अनुभव – ओंकार पल्येकर
एकदा मी, माझा मामा आणि त्याचे ६ मित्र गावी कोकणात एका जत्रेला जायला निघालो होतो. गाडी वैगरे आधीच बुक केली होती आणि संध्याकाळी ५ ला निघायचे ठरले होते. पण ड्राइव्ह र उशिरा आला त्यामुळे आम्हाला निघायला ७ वाजले. मामाचे मित्र निघाल्या निघाल्या गाडीत ड्रिंक्स घेऊ लागले. हळु हळु सगळे जण एकदम फुल झाले होते. रात्री ११ ला आम्ही जेवायला थांबलो. मी आणि माझ्या मामा मध्ये मामा भाच्या पेक्षा मैत्रीचे नाते जास्त आहे. त्यामुळे त्याच्या सोबत असलो की एकदम बिनधास्त एखाद्या मित्रा सोबत असल्या सारखे वाटते. त्यामुळे आम्ही दोघं सुद्धा एक एक बियर प्यायलो. जेवून निघता निघता १२ वाजले. आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जवळपास २ तास झाले असावेत. मी घड्याळ्यात वेळ पाहिली तर २ वाजायला आले होते. तितक्यात आमच्या गाडीचे टायर पंक्चर झाले. आमचे नशीब एवढे खराब की ड्रायव्हर उशिरा आल्यामुळे स्टेपनी मध्ये हवा भरायला ही विसरून गेला होतं
त्यात आमची गाडी एका निर्मनुष्य रस्त्यावर उभी होती. आजी बाजूला काहीच दिसत नव्हत. घर, वस्ती, एखादे दुकान काहीच नाही. आम्हाला तिथे थांबण्या शिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. एव्हाना सगळ्यांची उतरली ही होती. अर्धा पाऊण तास पुढे काय करायचे असा विचार करत तिथेच बसून राहिलो. त्यातला दोघा तिघा ना तहान लागली. आता अश्या ठिकाणी पाणी मिळणे जवळजवळ अशक्य होतें पण तरीही मामा आणि त्याच्या दोन मित्रांनी ठरवले की आपण चालत जाऊन आजू बाजूच्या परिसरात काही मिळते का ते बघू. मनात थोडी फार भीती होतीच. भुता खेतांपेक्षा जास्त हिंस्र प्राण्यांची. कारण आमची गाडी ज्या ठिकाणी बंद पडली होती त्या भागात अगदी घनदाट झाडी होती. रस्त्याच्या दुतर्फा भले मोठे वृक्ष आणि त्याच्या मागेही अतिशय गर्द झाडी. म्हणजे एखादा आत गेला की दिसणार ही नाही. आम्ही गाडी पासून मागच्या बाजूला चालत निघालो. साधारण ३०-४० पावले चालल्यावर आम्हाला एक बल्ब पेटलेला दिसला. आम्ही त्याच वाटेने पुढे चालत निघालो.
काही मिनिट चालत गेल्यावर एक छोटेसे कौलारू घर दिसले. रस्त्याच्या थोड आतल्या भागातच होत. आम्ही म्हंटले चला, निदान पाण्याची सोय तर झाली आज. इथून पाणी तर नक्कीच मिळेल. दारूच्या रिकाम्या झालेल्या ४ बाटल्या सोबत घेतल्या होत्या आम्ही. म्हणजे पाणी त्यात भरून आणता येईल. आम्ही त्या घराचं दार वाजवलं पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. आम्ही पुन्हा काही मिनिटांच्या अंतराने २-३ वेळा दार वाजवले. बऱ्याच वेळा नंतर आतून कसलीशी चाहूल जाणवली आणि आत कोणी तरी असल्याची खात्री झाली. बऱ्याच वेळा नंतर एक पांच्यात्तरी ओलांडलेली म्हातारी बाई दार उघडुन थोडे बाहेर आली. तिला आम्ही विनंती केली की आमची गाडी बंद पडली आहे आणि आमच्या कडे प्यायला पाणी नाहीये तर थोडे पाणी मिळेल का. इतके म्हणून आम्ही ४ बाटल्या तिच्या पुढे केल्या. ती म्हातारी आमच्या कडे पाहत होती. म्हणजे प्रत्येकाकडे. एकही शब्द बोलली नाही. तिच्या नजरेतून काही स्पष्ट होत नव्हत की ती अशी का बघतेय.
काही न बोलता तिने आमच्याकडून त्या बाटल्या घेतल्या आणि आत निघून गेली. आम्ही ते घर न्याहाळत होतो. खूप जुन्या पद्धतीचे घर होते. शेणाने सारवलेल्या भिंती, कौलारू छत, दरवाजा ही अगदी जुना भासत होता. १०-१२ मिनिटानंतर ती त्या बाटल्या भरून घेऊन आली आणि आमच्या हातात दिल्या. आम्ही तिचे आभार मानून तिथून निघू लागलो. तितक्यात ती जे म्हणाली ते ऐकून माझ्या काळजात अगदी धस्स झाले. ती म्हणाली “इथून जितक्या लवकर जमेल तितक्यात लवकर निघून जा.. ही जागा तुमच्यासाठी माझी..” आम्ही फक्त होकारार्थी माना डोला वल्या आणि झपाझप पावले टाकत पुन्हा गाडी जवळ आलो. कोणाकडून मदत मिळेल असे वाटत नव्हते. कारण गेल्या तासाभरात साधे एक वाहन ही दिसत नव्हते. तरीही आम्ही थोड्या वेळ रस्त्याच्या कडेला थोड्या वेळ थांबायचे ठरवले. त्या म्हाताऱ्या बाई चे बोलणे ऐकुन झोप तर उडून च गेली होती. पण तरीही आम्ही ८ जण असल्याने थोडे बिनधास्त होतो. सहज म्हणून घड्याळात वेळ पाहिली तर ३.३० वाजले होते.
आम्ही तिथेच बसून अजुन अर्धा पाऊण तास काढला. हळु हळु उजाडू लागले होते. तितक्यात एक दुधाची मोठी गाडी जाताना दिसली तसे आम्ही हात करून मदत मागितली. आमच्या गाडीचा ड्रायव्हर आणि मामा चा एक मित्र त्या गाडीत बसून पंक्चर काढण्यासाठी निघून गेले. सकाळ झाली आणि आमचा घसा कोरडा पडला. पुन्हा तहान लागली होती. विचार केला की जाऊन अजुन २ बाटल्या भरून आणू त्या म्हातारी कडून. तसे मी, मामा आणि मामा चा एक मित्र असे आम्ही तिघे पुन्हा त्या घराच्या दिशेने चालू लागलो. पण त्या परिसरात घर काय.. एक विजेचा साधा खांब ही नव्हता. आम्ही जरा गोंधळलो. वाटले की चुकीच्या दिशेला आलोय. आम्ही तो परिसर संपूर्ण पिंजून काढला पण आमच्या गाडी पासून जवळपास १ किलोमिटर पुढे आणि तितकेच अंतर मागे कोणतेही तसे घर नव्हते. अगदी निर्जन परिसर होता तो. ते घर शोधण्याचा बराच प्रयत्न केल्यानंतर आम्ही शेवटी हताश होऊन पुन्हा आमच्या गाडी जवळ आलो.
काही वेळात ड्रायव्हर आला, त्याने टायर फिट केले आणि आम्ही पुढे निघालो. आम्ही सगळे जण जाताना ते घर दिसतंय का ते पाहत होतो पण ते कुठे ही दिसले नाही. तिथून साधारण ३० किलोमिटर अंतरावर एक गाव लागले. तिथं थांबून आम्ही जरा विचारपूस केली तेव्हा कळले की त्या भागात एकही तसे घर नाही. मला खरंच माहीत नाही जे घडले ते नक्की काय होते. या गोष्टी ला १२ वर्ष झाली. त्या म्हाताऱ्या बाईचा चेहरा अजूनही नीट लक्षात आहे माझ्या. आजही तो आठवला की अंगावर शहारे येतात. त्यानंतर मी गावी खूप वेळा गेलो, कधी बाईक ने कधी कार ने पण ती जागा, ते घर कधीच परत दिसले नाही. जे काही त्या रात्री आमच्या सोबत घडले त्यात देवाचा हात होता की भुताचा हे माहीत नाही पण जे काही झालं त्याने आम्हाला मदतच केली. आम्हाला कसला ही त्रास दिला नाही.