अनुभव – वेदांत भोसले

मी आणि माझे वडील इस्लामपूर हून माल वाहतूक करण्यासाठी मुरुड जंजिरा ला जायला निघालो होतो. माझे वडील ड्रायव्हर असल्याने गाडी घेऊन भाड्यासाठी गेलो होतो. आम्ही सातारा सोडले तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. वडिलांना अजुन बराच प्रवास करायचा होता म्हणून आम्ही एका चहाच्या टपरीवर पाशी येऊन गाडी थांबवली. १०-१५ मिनिट थांबलो, चहा प्यायलो आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो. काही वेळात आम्ही अंबेणाली घाटात आलो. आम्ही जवळपास अर्धा घाट ओलांडला असेल तसे मला रस्त्यात एक छोटा ससा दिसला. गाडीच्या हेड लाईट मध्ये तो अधिकच चमकत होता. मी वडिलांना म्हणालो “बाबा तिथे ससा आहे आणि तो एकदम छोटा आहे. तो काही जास्त लांब जाणार नाही. आपण त्याला घेऊया का..?” तसे ते जरा रागातच म्हणाले “गप्प बस ! आणि समोर लक्ष दे..” त्यांचे असे बोलणे ऐकून मी जरा गप्प बसलो. आम्ही तिथून अवघे काही अंतर पुढे आलो असू.

तितक्यात रस्त्याच्या अगदी मधोमध मला एक सुंदर मोराच पिल्लू दिसले. पण या वेळी मला वडिलांना पुन्हा काही विचारायची हिंमत झाली नाही. त्यांनी गाडी त्याच्या बाजूने घेतली. रस्ता अरुंद होता म्हणून थोडी गाडी रस्त्याच्या खाली उतरवली पण त्या पिल्ला ला हॉर्न वाजवून बाजूला केले नाही. आमचा प्रवास असाच सुरू होता. तसे मी या आधी असे प्राणी रस्त्यावर कधी पाहिले नव्हते, ते ही असे इतक्या रात्री. आम्ही अर्धा किलोमिटर पुढे आलो असू. तसे रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा दिसला. तो गाडी थांबवण्यासाठी हात करू लागला. मी वडिलांना काही विचारले नाही पण फक्त त्यांच्याकडे पहिले. त्यांना दरदरून घाम फुटला होता. मी त्यांना न राहवून विचारले “बाबा काय झालं.. तुम्ही घाबरला आहात का..” तसे ते म्हणाले “अरे नाही.. आपण खिडक्या बंद केल्या आहेत ना म्हणून मला खूप गरम होतंय..” मला समजल की ते घाबरले आहेत पण मी सुद्धा घाबरून जाईन म्हणून ते मला त्यांची भीती दाखवत नाहीयेत. 

पण त्यांना काय वाटले काय माहीत, त्यांनी अचानक गाडी थांबवली आणि त्या माणसाला बोलावले. तो माणूस गाडीजवळ आला आणि म्हणाला ” दादा.. मी महाबळेश्वर चा.. मला तिथे सोडता का..?” तसे बाबा म्हणाले “हो आम्ही सोडू तुला पण गाडीच्या मागे बसावे लागेल..” तसे तो माणूस म्हणाला “ठीक आहे मी मागे बसतो पण तुम्ही गाडी मध्ये कुठेच थांबवू नका.. मी नंतर काय ते सांगतो तुम्हाला..”. बाबांनी पुढच्या प्रवासात कुठेच गाडी थांबवली नाही. महाबळेश्वर आल्यावर गाडी थांबवली तसे तो उतरला आणि बाबांना म्हणाला “दादा तुम्हाला काही दिसले का..?” तसे बाबा म्हणाले “हो ते प्राणी दिसले..माझ्या मुलाला ही दिसले”. त्यावर तो माणूस जे म्हणाला ते मी कधीच विसरू शकणार नाही.. तो मला की “बरे झाले तुम्ही कुठे थांबला नाहीत.. ती छलावा होता. चकव्याचा एक प्रकार.. तो कोणाचेही रूप घेऊ शकतो. आपल्याला भुरळ पाडण्यासाठी मृगजळ तयार करतो, आभास तयार करतो..”. तसे वडील अगदी शांतपणे म्हणाले “मला माहितीये.. मी त्या घाटाच्या रस्त्यावर नेहमी असे पाहतो.. माझ्या मुलाला माहीत नव्हते आणि मला त्याला घाबरवयचे नव्हते म्हणून मी शांत होतो..” मी सगळे ऐकत होतो. माझ्या वडिलांचे धाडस पाहून मी मनोमन सुखावलो होतो. आम्ही भाडे पोहोचवून दुसऱ्या दिवशी घरी आलो. 

Leave a Reply