत आणलेले आसन जमिनीवर अंथरले आणि त्यावर बसून डोळे बंद करत तो ध्यान करू लागला. बराच वेळा नंतर त्याने डोळे उघडले. मी त्याला काही विचारणार तेवढ्यात विवेक म्हणाला “आपल्या सगळ्यांचे जेवण राहिले आहे, आपण हॉटेल मध्ये जाऊन काय ती चर्चा करू. मला खूप भूक लागली आहे, तुम्हाला ही लागली असेलच. बरीच रात्र होत आली आहे. काही वेळात हॉटेल ही बंद होतील”. त्या माणसाला आम्ही विनंती केली तुम्ही ही आमच्या सोबत चला. तसे तो तयार झाला.

जरा जास्तच उशीर झाल्यामुळे हॉटेल मध्ये आमच्या व्यतिरिक्त कोणी नव्हते. आम्ही जेवायला सुरुवात केली. तितक्यात त्या माणसाने अचानक दोन्ही हात जोरात टेबल वर आपटले आणि वर पाहून आपली नजर झपाझप फिरवायला सुरुवात केली. काही क्षणासाठी आम्हाला कळलेच नाही काय घडतेय. त्या माणसाने वर पाहूनच बोलायला सुरुवात केली “तुला काही मिळणार नाही, काहीच नाही”. 

तसे मी जरा घाबरतच विचारले “काय झाले , कोणाशी बोलत आहात”. तसे तो माणूस सांगू लागला “ती ईथे आपल्या सोबत आहे, आपल्या मागावर येत ती इथपर्यंत पोहोचली आहे, तिला तुमच्यापैकी २ जण हवी आहेत”. त्याचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो माणूस पुन्हा वर बघून बोलू लागला “या मुलांची काही चूक नाही, यांना त्रास देणे बंद कर”. आम्ही सगळे जण समोर घडणारा प्रकार धड धडत्या काळजाने पाहत होतो. आमच्यातल्या विवेक ला मात्र हे सगळे पटत नव्हते. त्याला सतत वाटत होते की हा माणूस मुद्दामून असे करतोय. पण तो काही न बोलता तसेच बसून त्या माणसाच्या हालचाली पाहत होता. त्या माणसाने तिथल्याच एका निर्जन जागेचे नाव सांगितले आणि आम्ही तिथे जात आहोत असे म्हंटले. त्या नंतर काही वेळा ने सगळे शांत झाले. 

एव्हाना १२ वाजून गेले होते. हॉटेल मधून बाहेर पडल्यावर त्या निर्जन जागेवर आम्ही येऊन पोहोचलो. पुन्हा त्या माणसाने आपले आसन काढले आणि त्यावर बसून ध्यान करू लागला. आम्ही त्याच्या पासून काही फूट लांब उभे राहून पुढे काय घडतेय हे पाहू लागलो. जानेवारी महिना असल्यामुळे वातावरणात गारवा तर होताच पण त्या परिसरातला गारवा प्रत्येक सेकंदाला वाढतच जात होता. काही मिनिटात आम्हा सगळ्यांना तो थंड वारा अगदी असह्य होऊ लागला. तितक्यात त्या माणसाने पुन्हा वर पाहून झपाझप डोळे फिरवायला सुरुवात केली आणि सांगू लागला “या मुलांना तू काहीच करणार नाहीस, त्यांची काहीच चूक नाही, आणि माझे ऐकले नाहीस तर गाठ माझ्याशी आहे”. 

त्या निर्जन रस्त्यावर त्याचे असे हे वर पाहून अभद्र बड बडणे अतिशय विचित्र वाटत होते. पण इतका वेळ शांत बसलेला विवेक मात्र त्या माणसाचे वागणे बघून हसू लागला आणि म्हणाला “कधी पासून पाहतोय, काय फालतूपणा आहे हा, नाटक बस झाले आता”. तसे तो माणूस शांतपणे म्हणाला “तुला हे खोटे वाटतेय तर तसे समज पण ती अतृप्त शक्ती इथे आहे एवढे मात्र नक्की”. तसे विवेक म्हणाला “मग नुसते सांगू नका, काही पुरावा द्या. आहे का काही पुरावा तुमच्याकडे?” त्या माणसाने आम्हा सर्वांकडे पाहत म्हंटले “माझ्या आजूबाजूला डोक्यावर कोणतेही झाड वैगरे आहे का?. मग तुम्ही मला सांगू शकता की माझ्या केसांवर, खांद्यावर पाणी कुठून पडतेय ?”. 

आम्ही सगळ्यांनी जवळ जाऊन पाहिले तर खरच तो माणूस पाण्याने चिंब भिजला होता. थंडीमुळे पडणारे दव असू शकते पण ते इतक्या प्रमाणात ते ही इतक्या कमी वेळेत कधीच पडत नाही. आता मात्र विवेक ला ही थोडासा का होईना पण विश्वास बसू लागला होता. त्या माणसाचे अदृश्य शक्तीशी संवाद साधणे सुरूच होते. त्याने आम्हाला विचारले “तुमच्यापैकी कोणी या शक्तीला जागे करण्याचा प्रयत्न केला होता का ?”. तसे स्वप्निल म्हणाला “हो मी प्रयत्न केला होता. मला जाणून घ्यायचे होते की तिने आत्महत्या का केली होती?”. तोच प्रश्न त्या माणसाने तिला विचारल्यावर त्याला उत्तर मिळाले. घरात होणाऱ्या सतत च्याच त्रासाला कंटाळून तिने स्वतःला संपवले होते. 

तिला येत्या चंद्र ग्रहणाच्या रात्री एकटे राहायचे आहे. तुम्ही चुकूनही तेव्हा फ्लॅट वर थांबू नका. या एका अटीवर ती तुम्हाला सोडायला तयार आहे. आम्ही सगळ्यांनी होकारार्थी माना हलविल्या. काही दिवस आम्ही त्या फ्लॅट वर फिरकलो सुद्धा नाही. चंद्र ग्रहण झाल्यानंतर १-२ दिवसांनी आम्ही तिथे पाहायला गेलो. सगळे काही एकदम नीट होते. वातावरण ही प्रसन्न वाटत होते. त्या नंतर आम्हाला त्या शक्तीचा कधीच त्रास झाला नाही. बहुतेक तिला कायमची मुक्ती मिळाली असावी. 

https://youtu.be/bZYOC0VIvP0

Leave a Reply