अनुभव – तेजस

अनुभव माझ्या काकांच्या मित्रासोबत घडला होता. ते पेशाने डॉकटर आहेत. त्यांचे नाव राजेश. डॉक्टर असल्यामुळे त्यांना रात्री अपरात्री एखादी इमर्जेंसी केस आली की लगेच हॉस्पिटल ला जावे लागायचे. असेच एकदा रात्री एक ऑपरेशन होते. ते यशस्वी झाल्यानंतर ते घरी यायला निघाले. बराच उशीर झाला होता. त्यांच्याकडे मोटारसायकल होती. बरीच रात्र झाल्यामुळे रस्ता अगदी सामसूम झाला होता. त्यामुळे त्यांच्या बाईक व्यतिरिक्त एकही वाहन नजरेस पडत नव्हते. त्यांनी अर्धे अंतर पार केले असेल. तितक्यात त्यांच्या गाडी समोरून वाऱ्याच्या वेगात काही तरी गेले. म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला. ते इतक्या वेगात होते की त्यांचा बाईक वरचा ताबा सुटला आणि ते खाली पडले. सुदैवाने जास्त काही लागले नाही. स्वतःला सावरत ते उठले आणि चौफेर नजर फिरवली. पण अंधार असल्यामुळे त्यांना काही दिसले नाही. त्यांनी बाईक उचलली आणि सुरू करायचा प्रयत्न करू लागले. इतक्यात त्यांच्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला. जरा दचकून च त्यांनी मागे पाहिले. 

साधारण वयाची साठी ओलांडलेला इसम त्यांच्या मागे उभा होता. तो अचानक विनवण्या करू लागला आणि सांगू लागला की माझी बायको आजारी आहे. तापानी फणफणली आहे, मला मदत करा. घडलेला प्रकार जरा अनपेक्षित च होता म्हणून त्यांनी जरा दबकत विचारले “कोण आहात तुम्ही.. आणि कुठे राहता..”. तसे तो इसम म्हणाला “मी रंग्या वेताळ, याच रस्त्याला लागून आत एक पायवाट आहे. तिथून थोडे आत जंगलात गेले की माझी झोपडी आहे.. तिथेच राहतो मी..” तसे त्यांनी त्या इसमाला म्हंटले “ठीक आहे. मी एक डॉक्टर आहे, मी येतो तुमच्या सोबत. काळजी नका करू..” तसे तो इसम म्हणाला “माझ्या मागे या.. मी वाट दाखवतो तुम्हाला..”. त्यांनी बाईक तिथेच रस्त्याकडे ला पार्क केली आणि त्या इसमाच्या मागून चालू लागले. बराच वेळ ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. काही मिनिट ते चालत राहिले. त्यांना जाणवले की मुख्य रस्त्यापासून आता ते बरेच आत आले आहेत. पायवाट कधीच संपली होती आणि ते जंगलात आले होते. 

तितक्यात त्यांच्या पायाजवळून काही तरी गेल्या सारखे जाणवले. आणि त्यांची नजर तिथून त्या समोर चालणाऱ्या इसमाच्या पायाजवळ गेली. ते जागीच स्तब्ध झाले. त्याचे पाय त्याच्या शरीराच्या विरुद्ध दिशेला होते. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ते एकाचे जागी थांबले होते. पण तो इसम पुढे चालत जात होता. बघता बघता तो इसम डोळ्यांदेखत नाहीसा झाला. क्षणाचाही विलंब न करता ते उलट फिरून रस्त्याच्या दिशेने धावत सुटले. काही मिनिटात रस्त्यावर येऊन पोहोचले. पण बाईक काही सुरू होत नव्हती. २-३ वेळा किक मारून झाल्यावर त्यांची बाईक सुरू झाली आणि ते सुसाट घरच्या वाटेला लागले. त्या दिवशी त्यांचे नशीब चांगले होते बहुतेक म्हणून ते घरी सुखरूप येऊ शकले. 

Leave a Reply