अनुभव – योगेश राणा

मी एक कॉलेज मध्ये शिकत असणारा विद्यार्थी आहे. तेव्हा माझे इंजिनियरिंग चे पहिले वर्ष सुरू झाले होते. परिस्थिती ने गरीब असल्यामुळे आपल्या कॉलेज चा खर्च कसा भागवता येईल, पूर्ण करता येईल याचा मी विचार करू लागलो. तितक्यात पार्ट टाईम जॉब करण्याचा विचार मनात आला. आता रात्री एखादे काम मिळणे तितके सोपे नव्हते म्हणून मग मी रात्री रिक्षा चालवून थोडे पैसे कमावण्याचा विचार केला. शेजारीच एक काका राहायचे त्यांची रिक्षा होती. ते दिवसा रिक्षा चालवायचे आणि मग रात्री घरी आल्यावर मी निघायचो. तसे ही कॉलेज मुळे दिवसा मला रिक्षा चालवणे शक्य झाले नसते. मला अजून ही तो दिवस, ती रात्र लक्षात आहे. २२ सप्टेंबर.. नेहमी प्रमाणे कॉलेज मधून घरी आलो आणि अभ्यासाला बसलो. अभ्यास करता करता ९ वाजून गेले. मनात आले की उशीर झालाय म्हणून जेवण न करता बाहेर पडलो. एखाद्या हॉटेल मध्ये थोडेसे खाऊन घेऊ असे ठरवले. नाक्यावर येऊन पोहोचलो आणि पॅसेंजर ची वाट पाहत राहिलो. बराच वेळ झाला तरी एकही पॅसेंजर मिळाला नव्हता. साधारण ११ वाजत आले होते. दीड पावणे दोन तास थांबून आता कंटाळा येऊ लागला होता. 

जेवण करायचे ही राहून गेले. तितक्यात एक आजोबा तिथे आले आणि म्हणाले “लेका मला तेवढे गावात सोडतो का..?”. पण मी नकार दिला कारण तिथून गाव बऱ्याच आत म्हणजे साधारण २० किलोमिटर लांब होते. आणि तिथला रस्ता ही अतिशय विचित्र आणि निर्मनुष्य असायचा. त्यात येण्यासाठी एखादा पॅसेंजर मिळेल याची अजिबात खात्री नसायची. त्यामुळे कोणताही रिक्षावाला तिथले भाडे घ्यायचा नाही. माझ्या मनात हे सगळे विचार चालू असतानाच आजोबा म्हणाले “मी तुला ४ पट जास्त भाडे देतो हवे तर पण मला सोड गावात..” त्यांचे बोलणे ऐकल्यावर मी पुन्हा विचार केला की असे ही आज आपला धंदा आज काही झाला नाहीये आणि हे आजोबा चांगले पैसे द्यायचे म्हणत आहेत तर ही संधी हातून घालवायला नको. मी त्यांना पटकन म्हणालो “ठीक आहे या बसा..”. रिक्षा गावाच्या रस्त्याला घेतली. जाताना मनात थोडी धाकधूक होती पण जास्त भाडे मिळणार म्हणून मनोमन खुश होतो. काही किलोमिटर अंतर पार केल्यावर मला रस्त्याकडे ला एक लहान मुलगा खेळताना दिसला. जस जशी रिक्षा जवळ आली तसे दिसले की तो मुलगा बॉल सोबत खेळतोय.

तसे एरव्ही हे दृश्य अगदी साधे वाटत असेल पण ही वेळ साधी नव्हती. रात्रीचे १२ वाजायला आले होते. परिसर अगदी निर्मनुष्य होता, आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही. हा लहान मुलगा या अश्या सामसूम ठिकाणी काय करत असेल या नुसत्या विचाराने अंगावर शहारे उमटून गेले. रिक्षा त्याच्या अगदी जवळून जाऊ लागली तेव्हा तो एकदम जागीच उभा राहिला आणि आमच्याकडे एक टक पाहू लागला. मी एक क्षण त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. तितक्यात मागे बसलेले आजोबा म्हणाले “रिक्षा थांबवू नकोस..” मी एकदम दचकलो आणि वेग वाढवला. त्यांचे हे वाक्य ऐकून मला वाटत असलेल्या भयानक शंकेचे निरसन झाले होते. तितक्यात मला विचित्र आवाज येऊ लागले. आता मात्र मी प्रचंड घाबरलो. मागे बसलेले आजोबा तर काहीच बोलत नव्हते. ते ही अश्या प्रसंगी काय बोलणार म्हणा. त्यांची अवस्था माझ्या सारखी झाली होती. कदाचित अजुन बिकट. कारण मी मधल्या आरशातून मागे पाहिले तर त्यांची शुद्ध हरपली होती. मान मागे झोकून निपचित पडले होते. बहुतेक हा भयाण प्रकार त्यांना सहन झाला नव्हता.

आता स्वतःलाच नाही तर त्यांना ही यातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी रिक्षाचा वेग वाढवला. तितक्यात मला जाणवले की रिक्षाच्या उजव्या बाजूला काही तरी आहे. मागे वळून पाहण्याचे धाडस होत नव्हते पण तरीही हिम्मत केली. आणि तिथले भयाण दृश्य पाहून अंगातला होता नव्हता त्राण ही संपला. एक बाई माझ्या रिक्षा सोबत अतिशय वेगात पळत येत होती. आज आपले काही खरे नाही. ही रात्र जीवावर बेतणार असे वाटू लागले. स्वतःला भानावर आणत मी जमेल तितक्या वेगात रिक्षा चालवू लागलो. एका क्षणी तर वाटले की हिच्या तावडीतून सुटलो तरी अपघात होऊन नक्कीच जाणार मी. कारण रस्ता तितका चांगला नव्हता आणि त्यात रिक्षा चा वेग खूप जास्त होता. मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो. तसे हळु हळू ती विचित्र आवाज यायचा कमी होऊ लागला. तितक्यात गावातला एक लाईट चा खांब दिसला तसा थोडा जिवात जीव आला. कारण वस्तीचा परिसर सुरू झाला होता. मी एक दीर्घ श्वास घेत सुटकेचा निःश्वास सोडला. रिक्षा गावात आणली. एव्हाना १२.३० होऊन गेले होते. पण तरीही नशिबाने पारावर दोन पोरं बसलेली दिसली. 

त्यांना मदतीसाठी हाक दिली तसे ते धावत आले. त्यांनी आजोबांना उचलून बाहेर काढले. माझी अवस्था पाहून बहुतेक त्यांना आमच्यासोबत घडलेल्या प्रकाराची कल्पना त्यांना आली असावी. आजोबांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुध्दीवर आणले. तो पर्यंत जवळपास ची लोक जमा झाली. माहीत नाही त्यांना कोणी बोलावून आणले कारण आधीच घबरल्यामुळे मी माझ्याच धुंदीत होतो. बहुतेक त्या मुलापैकी एकाने फोन करून त्यांना कळवले असेल असे वाटले. मी त्यांना घडलेला प्रकार सांगू लागलो. तेव्हा मला त्या लोकांनी सांगितले की त्या रस्त्यावर एका बाई ला आणि तिच्या लहान मुलाला एका वाहनाने उडवले होते. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तेव्हा पासून ते माय लेक गावातल्या बऱ्याच लोकांना दिसतात. वाहनाचा पाठलाग करतात. तेव्हा पासून हे सगळे घडायला सुरुवात झाली आहे. त्यांना वाटत असेल की हे तेच वाहन आहे ज्याने आपला जीव घेतला आहे. ते काळाच्या चक्रात अडकून पडले आहेत. त्यांची यातून कधी सुटका होईल काय माहीत. यामुळे कोणी रिक्षावाला रात्री पॅसेंजर घेऊन येत नाही. पण तू कसा काय आलास. त्यांना काही उत्तर देण्याच्या मनस्थितीत मी नव्हती. कारण हा सगळा प्रकार ऐकून मी थोडक्यात वाचलो होतो यासाठी मनोमन देवाचे आभार मानत होतो. 

ती रात्र तिथेच गावात रिक्षात काढली कारण पुन्हा त्याच वाटेने जायचा विचार ही मनात धडकी भरवत होता. सकाळ झाली तसे मी घरी परतलो. पण त्या रात्री नंतर मी पुन्हा कधीही रात्री रिक्षा चालवली नाही. 

Leave a Reply