अनुभव – तनय जामदार
अनुभव मला ९ वी इयत्तेत शिकत असताना आला होता.. मी आणि माझे दोन मित्र करण आणि अनिरुद्ध आम्ही रोज रात्री सोसायटी जवळच्या गार्डन मध्ये फेरफटका मारायला जायचो. गार्डन पासून साधारण अर्धा पाऊण किलोमीटर अंतरावर पुढे एक दफनभूमी होती, म्हणजे कब्रस्थान किंवा ग्रेव्ह यार्ड.. जेवण आटोपल्यावर बाहेर शतपावली करायला जाणे हा आमचा दिनक्रम जो आम्ही अगदी न चुकता पार पाडायचो. मला तो दिवस ती रात्र अजूनही आठवतेय. सर्व पित्री अमावस्या सुरू होणार होती. आणि साहजिकच मला या बद्दल काहीच कल्पना नव्हती.
अमावस्या बरोबर १२ ला लागणार होती म्हणजे सुरू होणार होती. मला माहित नव्हते आणि घरच्यांनी ही काहीच सांगितले नाही. मी जेवण आटोपून जेव्हा बाहेर जायला लागलो तेव्हा बाबा म्हणाले की आज लवकर घरी ये. नेहमी प्रमाणे माझे मित्र करण आणि अनिरुद्ध मला सोसायटी बिल्डिंग खाली भेटले. काही गप्पा झाल्या आणि आमची पावले सोसायटी जवळच्या गार्डन कले वळली. जाताना वाटेत एक बेकरी लागायची. तिथला दुकानदार माझ्या ओळखीचा होता. त्या रस्त्यावरून जाता येताना नेहमी विचारपूस करायचा. त्या रात्री ही जाताना त्याने मला हाक मारली म्हणून मी त्याच्या जवळ गेलो.
काही वेळ तिथेच थांबलो. तो मला विचारत होता की कुठे फिरत आहात रात्री चे. त्यावर मी त्याला म्हणालो की काही नाही आपले रोजचे फिरणे चालू आहे मित्रांबरोबर.. घरचे कसे आहेत वैगरे विचारपूस करून झाली. तो मला म्हणाला की जास्त वेळ रात्री चे फिरू नकोस, लवकर घरी जा. मला थोड आश्चर्य वाटलं कारण तो मला असे कधीच सांगत नाही. त्यामुळे त्या रात्री असे का म्हणाला याचा विचार करू लागलो. अश्याच आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मी तिथून निघालो.
चालत मी थेट गार्डन मध्ये गेलो. काही वेळ मित्र दिसले नाहीत म्हणून वाटले की ते थोडे पुढे चालत गेले असावेत. म्हणून मग त्यांना शोधत अजुन आत गेलो तर ते एका बाकावर बसले होते. आम्ही जेवण झाल्यावर शक्यतो बसत नाही, उलट गार्डन मध्ये फेऱ्या मारत असतो त्यामुळे मला जरा आश्चर्य वाटलं. रात्रीच्या वेळी गार्डन मध्ये कोणीही नसत. त्यामुळे मनसोक्त फिरता येत, गप्पा मारता येतात. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले की आज अचानक इथे बसला आहात..? फिरायचे नाही का आज..? त्यावर ते दोघे ही काही म्हणाले नाहीत.
पण तितक्यात करण माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी म्हणाला – तनय आज आपण तृठ अँड डेअर खेळूया. मी त्याच्या कडे पाहत म्हणालो की आता रात्री अपरात्री कसले खेळ खेळायला लावतोय तू, ही काही वेळ आहे का..? त्यावर त्या दोघांनी ही मला सांगितले की तू घाबरट आहेस म्हणुन तयार होत नाहीस. आता असे म्हंटल्यावर कोण मागे हटतय. मी मागचा पुढचा विचार न करता म्हणालो ” मी तयार आहे.. बोल काय करायचे आहे..?”. त्यावर अनिरुद्ध ने तिथेच पडलेली एक काचेची बाटली घेतली आणि आम्हा दोघांना खाली बसायला सांगितले.
तो म्हणाला की मी ही बाटली फिरवून ज्याच्या समोर या बाटलीचा पुढचा भाग येईल त्याला विचारले जाईल की ट्रूथ की डेअर. आणि मग जे निवडाल त्या प्रमाणे तो टास्क पूर्ण करावा लागेल. मी होकारार्थी मान हलवली. सुरुवातीला त्या दोघांवर च टास्क करण्याची पाळी आली त्यामुळे मला मजा येत होती. कारण मला हवं ते विचारता येत होत, त्यांना काही करायला सांगत येत होत. पण शेवटी त्या बाटलीचा पुढचा भाग माझ्या दिशेने फिरलाच. आणि माझ्या तोंडून डेअर बाहेर पडले.
करण ला कसली मस्ती सुचली काय माहित. तो मला म्हणाला की तू इथून त्या दफन भूमी पर्यंत चालत जायचे आणि दफन भूमी च्या भिंतीवर चढून आत शिरायचे, काही वेळ तिथेच थांबायचे आणि मग परत यायचे. आणि हा टास्क तू करतोय की नाही हे पाहायला अनिरुद्ध तुझ्या सोबत फक्त तिथं पर्यंत येईल. माझ्या मनात एकच विचार आला ” दफनभूमी.. रात्रीचे १० वाजून गेले आहेत आणि अश्या वेळी तिथे जाणे कितपत योग्य असेल.. आता मला जायचे नाही, मी घाबरलोय हे सांगणे म्हणजे मला चिडवण्यासाठी यांना अजुन एक विषय मिळेल..”
मी काहीच बोललो नाही फक्त होकारार्थी मान हलवली. जड पावलांनी मी त्या गार्डन मधून बाहेर पडलो. अनिरुद्ध माझ्या सोबत नव्हता पण तो मागून येत असेल याची मला खात्री होती. मनात भीती दाटून आली होती पण मागे हटून चालणार नव्हत. मी तिरक्या नजरेने अंदाज घेतला तर जाणवले की अनिरुद्ध माझ्या मागून चालत येतोय. मी मागे न पाहताच म्हणालो ” करतोय मी टास्क पण मला लघवी आली आहे थांब..” मी बाजूला असलेल्या झाडीत थोड आत गेलो आणि लघवी करून पुन्हा बाहेर आलो. काही मिनिटांत आम्ही तिथे चालत आलो. अनिरुद्ध ला म्हणालो की चल आता बघ कसा टास्क पूर्ण करतो मी, तू इथे कंपाऊंड जवळ थांब.
त्याला थांबायला सांगून मी कंपाऊंड च्या भिंतीवर चढायला जोरात उंच उडी मारली. एका झटक्यात दोन्ही हात लांब करून त्या भिंतीवर चढलो. आता मागे पाहायचे नव्हते म्हणून मी धपकन आत उडी घेतली. आत एकदम भयाण शांतता होती. इथून आत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि टास्क चा तो भाग ही नव्हता. म्हणून तिथेच थांबून राहिलो. तितक्यात बाहेरून एका कुत्र्याचा रडण्याचा आवाज आला. आणि मनात कुठेतरी दाटून राहिलेली भीती आता बाहेर पडू लागली.
नकळत माझी नजर दफन भूमी मधल्या एक एक थडग्यावर जाऊ लागली. बाजूला असणाऱ्या झाडांची सुकलेली पान त्यावर पसरली होती. खर तर त्या भागात अंधार च होता पण कंपाऊंड च्या बाहेर असलेल्या स्ट्रीट लाईट चा प्रकाश आत काही अंतरापर्यंत पडत होता. तितक्यात मला एका थडग्या जवळून कसलासा आवाज आला. सुकलेली पाने सरकण्याचा. आणि माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. तिथे काही तरी होत. मला दिसत नव्हत पण त्या आवाजावरून वाटत होत की त्या थडग्याच्या बाजूला कोणी तरी बसलय आणि ते कदाचित उठून उभ राहण्याचा प्रयत्न करतय.
ते जाणवतच माझे हात पाय भीती ने थरथरू लागले. सर्वांग घामाने भिजल, काळीज इतकं जोरात धड धडू लागलं की एके क्षणाला वाटलं की मी भोवळ येऊन इथेच पडतोय की काय. पण मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा एक जोरात उडी घेऊन भिंतीवर चढलो. बाहेर पाहतो तर माझ्या सोबत आलेला माझा अनिरुद्ध ही दिसला नाही. मी थेट घरा कडची वाट पकडली. खर तर मी इतका घाबरलो होतो की नकळत धावतच सुटलो. गार्डन जवळून जाताना मला तो बेकरी वाला दुकानदार भेटला. दुकान बंद करून तो १०.३०-११ ला घरी जात होता. मला एकट्याला पाहून म्हणाला ” काय रे तनय अजुन घरी गेला नाहीस.. खूप उशीर झालाय..” मी अडखळत च म्हणालो ” नाही ते मला वेळेचे भान राहिले नाही..” इतकं बोलून मी धावतच सुटलो.
घडलेल्या प्रकारा मुळे मी प्रचंड घाबरलो होतो. बिल्डिंग मध्ये आलो आणि लिफ्ट चे बटण दाबले. पण लिफ्ट वरच्या मजल्यावर होती आणि काही सेकंद तरी मला तिथे थांबावे लागणार होते. तितक्यात मागून एक विचित्र आवाज कानावर पडला आणि माझे सर्वांग शहारले. मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती. जे पाहिलं ते माझ्या मागे सोबत तर आले नसेल. नुसत्या विचाराने डोकं सुन्न झालं.
आता मात्र लिफ्ट साठी थांबून काही फायदा नव्हता. मी जिन्यावरून वर धावत सुटलो. धडपडत, धापा टाकत मी कसा बसा वर पोहोचलो. माझ्याकडे घराची एक चावी नेहमी असायची कारण कधी उशीर झाला तर आई वडिलांना दार उघडायला झोपेतून उ ठा यला लागू नये. चावी लैच मध्ये घुसवली पण हात भीती ने इतके थरथरत होते की मला लैच उघडताच येत नव्हते. शेवटी काही प्रयत्नानंतर मी दार उघडले आणि आत जाऊन थेट पलंगावर जाऊन पडलो.
दुसऱ्या दिवशी जेव्हा जाग आली तेव्हा उठून पहिल्यांदा आई ला सगळा प्रकार सांगितला. आई आणि बाबा दोघं ही मला खूप ओरडले. त्या दिवशी मला ताप भरला होता. आणि संध्याकाळी कारण आणि अनिकेत ला मी आजारी असल्याचे कळल्यामुळे ते दोघं ही मला भेटायला आले होते. मी त्यांना सगळा प्रसंग सांगितला तेव्हा ते दोघं ही माझ्या कडे आ वासून बघतच राहिले. ते मला म्हणाले की तुला आम्ही डेअर देऊन तुझी मस्करी करण्यासाठी थेट घरी येऊन राहिलो होतो.. त्यांचे बोलणे ऐकल्यावर मात्र माझी अवस्था अजुन वाईट झाली. कारण जर ते दोघे ही घरी गेले होते तर मग गार्डन पासून ते त्या दफन भूमी पर्यंत माझ्या मागे सोबतीला नक्की कोण होत..?