अनुभव – शौनक ढाकुलकर

ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची असून ती मला माझ्या आईनी सांगितली होती. आमच्या शेजारी कमला बाई देशमुख नावाच्या काकू राहायच्या. त्यांचा एक दिनक्रम असायचा की त्या रोज पहाटे मालटेकडी वर फिरायला जायच्या. एके रात्री त्यांच्या घरचा विद्युत प्रवाह बंद झाला. तसे त्यांना जाग आली. वाटले की पहाट झाली आहे, ४-४.३० वाजले असतील. त्या उठून फ्रेश झाल्या आणि घरा बाहेर पडल्या. खर तर त्यांनी घड्याळात वेळ पहिलीच नाही. रात्री चे अडीच वाजले होते. आणि अश्या भयाण वेळी त्या बाहेर निघाल्या. एकदम गडद अंधार आणि अगदी स्मशान शांतता पसरली होती. त्या वेळेपासून अनभिज्ञ होत्या. कमला काकू रोजच्या सवई प्रमाणे झपाझप पावले टाकत चालतच होत्या. काही वेळात ते त्या टेकडी जवळ येऊन पोहोचल्या. जसे त्यांनी टेकडी चढायला सुरुवात केली त्यांना जाणवू लागले की आपल्या मागून कोणीतरी चालत येतंय. पण त्यांनी लक्ष दिलं नाही. काही अंतर चालत आल्यावर त्यांना कुत्र्याच्या भेसूर रडण्याचा आवाज येऊ लागला. 

त्यांना लक्षात आले की आज अमावस्या आहे, काही कारणामुळे कुत्रे रडत असतील. त्या दुर्लक्ष करत पुढे जात राहिल्या. पण तो कुत्र्याच्या रडण्याचा आवाज हळु हळू बदलून एका बाईच्या रडण्याचा भासू लागला. तसे त्या आवाजाच्या दिशेने पुढे गेल्या. तिथे एक मोठे पिंपळाचे झाड होते. त्या खाली एक बाई बसली होती. आपली मान गुडघ्यात खुपसून रडत होती. काकू तिच्या जवळ गेल्या आणि तिला विचारले “का ग पोरी.. का रडतेस.. आणि इतक्या पहाटे इथे काय करतेय..”. तिने काहीच उत्तर दिले नाही. तसे काकूंनी पुन्हा एकदा तिला विचारले. तसे तिने मान वर करून पाहिले. तिचा चेहरा पाहून काकूंच्या पायाखालची जमीनच सरकली. पांढरे फट्टक डोळे, मोकळे केस आणि निर्विकार भाव पाहून काकू प्रचंड घाबरल्या आणि उलट दिशेने धावत सुटल्या. त्या आल्या वाटेने धावू लागल्या पण बराच वेळ धावून झाल्यावर त्या पुन्हा त्याच पिंपळाच्या झाडाजवळ आल्या. त्यांना काहीच सुचेना से झाले होते. त्यांना तो परिसर काही नवीन नव्हता पण तरीही त्यांना तिथून बाहेर पडता येत नव्हते. 

जणू त्यांना चकव्याने झपाटले होते. तब्बल ३-४ वेळा तसाच प्रकार झाला. ती बाई ही त्याच झाडाखाली बसलेली दिसायची. त्या बराच वेळ धावून ही पुन्हा त्याच ठिकाणी यायच्या. या वेळेस मात्र त्या बाई ने काकूंकडे धाव घेतली. पण त्यांनी थोडक्यात स्वतःला वाचवून तिथून पळ काढला. या वेळेस त्यांनी नेहमीची वाट धरली नाही. त्यामुळे कदाचित त्या भागातून बाहेर पडल्या आणि टेकडी खाली आल्या. धावत असताना सतत त्या देवाचे नाव घेत होत्या. तितक्यात त्यांना पोलिसांची गाडी येताना दिसली. त्यांनी गाडी थांबवून विचारले की इतक्या रात्री इथे काय करत आहात. काकूंनी सांगितले की पहाट झाली म्हणून मी नेहमी प्रमाणे इथे चालायला आले होते पण.. काकूंनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तसे ते म्हणाले “ताई रात्रीचे ३ वाजत आले आहेत. तुम्ही गाडीत बसा आम्ही तुम्हाला घरी सोडतो..” काकूंनी त्यांचे आभार मानले आणि घरी सुखरूप पोहोचल्या. त्या रात्री काकूंना मात्र काही झोप लागली नाही..

Leave a Reply