अनुभव – सबस्क्राईब र अशोक
मी मूळचा मराठवाड्यातला. अगोदर मी या अश्या गोष्टींना कधी मानत नव्हतो पण या अनुभवा नंतर मला या गोष्टींवर विश्वास बसला.
प्रसंग जवळपास १३ वर्षा पूर्वीचा आहे. मी त्यावेळेस बी कॉम प्रथम वर्षाला होतो. घरची परिस्तिथी तशी साधारण. वडील भारतीय सैन्यदलात होते. मी कॉलेजला असताना क्रिकेट खेळायचा खुप नाद होता. मित्र मंडळ ही मोठे होते त्यामुळे बाहेर पण बऱ्याच उनाडक्या करत फिरायचो. कॉलेज प्रमाणे आमचे गल्लित ही क्रिकेट मंडळ होते. रोज सायंकाळी खेळून झालें कि ग्राऊंडवर राऊंड करून बसायचो आणि भुतांच्या गोष्टीविषयी चर्चा करायचो. माझा जास्त विश्वास नसल्याने मी जास्त लक्ष देत नसे मग त्यावरून मित्र माझ्यासोबत पैज़् लावत. तु इकडे जाउन् दाखव मि तुला पार्टी देईन किंवा तिकडे जा २ बियर देईन.. कधी कधी तर या पैजा भयानक असायच्या. स्मशानात प्रेत जळत असेल तर तिथे जाऊन बस, कधी तर नुसता बसू नकोस, अंडी खा वैगरे. पैज कसलीही असो मी ती पूर्ण करायचो आणि मित्रांना खोटे ठरवायचो. मला कधीही इतका जीवघेणा प्रसंग कधीच आला नव्हता. आमच्या इथे खूप जुनी आंब्याची आमराई आहे. कारण माहीत नाही पण त्या आमराईत बऱ्याच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे तिथे जास्त कोणी फिरकत नाही. एकदा तर मित्रांनी मला अमावस्येला त्या आमराईत ल्या एका झाडाला जाऊन खिळा मारून ये अशी पैज दिली होती. ती ही मी परंपरेनुसार पूर्णही केली.
ही घटना अश्याच एका अमावस्येच्या रात्री ची आहे. मी जिथे राहतो तिथून माझ्या आई चे गाव जवळपास १० किलोमिटर वर आहे. आमच्याकडे पाऊस सुरू होण्या आगोदर जी अमावस्या असते त्या दिवशी मूळ गाव देवीला कोंबडा किंवा बकऱ्याचा मान द्यावा लागतो. कोंबडा आणायची जबाबदारी मला दिली होती. त्या दिवशी मी आणि माझा मित्र अण्णा असे दोघे कोंबडा विकत घेऊन निघालो. पण जसे त्या गावाची वेस ओलांडली तसे कोंबडा मेला. आम्हाला काही कळलेच नाही काय झाले अचानक. माझा मित्र म्हणाला की आता पुन्हा मागे जाण्यापेक्षा आपण पुढच्या गावातून नवीन कोंबडा विकत घेऊ, माझ्याकडे पैसे आहेत, मी पैसे देतो हवे तर तू मला नंतर आरामात दे. ठरल्याप्रमाणे आम्ही देवीला कोंबड्याचा मान दिला. त्या दिवशी गावात क्रिकेट चे सामने होते. मी आई ला आधीच सांगून ठेवले होते की आमच्या टीम साठी जेवणाचा चांगला बेत करून ठेव. सामने झाले, आमची जेवणं आटोपली. त्या गावातले सगळे मित्र आप आपल्या घरी निघून गेले. माझा मित्र अण्णा त्याच्या बायका पोरांसोबत आला होता. जेवण झाल्यावर मी त्याच्याशी गप्पा मारत बसलो. १०.३० होऊन गेले होते. माझी आई म्हणाली की अण्णा सोबत त्याचे कुटुंब आहे, त्याला त्याच्या गावात सोडून ये. आता बाईक वर इतक्या सगळ्यांना घेऊन जाणे शक्य नव्हते. म्हणून मग आई म्हणाली की संजय ला सोबत घेऊन जा. संजय म्हणजे आमच्या टीम मधला सचिन. वय तसे आमच्याहून जास्त आणि अनुभव ही दांडगा.
तो आम्हाला खूप मार्गदर्शन करायचा. मी त्याची मदत मागितली आणि तो लगेच तयार ही झाला. त्याच्याकडे जुनी महिंद्रा ची जीप होती. तुम्ही जुनी जीप पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात असेल. त्याला दरवाजे नसायचे, पडदे असायचे. आम्ही दोघांनी जाऊन त्याला व त्याच्या घरच्यांना गावात सोडून आलो. येताना जवळच असलेल्या चौकातील एकमेव टपरीवर पान खायला थांबलो. सोबत माझा मित्र किरण ही होता. बराच उशीर झाला होता. मी तशी वेळ पाहिली नाही. अंगाला गार वारा झोंबत होता. तितक्यात जवळच्या बोळातून दारुडा पांडू पळत आला. संजय ला म्हणाला की माझी रिक्षा बंद पडली आहे. माझा एक पाहून मुंबईहून येतोय, त्याला घ्यायला जायचे आहे. त्याच्याकडे खूप पैसे आहेत. त्याला इथे पुढच्या गावात जायचे आहे. तू त्याला सोडून ये तो तुला तुझे भाडे देईल. त्याचे बोलणे ऐकून संजय म्हणाला “अरे मी गेलो असतो पण मला माहित नाही गाडीत इंधन किती आहे, ड्रायव्हर कडे असते गाडी..”. त्यावर पांडू म्हणाला “तो तुला १२०० रुपये देईल ट्रीप चे..” मग मात्र संजय तयार झाला पण मला आणि किरण ला येण्यासाठी ही हट्ट करू लागला. किरण तयार झाला पण मी त्याला नाही म्हणालो. तसे तो लगेच बोलला “आज अमावस्या आहे म्हणून घाबरतोस काय..?”. बस.. झालं.. असे बोलल्यावर मी कोणाचे काय ऐकतोय.. म्हणालो “चल मी काय भितो काय कोणाला..”
काही वेळात आम्ही सांगितलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलो. त्या पांडूने सांगितलेला माणूस ही दारू पिऊन झिंगत होता. त्याला धड उभे ही राहता येत नव्हते. आम्ही कसे बसे त्याला गाडीत बसवले आणि निघालो. त्याला ज्या ठिकाणी सोडायचे होते ते जवळपास २० किलोमिटर वर होते. थोड्याशा गप्पा झाल्यानंतर आम्ही सगळेच शांत बसलो. किरण ने घातलेले रेडियम चे घड्याळ अंधारात चांगलेच चमकत होते. राहून राहून त्याकडे लक्ष जात होत. पाठीमागून त्या पाहुण्या ची नशेत चाललेली बडबड ऐकू येत होती जी आम्हा तिघांना अजिबात कळत नव्हती. बरीच रात्र झाली होती. मध्येच रस्त्यात काही कुत्रे गाडी मागे काही अंतर धावत यायचे आणि मध्येच कुठे तरी गायब ही व्हायचे. रस्ता खराब असल्यामुळे गाडी जरा हळूच होती. त्यात तो परिसर चोरीच्या घटनांसाठी परिचित होता त्यामुळे तिथे कोणीही फिरकत नसे. अगदी खूप गरज असलीच तरच तिथून प्रवास करायचे. आम्हालाही लूटमारीची थोडी भीती वाटत होती पण तसे कोणीही दाखवत अथवा बोलत नव्हते. आणि तितक्यात जे व्हायला नको होते तेच झाले. गाडी धक्के खात बंद पडली आणि माझी झोप उडाली. संजय ने तपासले आणि म्हणाला की गाडीतले इंधन संपले आहे. आता गावात चालत जाऊन इंधन घेऊन येण्या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नव्हता. पण त्याने सांगितले की समोरच्या गावात माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे. त्याच्याकडे जाऊन बघावे लागेल. मग काय.. गाडीत पांडू आणि त्याच्या पाहुण्याला तसेच ठेऊन निघाला आमचा पायी मोर्चा.. पुढचे गाव अजूनही १-२ किलोमिटर वर होते. १२-१२.३० होऊन गेले असावेत.
दूर कुठून तरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज यायचा आणि अंगावर शहारे यायचे. जवळपास अर्ध्या तासाची पायपीट झाल्यानंतर आम्ही गावात येऊन पोहोचलो. संजय त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे घेऊन गेला. सुरुवातीला तर आम्हाला दारावरच बराच वेळ थांबावे लागले. कारण रात्र झाल्यामुळे संपूर्ण खात्री पटल्यावर च त्या व्यक्तीने दार उघडले. त्याला आम्ही सगळी समस्या सांगितली पण तो म्हणाला की माझ्याकडे इंधन नाही. झाली पंचायत. त्या पाहुण्याला सोडणार कसे..? आधीच तो शुद्धीत नाही, त्यात त्याच्याकडे पैश्याची बॅग. गाडीत झोपायचे म्हंटले तर ते धोक्याचे ठरले असते. पण आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून आम्ही गाडी चे पडदे लावून त्यातच रात्र काढायचे ठरवले. थोडा थकवा जाणवत होता म्हणून आम्ही त्या गावाच्या बाहेर एका पारावर येऊन बसलो. इतक्यात एक माणूस समोरून सायकल वरून येताना दिसला. आम्हाला पाहताच त्याने सायकल सोडून हातात एक मोठा दगड उचलला. त्याला वाटले की आम्ही चोर आहोत. आम्ही त्याला लांबून च समजावू लागलो “अरे दादा आम्ही चोर नाही.. आमची गाडी बंद पडली आहे..” त्याने आम्हाला बरेच प्रश्न विचारले. खूप वेळ त्याला समजावण्या तच गेला. पूर्ण विश्वास बसल्यावर तो म्हणाला “ती रोड वर गाडी उभी आहे ती तुमची आहे का..?”. आम्ही त्याला हो म्हणालो आणि सांगितले “मुंबई हून पाहुणा आला आहे त्याला पुढच्या गावात सोडायला आम्ही चाललो होतो आणि इंधन संपले म्हणून आम्ही इथेच अडकलो आहोत..”
तसे तो म्हणाला “तो पाहुणा आमच्या सरपंच साहेबांकडे येणार होता. मी त्यांच्या कडेच कामाला असतो काळजी करू नका, मी त्यांना कळवतो.” जाताना आम्ही त्याला थोडे इंधन मिळते का ते ही बघायला सांगितले. बघतो असे सांगून तो निघून गेला आणि आम्हाला तिकडेच थांबायला संगितले. थोड्याच वेळात २ माणसं बाईक वरून आली, एकाने कॅन मध्ये इंधन आणले होते. त्याने आम्हाला कॅन दिला आणि गाडी कुठे आहे असे विचारले. तिथून काही मीटर वर आम्ही गाडी पार्क केली होती. तसे ते दोघे तिथे गेले आणि त्या पाहुण्याला घेऊन ही आले. तो पाहुणा म्हणाला की उद्या येतो आणि पैसे देतो तसे संजय ने ठीक आहे म्हंटले. आम्ही तिघे ही दिवसभराच्या धावपळी ने खूप दमून गेलो होतो. जड पावलांनी आम्ही गाडीकडे चालत निघालो. अधून मधून थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती म्हणून जरा बरं वाटतं होत. वेळ पाहिली तर १.२० झाले होते. वातावरणात चांगलाच बदल जाणवू लागला होता. रातकिड्यांचा आवाज ही एव्हाना बंद झाला होता. त्या काळ्याकुट्ट अंधारात तो सामसूम रस्ता अतिशय भयाण वाटत होता. बराच वेळ चालून झाले पण आमची गाडी काही दिसत नव्हती. आम्हाला आश्चर्य वाटले. रस्ता चुकलो की काय असे वाटून गेले. मी संजय ला विचारले “संज्या वाट चुकलो बहुतेक आपण..”. पण तो अगदी गप्प. तोंडातून ब्र काढायला ही तयार नाही.
मला वाटले थकला असेल म्हणून बोलणे टाळतोय. मनाची बैचेनी वाढत चालली होती. उगाच कसले तरी दडपण आल्यासारखे वाटू लागले. चालता चालता अचानक मागून आवाज येऊ लागला. मी मागे वळून पाहिले पण कोणी दिसले नाही. असे २-३ वेळा झाले. तितक्यात अचानक संजय ने चालण्याचा वेग वाढवला. मी खूप अस्वस्थ झालो, काही तरी वेगळे जाणवत होते पण काय ते उमगत नव्हते. तितक्यात अचानक बाजूच्या शेतातून कसली तरी सळसळ जाणवली. काही तरी जोरात आत गेल्यासारखे भासले. पण दिसले काहीच नाही. मी संजय कडे पहिले पण तो काहीच न बोलता झपाझप पावले टाकत पुढे जात होता. तेवढ्यात माझी नजर रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतातील बांध्यावर गेली आणि काळजाचा ठोकाच चुकला. आमच्या पेक्षा दुप्पट उंचीची एक एक पांढरट आकृती आमच्या सोबत येत होती. ती सतत आपला आकार बदलत होती. मला काहीच कळायला मार्ग नव्हता. मी संजय चा हात धरत त्याला म्हणालो “संजय ते बघ काय आहे..” तसे तो दबक्या आवाजात च म्हणाला “गप गुमान चल.. अजिबात आवाज करू नकोस आणि तिकडे बघू नकोस.” आम्ही पार्क केलेली गाडी शोधत दीड तास होऊन गेला होता. तरीही गाडीचा पत्ता नव्हता. आम्हाला चकवा लागलाय हे मला आता कळून चुकले होते. आज आपण घरी जाणार असे वाटत नव्हते.
त्या वेळेस किती देवाचे नाव घेतले ते त्यालाच माहीत. आम्ही रात्री ३.१५ च्या सुमारास गाडी पाशी आलो पटकन गाडीत जाऊन बसलो. पांडू मागच्या सीट वर घोरत पडला होता. त्याच्या घोरण्याचा आवाज देखील धडकी भरवत होता. तितक्यात गाडी भोवती कसलीशी चाहूल जाणवू लागली. आमच्यातले सगळे शांत झाले. भीतीमुळे सर्वांग भिजले होते. पण आत बसून मरणाची वाट कोण बघणार. संजय मला म्हणाला “अशोक कॅन घे आणि माझ्यासोबत खाली उतर..” मी नाही म्हणालो पण संजय एकटा कसा जाईल म्हणून वेळेचे गांभीर्य राखत मी खाली उतरलो. संजय ने बोंनेट उघडले आणि कॅन ओतायला सुरुवात केली. मिनिटाच्या आत तो कॅन रिकामा झाला. पंप मारला आणि म्हणाला “आता चल लवकर..” पण त्या रात्री नियतीने आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवले होते तिलाच माहीत. बरेच स्टार्टर मारले पण गाडी चालू होत नव्हती. आता काय करायचे म्हणून डोक्याला हात लाऊन बसलो. तितक्यात किरण म्हणाला “माझ्याकडे आई चा फोन आहे पण बलेंस उडवला तर आई ओर डेल..” त्याचे ते वाक्य ऐकून असे वाटले की याला इथे बडवावे.. एवढे सगळे विचित्र घटनाक्रम झाले आणि फोन बद्दल हा आत्ता सांगतोय. पण निव्वळ फोन असून चालणार नव्हते. त्याकाळी फक्त दोन च कंपन्या होत्या बी एस एन एल आणि एम टी एन एल. आणि त्याला रेंज असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट.
शेवटचा प्रयत्न म्हणून किरण ला गाडीच्या टपावर चढवले आणि नशिबाने रेंज मिळाली. लगेच मित्राला फोन करून बोलावून घेतले. तसे काही वेळात २ दुचाकीवर मित्र आले आणि आम्हाला गावात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ला संजय किरण ला घेऊन घरी आला आणि म्हणाला की आपण गाडी घेऊन येऊ आता. तसे मी त्याला म्हंटले हो जाऊ, थोड्या वेळ बस मी जरा फ्रेश होतो. तसे त्याने एक प्रश्न विचारला ” तू काल रात्री नक्की काय पाहिलंस..” तसे मी त्याला सगळे सांगितले. त्यावर तो म्हणाला “ती आकृती अगोदर माझ्या बाजूने चालत होती आणि ते ही वडा जवळच्या मसणवाट्यातून.. तुम्ही घाबरून जाल म्हणून मी काही बोललो नाही.. तिथे काहीही घडू शकले असते म्हणून मी चालण्याचा वेग वाढवत होतो.. आणि जे तू म्हणालास ना की आपल्या मागून पावलांचा आवाज येतोय तर आपल्या मागे एक नाही तर बरेच जण चालत होते..” त्याचे बोलणे ऐकून किरण म्हणाला “मला या पैकी काहीच जाणवले नाही. मात्र तुमची अवस्था बघून मला काहीतरी वेगळे घडते आहे हे कळले म्हणून मी काही न बोलता तुमच्या सोबत चालत होतो..” मी यावर काहीच बोललो नाही. आवरून घरा बाहेर पडलो, मेकॅनिक घेतला आणि गाडी आणायला निघालो. पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. आम्ही ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती तिथे आजूबाजूला पांढरी माती, लिंबू, सुया आणि काळया बाहुल्या उतारा करून टाकलेल्या होत्या.
आम्हाला काल रात्री घडलेल्या गोष्टीचे कारण काय असेल याचा अंदाज आला होता. मेकॅनिक ने चावी लावली तसे एका झटक्यात गाडी स्टार्ट झाली. हे पाहून आम्ही समजलो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तिथून एक आजोबा जात होते त्यांना मी थांबवून विचारले “हे इथे सगळे उतारे का टाकले आहेत, ते ही याच भागात..?” त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले “नवीन दिसताय.. इथे जास्त वेळ थांबू नका.. ही जागा तिची आहे.. याला तूर्टी चे आळे म्हणतात..”. आम्ही त्यांना रात्रीचा प्रकार सांगितला तसे ते म्हणाले “आई बाबांची पुण्याई म्हणून तुम्ही वाचलात नाही तर ती सोडत नाही कोणाला.. खूप जीव घेतलेत तिने इथे.. ते मांजरीचे रडणे ऐकले ना तुम्ही.. ती मांजर नव्हती ते तिचे लेकरू होते. जवळ जवळ २०-२२ वर्षांपूर्वी एका स्त्रीला ७ व्या महिन्यात प्रसूती कळा सुरू झाल्या. गावातील बायकांनी खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. मग तालुक्याला घेऊन जायचे ठरले. पूर्वी या जागेवर माळरान होते, रस्ता असा नव्हताच. इथून जात असताना तिने व तिच्या लेकराने इथेच शेवटचा श्वास घेतला. तेव्हा पासून गावाला लागलेली ही पीडा आहे. या खालच्या अंगाच्या रस्त्याने कोणीही येत नाही, तुम्ही कसे काय आलात या रस्त्याने..” आम्ही कोणी काहीच बोललो नाही, जे काय समजायचे होते ते समजून गेलो आणि तिथून निघालो..