अनुभव – गणेश डोंगरे

अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा मी चौथी मध्ये शिकत होतो. त्या वेळी घरात माझी आई आणि माझ्या ३ मोठ्या बहिणी रहायच्या. माझे वडील सरकारी नोकरी करायचे आणि तेव्हा बदली झाल्यामुळे बाहेरगावी होते. त्या काळी आमच्याकडे लोड शेडींग चा खूप त्रास असायचा. गावात रात्री लाईट जात असे आणि त्यामुळे आम्ही सर्व घराच्या माडी वरच झोपायचो. एक दिवस आम्ही सगळे असेच माडीवर झोपलो असताना मला एक भयानक स्वप्न पडले. स्वप्नात माझ्या अंगावर कोणी तरी बसून गळा दाबत होते आणि माझ्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. मी ओरडण्याचा, आई ला आवाज देण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण वाचाच गेली होती. एके क्षणी मी संपूर्ण जोर लावून खाडकन अंथरुणात उठून बसलो. मला अक्षरशः धाप लागली होती, श्वास कमी पडत होता. स्लीप परा लीसिस..? हो नक्कीच मला त्याचाच अनुभव आला. ती रात्र मी कशी बशी काढली. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही पुन्हा माडी वर झोपायला गेलो. मला डोळे मिटायला ही भीती वाटत होती म्हणून तसाच अंथरुणात पडून होतो. बराच वेळ झाला. सगळे अगदी गाढ झोपून गेले.

माहीत नाही मला कधी झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली असेल. अचानक मी उठलो आणि माडी च्या कडेला चालत गेलो. तिथून खाली उडी घेणार तितक्यात मागून आई ने पडकले आणि मागे खेचले. मला रागातच विचारले “तू इथे काय करतोयस.. पडला असतास ना वरून..” तिने माझ्या कडे पाहिले आणि जरा दचकली च. कारण मी काहीच बोललो नाही आणि माझे डोळे बंद होते. मी विचित्र आवाजात फक्त एकच वाक्य बोलू लागलो “सोड मला..” त्या आवाजाने माझ्या बहिणी ही जाग्या झाल्या. आई ने जरी मला धरून ठेवले होते तरीही मी माडी वरून खाली उडी मारायचा प्रयत्न करत होतो. ते पाहून माझ्या बहिणी ही आल्या आणि मला आतल्या बाजूला खेचले. पण त्या वेळी मी त्यांना आवरत नव्हतो. कुठून इतकी शक्ती संचारली होती माझ्या अंगात काय माहित. पण त्या चौघी नी ही मला सोडले नाही. जवळपास १५ मिनिट मी असेच विचित्र वागत राहिलो. आणि एके क्षणाला अगदी झटकन जागा झालो, माझे डोळे उघडले. मला काय होत होते माहीत नाही पण मी थर थर कापत होतो. आई ला घट्ट पकडुन बसलो. माझ्या सोबत नक्की काय झाले तेच कळले नाही. त्या रात्री मी झोपलोच नाही. माझी आई ही मला जवळ घेऊन बसली होती. तिने मला तिच्यापासून दूर केले नाही.

सकाळी आई ने मला जवळच राहत असलेल्या एका पुजाऱ्याकडे नेले. त्याने माझ्यावर रेकी केली. तुळशी खाली पाणी ठेऊन ते प्यायला सांगितले. त्यांनी म्हंटले की याला नक्कीच कोणी तरी झपाटले होते. तुम्ही सर्व त्या रात्री त्याच्या जवळ होता म्हणून सांभाळू शकलात. नाही तर याचे काही खरे नव्हते. मला रात्री झोपेत चालण्याची कधीच सवय नव्हती. आणि या एका प्रसंगा नंतर मला पुन्हा कधीच असा अनुभव आला नाही. त्यामुळे माझ्यासोबत त्या रात्री किती भयानक प्रकार घडला ते फक्त माझ्या घरच्यांना च माहीत. मी कसे वागलो, काय वागलो, काय बोललो या बद्दल त्यांनीच मला नंतर सगळे सांगितले. ती भयानक अनुभव आजही आठवला तरी माझ्या शरीराचा थरकाप उडतो. 

Leave a Reply