ही गोष्ट साधारण ३-४ वर्षांपूर्वीची आहे, २०१७ ची. माझा भाऊ प्रकाश हा थोड्या भित्र्या स्वभावाचा. दिसायला तसा देखणा आणि तेव्हा तिशी ओलांडली होती. पण त्याच्याकडे बघून त्याचे वय जेमतेम २५ वाटायचे. त्याला पिण्याचे थोडे व्यसन होते. त्याच्या बरोबरीच्या मुलांची लग्न होऊन त्यांना मूल ही झाली होती. पण याच्या लग्ना साठी कोणी मुली पाहायला धजावत नव्हते कारण एकच ‘ दारू पिण्याचे व्यसन ‘. कामाच्या बाबतीत अगदी हुशार आणि मेहनती होता. कामात कधी टाळाटाळ करत नसे. त्याचे काम ही फिरती चे होते. त्याच्यावर जबाबदारी असायची ती म्हणजे अवजड सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचे. त्यामुळे नेहमी फिरती वर असायचा. असे च त्या दिवशी तो कमा साठी बाहेर पडला. तारीख होती २५ मे २०१७. दिवसभर काम केले पण तो लवकरच म्हणजे दुपारीच घरी आला. 

आई ला सांगू लागला की आज मी वाड्याला गेलो होतो तिघे मी चक्कर येऊन पडलो. माझ्या सोबतीला होता त्याने मला डॉकटर कडे नेले. तसे आई म्हणाली की दुपारच्या उन्हाचा त्रास झाला असेल तुला, आज खूप कडाक उन पडले होते. तू गोळ्या घेऊन झोप जरा आराम कर म्हणजे वरे वाटेल. त्या दिवसानंतर तो झोपूनच होता, कामावर गेला च नाही. ते मे महिन्याचे दिवस असल्यामुळे आमच्या समोर राहणारे कुटुंब गावी गेले होते. त्यांची चावी आमच्याकडे असायची. म्हणून तो झोपायला फक्त त्याच्या कडे जायचा. पण दोन दिवस झाले कामावर गेला नाही म्हंटल्यावर आई लय वाटले की याला नक्की कावीळ वैगरे झाली असणार. रविवार चा दिवस उजाडला. याला डॉकटर कडे घेऊन जाते असे म्हणत सकाळीच ती त्याला उठवायला गेली. तिने बराच वेळ खोलीचे दार वाजवले पण त्याने दरवाजा उघडला नाही. तितक्यात मोठी वहिनी आली आणि तिने ही त्याला आवाज दिला. पण तो काही प्रतिसाद देत नव्हता. 

ती त्याला खूप ओरडली की आता काय लहान आहे का असे वागायला. आई कधी पासून दार वाजवत आहेत. रात्र भर काळजी करत असतील. इतके सांगतोय आम्ही तर एकदा डॉकटर कडे जाऊन या. असे किती दिवस झोपून राहणार, आज तिसरा दिवस आहे. जवळपास आर्धा तास दार वाजवणे, त्याला हाका मारणे, ओरडणे चालूच होते. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने दार उघडले. त्याची अवस्था खूप विचित्र झाली होती. नजर स्थिर नव्हती. म्हणजे सतत वर पाहत होता. डोळे सुद्धा लाल भडक झाले होते. त्याला बहुतेक कसलीच शुध्द नव्हती. समोर कोण आहे, काय बोलतेय याचे भानच राहिले नव्हते. आणि या सगळ्यात तो असंबंध बडबडत होता. इतकेच काय तर तो ज्या भाषेत बडबडत होता ते ही कोणाला काळात नव्हत. त्यांची नजर त्याच्या कपड्यांवर आणि हातावर गेली आणि त्यांना धडकीच भरली. 

त्याच्या हातावर चावल्याच्या जखमा होत्या. ते त्याला विचारू लागले पण हा मात्र आपल्या धुंदीत होता. अचानक हाताचे मान्य गट तोंडात घेऊन दातांनी जोरात चाऊ लागला. त्याला कसे बसे सावरले पण त्याची मान तो वेडीवाकडी करत चोहो बाजूंनी पाहत होता. त्याला नक्की काय होतंय तेच कळत नव्हते. बघताना ते विचित्र च नाही तर आता किळसवाणे वाटू लागले. त्यात भयानक गोष्ट म्हणजे तो त्याची मान खांद्याच्या ही पुढे वळवू लागला. त्याला या आधी असे कोणीही पाहिले नव्हते. आमच्या घरात अश्या गोष्टीवर कोणालाही विश्वास नाही त्यामुळे कोणाला कसलीच शंका आली नाही. माझा मोठा भाऊ तर असे झपाटणे वैगरे शब्द जरी काढले तरी लगेच चिडतो. पण आता कोणाला तरी मदतीला बोलवायला लागणार होतच. म्हणून त्यांनी माझ्या दोन नंबर च्याच भावाला बोलावले. जास्त विचार न करता त्या दोघांनीही त्याला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. 

कारण याने स्वतःला बरीच इजा करून घेतली होती. सगळी कडे चाऊन लचके तोडून स्वतःचा जबडा अक्षरशः रक्त बंबाळ केला होता. त्याला सगळ्यांनी मिळून एम्ब्यू लांस मध्ये बसवले आणि दवाखान्यात घेऊन गेले. तिथे दवाखान्याच्या गेट वर वॉचमन ने त्याची अवस्था पाहिली आणि लगेच म्हणाले “तुम्ही याला इथे का आणले, तुम्हाला कळत नाही का, याला भूत भाधा झाली आहे”. त्या माणसाचे असे बोलणे ऐकल्यावर माझ्या मोठ्या भावाला प्रचंड राग आला. तो अतिशय चिडत म्हणाला “तुम्ही गप्प बसा.. आणि आम्हाला डॉकटर कडे जाऊ द्या.. या फालतू गोष्टी माझ्यासमोर करू नका..” ते त्याला आत घेऊन गेले. सगळ्या नर्स वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहु लागल्या. एव्हाना तो ४-५ जणांना ही आवरत नव्हता. कोणालाच कळत नव्हत की इतकी ताकद इतकी शक्ती त्याच्या मध्ये कुठून संचारली आहे. त्यात २ दिवस त्याने काही खाल्ले ही नव्हते. डॉक्टर नी त्याला तपासले आणि काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या. अशी केस असल्यामुळे त्यांनी काही तासात रिपोर्ट दिले. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल. 

डॉक्टरनी त्याला घरी घेऊन जायला सांगितले कारण त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून घेण्या सारखे काही झालेच नव्हते. निदान केलेल्या रिपोर्ट्स मध्ये तरी तसे काही निदर्शनास आले नव्हते. त्याला घरी घेऊन जात असताना एका माणसाने सांगितले की एके ठिकाणी दर्ग्यात हे उतरवतात, याला तिथे घेऊन जा. आता त्यांच्या समोर नाईलाज होता. आणि प्रत्येक क्षणाला त्याची अवस्था भयानक होत चालली होती. शेवटी ते त्याला तिथे घेऊन गेले. तिथे गेल्यावर तो थोडा शांत झाला. त्याला पुन्हा घरी घेऊन जायला निघाले. पण तिथून बाहेर पडल्यावर तो पुन्हा तसेच करू लागला. आता मात्र कुठे जायचे, काय करायचे ते माझ्या दोघा भावांना ही कळत नव्हते. ते त्याला घेऊन घरी आले. तो पर्यंत आजूबाजूच्या परिसरात सगळ्यांना कळले होते. ज्यांना हा प्रकार माहीत होता ते येऊन आम्हाला विचित्र गोष्टी सांगत होते. कोण म्हणतं होते की याच्या अंगात ४ बायकांचे भूत शिरले आहे, कोंबडे उतरवा. नाईलाजाने ते ही करून पाहिले. पण सगळे निरर्थक वाटत होते. 

सोमवारचा संपूर्ण दिवस या सगळ्यात निघून गेला. कोणीही त्या दिवशी झोपेल नाही. सगळे खूप थकून गेले होते. कोणी तरी सांगितले की रात्री १२ वाजता याच्यावरून कोंबडा उतरवून टाका. त्या प्रमाणे माझ्या दोन नंबरच्या भावाने ते करायला घेतले. पण नेमके त्याच वेळी त्याला रक्ताची उलटी झाली. कदाचित या मुळे त्याला इतका अशक्तपणा आला की तो एका कुशीवर झोपून गेला. सगळे तसेच बसले होते. काही जण त्याच्या जवळ तर काही इतर खोलीत. सगळे दमल्यामुळे तिथे झोपून गेले. सकाळी ४ वाजता आई ला जाग आली आणि ती त्याला उठवायला गेली. पण तो.. तो कायमचा झोपून गेला होता. माझ्या घरातली सगळी माणसे साधी होती, भूत बाधा, बाहेरचे काय असते, असे झाल्यावर काय करावे हे कोणाला काहीच माहीत नव्हते. सगळे अचानक घडले होते. अवघ्या ३-४ दिवसात त्याचा प्राण गेला. त्याच्या सोबत नेमके काय घडले हे अजूनही आम्हाला समजले नाही. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या दिवशी तो चक्कर येऊन पडला होता त्या दिवशी म्हणजे २५ मे ला अमावस्या होती..

Leave a Reply