अनुभव – दीक्षा दहरे

हा प्रसंग माझ्या वडिलांसोबत घडला होता. तेव्हा ते बी ए चे शिक्षण पूर्ण करत होते. त्या काळी एक रूम भाड्याने घेऊन राहायचे. आणि घर मालकीण बाई सुद्धा बाजूच्या मोठ्या घरात राहायची. तो परिसर अगदी कमी वस्तीचा होता. तसे ते एक गाव होते असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अश्याच एके दिवशी जेवण आटोपल्यावर बाहेर अंगणात खाटेवर झोपायचे ठरवले. कारण कधी कधी रूम मध्ये खूपच उकडायचे. इतके की रात्र भर झोपही लागायची नाही. त्या काळी तसे ही गावातली सगळी लोक ८.३० ते ९ च्या दरम्यान झोपून जायची. त्यामुळे संपूर्ण परिसर अगदी शांत, सामसूम हाउस जायचा. त्या रात्री ते एकटेच बाहेर खाटेवर झोपले. रूम च्या तुलनेत बाहेर थोडा का होईना पण थंडावा होता. अधून मधून हलकीशी वाऱ्याची झुळूक यायची. वातावरण शांत असल्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. काही वेळ उलटला असेल. ते कुशीवर झोपायला म्हणून वळले तर त्यांना त्यांच्या छातीवर कसलासा भार जाणवला. जस की त्यांच्या छातीवर कोणी तरी बसले आहे. झोपेत असल्यामुळे ग्लानी होती त्यामुळे त्यांना काही कळले नाही की आपल्यासोबत नक्की काय होतंय. त्यांनी उठायचा प्रयत्न केला पण ते ही त्यांना शक्य होत नव्हते. त्यांना हळु हळू जाणवू लागले की आपल्याला जागचे हलता ही येत नाहीये. त्यांनी हनुमंताच्या नावाचा जप सुरू केला आणि कसे बसे खाटेवर उठून बसले. 

त्यांनी चौफेर नजर फिरवली पण कोणीही दिसले नाही. नक्की काय घडतंय याचा शोध घेतच होते तितक्यात बाजूच्या घरातून घर मालकीण बाई धावतच बाहेर आली. ते जरा दचकलेच. अचानक हवेत एक वेगळाच गारवा पसरला. काही कळते ना कळते तोच घर मालकीण बाई अतिशय किळसवाण्या आणि घोगऱ्या आवाजात त्यांना म्हणाली ” तू माझ्या तावडीतुन खूपदा वाचला, पण ही बाई आली आहे माझ्या तावडीत, हिला मी सोडणार नाही, घेऊन जाईन हिला.. ” तो भरडा आवाज ऐकून माझ्या वडिलांची झोप एका क्षणात उडाली. त्या आवाजाने आजू बाजूच्या घरातले लोक अंगणात आले आणि पाहू लागले की काय झालेय. तिथल्या काही जाणकार लोकांनी ओळखले आणि पटकन मांत्रिकाला बोलावून आणले. तो पर्यंत ४-५ जणांनी त्या बाई ला घट्ट पकडुन ठेवले होते. ती ओरडत होती, किंचाळत होती, सुटण्याचा प्रयत्न करत होती. तिला एकटीला सांभाळायला ही ४-५ जण ही कमी पडत होते. पण तितक्यात काही वेळा पूर्वी गेलेले दोघं जण मांत्रिकाला घेऊन आले. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला एका रिंगणात बसवून विधी सुरू केले. मंत्रोच्चार कानावर पडू लागले तशी ती बाई व्हीवळू लागली. त्या मांत्रिकाने तिला बोलते केलेच. ती त्याच भागात राहायची. लग्ना नंतर आपल्या नवऱ्या सोबत झालेल्या भांडणाचा राग आल्यामुळे तिने स्वतःला जाळून घेतलं होत. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता. तिचे अंतिम कार्य नीट पार न पडल्यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळाली नव्हती. त्याचाच सुड घेण्यासाठी ती शरीर शोधत होती. 

शेवटी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एक उतारा फिरवून तिच्या घरा जवळच्या वडाच्या झाडाखाली ठेवण्यात आला. आणि त्या नंतर मात्र असा त्रास वडिलांना किंवा त्या घर मालकिणीला कधीच झाला नाही. आजही न चुकता तो उतारा तिथे ठेवला जातो..

Leave a Reply