अनुभव – ऋषी मिराजकर

घटना याच वर्षी जानेवारी महिन्यात माझ्या सोबत आणि माझ्या मित्र सोबत घडली होती. आमचा डॉल्बी साऊंड सिस्टीम चा व्यवसाय आहे. आम्ही म्युसिक सिस्टीम साठी लागणारे डॉल्बी साऊंड पुरवतो. जवळपास सगळ्या ऑर्डर्स साठी आम्ही जात असतो. जानेवारी महिन्यात आम्हाला कोकणातल्या एका गावात लग्नासाठी ऑर्डर मिळाली होती. कोल्हापूर ला राहत असल्यामुळे आम्हाला बराच प्रवास करून जावे लागणार होते. ऑर्डर मिळाल्यावर आम्ही लगेच टेम्पो वैगरे बुक केला. माझ्या सोबत माझा एक मित्र मोन्या होता. निघायच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे सामान व्यवस्थित टेम्पो मध्ये भरून ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. साधारण २०० किलोमीटर चा प्रवास करून आम्ही त्या गावात येऊन पोहोचलो. लग्नाचा कार्यक्रम वैगरे छान झाला. सगळी लोक साऊंड सिस्टीम मुळे खूप खुश झाली. कार्य आटोपल्यानंतर आम्ही जेवण उरकून साधारण ५-५.३० ला परतीच्या प्रवासाला लागलो. 

ड्रायवर सोबत अजुन एक व्यक्ती होती म्हणून आम्ही दोघे टेम्पो च्या मागच्या बाजूला बसायचे ठरवले. सगळे सामान टेम्पोत भरून आम्ही दोघे मागच्या बाजूला बसलो. साधारण तासाभरात आम्ही गावापासून बरेच दूर आलो आणि घाटाच्या रस्त्याला लागलो. हळू हळू अंधार पडायला सुरुवात झाली होती. मी मोबाईल घेऊन टाईमपास म्हणून व्हिडिओ पाहत बसलो होतो. घाटाच्या वळणामधून आमचा टेम्पो जात होता. माझ्या मित्राला मावा खायची सवय आहे म्हणून तो मागच्या दरवाज्याच्या अगदी जवळ बसला होता. त्याचा मावा खाऊन झाल्यावर तो मला म्हणाला “रुश्या मला झोप येतेय”. तसे मी त्याला म्हणालो “इकडे आत येऊन झोप”. तसे टेम्पो मधले सामान सरकवत तो आत आला आणि येऊन झोपला. 

काही तासानंतर मला मोबाईल चा कंटाळा आला म्हणून मी मोबाईल खिशात ठेऊन बाहेर बघू लागलो. आजूबाजूला गर्द झाडी पसरली होती. स्ट्रीट लाईट असून नसल्यासारखे होते. म्हणजे दोन स्ट्रीट लाईटस् मध्ये बरेच अंतर होते. तो मिट्ट अंधार त्या स्ट्रीट लाईट च्या प्रकाशाला पूर्ण पणे गिळंकृत करत होता. मध्येच एका वळणावर एका बाजूला खोल दरी दिसायची तसे एक अनामिक भिती दाटून यायची. ड्रायवर तसा नवखा नव्हता पण या अश्या घाटाच्या वळणावर कधी काय होईल कोणालाच सांगता येत नाही म्हणून मन धास्तावत होत. वेगात मागे पडणाऱ्या झाडांवर माझे लक्ष होते. तितक्यात मला एका झाडावर कोणी तरी बसल्याचे जाणवले. पाय खाली मोकळे सोडून एका फांदीवर कोणी तरी बसले होते. ते पाहून माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. 

एका क्षणासाठी कळलेच नाही मी काय पाहिले. अंधार असल्यामुळे भास झाला असेल असे वाटून गेले. पण काही वेळात मला एखादे जंगली श्र्वा पद एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेत आमच्या टेम्पो च्या मागे येत आहे असे भासू लागले. मी नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. काही वेळापूर्वी पाहिलेली तीच आकृती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेत, सरपटत आमच्या मागे येत होती. ते दृश्य पाहून माझे हात पायच गळून गेले. मी घाबरून मित्राला उठवू लागलो “मोन्या अरे उठ ना मर्दा, हे बाहेर काय आहे बघ ना..” तो मात्र उठायचे काही नाव घेत नव्हता. किती तरी प्रयत्नानंतर तो उठला आणि बाहेरचा प्रकार पाहून तो ही घाबरला. आम्ही ड्राइवर ला हाका मारायला सुरुवात केली पण त्याने गाडीत मोठ्याने म्यूसिक प्लेअर सुरू केला होता म्हणून त्याला काहीही ऐकू येत नव्हते.

ते जे काही होते ते आता झाडांवरून उतरून रस्त्यावर आले होते आणि अतिशय वेगात आमचा पाठलाग करत होते. केस अतिशय विस्कटलेले होते, चेहरा नीट दिसला नाही पण असे वाटले की चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत. आमचे ड्राइवर ला हाका मारणं सुरुच होते. आता मात्र आमची भीतीने पूर्ण गाळण उडाली कारण ते जे काही होत ते आमच्या टेम्पो च्यायला अगदी जवळ आले होते. पुढच्या क्षणी ते आत झेप घेणार असे वाटले आणि तितक्यात टेम्पो ने वळण घेऊन रस्ता बदलला तसे ते विजेचा तीव्र झटका लागल्यासारखे दूर फेकले गेले. आम्ही जीव मुठीत धरून हे सगळे दृश्य पाहत होतो. तितक्यात अतिशय विचित्र आवाजात ओरडत ती आकृती अंधारात कुठे तरी दिसेनाशी झाली.

आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे घरी पोहोचलो. ड्रायवर ला खूप झापले कारण इतक्या हाका मारून सुध्धा त्याचा काहीच प्रतिसाद आला नव्हता. मी घरी घडलेला प्रकार सांगितला तसे माझे आजोबा म्हणाले तुम्ही त्या रस्त्यावरून रात्री प्रवास का केलात? तो रस्ता ठीक नाहिये. ती बाई त्या रस्त्यात खूप जणांना दिसते आणि वाहनांचा अपघात घडवून आणते. लोक म्हणतात की तिच्या नवऱ्याने कसल्या तरी वादामुळे तिला त्या रस्त्यावर मारून टाकले होते आणि तिचे प्रेत तसेच टाकून निघून गेला होता. तेव्हापासून ती बाई खूप लोकांना दिसते. आजोबांचे बोलणे ऐकून आम्ही निशब्द झालो होतो. त्या नंतर मात्र आम्ही कधी त्या रस्त्याने फिरकलो सुद्धा नाही. 

Leave a Reply