लेखक – अमोल वैद्य

“मी गावाकडे जायला निघालो. रात्रीचे नऊ वाजले होते. मला गावा मध्ये पोचण्यासाठी अजून जवळपास दोन तास तरी लागणार होते. रात्र असल्यामुळे मी सावकाश गाडी चालवत होतो. त्यामुळेदेखील अर्धा-एक तास जास्ती चा लागणार होता.

.”हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा वाढला होता. जशी.. जशी रात्र होत होती तसा…तसा गारवा देखील वाढत होता…अचानक माझ्या डोक्यामध्ये एक विचार चमकला. आज अमावस्या आहे. आणि सगळ्या भारतामध्ये कोकण हा भुतांचा गड म्हणून प्रसिद्ध आहे. भुता बद्दल मी गावामध्ये भरपूर गोष्टी ऐकल्या होत्या. पण प्रत्यक्ष मला कधीही अनुभव आला नाही…!

“अंधार असल्यामुळे आजूबाजूचा परिसर गाडीतून मला स्पष्ट दिसत नव्हता. थंडीमुळे  गाडीच्या समोरच्या काचेवर पाणी जमा झालं होतं. दर पाच मिनिटाने मी वायपर चालू करून काच साफ करत होतो. गाडीत मंद आवाजात गाण लावलं होत.. त्या शांत वातावरणात त्याचा हळुवार आवाज कानावर पडत होता. मी मोबाईल हातात घेऊन गुगल मॅप चालू केलं आणि पाहिल अजून किती अंतर बाकी आहे. मॅप वर चाळीस किलोमीटर दाखवत होतं..!!!

“रस्ता देखील आता आडवळणी चालू झाला.. हायवे तर कधीच संपून गेला होता… आडवळणी रस्ता म्हटल्यावर खड्डे तर आलेच…. पण तरीही तसा रस्ता बऱ्यापैकी व्यवस्थित होता… अजून मला गावामध्ये पोहोचायला एक तास तरी लागणार होता.

त्या रस्त्याला लागल्यावर आजुबाजुला घनदाट झाडी दिसू लागली.. त्या सोबतच रातकिड्यांचा कर्कश आवाज कानावर पडू लागला.. कार असल्यामुळे जंगली प्राण्यांची मला कसलीही भीती नव्हती..!!

“मी कार देखील अगदी सावकाश चालवत होतो. तितक्यात समोरच मला लाईटचा प्रकाश दिसला. मनात विचार केला एखादे हॉटेल असेल तर बरं होईल. एकटा असल्यामुळे खूप कंटाळलो होतो. सोबतीला होता तो फक्त काळाकुट्ट अंधार.. मला चहाची देखील तलप जाणवू लागली…!!!

“मी कारचा वेग वाढवला, हॉटेल अगदी दोनशे मीटर अंतरावर होते. जवळ आल्यावर कळले की मोठे हॉटेल नाही तर एक लहानसे च हॉटेल वजा ढाबा आहे. बाहेरच दोन बाकडे ठेवलेले होते. एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा चहा उकळत होता, बाजूच्या बाकड्यावर दोन व्यक्ती बसलेल्या, बहुतेक बाजूच्या गावच्या असाव्यात. मी हॉटेल समोर गाडी उभी केली आणि सावकाश गाडीतून खाली उतरलो.

“त्या मुलाची माझ्यावर नजर जाताच तो माझ्याकडून बघून हसला, आणि मीही त्याच्याकडे बघून किंचित स्मितहास्य केले.. त्याला आनंद होणं सहाजिकच आहे. रात्री त्याला एक गिर्‍हाईक मिळालं होतं…

” मी वेळ बघण्यासाठी मोबाईल बाहेर काढला रात्रीचे बारा वाजून गेले होते. गावात पोहोचण्यासाठी मला अजून तीस मिनिट तरी लागणार होते. त्याने गरम चहा चा एक कप समोर केला…

“मला थोडीशी भूक देखील लागली होती. तसे मी त्या मुलाला लगेच विचारलं…

“खाण्यासाठी आहे का रे तुझ्याकडे काही..??

“हो साहेब आहे ना.”  पण साहेब माफ करा माझ्याकडे फक्त बिस्कीट आहे…!!!

“चालेल दे’  तसही मला काही जास्त भूक नाही.. आणि त्यात माफी मागण्यास सारखं काय आहे रे, कोणते बिस्किट आहे तुझ्याकडे..!!!

“वही अपना पुराना ब्रँड पार्ले जी,??

आम्ही दोघही एकमेकाकडे बघून हसलो. आणि तो माझ्यासमोर येऊन बसला…!!!

“साहेब एक विचारू,

“विचार ना त्यात काय एवढं,

“साहेब एवढ्या रात्री कुठे चाललात याच्या आधी मी तुम्हाला कधी पाहिलं नाही म्हणून विचारतोय..!!

“मी रायपूर ला चाललोय महादेवाच्या यात्रेसाठी आलोय,

गंगाधर देशमुख माहित आहेत का तुला रायपूर चे सरपंच.

“हो साहेब त्यांना कोण नाही ओळखत एकदम देव माणूस आहे.

“मी त्यांचा मुलगा प्रशांत…!!

“तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता… मी त्याला लगेच म्हणालो अरे तू असा का बघतोस माझ्याकडे एखादं भुत बघीतल्यासारखा,..!!!

“साहेब तुम्ही कोकणातलेच, तरीही तुम्ही अमावस्येच्या रात्री एकटेच निघालात त्यामुळे जरा विचित्र वाटलं. मला वाटतं बहुतेक तुमचा भुताखेतांवर विश्वास नाही…!!

“आहे ना’  पण मला कधीही प्रत्यक्ष अनुभव आला नाही. ते देखील एका काळी आपल्यासारखीच माणसं होते त्यांच्यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे…!!! आणि तसंही मी महादेवाचा भक्त आहे, त्यामुळे मी भुतांना घाबरण्यातला नाही.

“पण साहेब तुम्हाला तर माहीतच आहे, प्रत्येक माणूस सारखा नसतो प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. तो स्वभाव त्याच्या विनाशाच कारण बनतो. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे ज्याच्या इच्छा कधीच संपत नाही..!!

“त्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तो मेलेला असून देखील मरत नाही. तो फक्त शरीराचा त्याग करतो पण त्याचा आत्मा अमर आहे. तो सतत आपल्या आजूबाजूला भटकत राहतो. त्यानी केलेल्या दुष्कर्मामुळे त्याला पिशाच योनी प्राप्त होते. आणि तो आपल्या सारख्या माणसांना त्रास देतो किंवा त्याच्या सोबत घेऊन जातो…

“मित्रा तुझ्या शरीरांमध्ये एखादं पिशाच घुसलं तर नाही ना, (मी त्याला थट्टेच्या स्वरात म्हणालो,)

“अगदी सत्तर वर्षाच्या आजोबा सारखं बोलतोय तू..

“नाही साहेब हे सगळं माझ्या आजीने मला सांगितलं.

“बरं राहू दे’  किती पैसे झाले तुझे’

राहू द्या हो साहेब तुम्ही मित्र म्हणालात ना, तरीही पैशाची भाषा करताय काय राव तुम्ही, मित्राकडून कोणी पैसे घेतो का आणि मित्राला कोणी पैसे देतो का,

“तू तर वयापेक्षा जास्त बोलतोस कुठून शिकला एवढे बोलायला,

“साहेब वयाच्या दहाव्या वर्षापासून हॉटेल चालवतोय तुमच्या आमच्या सारख्या कडून शिकलो बाकी कोणाकडून शिकणार..!!

“मला त्याच्या बोलण्याच अगदी कुतूहल वाटत होती. मी पाकिटातून शंभर ची नोट काढली आणि त्याच्या खिशात कोंबली, नाही म्हणू नकोस ही तुझ्या मित्रांनी दिली तुला भेट. त्याची इच्छा नसतानाही त्यांनी पैसे घेतले…!!

“मी परत एकदा खिशातून मोबाईल काढला आणि मोबाईल मध्ये वेळ पाहिली. रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते…!!

“मी आजूबाजूला नजर फिरवली अंधार खूप वाढला होता, अंधारा बरोबरच हवेमध्ये अजुनही गारवा वाढला. बाजूच्या बाकावर बसणाऱ्या दोन व्यक्ती निघून गेल्या होत्या बाकी होतो फक्त आम्ही दोघेच…!!

“मी लगेच कार मध्ये जाऊन बसलो. डावा हात वरती करून त्याला बाय च इशारा केला. गाडी सुरू करून गावाच्या दिशेने निघालो. तो मुलगा बोललेला प्रत्येक शब्द माझ्या डोक्यामध्ये घुमत होता. मी कारचा वेग देखील थोडासा वाढवला. कार मध्ये मंद आवाजात गाणी सुरू होती पण माझे मात्र अजिबात लक्ष त्यावर नव्हते. जस … जसे त्याचे शब्द कानामध्ये घुमत होते, तसतसे डोक्यावर घामाचे बिंदु जमा होत होते…!!

तेवढ्यात “एकाएकी माझ्या गाडी समोरून कोणीतरी वाऱ्याच्या दिशेने निघून गेले. माझी पापणी लावण्याच्या आत ते माझ्या समोरून निघून गेले. आता मात्र माझ्या मनामध्ये भीतीने घर केले होते. मी गाडीचा स्पीड अजूनच वाढवला. काही अंतर पुढे आलो असेन आणि माझ्यासमोरच मला रोडच्या मधोमध कोणीतरी उभं असलेलं दिसलं…!!

“मला वाटलं माझी गाडी पाहून ते जे कोणी असेल ते बाजूला जाईल, पण माझे विचार साफ चुकीचे ठरले. माझी कार त्या दिशेला येताना पाहून देखील ते जागचे हलले नाही.. तरीही मी कार चालवत राहिलो. अगदी समोर येऊन जोरात करकचून ब्रेक मारला. तो आवाज जसा थांबला तशी पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली. समोर एक माझ्याच वयाची मुलगी उभी होती. एवढ्या रात्री ही मुलगी इथं काय करत असेल असा प्रश्न मनात डोकावून गेला. पण याचे उत्तर मला तिच्याकडून च मिळणार होते.

‘”मी लगेच तिला प्रश्न विचारला, आपण कोण आहात… मी आपली काही मदत करु शकतो का. तिने काहीच उत्तर दिले नाही. फक्त माझ्या कार समोर उभी होती आणि माझ्याच कडे पाहत होती. चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. गाडीतून खाली उतरून तिच्यापाशी जावे वाटत होते…. पण माझ्या मनाची दुसरी बाजू मला नकार देत होती… ती मुलगी दिसायला देखील अगदी सुंदर होती… पण तिचे असे एक टक निशब्द राहून पाहत राहणे मला आता विचित्र वाटू लागलं. आता तिच्याबद्दल शंका येऊ लागली. 

बराच वेळ वाट पाहिली, भरपूर प्रश्न विचारले पण काहीच प्रतिसाद नाही. हा बहुतेक भलताच प्रकार आहे असे आता वाटू लागले. म्हणून मी डोळे बंद करून देवाची प्रार्थना करू लागलो. काही वेळानंतर डोळे उघडले तेव्हा  माझ्या समोर फक्त निर्मनुष्य रस्ता दिसत होता आणि त्यावर दूरवर जाणारी माझ्या कार ची हेड लाईट. समोर, रस्त्या कडेला ही पहिलं पण ती मुलगी कुठे ही दिसत नव्हती… आता तर माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं होतं… ती नक्की तिथे उभी होती की मला फक्त भास झालाय.. असती तर इतक्यात नजरेआड कशी झाली. भीती ने घशाला कोरड पडली…. मी घाबरून माझ्या बाजूच्या दरवाजाची काच वर करून बंद केली.

“समोर ठेवलेली पाण्याची बॉटल घेऊन दोन घोट घटाघटा पाणी प्यायलो.. स्वतःला शांत केलं. आता कुठे मला थोडं बरं वाटलं…. तितक्यात खाडकन आवाज आला. गाडीच्या टपावर कोणीतरी आले होते…. मी तशीच थरथरत्या हाताने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो…

“पण गाडी काही केल्या सुरू होत नव्हती…. पण मी बऱ्याच वेळ प्रयत्न करू लागलो. आणि एके क्षणी अचानक गाडी सुरू झाली. मी तसाच सुसाट वेगाने गावाच्या दिशेने निघालो. माझ्या गाडीच्या टपावर जोर जोरात उड्या मारण्याचा आवाज येत होता. मी त्याकडे दुर्लक्ष करून गाडी चालवत होतो. गाडी अगदी आमच्या गावच्या वेशी जवळ आली आणि वर जे काही होत त्याने जोरात बोनेट वर उडी घेतली. ती तीच मुलगी होती. पण तिचे रूप पालटले होते. माझी तर बोबडीच वळली…!!!

“अगदी घाणेरडा आणि विचित्र अवतार होता तिचा, तिच्या अंगावरील कपडे सगळे फाटलेले, हाताची नखे वाढलेली, कपाळाला चीर पडलेली, त्या चीरेमधून होणारा काळसर रंगाचा रक्तस्राव… आणि सगळ्यात भयानक म्हणजे तिच्या केसांमधून दिसणारे तिचे लालभडक डोळे..

“जशी गाडीने गावची वेस ओलांडली तसे नजरेसमोरून अचानक ती गायब झाली… माझे काळीज अजूनही भीती ने धड धड त होत. मला वाटलं होतं… ती गावाच्या वेशी मध्ये प्रवेश करु शकणार नाही…

“समोरच महादेवाच मंदिर दिसत होतं… मी अगदी मनोभावाने महादेवाला हात जोडले… आणि त्याची आभार मानले… तितक्यात मोबाईल ची रिंग वाजली.. बाबांचा फोन आला होता.. पाच मिनिटात पोहोचतो असे सांगून मी फोन ठेवला आणि मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो. 

Leave a Reply