लेखक – अनुराग देशपांडे

एखाद्या खेड्यात पायी जाताना, ठिकठिकाणी वसलेले शेंदूर लावलेले दगड तुम्ही पाहिले असतीलच. तो नुसता दगड जरी दिसत असला तरी त्याला एक जीव असतो असे म्हणतात. कोणाची स्मृती, एखाद्या अघटित घटनेची साक्ष तो देत असतो. ज्यांना माहीत आहे तेच सांगू शकतात की हे नेमके काय आहे. बऱ्याच गावात असे दगड वेशीपाशी, एखाद्या जुन्या वाड्यापाशी, चिंचेच्या झाडापाशी ही असतात. पिकांमध्ये लपून बसलेले हे दगड नेहमीच देव असतात असे नाही. अश्या काही जागा अतृप्त जीवांचे ठिकाण असते. त्याची मनोभावे सेवा सुद्धा केली जाते. जर त्या सेवेत खंड पडला तर मात्र त्याचे परिणाम संपूर्ण गावाला भोगावे लागतात. तर याच बद्दल चा हा एक ऐकीवात अनुभव. 

माझ्या आजोबांचे चुलत भाऊ शिरुकाका 8 वर्षांचे होते. आमचे बाळासाहेब त्यांना रोज शेतात घेऊन जात असत. कोणतीही वेळ असो, शिरुकाका नेहमी तयार असत. कारण बाळासाहेब त्यांना भुता-खेताच्या, रहस्यमयी गोष्टी सांगत. आणि कदाचित त्यामुळेच, शिरुकाका कधीच, कशालाच घाबरत नव्हते. कदाचित अश्या शक्तींचा सामना करण्याचे धाडस त्यांच्यात होते.

शेतात गहू लावला होता. गव्हाला सूर्योदयापूर्वी पाणी द्यावे लागते. बाळासाहेब न विसरता रात्री 2.30 वाजता गव्हाला पाणी द्यायला जात..हाडाचे शेतकरी असल्यामुळे त्यांची वेळ कधीच चुकत नव्हती.  

पण ते नको त्या वेळी शिरूकाकाला कधीच घेऊन जात नसत. एक दिवस असेच बाळासाहेब रात्री शेतावर जाण्यासाठी म्हणून बैलगाडी जुंपु लागले. समोर अचानक शिरुकाका उभे राहिले आणि  इवलुशी चप्पल पायात अडकवून त्यांच्याबरोबर जायला निघाले. 

‘तुम्ही नाही यायचं बरं का, झोपा आत जाऊन’ बाळासाहेबांनी त्यांना एक गोड दम भरला. त्यावर ते म्हणाले ‘का मी का नको?’

‘वेळ चांगली नाहीये शिरूभाऊ आणि तुम्हाला मध्येच झोप लागली तर’ ? पण त्यांच्याकडे लक्ष न देता शिरूभाऊ बैलगाडीत जाऊन बसले. रात्रीच्या किर्रर्रर अंधारात घुंगरू बोलायला लागले.

रोजची सवय असली तरी बैल पेंगतच वाटेला लागली. गावात त्या काळी दिवे नव्हते. आपला अंदाज आणि बैलगाडीतला कंदील इतकेच अंधारावर मात करण्यासाठी पुरेसे साहित्य होते. गाव मागे पडलं. कोसभर गेल्यावर बाळासाहेबांनी गाडी थांबवली आणि म्हणाले “शिरूभाऊ, पाटाकडून जायचे आहे बरं का, लवकर पोहोचू!”
पाटाचा रास्ता.. दिवसादेखील कमी लोक तिथे फिरकतात. पाटाच्या कडेने जाणारा हा रस्ता खूप विक्षिप्त होता. लोकांच्या हातातल्या पिशव्या काय किंवा लहान मुलं काय अचानक कोणी तरी ओढून न्यायचं. बैल गाडीची चाक अचानक निखळून जायची. त्या वाटेवरून चालत असलेल्या माणसाला अचानक पाठीवर कोणीतरी चाबकाचे फटके मारल्यासारखे वाटायचे तर कधी केस ओढल्याचा भास व्हायचा.

चालता चालता माणसं पाटात ओढली जायची. अश्या अनेक गोष्टी पाटाच्या त्या वाटेवर होत होत्या. ती वाट कधीच मोकळी नसायची. कोंबड्यांची पिसे, बकऱ्यांचे तुटलेले पाय, मंतरलेले लिंबू, कंगवे, फण्या आणि हो तंबाखूच्या पुड्या आणि चुन्याच्या डब्या या गोष्टी हमखास पडलेल्या असायच्या.

गावातील कोणतीच स्त्री, लग्न ठरलेला मुलगा किंवा मुलगी, गर्भवती स्त्री पाटाच्या वाटेकडे ढुंकून ही बघत नसत. आणि त्यात बाळासाहेब आणि शिरुकाका रात्री अडीच ला पाटाच्या वाटेने शेतात जायला निघाले. गार वाऱ्यामुळे शिरुकाका पेंगायला लागले. घुघराचा आवाज शांतता चिरत हळू हळू पुढे सरकत होता. पाटाचे पाणी खळखळत त्याच वेगात वाहत होते. मुख्य रस्त्यावर बैलाची जी चाल होती ती आता बऱ्यापैकी मंदावली होती. 

असे म्हणतात की जनावरांना माणसापेक्षा अश्या गोष्टींची जाणीव खूप लवकर होते. कदाचित म्हणूनच गावातील बरीच जनावरं या पाटाच्या रस्त्याला यायचीच नाही.
थोडं पुढे गेल्यावर अचानक दोन्ही बैल बिथरली. बैलांच्या खांद्यावर असलेल्या जुव्या सकट गाडी मागे ओढली जाऊ लागली. जोरात धक्का लागल्यामुळे शिरुकाका भानावर आले.

“शिरूभाऊ गाडी घट्ट धरून ठेवा, हालायचं नाही” अस म्हणत बाळासाहेब बैलाचा दोर ओढून त्यांना ताब्यात आणायचा प्रयत्न करू लागले. पण शेवटी बिथरलेले बैल ते ऐकतात कुठे.

त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ते आपल्या ताकदीने गाडी वळवू पाहत आहेत. एकतर थंडी, त्यातच पाटाच्या पाण्याचा गारवा आणि बोचणारी थंडी. आजूबाजूच्या झाडाच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. वाऱ्याच्या वेगा विरुध्द त्या हलत असल्यामुळे एखादी अदृश्य शक्ती तसे करतेय असा भास होऊ लागला. बाळासाहेब सावध झाले. गाडीतला कंदिल त्यांनी हातात घेतला आणि समोर पाहू लागले. शिरू काकांना त्यांनी आपल्या जवळ ओढले आणि त्यांचे हात बैलगाडीला आतून बांधून ठेवले.

“शिरूभाऊ काहीही झालं तरी गाडीच्या खाली उतरायचे नाही”.. 
तितक्यात.. समोरून कोणीतरी चालत येत असल्याची चाहूल जाणवू लागली. त्या चाहूल चा वेध घेत बाळासाहेबांची नजर त्या दिशेला गेली. पांढरे धोतर, अंगावर कोपरी, उजव्या हातात काहीतरी धरले होते. बाळासाहेबांना दरदरून घाम फुटला. आपसूक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले “विड्या खविस”.

25 वर्षांपूर्वी गावातला एक तरुण. त्याला विड्या ओढायची खूप सवय होती. म्हणून त्याचे नाव लोकांनी विड्या ठेवले होते. एकदा पाटात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. एकटा असल्यामुळे त्याच्यावर फक्त अंत्य संस्कार झाले होते. पण बाकीचे विधी राहिले होते. 

गरुड पुराणात सांगितल्या प्रमाणे मनुष्याचा आत्मा 10 दिवस झाल्याशिवाय या मृत्यूलोकातून जाऊ शकत नाही. तो याच मृत्यूलोकात अडकून राहतो. तो दहावे होई पर्यंत प्रेतात्म्याच्या योनीत असतो. आणि नंतर त्याला मोक्ष मार्ग किंवा त्याच्या कर्मा प्रमाणे शिक्षा मिळते.

विड्या च्या बाबतीत तेच घडले होते. बाळासाहेबांनी त्याला लगेच ओळखले. गावातल्या इतर लोकांनाही तो पाटाच्या रस्त्याला दिसला होता. 

“शिरूभाऊ जानवं काढा आणि कानाला गुंडाळा, असे म्हणत त्यांनीही आपले जानवं कानाला गुंडाळले. शिरुकाका गोधडीत लपून बसले होते. बाळासाहेबांनी त्यांच्या डोळ्यावर पूर्ण पांघरूण घातले होते. विड्या जवळ येऊ लागला. जसजसा तो बैलगाडी समोर येऊ लागला तसतसा त्याचा आकार वाढू लागला. आता तो चांगला 9 फुटांचा झाला होता. 

“चुना द्या..” अत्यंत किळस वाटेल अश्या घोगऱ्या आवाजात तो म्हणाला. कंदिलाच्या प्रकाशात विड्या पूर्ण स्पष्ट दिसत होता. लाल भडक डोळे, पूर्ण काळाकुट्ट चेहरा, मळलेले कपडे आणि अर्धवट जळालेल्या चेहऱ्यावर क्रूर भाव. शरीरावर जाळलाच्या, कोणीतरी वार केल्याच्या खुणा होत्या. 

“मी तंबाखू खात नाही” थरथरत बाळासाहेब म्हणाले. शिरुकाकाना एव्हाना सुरू असलेला प्रकार समजला होता. गोधडीत सुरू असलेल्या हालचालीवर विड्याची नजर गेली.
“तो पोरगा दे मग मला” विड्या म्हणाला. 
“लहान आहे तो.. दुसरे काही माग.. देतो” बाळासाहेबांनी आता गंभीर स्वर धरला होता. आज जे काही होईल ते माझं. शिरूभाऊ ला अजिबात धक्का लागू द्यायचा नाही. विड्या गाडी भोवती फेऱ्या मारू लागला.

गोधडीत दडून बसलेल्या शिरुकाका कडे त्याचे पूर्ण लक्ष होते. बैल जोरजोरात खूर आदळत होती. पण जागची हलू सुद्धा शकत नव्हती. फिरत फिरत विड्या गाडीच्या उजव्या कोपऱ्याकडे आला. 

“कुस्ती खेळ माझ्याशी.” विड्या मधला खविस बोलला.
खविसाशी कुस्ती म्हणजे मृत्यूला आमंत्रण. जर आपण जिंकलो तरच सुटका नाही तर आपल्याला आयुष्यभर याच्या तालावर नाचावे लागणार. 

हा आपल्याला गुलाम बनवणार. आपल्यालाच नाही तर याला मुक्ती मिळे पर्यंत आपल्या येणाऱ्या पिढ्याना हा त्रास देणार. या सगळ्याची जाणीव बाळासाहेबांना होती.
त्यांनी आयुष्याची 60 वर्ष ,पाहिली होती. त्यांना स्वतः ची काळजी अजिबात नव्हती. पण विड्याने शिरूभाऊ ला काही केले तर ..? धीर एकटवून ते विड्याला म्हणाले “खेळतो, पण वचन दे, मी हरलो तर, तुझी सत्ता माझ्यावर. या पोराला घेऊन जाणार नाहीस. मला नेशील.” एकदा पुन्हा लपलेल्या शिरुकाका कडे बघत विड्या ने होकार दिला.

खविस वचनाशी एकनिष्ठ असतो. विड्या बाजूच्या झाडीकडे चालू लागला. इथे बैलगाडीत बसून बाळासाहेब हळूच गोधडीजवळ येऊन पुटपुटले “शिरूभाऊ, माझं जर काही बार वाईट झालं, तर गाडी घेऊन घर गाठायचं आणि गाडीच्या खाली पाउल टाकायचं नाही”

शिरुकाकांनी बाळासाहेबांना घट्ट धरून ठेवले. जणू ते बाळासाहेबांना अडवतच होते. विड्या 10 पाऊले चालत गेला. बाळासाहेबांनी अंगातला अंगरखा काढून गाडीच्या खुंटीला लावला. त्यांना 2 गोष्टी माहीत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण कुस्ती खेळून जिंकू शकत नाही. आणि दुसरी म्हणजे विड्याला पळवण्यासाठी काही तरी वेगळा पर्याय शोधावा लागेल.

ते विचारातच खाली उतरले आणि त्यांचे पाय आता जमिनीला लागले. पण डावा हात गाडीलाच धरून होता.
“गाडी सोड आणि मैदानात ये” त्या किळसवाण्या आवाजाने ते भानावर आले. आतापर्यंत 3 वाजत आले होते. ते गाडीला स्पर्श करत तसेच पुढे आले आणि म्हणाले “तू पुढे ये”.
“हे बघ, ठरले ते ठरले, मैदानात ये, कुस्ती मार आणि निघून जा” विड्या चिडलेल्या स्वरात म्हणाला.
“नाही मी इथेच उभा आहे, तू पुढे ये’.

विड्याचा राग अनावर झाला आणि अचानक त्याचा आकार बदलायला सुरुवात झाली. तो 9 फुटांचा होता, आता हळू हळू तो 8, 7, 6 आणि शेवटी 5 फुटांचा झाला. त्याचे डोळे अधिकच लाल होऊ लागले. शिरुकाका हे सगळे गोधडीत लपून बघत होते.

खविसाचे एक गणित असते. त्याची एक विशिष्ट वेळ असते. ब्रम्ह मुहूर्ताच्या आधीचे 2 तास म्हणजे मध्य रात्री 12 ते 3 पर्यंत. त्या वेळेत तो आकार बदलू शकतो, कोणत्याही प्राण्याचे रूप घेऊ शकतो, पायाने झाड, भिंत चढू शकतो, पण खविस कधीच कोणाचा जीव घेऊ शकत नाही कारण तो प्रेत योनीत असतो.

त्याचे काहीही उद्दिष्ट नसते, त्याला फक्त लोकांना त्रास द्यायचा असतो आणि त्यात त्याला आनंद होतो. तो ज्याला जिंकतो त्याला आयुष्यभर आपल्या तालावर नाचवतो. आणि जो खविसाला जिंकतो त्याच्या 3 इच्छा खविस पूर्ण करतो असं ऐकण्यात आहे पण प्रत्यक्षात असे कोणीही नाही ज्याने याचा पुरावा दिला आहे.

पहाटे साधारण 3 नंतर देव-यक्ष आणि गंधर्व, स्नान करण्यासाठी पाण्याच्या वाहत्या स्रोताजवळ येतात. नदी, पाट, विहीर अश्या ठिकाणी पहाटे 3 नंतर सूक्ष्म स्वरूपात देवाचा वावर सुरू होतो.

विड्याने बाळासाहेबांना बोलावलेले ठिकाण पाटाच्या विरुद्ध बाजूला काही अंतरावर होते. आणि ब्रम्ह-मुहूर्ताला फक्त 15 मिनिट राहिले होते. विड्या आणि बाळासाहेब दोघांकडे वेळ खूप कमी होता. अजून एक कारण म्हणजे राक्षसाचा राजा नरकासुर हा सुद्धा पहाटेच ब्रम्ह-मुहूर्तावर श्री विष्णूच्या हातून मारला गेला होता.
ब्रम्ह मुहूर्तावर राम प्रहर सुरू होतो. भूत-प्रेत, पिशाच्चाची भीती आणि प्रभाव फक्त मध्य-रात्री 12 ते 3 याच काळात सगळ्यात जास्त असतो. दुपारी 3 वाजता त्यांचा प्रभाव सगळ्यात कमी असतो. म्हणून त्याच वेळेस भूत उतरवणे हा प्रकार करतात. बाळासाहेबांना हे सगळं गणित माहीत होतं. गाडी ओढत ते पाटाच्या पायथ्याशी आले. ‘शिरूभाऊ गाडी घट्ट धरून ठेवा, अजिबात जमिनीला पाय लावायचा नाही’. त्याला अजून एक कारण म्हणजे “भुतांमधला कोणताही प्रकार ‘रथात’ म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या गाडीत काहीही करू शकत नाही.

कारण रथ हे देवाचे वाहन आहे. त्यांनी गाडी ओढत बैलाचे पाय पाण्याला लागतील अशी गाडी उभी केली. आणि गाडीच्या खाली असलेली बादली काढून पाटाच्या पाण्याने भरली आणि स्वतःच्या अंगावर ओतली आणि मारुती स्तोत्र म्हणू लागले.

दुसरी बादली भरून त्यांनी गाडीत लपलेल्या शिरुकाकांवर ओतली. विड्या चा संताप अनावर झाला आणि तो भयंकर चिडला. पण त्याची वेळ संपत आली होती. तो गाडी कडे धावू लागला. शिरू-काका आणि बाळासाहेब जोर-जोरात मारुती स्तोत्र म्हणू लागले. विड्या जस जसा जवळ येत होता तस तसा दोघांचा आवाज ही वाढत होता. तिसरी बादली बाळासाहेबांनी भरून दोन्ही बैलांच्या अंगावर ओतली आणि “जय नंदिकेश्वराय नमः” असे म्हंटले.
यात 2 गोष्टी घडल्या, पहिली म्हणजे शिरुकाका आणि बाळासाहेब ब्रम्ह-मुहूर्तावर शुचिर्भूत म्हणजेच वाहत्या पाण्यात अंघोळ करून पवित्र झाले आणि दुसरे म्हणजे बैलांना अंघोळ घालून ‘नंदी’ म्हणजेच महादेवाचे वाहन म्हणून संबोधले.

मारुती स्तोत्र सुरूच होते. विड्या 5 फुटांवर येऊन कोसळला. बाळासाहेबांनी एक भरलेली बादली विड्यावर फेकली. अंगावर ऍसिड फेकल्या सारखे विड्या कळवळला, तडफडू लागला. त्याचा आधीच जळलेला चेहरा अजून विद्रुप झाला. तो बाळासाहेबांना विनवु लागला “जाऊद्या मला , पहाट झाली”

तुला असच कसं सोडू, तू मला सोडलं असतं का ? बाळासाहेबांनी त्याला विचारले.
जाऊद्या हो मला, मी नाही येणार आता कोणाच्या मार्गात.
न राहवून बाळासाहेबांनी त्याला विचारले ‘कायमचा जायचे काय घेशील?’
विड्या म्हणाला ‘मला बांधून घाला’..

बाळासाहेबांना समजले काय करायचे आहे ते. “ठीक आहे तुला आजच बांधतो, पण पुन्हा बाहेर यायचं नाही, आलास तर बघ”
कळवळून विड्या म्हणाला “नाही येणार, वचन देतो”.
पहाट झाली आणि जवळच्या दत्त मंदिरात घंटा वाजली. विड्याचा प्रभाव संपला आणि तो जमिनीवरच गुप्त झाला. शिरुकाका सगळे बघत होते.

बाळासाहेबांनी आपली गाडी पुन्हा पाटाच्या बाहेर काढली, आणि परत घरच्या रस्त्याला लागले. सकाळी गावात एक सभा झाली. 4 गवंडी तयार झाले. एका मोठ्या दगडी शिळेला शेंदूर फासला गेला आणि विड्या कायमचा पाटाच्या कडेला बांधला गेला.

आजही पाटाला पहिल्या पावसाचं पाणी आलं की अंघोळीचा पहिला मान विड्याचा असतो. सोबत त्याला तंबाखू ची पुडी आणि चुना पण ठेवला जातो. पण पाटाचे पाणी आटले की पाटाचा रस्ता बंद होतो..

Leave a Reply