अनुभव – नितीन पाटील

घटना माझ्यासोबत २०१३ साली घडली होती. मी माझ्या कुटुंबासोबत सुरत येथे राहायचो. ऑगस्ट महिना सुरू झाला आणि गणेशोत्सव जवळ येत होता. गणेश चतुर्थी च्या आदल्या दिवशी माझ्या मित्रांनी रात्री आमच्याच जवळच्या परिसरात फिरायला जायचा प्लॅन केला. तश्याही सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मग मी ही घरी विचारले. सुरुवातीला मला घरच्यांनी परवानगी दिली नाही पण नंतर बऱ्याच विनवण्या करून मला होकार मिळाला. त्या दिवशी जेवण आटोपून रात्री ९.३० च्याच सुमारास घराबाहेर पडलो. आम्ही एकूण १२-१३ मित्र होतो त्यामुळे तसे काही काळजी करायचे कारण नव्हते. फेरफटका मारता मारता १२ वाजत आले आणि आम्ही आमच्या भागापासून बऱ्याच दूर आलो होतो. अंधार ही गडद झाला होता. आमच्यातल्या एक मित्र म्हणाला की इथून थोड्या अंतरावर एक जुने रेल्वे स्टेशन आहे तिथे जाऊ, थोड्या वेळ बसू आणि मग परत येऊ. आम्ही होकार दिला. 

पुढच्या काही मिनिटात आम्ही त्या स्टेशन वर येऊन पोहोचलो. खूप रात्र झाल्यामुळे स्टेशन वर ही कोणी दिसत नव्हते. आणि या वेळेला ट्रेन चे प्रमाण ही अगदी कमी असते. काही वेळ तिथे बसून टाईमपास करू लागलो. तसे एक मित्र म्हणाला की इथे बाजूलाच एक दफनभूमी आहे, आपण तिथून एक राऊंड मारून येऊ. सगळे पटकन तयार झाले पण मी त्यांना माझी म्हणालो. कारण मला भूता खेतांवर विश्वास होता आणि विषाची परीक्षा घ्यायला मला जराही रस नव्हता. मित्र म्हणाले की ठीक आहे तू बस इथे आम्ही जाऊन येतो. मी विचार केला की इथे या सामसूम स्टेशन वर एकटे बसण्या पेक्षा मित्रासोबत गेलो तर बरे होईल. इथे एकटे कोण थांबणार.. मी नाईलाजाने त्यांच्या सोबत गेलो. योग्य वाटत नव्हते पण दुसरा पर्याय नव्हता. आत शिरलो. फक्त एक विजेचा खांब होता ज्याचा प्रकाश जेमतेम काही अंतरापर्यंत जात होता. दफनभूमी च्या इतर भागात अंधार होता. जसे आम्ही आत फिरू लागलो तसे कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज येऊ लागला. 

आम्ही घाबरून सगळे पुन्हा बाहेरच्या दिशेला पळालो. आणि पुन्हा त्या स्टेशनवर येऊन बसलो. तितक्यात आम्हाला लक्षात आले की आमचा एक मित्र तिथे आतच राहिलाय. आम्ही सगळे घाबरलो. वेळ न घालवता पुन्हा सगळे आत गेलो. जाताना रस्त्यात पडलेल्या काठ्या उचलल्या आणि आत जाऊन त्याला शोधू लागलो. तसे एके ठिकाणी तो बेशुध्द पडलेला दिसला. आमच्यातल्या ४-५ जणांनी त्याला उचलून बाहेर स्टेशन वर आणले. तोंडावर पाणी मारून उठवले. त्याला शुद्ध आल्यावर आम्ही विचारले की काय झाले तुझ्यासोबत. तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून आमची बोबडीच वळली. तो म्हणाला की जेव्हा आपण सगळे पळालो तेव्हा माझा पाय चुकून एका कबरीवर पडला आणि माझ्या पाय कोणी तरी खेचल्या सारखे जाणवले. पायाला धार धार काही तरी टोचत होत. अंधार असल्यामुळे काही दिसले नाही. मला वाटले की कुत्र्याने माझा पाय धरला पण नंतर पायावर वार झाल्यासारखे वाटू लागले, खूप वेदना होऊ लागल्या. 

त्याचे बोलणे ऐकून एक मित्र म्हणाला “चल काहीही फेकू नकोस..”. तसे आम्ही त्याच्या पायाकडे पाहिले. त्याच्या पायावर च नाही तर संपूर्ण पाठीवर ब्लेड सारख्या धार धार वस्तू ने वार झाले होते. तो संपूर्ण रक्त बंबाळ झाला होता. तो घामाने भिजला नव्हता तर रक्ताने माखला होता. बोलता बोलता त्याची शुद्ध हरपली कारण बराच रक्तस्त्राव झाला होता. वेळ न दवडता आम्ही त्याला रात्रीच दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि विचारू लागले की याला इतकी जखम कशी काय झाले. आम्ही जास्त काही बोललो नाही, म्हणालो की काट्यात पडला म्हणून लागले. ते आम्हाला म्हणाले की याच्या घरच्यांना बोलवा याला खूप इजा झाली आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही केले. या गोष्टीला आज जवळपास ७ वर्ष उलटली पण तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर तसाच आहे. प्रत्येक वर्षी जेव्हा गणपती बसतात तेव्हा मला हा भयाण प्रसंग आठवतो च.

Leave a Reply