अनुभव – आदेश शिंदे

अनुभव माझ्या भावाच्या मित्राच्या एका ओळखीच्या व्यक्तीला आला होता. प्रसंग खूप वर्षांपूर्वीचा आहे.. जुन्या काळातला.. कोल्हापूर पासून काही अंतरावर त्यांचं गाव होत. गावात त्या काळी वीजही आली नव्हती. त्यांना गावात सगळे पाटील मामा म्हणून ओळखायचे. अगदी साधे आणि सरळ राहणीमान. आपल्या कामाशी काम ठेवणारे असले तरी गावातल्या सगळ्यांसाठी वेळेप्रसंगी मदतीसाठी धावून जायचे. त्यांना वादनाची खूप आवड होती पण त्या काळी जास्त साधने नव्हती. त्यामुळे कुठे मिरवणूक असली किंवा तमाशाचा फड बसला की ते आवर्जून तिथे पाहायला जायचे. ढोल, तशा, झांज पथक, ढोलकी अश्या वाद्यांची त्यांना खूप आवड होती. त्यामुळे कधी कुठे असे पाहायला किंवा ऐकायला मिळाले की एकही संधी सोडत नसत. यासाठी ते अगदी कितीही पायी चालत जावे लागले तरीही ते कसलाही विचार करायचे नाहीत. मग सोबत कोणी असो वा नसो. पण याच एका आवडीमुळे त्यांच्या सोबत एकदा असा प्रसंग घडला जे सांगताना ही अंगावरून सरसरून काटा येतो. एके रात्री जेवण वैगरे आटोपून ते शांत झोपले होते. तितक्यात त्यांना लांबून ढोल ताशांचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला झोपेत असताना त्यांना वाटले की आपल्याला भास होतोय पण तस नव्हत. कारण तो आवाज हळु हळू वाढत चालला आहे. ते झोपेतून जागे झाले आणि तो आवाज ऐकण्यासाठी उठून खाटेवर बसले. तो आवाज त्यांच्या घराच्या दिशेने येत असल्याचे त्यांना जाणवले. 

ते उठून खिडकीजवळ जाऊन बाहेरच्या दिशेने पाहू लागले. तसे त्यांना जाणवले की कसली तरी यात्रा निघाली आहे आणि ती आपल्या घराच्या समोरच्या रस्त्याने जाणार आहे. ते मागचा पुढचा विचार न करता पटकन दार उघडुन बाहेरच्या आवारात येऊन उभे राहिले. त्या ढोल ताशांचा मंत्र मुग्ध करणारा आवाज ऐकून ते खूप खुश झाले. एखादी मोहिनी घालण्यासारखा आवाज होता तो. त्यांना काळ वेळेचे कसलेच भान राहिले नव्हते. इतक्या रात्री कोणाची यात्रा असेल, कुठे चालली असेल याचा जरा सुद्धा विचार त्यांच्या मनात आला नाही. इतकचं काय तर आपल्या घरातले, शेजारचे त्या आवाजाने कसे उठले नाहीत हे ही त्यांना कळले नाही. जशी ती यात्रा त्यांच्या जवळ आली तसे ते त्यांच्यात जाऊन मिसळले आणि त्या यात्रे सोबत चालू लागले. ढोल ताशाच्या आवाजाचा आनंद घेत च ते आजू बाजूला पाहू लागले. खूप माणस होती त्या यात्रेत आणि गुलाल उधळून नाचत होती. गुलालामुळे त्यांचे चेहरे च काय त्यांनी काय वस्त्र परिधान केली आहेत हे ही दिसत नव्हत. त्यात रात्रीचा गडद अंधार. पण या सगळ्या गोष्टींची त्यांना फिकीर नव्हती. त्या ढोल ताशाच्या आवाजामुळे त्यांनी नकळत त्यांच्यात मिसळून नाचायला ही सुरुवात केली. एका वेगळ्याच तंद्रती असल्यामुळे कसलेच भान राहिले नव्हते त्यांना. त्या यात्रेत ढोल ताशांच्या आवाजावर नाचत ते गावा जवळच्या डोंगराळ भागात गेले. तिथे गेल्यावर एकाने त्यांच्याकडे एक मोठे ढोल दिले. कसलाही विचार न करता ते ढोल घेऊन जोर जोरात वाजवू लागले. 

बराच वेळ असेच चालू राहिले. काही वेळानंतर ती यात्रा एका विशिष्ट ठिकाणी येऊन थांबली. सगळ्यांचे नाचणे, वाजवणे एका एकी थांबले. तशी त्या परिसरात एक वेगळीच शांतता पसरली. सगळे जण एका रांगेत पुढे चालत जाऊन खाली जमिनीवर बसले. ते सुद्धा नकळत पणे त्यांच्या सोबत जाऊन बसले. काही जण त्यांच्या पुढ्यात मटणाचे ताट वाढू लागले. पण ते वशाट साधं वाटत नव्हतं. तितक्यात अचानक त्यांचं लक्ष त्या ताट वाढणाऱ्या च्या पायाकडे गेलं आणि एका झटक्यात ते भानावर आले. त्यांना कळून चुकलं की आपण ज्या ठिकाणी ज्यांच्या सोबत येऊन बसलो आहोत ती साधी सुधी लोक नाहीत. त्यांना सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. आपण घरातून बाहेर आलो तेव्हा आपल्या घरातला एकही व्यक्ती त्या आवाजाने उठला नाही. इतकचं काय तर ती यात्रा दारा समोरून जात असताना शेजारचे ही कोणी बाहेर पाहायला आले नाही. ते प्रचंड घाबरले. भीतीने अंगात कापर भरलं. त्या पंगती मधून उठायचे कसे याचा प्रश्न त्यांना पडला. कारण ते सगळी कडे होते. बाजूला बसले होते, समोर फिरत होते आणि मागे ही उभे होते. पण इथे थांबलो तर आपले काही खरे नाही हा विचार करत त्यांनी संधी साधली आणि उठायला गेले. तेवढ्यात बाजूच्या एकाने हाताला धरत त्यांना पुन्हा खाली बसवलं. आणि म्हणाला ” स्वतःहून आला आहेस.. आम्ही नाही बोलावलं.. तुला असे जाता येणार नाही..” तो किळसवाणा भरडा आवाज ऐकून त्यांचे शरीरचं थंड पडले. त्या थंड वातावरणात ही त्यांना दरदरून घाम फुटू लागला. 

हाताला जोरात झटका देऊन तू पकड सोडवली आणि जिवाच्या आकांताने तिथून धावत सुटले. ते घरा पासून बरेच लांब आले होते जे त्यांना आता भानावर आल्यावर लक्षात आले. धावताना त्यांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. जवळपास २ डोंगर ओलांडून ते गावात आपल्या घरी पोहोचले. इतके थकले होते की खाटेवर पडल्या पडल्या झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा संपूर्ण अंग दुखत होत. त्यांना हे ही कळायला मार्ग नव्हता की काल जे काही घडल ते प्रत्यक्षात घडल की फक्त स्वप्न होत. जेमतेम उठून ते अंघोळीला गेले. पाण्याने भरलेला पहिला तांब्या डोक्यावरून घेतला तसे लाल भडक गुलालाचे पाणी डोक्यावरून ओघळत त्यांच्या अंगावरून खाली पडू लागले. आणि त्यांना कळून चुकले की काल रात्री घडलेला भयानक प्रसंग हे काही वाईट स्वप्न नव्हत तर ते प्रत्यक्षात घडल होत. त्या दिवसापासून दररोज मध्यरात्र उलटल्यावर त्यांना तो ढोल ताश्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज इतका असह्य होऊ लागला की त्यामुळे त्यांना वेड लागले. त्यांनी स्वतःच्या मेंदुवरचा ताबा गमावला. आणि अश्याच एके रात्री वेडेपणा चा तीव्र झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. 

Leave a Reply