अनुभव – ओंकार कांबळे
प्रसंग माझ्या मावशी सोबत जवळपास वीस वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हा ती वयाने लहान होती. त्यांचं कुटुंब गावी राहायचं. मावशी खूप हुशार आणि अगदी बिनधास्त होती. भुताखेतांवर तिचा अजिबात विश्वास नव्हता. पण या एका प्रसंगामुळे तिची अश्या गोष्टीबाबत विचारसरणी च बदलली. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा गावातील घरा शेजारी राहणाऱ्या काकुंचे अकाली निधन झाले. माझी मावशी काकूंची खूप लाडकी होती. त्यांच्या अश्या अकस्मात जाण्याने तिला खूपच धक्का बसला. पण हळु हळू त्यातून ती सावरत होती. साधारण एक महिना उलटला असेल आणि त्यांच्या आठवणीतून ती बाहेर पडू लागली. पण गावात काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. गावातल्या लोकांना त्या काकूंचा भास व्हायचा. इतकचं नाही तर काही जणांना तर त्या रात्री अपरात्री वाटेत दिसायच्या. या प्रकाराबद्दल गावातल्या सगळ्यांना माहीत असेल तरी लहान आल्यामुळे मावशी व तिच्या मैत्रिणींना ही गोष्ट अजुन कानावर आली नव्हती. त्या दिवशी दुपारी त्या सगळ्या जणी ओढ्याच्या मागच्या बाजूला खेळत होत्या. सकाळी ओढ्यावर कपडे धुवायला आलेल्या काही बायका ही एव्हाना आपल्या घरी परतल्या होत्या. त्यामुळे मावशी आणि तिच्या काही मैत्रिणी सोडल्या तर तिथे कोणीही दिसत नव्हत. त्या भागात बरीच झाडी झुडूप होती. खेळता खेळता अचानक मावशीला त्या झुडुपात एक वेगळीच सळसळ जाणवली. तिने निरखून पाहायचा प्रयत्न केला पण तिला काहीच दिसल नाही.
मनातच म्हणाली की जाऊदे एखादा प्राणी असेल, जाईल निघुन. ती त्याकडे दुर्लक्ष करून खेळात रमली. बराच वेळ त्यांचा खेळ सुरू होता. दिवस मावळतीला आला तसे त्यांनी खेळ थांबवला आणि घराची वाट धरली. नुकताच अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्याच सोबत रातकिड्यांचा आवाज कानावर पडू लागला. त्या भागात झाडी असल्याने तो जास्तच जाणवू लागला. ओढ्याच्या जवळचा परिसर असल्यामुळे हवेत खूप गारवा पसरला. मैत्रिणी तिच्या पुढे निघून गेल्या पण मावशी मात्र आपल्याच धुंदीत चालत होती. तितक्यात मागून एक वेगळाच आवाज आला पण तीच त्याकडे लक्ष नव्हतं. ती तशीच पायवाटेने पुढे चालत जात होती. तितक्यात त्या वाटेवर कडेला कोणी तरी उभ दिसल. ती जस जशी पुढे चालत जाऊ लागली तसे तिला जाणवले की एक बाई उभी आहे. त्या बाई चे लक्ष तिच्याकडे नव्हते. ती एकटक त्या वाटेच्या दुसऱ्या बाजूला बघत होती. मावशीला वाटले की असेल कोणी तरी म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करत तिला ओलांडून ती पुढे चालत निघून गेली. १५-२० पावले चालल्यावर तीच बाई पुन्हा वाटेच्या त्याच बाजूला उभी दिसली आणि आता मात्र मावशी दचकली. कारण त्या वाटेच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडूप होती त्यामुळे काही मिनिटात तिचे असे पुन्हा समोर येणं साधं सुध नव्हत. इतकचं काय की खात्री करण्यासाठी तिने मागे ही वळून पाहिले.
तिला कळायला वेळ लागला नाही की हा प्रकार काही तरी वेगळाच आहे. तिने चालण्याचा वेग वाढवला. त्या वाटेवर प्रत्येक १५-२० पावलांवर ती बाई उभी दिसू लागली. ती प्रचंड घाबरली, शरीरातला सगळा त्राण एकवटून जोरात घराच्या रस्त्याने धावत सुटली. पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं. रोजची वाट असूनही तिला घरचा रस्ताच सापडेना. धावताना एक दोन वेळा ठेच लागून पडली त्यामुळे पायाला ही बरेच खरचटले. पण काही केल्या तिला मार्ग मिळत नव्हता. तिने त्या बाई कसे पाहण्याचा प्रयत्न केला पण अंधार गडद होत चालला होता त्यामुळे तिला नीटसे काही दिसत ही नव्हते. चालत ७-८ मिनिटांत जिथे पोहोचता येत होत त्या वाटेवर तब्बल अर्धा तास ती धावत राहिली. शेवटी कसे बसे तिला तिथून बाहेर पडण्यास यश मिळाले आणि ती घरी पोहोचली. आत शिरल्या शिरल्या आई ने विचारपूस केली की काय झालं, इतकी का घाबरलेली दिसत आहेस. तेव्हा तिने घडलेली गोष्ट सांगितली. आई ने क्षणाचाही विलंब न करता देवीचा अंगारा तिच्या कपाळी लावला आणि झोपायला सांगितले. दुसऱ्या दिवशी तिला खूप ताप भरला होता. ती इतकी घाबरली होती की दोन दिवस तिचा ताप अजिबात उतरला नाही. पूर्ण दोन दिवस ती अंथरुणाला खिळून होती. त्या नंतर हळु हळू ताप उतरू लागला. आई ने नंतर तिला सक्त ताकद दिली की रात्री जास्त वेळ बाहेर जायचे नाही. त्या रात्री मावशीला नक्की त्या गेलेल्या काकू दिसल्या की ते काही दुसरेच होते हे मात्र आज पर्यंत कळले नाही.