अनुभव – आरती कुलकर्णी
अनुभव साधारणतः ६-७ वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा मी १४ वर्षांची होते. मी माझ्या मावस आजीकडे राहायला होते. आजी आजोबा आणि मी असे घरी आम्ही तिघच असायचो. आमचे ते घर म्हणजे खर तर एक पाच खोल्यांचा प्रशस्त वाडा होता. समोर मोठा दरवाजा, आत मोठे अंगण आणि मग पाहिली खोली म्हणजे देवघर.. तिथून आत आले की हॉल आणि मग स्वयंपाक घर.. देवघर आणि हॉल मध्ये जे दर होते त्याच्या पाठीमागे जिन्याचा दरवाजा होता. जिथून वर गेल्यावर २ खोल्या होत्या. एकदा काही कारणाने त्यांना बाहेर गावी जावे लागले त्यामुळे मी घरी एकटेच राहायचे होते. त्यांना कुठे बाहेर जावे लागले की ते मला ही न्यायचे पण त्या वेळी नेमकी माझी सहामाही परीक्षा चालू होती त्यामुळे मला तिथेच घरी राहावे लागले. पण प्रश्न हा होता की मी एकटी राहणार कशी..? जरी दिवसा राहिले तरी रात्री चे काय..? माझ्या मावशीची मैत्रीण तिथे जवळच राहत होती, त्यामुळे तिला सोबतीला घरी बोलवायचे असे ठरले. दुसऱ्या दिवशी आजी आजोबा सकाळीच निघाले. मी सुद्धा त्या दिवशी लवकर उठून अभ्यासाला बसले. दुपार पर्यंत चांगला अभ्यास झाला. जेवण वैगरे तयार करूनच ते निघाले होते त्यामुळे मी दुपारचे जेवण आटोपले, घरातच थोड्या फेऱ्या मारल्या आणि पुन्हा अभ्यासाला बसले.
तितक्यात स्वयंपाक घरातून पाण्याचा पेला पडण्याचा आवाज आला. मला वाटले की खिडकी उघडी राहिली असेल आणि वाऱ्यामुळे खाली पडला असेल. मी उठून पाहायला गेले तर खिडकी बंद होती. तसे मला जाणवले की जेवण ठेवलेली सगळी भांडी उघडी आहेत. मनात विचार आला की जेवल्यावर मी सगळे अन्न झाकून ठेवले होते मग अचानक.. पण वाटले की माझ्याकडून च राहून गेले असेल आणि कदाचित पेला ही नीट ठेवला नसेल म्हणून सरकून खाली पडला असेल. दुर्लक्ष केलं आणि माझ्या खोलीत आले. पुन्हा अभ्यासाला बसले. पण इतका सतत अभ्यास करायचे कारण हेच होते की मला रात्री टीव्ही बघायचा होता. माझ्या आवडीचा एक सिनेमा लागणार होता. त्या दिवशी दिवस कसा गेला ते कळलेच नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडायला सुरुवात झाली. उठून सगळी दारे खिडक्या लाऊन घेतली. मावशीची मैत्रीण रात्री जेऊन येणार होती त्यामुळे वेळ होता. मी अभ्यासाचे सगळे आवरले आणि टिव्ही सुरू केला. पण तो काही चालू होईना. अचानक टिव्ही बंद पडायचे काही कारण कळले नाही. मला काय करावे काही कळेना. तितक्यात दुपारपासून घडणाऱ्या गोष्टी आठवल्या. पाण्याचा पेला पडण्याचा आवाज, उघडे राहिलेले अन्न.. या गोष्टी जरी साध्या वाटत असल्या तरी या आधी असं कधी झाले नव्हते. मी हा विचार करतच होते तितक्यात अचानक जिन्याच्या दाराचा पडदा हळुवार पणे उडाला. मी एकदम दचकले कारण इतर दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या, हॉल मधला पंखा ही बंद होता. त्यामुळे आत वारा शिरणे शक्य नव्हते.
आता मात्र माझ्या मनात भीती ने घर करायला सुरुवात केली. मी घाबरून उठले आणि थेट घराच्या बाहेर आले. काही सुचले नाही म्हणून तिथून मावशीच्या मैत्रिणीच्या घरी आले. तिथे गेल्यावर मी तिला काही सांगितले नाही. मला वाटले की ती माझ्यावर हसेल म्हणून मी फक्त तू कधी येतेस असे विचारले. त्यावर ती म्हणाली की थोडी कामे राहिली आहेत ती आटोपून येते लगेच, तू हो पुढे. तिच्याशी बोलून थोडे का होईना बरे वाटले. घरी जायची इच्छा नव्हती पण नाईलाज होता म्हणून घराच्या दिशेने चालत निघाले. अंतर काही जास्त नव्हते म्हणून ८-१० मिनिटात लगेच घराजवळ पोहोचले. दार उघडणार तेवढ्यात टीव्ही चा आवाज आला. लक्षात आले की घाबरून तशीच बाहेर पडताना टीव्ही चालूच ठेऊन निघाले होते. पण मग अचानक सुरू कसा झाला हे मात्र कळले नाही. आपला आवडता सिनेमा पाहायला मिळेल या विचारात थोड्या वेळासाठी मी सगळे विसरून गेले. पटकन आत गेले, टिव्ही चा रिमोट उचलला आणि चॅनल बदलून तो सिनेमा पाहत बसले. तो पाहण्यात इतकी गुंग झाले की हॉल मधला लाईट लावायचे ही विसरून गेले. घरात फक्त टिव्ही चा उजेड होता. आणि त्याचाच प्रकाश आतल्या एका खोलीत हलकासा पोहोचत होता. सिनेमा बघता बघता जाहिरात आली आणि माझे लक्ष सहज त्या खोलीकडे गेले. त्या खोलीतल्या बेड वर कोणी तरी झोपल होत. एका कुशीवर वळून माझ्याकडेच एक टक पाहत होत. भीती ने सर्वांग शहारले आणि वाटलं की शरीरातून त्राण च निघून गेलाय.. काही क्षणांसाठी मी अगदी स्थिर झाले.
मी हळु हळू नजर हटवून दुसरी कडे पाहण्याचा प्रयत्न करू लागले. मी सगळी ताकद एकवटून पाळायचे ठरवले. त्या अंधाऱ्या खोलीत मला कसलीशी हालचाल जाणवू लागली तसे माझा काळजात धड धड वाढू लागली. जीव मुठीत धरून मी उठले आणि जोरात वाड्याच्या मुख्य दाराकडे धावत सुटले. पण तितक्यात जिन्याच्या दाराचा पडदा अचानक उडून माझ्या तोंडावर आला आणि मी धाडकन खाली आपटले. माझी शुद्ध हरपू लागली होती. अंगात कसलाही त्राण उरला नव्हता. उठून पाळायची ताकद ही राहिली नव्हती. म्हणून मी तशीच रांगत वाड्याच्या दारा पशी आले. वाड्यातून बाहेर पडल्यावर कशी बशी उठून उभे राहिले. काही वेळ बाहेरच थांबले. पुन्हा आत जाण्याची हिम्मत नव्हती म्हणून हळु हळू चालत मावशीच्या मैत्रिणीकडे गेले. आता मात्र तिला सगळा प्रकार सांगितला. ती ही थोडी घाबरली कारण तिला व घरातल्या लोकांना ही असे अनुभव आले होते हे मला तेव्हा तिच्याकडून कळले. पण मी खूप घाबरले आहे हे तिला जाणवतच तिने विषय बदलला. नंतर ती मला समजावू लागली की तुला भास झाला असेल. हे फक्त भास असतात बाकी काही नाही. पण मला चांगले माहीत होते की हा माझा भास नव्हता, हे सगळ माझ्या डोळ्यासमोर घडले होते.