अनुभव – सिद्धू अहिवले

हा प्रसंग माझ्या मामा सोबत खूप वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हा तो साधारण १९-२० वर्षांचा असेल. तो आणि त्याचे मित्र रोज रात्री जेवण आटोपल्यावर कट्टा टाकायला जायचे. घरा जवळच्या एका ब्रीज वर बसायचे आणि रात्री १२-१ ला घरी परतायचे. असेच एकदा रात्री तो घरी येत होता. त्याच्या सोबत त्याचा एक मित्र ही होता, आणि त्याचे घर वाटते च लागायचे. मामा ने त्याला घराजवळ सोडले आणि तो नेहमी प्रमाणे आरामात घरी यायला निघाला. रस्ता अगदी सामसूम झाला होता पण मामा ला असे रात्री अपरात्री यायची सवय झाली होती. आमचे घर रस्त्यापासून अगदी आतल्या भागात होते. मुख्य रस्त्यापासून आत एक गल्ली होती आणि तिथून काही मिनिटांवर आमचे घर होते. त्या वळणावर एक किराणा मालाचे दुकान होते, जे इतक्या रात्री बंद असायचे. त्या दुकानाला थोडा आवार होता आणि समोर एक बाकडे ठेवलेले असायचे. त्या दुकानाजवळ येत असताना कधी नव्हे पण त्या दिवशी मामा ला एक म्हातारी बाई त्या बाकड्यावर बसलेली दिसली. 

वयाची ८० वर्ष ओलांडली असतील असे वाटत होते. मामा चे दुरूनच तिच्या कडे लक्ष गेले आणि त्याला जाणवले की ती ही लांबून बहुतेक त्याला येताना पाहतेय. मामा जस जसे जवळ जाऊ लागला तसे त्याला खात्री पटली की ती एकटक त्याच्या कडेच पाहतेय. त्याने दुर्लक्ष केलं. पण पुढच्या क्षणी मनात विचार आला की सगळा परिसर इतका निर्मनुष्य असताना ही म्हातारी इथे का बसली असेल. आणि त्यात ही बाई आपल्या परिसरातील दिसत नाहीये. तितक्यात त्या म्हातारीने हाक दिली. “बाळा थांबतो का जरा..”. तसे मामा थांबला आणि म्हणाला “काय झाले आजी..?” तर ती म्हणाली “मला एक मदत करतोस का राजा.. जरा हा रस्ता ओलांडून दे मला.. बऱ्याच वेळा पासून इथे थांबले आहे..” तिचा खोलात गेलेला आवाज आणि अवस्था पाहून मामा ने जास्त विचार न करता हो म्हंटले. तो तिच्या जवळ गेला, तिला हाताला धरून उठवले आणि हळु हळू चालत घेऊन जाऊ लागला. त्याला जरा आश्चर्यच वाटत होते कारण रस्ता अगदी सामसूम होता, गेल्या १० मिनिटांत साधे एक वाहन ही तिथून गेले नव्हते. तरीही ही बाई मदती साठी बसून राहिली. 

काही सेकंदात त्याने रस्त्याच्या पलीकडे आणून सोडले आणि सहज म्हणून त्याने विचारले “आजी तुम्हाला तर इकडे या आधी कधी पाहिले नाही.. नवीन राहायला आला आहात का..” पण त्या बाई ने एव्हाना पुढे चाल मांडली होती. काहीच न बोलता ती पुढे निघून गेली. त्याला थोडे विचित्र वाटले, रस्ता अगदीच अरुंद असल्यामुळे तो ४-५ सेकंदात पुन्हा अलीकडे आला. सहज म्हणून त्याने मागे वळून पाहिले तर ती म्हातारी बाई त्याला दिसली नाही. तो थोडा बुचकळ्यात पडला. कारण तो परिसर बराच मोकळा होता, जरी रस्ता सोडून आतल्या भागात चालत गेले तरी दिसायचे. पण ती बाई काही क्षणात कुठे निघून गेली काही उमगलेच नाही. तो घरी आला. थकला होता म्हणून झोपही लगेच लागली. काही दिवस उलटले. अश्याच एका रात्री तो नेहमी प्रमाणे १२ च्या सुमारास घरी परतत होता. तेव्हा पुन्हा त्याला ती म्हातारी बाई तिथेच त्या बाकड्यावर बसलेली दिसली. या वेळेला मात्र तो जरा सावध झाला. अजिबात लक्ष द्यायचे नाही असे मनोमन ठवरून तो तिथून पुढे जाऊ लागला. चालण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो तिला ओलांडून पुढे आला. तितक्यात त्या बाई ने पुन्हा एक हाक दिली. मामा थांबणार नव्हता पण तरीही त्याने एक नजर तिच्या दिशेला टाकली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. 

ती म्हातारी मान संपूर्ण वळवून त्याला पाहत होती. तिचे शरीर पुढच्या बाजूला होते पण मान गोल वळवून मामा कडे होती. सगळ्यात भयानक म्हणजे तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या. तो जागीच स्तब्ध झाला. काही वेळ तर आपण नक्की काय पाहतोय हेच त्याला कळत नव्हतं. त्याची नजर तिच्या पायांकडे गेली. बऱ्याच काळापासून खितपत पडलेल्या मृतदेहासारखे तिचे सुकून गेलेले पाय दिसले. तो क्षणात भानावर आला आणि सरळ घराकडे पळत सुटला. त्या रात्री त्याला प्रचंड ताप भरला होता. दोन दिवस तो अंथरुणाला खिळला होता. ती म्हातारी नक्की कोण होती, कुठून आली होती, त्यालाच का दिसली या बद्दल त्याला काहीच कळले नाही. भीतीमुळे त्याने ते शोधून काढायचा ही कधी प्रयत्न केला नाही. पण त्या रात्रीच्या भयानक घटने नंतर मात्र तो कट्टा टाकायला कधीच गेला नाही.

Leave a Reply