अनुभव – पार्थ भगारे

ही २०१७ मधली गोष्ट. तेव्हा मी एका महाविद्यालयात शिकत होतो. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता उठून, आवरून, कॉलेज ला जायला निघालो. नोव्हेंबर महिना होता त्या मुळे मजबूत थंडी होती. सकाळी थंडी मध्ये कॉलेज पर्यंत चालत जाताना जी मजा येते ना तशी मजा दुसरी कोणती नाही. सकाळी कॉलेज ला जाताना मी आणि माझी मैत्रीण आम्ही दररोज एकत्रच यायचो. तिची आणि माझी चांगलीच मैत्री झाली होती. कॉलेज सुरु होऊन नुकताच एक महिना झाला होता आणि बरेचसे चांगले मित्र आणि मैत्रिणी ही झाले होते. त्या सगळ्यांशी अगदी घट्ट मैत्री झाली होती. त्या दिवशी आमच कॉलेज लवकर संपले. कॉलेज मध्ये डायमेनशन्स नावाचा फेस्ट होणार होता त्याची सगळी लगबग सुरु होती. 

डायमेनशन्स ला नेहमीप्रमाणे डिजे आणि नाचगाणी असतात त्या मुळे माझ्या ग्रुप मधील कोणालाच ह्या वर्षी च्या डायमेनशन्स मध्ये सहभाग घेण्यास काडीचा रस नव्हता. शिवाय परीक्षा सुद्धा संपल्या होत्या त्या मुळे मी आणि माझे दोन मित्र मनीष आणि अक्षय ह्यांनी डिसेंबर च्या क्रिसमस च्या एक आठवड्याच्या सुट्टी मध्ये रोहित च्या गावात म्हणजे कोकणात जायचे ठरवले. रोहित चा कोकणात वाडा होता. तो लहानाचा मोठा त्याच वाड्यात झाला नंतर त्याच्या वडिलांची मुंबई ला कामानिमित्त बदली झाली म्हणून त्याचे सगळे कुटुंब मुंबई ला वास्तव्यास आले. आमचे सगळ्यांचे डिसेंबर ची सुट्टी कोकणात घालवण्याचे ठरले तसे सगळे एकदम खुश झाले. आम्ही जायचा दिवस ठरवला. कसे जायचे हा प्रश्नच नव्हता कारण की माझी मैत्रीण भाग्यश्री आणि मित्र अक्षय ह्याच्या कडे फोर व्हिलर होती.

आम्ही ८-१० जण होतो. हळू हळू नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर उजाडून आमचा कोकणात जायचा दिवस देखील जवळ येऊ लागला. १२ डिसेंबर २०१७. त्या दिवशी आम्ही सगळे रोहित च्या बिल्डिंग जवळ सकाळी ५;३० वाजता भेटायचे ठरवले. सगळे येईपर्यंत ६ वाजून गेले होते. शिवाय लांब चा पल्ला गाठायचा असल्याने आम्ही थोडे लवकरच निघायचे ठरवले. आम्ही सर्वच मित्र मैत्रिणी पहिल्यांदाच असे सगळे लांब फिरायला जात होतो त्यामुळे आम्ही सर्व जण खूप उत्साहात होतो. कोल्हापूर ला महालक्ष्मी देवी चे दर्शन घेऊन थोडा आराम करून आम्ही गगनबावडा घाट चढण्यास सुरुवात केली. गाणी म्हणत बाहेरची निसर्ग दृश्ये पाहत आम्ही कोल्हापूर ला कधी पोहोचलो ते आम्हालाच कळले नाही. 

आमचा प्रवास असा होता की आम्ही कोल्हापूर वाया गगनबावडा घाटातून कणकवली ला उतरून एक दिवस रात्री विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार होतो. परंतु आम्हाला गगनबावडा घाटातुन बाहेर येईपर्यंत संध्याकाळचे ५ वाजून गेले होते. शिवाय दिवसभर गाडीत बसून आम्ही सगळे दमलो देखील होतो. तसेच रोहित देखील सतत ड्रायविंग करून दमला होता. गाडीतले पेट्रोल आम्हाला पुढील प्रवासासाठी साठवून ठेवायचे होते म्हणून आम्ही सर्वांनी एका हॉटेल मध्ये एक दिवस विश्रांती घेण्याचे ठरवले. तसे थोडे पुढे जाऊन आम्ही एक हॉटेल शोधून काढले. त्या हॉटेल कडे पाहून ते हॉटेल कमी आणि भूत बंगलाच जास्त वाट होते. तसेच ते हॉटेल नसून सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना राहण्यासाठी बांधलेले अधिकारी निवास होता.

मग आम्ही कसलाच विचार न करता तिथे राहण्याचे ठरवले. शिवाय मी आणि रोहित एन.सी.सी. कॅडेट आणि शिवाय सरकारी विद्यार्थी म्हणून म्हणून आम्हाला सगळ्यांना तिथे एक दिवस राहण्याची परवानगी दिली. आम्ही सर्वांनी एकत्रच एका खोलीत राहण्याचे ठरवले. वरच्या मजल्यावर काम चालू असल्याने आम्हाला तळमजल्यावर असलेली एक मोठी खोली दिली. आम्ही सगळे थकलो असलो तरी आमच्या उत्साहात कोणतीच कमी दिसत नव्हती. रात्री जेवण वैगरे करून थोड्या गप्पा मस्ती करत साधारण ११-१२ च्या सुमारास झोपी गेलो. परंतु आमच्या पैकी आमचा एक मित्र आशिष थोडा चिंतेत होता. आम्ही सर्वच दमलो असल्या कारणाने त्याला काहीच विचारण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मग रात्री अडीच वाजता माझी मैत्रीण भाग्यश्री हिला वॉशरूम ला जायचे असल्याने ती उठली आणि समोरचे दृश्य पाहताच एकदम मोठ्याने किंचाळली.

तिच्या आवाजाने तिच्या बाजूला झोपलेलो मी आणि बाकी सगळे देखील एकदम दचकून जागे झालो. आम्ही आमच्या समोर जे काही दृश्य पाहिले त्याने आमच्या सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आमचा मित्र आशिषने त्याच्या अंगावर ब्लेड ने वार करून घेतले होते. तो रक्ताच्या थारोळ्यात तसाच आमच्या पायाशी बसला होता. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. पण जेव्हा आमचे लक्ष त्याच्या बाजूला गेले तेव्हा कळले की तो एकटा नाहीये. त्या अंधारात त्याच्या बाजूला अजुन कोणी तरी होते. एक पांढरट आकृती. आणि ती त्याचा गळा चिरत होती. हे सर्व पाहून आमची कोणाचीच त्याला वाचवण्याची हिम्मत होत नव्हती. 

परंतु मी आणि रोहित कसे तरी हिम्मत करून आशिष ला उचलून बाहेर घेऊन गेलो. तो पर्यंत आमच्यातले सगळे उठून त्या खोलीतून कधीच बाहेर निघून गेले होते. आम्ही त्याला बाहेर घेऊन जात असताना मागून एक आवाज कानावर पडला “याचा जीव हवाय मला.. नाही तर कापून टाकीन सगळ्यांना”. त्या आ वाजा मागोमाग जोरात कसला तरी आवाज आला. बहुतेक काही तरी खाली पडले होते. त्या आवाजामुळे तिथले इतर लोक धावत आमच्या खोली बाहेर धावत आले. त्यातला एक माणूस हे सगळे जाणून होता बहुतेक. तो झटकन त्या खोलीत गेला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आत जाऊन त्याने नक्की काय केले हे त्याचे त्यालाच माहीत.

आमच्या मध्ये असलेल्या सगळ्या मुली तर घाबरून रडू लागल्या होत्या. आम्ही त्यांना धीर देऊ लागलो. तितक्यात त्याने आशिष ला आत आणायला सांगितले. आम्ही दोघं त्याला आत घेऊन गेलो. त्याने पुन्हा काहीतरी मंत्र उच्चारायला सुरुवात केली. आता मात्र आम्ही जे काही नजरेसमोर पाहत होतो ते विश्वास बसण्याच्या पलीकडचे होते. आमच्या डोळ्यादेखत त्याच्या शरीरावर च्या जखमा भरू लागल्या. काही वेळा नंतर आशिष भानावर आला. आम्ही त्या माणसाला विचारले की हा सगळा काय प्रकार आहे त्यावर तो म्हणाला की या जागेवर काही वर्षांपूर्वी स्मशान होते आणि नंतर इथे हे निवास स्थान बांधण्यात आले. इथे भुंतांचा वास आहे. आणि त्यातल्याच एकाने याला पछाडले. त्याचे असे हे बोलणे ऐकून आम्ही त्या रात्री कोणीच झोपू शकलो नाही. 

आम्ही त्या प्रसंगानंतर आम्ही ठरवले की जे झाले त्याचा विचार मनातून पूर्ण काढून टाकायचा आणि झालेल्या गोष्टी विसरायच्या. म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारू लागलो. पण आमचा मित्र आशिष काहीच न बोलता गपचुप झोपून गेला. सकाळी ७ वाजता आम्ही त्याला कालच्या प्रसंगाबद्दल विचारले. तसे तो सांगू लागला “काल तुम्ही सगळे झोपलात पण मला काही केल्या झोप लागत नव्हती म्हणून मी आपल्या खोलीबाहेर येऊन निवासाच्या समोरच्या अंगणात असलेल्या छोट्या कारंज्याजवळ जाऊन बसलो आणि आकाशातले तारे पाहू लागलो. इतक्यात मला असे जाणवले की मला मागून कोणीतरी खेचत आहे म्हणून मी उठून मागे पहिले तर मागे एक पांढरट आकृती बसली होती. मी नीट निरखून पाहिले आणि तिचे रूप पाहून मला धडकीच भरली.

डोळे फुटले होते, म्हणजे डोळ्यांच्या फक्त रिकाम्या खोबण्या दिसत होत्या. चेहऱ्यावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या, शिवाय कवटी फुटून मेंदूचा भाग अर्धा बाहेर आला होता. त्याच्या पायांची बोट कुरतडून खाल्ल्यासारखी वाटत होती. ते भयाण दृश्य पाहून मला आगदी सळो की पळो झाले होते म्हणून मी घाबरून धावत आपल्या खोलीत आलो आणि माझ्या बेड वर जाऊन बसलो. पण काही वेळानंतर मला कोणीतरी भिंतीतून खेचल्यासारखे वाटत होते. मी ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण तितक्यात माझ्यासमोर ती विचित्र आकृती समोर येऊन उभी ठाकली. त्या आकृती ने बाजूचे ब्लेड उचलले आणि माझ्यावर वार करू लागली,  गळा चिरण्याचा प्रयत्न करू लागला हे बोलल्यावर त्याला एकदमच रडू कोसळले. त्याला कसेतरी सावरत आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचे ठरवले. 

सकाळी ८ वाजता आम्ही तो निवास सोडून पुढच्या प्रवासाला लागलो. आम्ही सगळेच आशिष च्या बाबतीत थोडे अस्वस्थ होतो. परंतु आम्ही सर्वानीच घडलेला प्रसंग विसरून धम्माल करायचे ठरवले होते. मग आम्ही आशिष ला देखल त्या प्रसंगातून बाहेर काढले आणि गाडीत त्याच्याशी मस्ती मजा करत दुपारी १२:३० च्या सुमारास गावात पोहोचलो. तिथले निसर्गसौंदर्य आणि आभाळाप्रमाणे दिसणारा अथांग समुद्र किनारा पाहून आम्ही सर्वच जण भारावून गेलो होतो. शिवाय रोहित चा वाडा देखील खूप भारी होता. जुन्या काळातील बांधकाम अगदी त्या वेळी देखील भक्कम आणि मजबूत होते. दोन तीन दिवस तिथे आम्ही सगळ्यांनी भरपूर मजा केली, समुद्रावर फिरलो, पाण्यात उतरलो, किल्ले पाहिले. दोन तीन दिवस इतकी धम्माल आणि मजा केली की आम्ही तो प्रसंग देखील विसरलो.

आमच्या पैकी बरेच जण आता नोकरी करत आहोत आणि बाकीचे त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात गुंतले आहेत. परंतु आम्ही सर्व एकत्र कधी भेटलो आणि गप्पा रंगल्या की घडलेला प्रसंग आठवतो. पण तो विषय निघाला की आम्ही लगेच विषय बदलून बोलणे टाळतो. त्या रात्री घडलेला तो प्रसंग अजूनही आमच्या सर्वांच्या अंगावर शहारे आणतो.

Leave a Reply