अनुभव – हार्दिक अल्दर
घटना २३ मे २०१३ ची असून संगोला तालुक्यातील बेवनुर गावातली आहे. तेव्हा सांगली ला बैलांचा बाजार चालू होता. माझ्या मामा ला त्याच्या कडचे काही बैल विकायचे होते. सकाळी बाजारात लवकर पोहोचण्यासाठी त्याने मध्य रात्रीच निघायचे ठरवले. बैलांना नेण्यासाठी त्याने एक छोटा टेम्पो ही मागवला होता. सोबतीला २ मित्र ही होते. त्याने बैलांना टेम्पोत चढवले आणि प्रवासाला सुरुवात केली.. वाटेत खिंडी चा रस्ता लागायचा. त्याला थोडी चिंता होतीच पण पहाटे बाजारात पोहोचायचे होते म्हणून त्याने सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होत.
काही वेळानंतर तो खिंडी च्या रस्त्याला लागला. या रस्त्याला लोक दुपारी यायला ही घाबरत आणि त्यात मामा कसलाही विचार न करता मध्य रात्री निघाला होता. त्याने खूप चित्र विचित्र गोष्टी ऐकल्या होत्या. पण आज पर्यंत तसा अनुभव आला नव्हता. तो रस्ता खूपच खडकाळ होता. टेम्पो जसा त्या वाटेला लागला तसे काही मिनिटात त्याचे एक टायर जोरात फुटले. त्यामुळे टेम्पो थांबवून तिघे ही टायर चेक करण्यासाठी खाली उतरले.
तसे त्यांना समोरून कोणी तरी चालत येत असल्यासारखे जाणवले. जस जशी ती आकृती जवळ येऊ लागली तसा तिचा आकार स्पष्ट होऊ लागला. मामाला वाटले की कोणी तरी आपली मदत करण्यासाठी येतंय. पण जवळ आल्यावर कळले की ती एक ७-८ फूट उंच बाई होती. तिचे लांबडक केस जमिनीला टेकले होते, तोंडाचा जबडा विस्फारला होता. कडेवर ३-४ वर्षाचं पोर होत. ती साधारण १० फुटांवर येऊन थांबली आणि भरड्या आवाजात विचारू लागली “मला पाचगाव ला जायचयं, मला तिथे सोडा”. मामा तसाच एकटाच खाली उभा , भीतीने त्याचे हात पाय कापत होते.
मित्रांची बोलती ही बंद झाली होती. मामा बरोबरच त्याच्या मित्रांना हा काही साधा सुधा प्रकार नाही हे कळून चुकले होते. घाबरून मित्र गाडीच्या टपावर चढले. मामा इतका घाबरला होता की जागेवरून हलुच शकत नव्हता. मित्रांनी हाका मारून भानावर आणले तेव्हा मामा ने सगळा धीर एकटवला आणि गाडी कडे वळला. मित्राकडे हातवारे करून खुणावले आणि टायर काढून गावाकडे निघाला. भर रात्री एका पंक्चर वाल्याला उठवून टायर चे पंक्चर काढून घेतले. आणि पुन्हा खिंडीच्या रस्त्याला यायला निघाला.
साधारण २ तास झाले असावे. जेव्हा पुन्हा मामा त्या खिंडी च्या रस्त्यावर आला तेव्हा त्याचे दोघे मित्र दिसले नाहीत पण ती बाई मात्र तशीच त्याच ठिकाणी उभी राहून गाडी कडे एक टक पाहत होती. त्याने मित्रांना फोन ट्राय केला पण मोबाईल ला रेंज नव्हती. एक शब्द ही न बोलता गाडीचे टायर बसवले आणि जसे काही घडलेच नाही अश्या हावभावानी हळू हळू बाजूने गाडी काढत आपल्या वाटेला लागला.
दुसऱ्या दिवशी बाजारात गेल्यावर त्याला कळले की दोन्ही मित्र पळून गावात आले होते. त्याने विचारपूस केली तेव्हा तिथले काही लोक म्हणाले की त्या रस्त्यावर खूप जणांना ती बाई दिसली आहे. बरं झालं तुम्ही दुर्लक्ष करून आपल्या वाटेला लागलात नाही तर आज बाजारात यायला जिवंत राहिला नसता.