अनुभव – निखिल मराठे
प्रसंग खूप जुना आहे. तेव्हा मी शाळेत सातवी इयत्तेत शिकत होतो. माझे वडील औरंगाबाद ला नोकरी करायचे. मी, आई आणि ताई आम्ही ३ लोक फक्त घरात राहायला होतो. कारण वडील नोकरी निमित्त बाहेरच असायचे. त्या वर्षी आम्ही नुकताच एका नवीन घरात राहायला आलो होतो. जवळपास एक महिना झाला असेल त्या ठिकाणी राहायला येऊन. सगळे काही व्यवस्थित सुरू होते. पण नंतर का कोण जाणे अचानक घरात विचित्र गोष्ट घडायला सुरुवात झाली. पहिला विचित्र अनुभव घेतला तो माझ्या आई ने. आम्ही तिघही हॉल मध्येच झोपायचो. त्या रात्री आई ला अचानक जाग आली. वेळ पाहिली तर ३ वाजले होते. नकळत तिचे लक्ष हॉल च्या दरवाज्याकडे गेले आणि तिथेच खिळले. तसे हळूच तो दरवाजा आपोआप आत ढकलला गेला. आई खूप घाबरली. कारण घराच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या त्यामुळे वारा आत येत नव्हता. तरीही दरवाजा आत लोटला गेला. तिने मला आणि ताई ला उठवले नाही कारण आम्ही दोघं ही गाढ झोपेत होतो. तिला वाटले की कदाचित आपल्याला भास झाला असेल. म्हणून ती जास्त विचार न करता झोपून गेली. हा प्रसंग तिने आधी कोणालाच सांगितला नाही. पण काही दिवसानंतर आई ला पुन्हा असाच प्रसंग वाट्याला आला. त्या रात्री ही तिला अचानक जाग आली. जाग येण्याचे असे काहीच कारण नव्हते. पण तिची चाहूल लागून मला ही जाग आली तसे मी ही उठलो.
ती उठून स्वयंपाक घरात पाणी प्यायला गेली. मी हॉल मध्ये अंथरुणात पडून तिला पाहत होतो. डोळ्यावर झोप होतीच. तितक्यात हॉल चा दरवाजा तसाच आत हळूच लोटला गेला. मी प्रचंड घाबरलो आणि आई ला जोरात हाक मारून तिच्याकडे धावत गेलो. तिने मला विचारल्यावर मी तिला सांगितले दरवाजा स्वतःहून हळूच हलला आणि आतल्या बाजूला ढकलला गेला. तिने मला शांत करत सांगितले की घाबरु नकोस. मला ही असेच जाणवले काही दिवसा पूर्वी. म्हणजे तो माझा भास नव्हता. आई स्वामी समर्थांची पूजा करायची. कदाचित त्यामुळे त्या घरातल्या काही वाईट शक्ती ना त्रास होऊ लागला होता. मी स्वामींचे नाव घेऊ लागलो आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही. पण तितक्यात कसल्याश्या आवाजाने मला जाग आली. मी बाजूला पाहीले तर आई खूप अस्वस्थ झाली होती. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काय होत होते तेच कळत नव्हते. बहुतेक ती वाईट स्वप्न पाहत होती पण तिला त्या स्वप्नातून बाहेर पडता येत नव्हते. तिला डोळेच उघडता येत नव्हते. मी खूप घाबरलो होतो. ताई ही माझ्या आवाजाने उठून बसली.
तितक्यात मी स्वामी समर्थांच्या नावाचा धावा सुरू केला आणि अचानक एके क्षणी आई ने डोळे उघडले. ती सांगू लागली की माझा अंगावर एक आकृती बसून माझा गळा दाबत होती. मी खूप घाबरले होते, पण मला कसली हालचाल करता येत नव्हती. तिने मला जवळ घेतले. आम्ही तिघे ही घाबरून रडूच लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही औरंगाबाद ला जायला निघणार होतो. नंतर आम्ही ती जागा बदलली, पुन्हा कधीच तिथे गेलो नाही. सामान ही माणसे लाऊन काढायला लावले आणि दुसरीकडे राहायला गेलो. काही दिवसांनंतर मला कळले की आई आणि मलाच नाही तर जेव्हा आमच्या कडे माझी आत्ये बहीण राहायला आली होती तेव्हा ही तिला असा भयानक अनुभव आला होता. तिने आम्हाला नाही पण तिच्या आई ला सांगितले होते आणि तिच्या आई ने तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. स्वामींच्या कृपेने आम्ही सुखरूप त्यातून बाहेर पडू शकलो.