अनुभव – प्रणय कोळंबे

अनुभव माझ्या मोठ्या भावाचा आहे जो बऱ्याच वर्षांपूर्वी त्याला आला होता. तेव्हा तो अगदी लहान लहान होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की तो गावी आजोबांकडे जायचा आणि जवळ जवळ संपूर्ण सुट्टी तिथेच घालवायचा. शाळा सुरू होण्या आधी तो पुन्हा घरी यायचा. त्या काळी शहरीकरण झाले नसल्यामुळे ते अगदी खेडेगाव होत. वस्ती ही तुरळक. गावात मोजकी घरे होती आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे घनदाट जंगल. चारही बाजूंनी गर्द झाडांनी व्यापलेले जंगल आणि त्यात मधोमध ते छोटेसे गाव. दळणवळणाची साधने ही तेव्हा जास्त नव्हती. त्यात शहराचा भाग इतका दूर होता की तिथे जाणे सहजा सहजी शक्य होत नसे. त्या काळी शिकारी करण्याला जास्त प्राधान्य दिलं जायचं. गावातली लोक एकत्र जमून रात्री शिकारी ला जायची. भावाला त्या वर्षी गावी येऊन २ दिवस झाले होते. आणि त्या रात्री माझ्या आजोबांनी रात्री शिकारी ला जायचा बेत आखला. माझे काका, आजोबा आणि गावातली काही लोक असे सगळे मिळून शिकारी ला जाणार होते. गेले काही वर्ष जेव्हापासून तो सुट्टीत गावी यायचा तेव्हा तो नेहमी शिकारी ला जाण्या बद्दल ऐकायचा. या वेळेस त्याने ठरवले की आपण एकदा काकांना विचारून पाहूया की मी सोबत आलो तर चालेल का. वय कमी असले तरी तो तेव्हा इतकाही लहान नव्हता. त्याने सहज म्हणून काकांना विचारले “मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत..?”.  काकांनी ही जास्त विचार न करता होकार दिला पण एक गोष्ट बजावून सांगितली की ” ये आमच्याबरोबर पण सोबत च रहा, कोणी तुझ्या नावाने हाक मारली, आवाज दिला तर त्याला प्रतिसाद देऊ नकोस..”

भावाने होकारार्थी मान डोलावली. पण त्याला कळले नाही की काका असे का म्हणाले. कारण शिकारीला तर रात्री जाणार आहोत, आधीच या भागात वस्ती कमी त्यामुळे मग आवाज देणार तरी कोण. भावाने जास्त लक्ष दिले नाही. ठरल्या प्रमाणे ते रात्री ११.३० वाजता शिकारीला जायला म्हणून घरा बाहेर पडले. १०-१२ लोक असावेत. बाहेर गडद अंधार पसरला होता. काहींच्या हातात कंदील होते तर इतरांच्या हातात शिकारी साठी ची हत्यार. साधारण अर्ध्या तासात गाव मागे टाकत जंगलाच्या वाटेवरून बरेच आत आले. माझ्या भावा साठी हा नवीनच अनुभव होता. तो या आधी असे रात्री जंगलात कधीच आला नव्हता. भले मोठे वृक्ष जे रात्री अगदीच भयावह वाटत होते. कंदिलाच्या मंद प्रकाशात वाट काढत ते पुढे जात होते. पायाखाली येणाऱ्या सुकलेल्या पानांच्या आवाजा सोबत इतरही आवाज कानावर पडत होते. हिंस्र प्राण्याचे असावेत बहुतेक. विचाराने भावाच्या काळजात धस झाले. जणू अंधारातून एखादे जनावर धावत अंगावर झेप घेईल आणि आपला फडशा पाडेल. पण सोबत लोक होती म्हणून त्याला थोडासा धीर वाटत होता. बऱ्याच वेळेच्या पायपिटी नंतर ते एका ओढ्यापाशी येऊन थांबले. कारण रात्री त्या ओढ्यावर जनावर पाणी प्यायला येतात आणि त्यांची शिकार करायला सोप जातं. म्हणून ते तिथेच दबा धरून बसले. आणि एखाद्या प्राण्याची चाहूल लागते का ते पाहू लागले. अंधारात जास्त काही दिसत नव्हत, पण पाण्याच्या खळखळण्याचा स्पष्ट आवाज मात्र कानावर येत होता. 

उन्हाळ्याचे दिवस असले तरीही त्या ओढ्या जवळ च्या परिसरात एक वेगळाच गारवा पसरला होता. अचानक भावाची नजर ओढ्यावरच्या पाण्यावर स्थिरावली. तसे त्यांना जवळच ठेवलेला कंदील उचलला आणि त्या दिशेने फिरवला. पाण्यामध्ये कसलीशी हालचाल जाणवली म्हणून त्या दिशेने पाऊल टाकत तो थोडे पुढे गेला. तिथे काही तरी होत, त्याला काही तरी दिसत होत जे त्याला आकर्षित करत होत. नक्की काय आहे हे कळत नसले तरीही जणू मोहिनी टाकल्यासारखे तो हळु हळु तिथे खेचला जात होता. तितक्यात अचानक त्याला ओढ्यात बरेच मासे दिसू लागले. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य पसरले. शिकार मिळेल तेव्हा मिळेल पण हे इतके मासे हातातून निसटायला नको म्हणून काहीही करून मास्याना पकडायचे असे ठरवून तो अगदी त्या पाण्याजवळ आला. त्याच्या प्रत्येक पावलासोबत त्या मास्यांची संख्या वाढत चालली होती. इतके मासे कुठून आणि कसे येत आहेत हे मात्र त्याला समजत नव्हतं. तो त्या पाण्यात आत शिरणार तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला. तसा भाऊ दचकून अचानक भानावर आला. मान वळवून मागे पाहिले तर माझे काका उभे होते. ते त्याला ओरडले आणि म्हणाले की तू न सांगता ओढ्याच्या पाण्या जवळ का आलास. त्यावर तो त्यांना सांगू लागला की काका उन्हाळ्याच्या दिवसातही इथे किती मासे आहेत बघा. त्यांनी फक्त भावाकडे एक वेगळाच कटाक्ष टाकला पण त्या पाण्याकडे पाहिले नाही. त्यांना काय वाटले काय माहीत ते दबक्या आवाजात म्हणाले “चल.. इथून पटकन.. या भागात थांबू नकोस..” 

भावाने त्यांच्या डोळ्यात दाटून आलेली भीती अचूक हेरली होती. ते थेट आजोबांकडे आले आणि त्यांना भावाला दिसलेल्या प्रकारा बद्दल सांगितले. त्यांनी फक्त काकांकडे पाहिले आणि त्यांना जे कळायचे ते कळून गेले. त्यांच्या सोबत जे काही जण आले होते ते झपाझप पावले टाकत त्या परिसरातून लांब जाऊ लागले. पण ते जंगलात नाही तर घराच्या दिशेने निघाले होते. भावाने एक दोन वेळा विचारायचा प्रयत्न केला की काय झाले, आपण पुन्हा घरी का निघालो, शिकार करायची नाही का आज, मासे ही पकडले नाहीत आपण. पण त्यांच्यापैकी कोणीच त्याच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. अर्ध्या पाऊण तासात ते घरी पोहोचले. भावाला मात्र राहवत नव्हते. तो आजोबांकडे गेला आणि सगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा आजोबांनी त्याला एके ठिकाणी बसून शांत व्हायला सांगितलं. आणि त्यांनी पुढे जे सांगितले ते ऐकून भाऊ अगदी सुन्न झाला. Pकारण तो असा भयानक प्रकार पहिल्यांदा ऐकत होता. ते म्हणाले ” तू आता मोठा झाला आहेस.. काही गोष्टी इतक्यात कळणार नाहीत पण तरीही सांगतो.. अश्या रात्री अपरात्री जंगलात काही गोष्टी आहेत, ज्या भक्ष्य पाहून अडकावयला मृगजळ तयार करतात. आणि त्यांचा घात करतात. ते जरी दिसत नसले तरी असते कारण ते असल्याचे अस्तित्व जाणवते. तू जिथे ओढला जात होता त्या पाण्याजवळ ही ते होत. जिथे फक्त तुला मासे दिसत होते आम्हाला नाही. तुझा काका वेळेवर आला म्हणून तू वाचलास..” हा सगळा प्रकार ऐकून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या नंतर मात्र तो असा रात्री अपरात्री शिकारी ला कधीही गेला नाही.

Leave a Reply