लेखक – विनीत गायकवाड

हा अनुभव माझ्या दाजींच्या काकांना सुमारे तीस वर्षांपूर्वी आला होता.

काका तसे एका खाजगी कंपनीमध्ये सेल्स एक्सिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. सेल्स म्हटलं तर कामानिमित्त फिरणं हे स्वाभाविकच होतं. त्या काळी चारचाकी इतक्या चलनात नसल्यामुळे काका त्यांच्या स्कुटरवरच प्रवास करायचे. अगदी कुठे लांब जायचं म्हटलं तरच बसने किंवा ट्रेनने प्रवास व्हायचा. त्यांच्या कामामुळे त्यांची घरी यायची किंवा जायची वेळ ही ठराविक नव्हती त्यामुळे त्यांच्या घरच्यांनाही त्यांच्या या अनिश्चित वेळेपत्रिकेची सवय झालेली होती.

दिवाळीला अजून महिनाभर राहिला होता त्यामुळे काका कंपनीचे सेल्स टार्गेट पूर्ण करण्याच्या जोमात होते. सुट्टी लागायच्या आधी जास्ती जास्त ऑर्डर मिळवायच्या, असा त्यांचा ध्येय होता, त्यामुळे ते घरापासून काही दिवस लांब राहतील हे घरातल्या सर्वांनाच माहीत होतं. अशाच एका संध्याकाळी ते ऑफिसच्या कामासाठी शेजारच्या जिल्ह्याच्या एमआयडीसीकडे जायची तयारी करू लागले. प्रवास जरा लांबचा होता तरी पुढचे तीन चार दिवस एमआयडीसीमध्ये फिरताना रिक्षापेक्षा आपली स्कूटर बरी पडेल या विचाराने त्यांनी स्कूटरवर जायचे ठरवले. काकूंना तसा याचा विरोध होता पण एमआयडीसीत रिक्षा मिळाली नाही तर ऐनवेळी फजिती होईल या विचाराने त्यांनी काकांशी जास्त वाद घातला नाही. 

काका निघताना , “सांभाळून जा”, या दोन शब्दातच काकूंनी आपल्या सगळ्या भावना त्यांच्या पर्यंत पोहचवल्या.

रात्रीचे साधारणतः नऊ-दहा वाजले असतील, काका एमआयडीसीच्या अलीकडे असलेल्या घाटाच्या दिशेने चालले होते.

मागच्या चार तासापासून सतत चाललेल्या प्रवासामुळे त्यांना आता चांगलाच थकवा जाणवत होता. घाटाच्या तोंडाशीच असणाऱ्या एका टपरीवर काकांनी स्कूटर थांबवली. त्या टपरीवर गॅस कंदील लावलेला एक चाळिशीतला अशक्तसा माणूस फाटके स्वेटर आणि कान टोपी घालून बसला होता.

“दादा..एक मार्लबोरो आणि एक कटिंग”..काका स्कूटरवरून उतरत म्हणाले.

“साहेब इतक्या रात्रीचं एमआयडीसीत चाललाय?”, त्या माणसाने सिगरेटच्या पाकिटातून एक सिगरेट पुढे सरकवत विचारले.

“छे ओ ..रात्रीचं काय काम तिथे?..आता अलीकडेच मुक्काम करीन हॉटेलात..मग जाईन उद्या सकाळी..”

“बरं..बरं..सावकाश जा..पुढं घाटात खूप वेडी वाकडी वळणं आहेत..खालुन एसटीवाले गर्रकन येतात”, त्या टपरीवाल्याने स्टोव्हवरचा चहा ग्लासात ओतत सांगितले.

“हो..एसटीवाल्यांचा अंदाज बरोबर असतो पण आपण घाबरता कामा नये”, काका चहाचा ग्लास उचलत बोलले.

एका हातात चहाचा ग्लास आणि एका हातात सिगरेट घेऊन काका पाय मोकळे करायला त्या टपरीपासून थोडे पुढे चालत येऊन थांबले. त्या थंड रात्रीत, तो गरम चहाचा घोट त्यांच्यासाठी अमृतापेक्षा कमी नव्हता. काकांनी दुसऱ्या हाताने सिगरेट पेटवत एक झुरका मारला. त्यांना थोडंस हलकं वाटलं. इकडे तिकडे बघताना त्यांची नजर सहज खालच्या दरीकडे गेली. घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या एमआयडीसीचे ते पिवळे दिवे इतक्या उंचीवरून चांदण्यासारखे दिसत होते. 

“साहेब..जास्त पुढे जाऊ नका..तिथला कट्टा तुटलाय..” , त्या टपरीवाल्याने एकदम हाक दिली.

सिगरेट आणि चहामध्ये तल्लीन झालेल्या काकांना अचानक शुद्ध आली.

हो.. हो..म्हणत काका पुनः एकदा टपरीकडे वळाले.

खिश्यातून पैसे देत त्यांनी जवळच्या चांगल्या हॉटेलांची नावं त्या टपरीवाल्याकडून घेतली आणि स्कूटरला किक मारत तिथून निघाले.

भुयारातून जावी तशी त्यांची स्कूटर त्या घाटातून जात होती. काका मात्र बिनधास्त होते.

बघता बघता त्यांनी घाट पार केला. पुढे गेल्यावर त्यांना जाणवले की वरून जरी एमआयडीसी घाटाच्या जवळ वाटत असली तरी घाटापासून ती काही किलोमीटर लांब होती. मग रात्री हॉटेलसाठी भटकण्यापेक्षा दिसेल त्या हॉटेलमध्ये तळ ठोकायचा असं त्यांनी ठरवले.

ते विचार करतच होते की इतक्यात त्यांना रस्त्याला लागून एक हॉटेल दिसले.

“बरं झालं ..भेटलं एकदाचं..”, असं म्हणत काकांनी स्कूटर हॉटेलच्या दिशेला वळवली.

हॉटेल दिसायला साधंच होतं पण आत लोकांची चांगली रेलचेल सुरू होती. हॉटेलमध्ये खाली जेवणाची सोय आणि वरती राहण्याची सोय होती.

काकांनी तिथल्या काउंटरवर बोलून एक खोली बुक केली आणि चेक इन करून थोड्या वेळेने जेवायला आले.

येऊन बघतात तर काय तर मगाची रेल चेल केव्हाच संपली होती. खालचा डायनिंग हॉल रिकामा झाला होता. तिथे काम करणाऱ्या वेटरनी सगळे ताट, ग्लास, टेबल स्वच्छ करून नीट नेटके ठेवले होते.

“अरेच्या..कुठे गेले सगळे गेस्ट?”, काकांनी तिथल्या कॅप्टनला विचारले.

“सर..सगळे गेस्ट डिनर करून आप आपल्या खोलीत गेलेत”, तो स्मितहास्य करत म्हणाला.

“बरं.. मग डिनर सुरू आहे की संपला?”

“ऑफकोर्स आहे ना सर..प्लिज तुम्ही बसून घ्या..मी वेटरला सांगतो तुम्हाला सर्व करायला”, असं म्हणून तो कॅप्टन तिथून किचनमध्ये गेला.

थोड्या वेळात एक वेटर जेवणाची थाळी घेऊन काकांच्या टेबला समोर आला.

इतक्या वेळ उपाशी असलेल्या काकांनी मस्त आडवा हात मारला.

जेवण चांगलं होतं असा कॅप्टनला शेरा देत ते आपल्या खोलीकडे गेले.

आता रात्रीचे बारा वाजून गेले होते. थकलेले असताना ही काकांना अजून झोप आलेली नव्हती. बिछान्यातून उठून ते सहज खोलीच्या बाल्कनीत येऊन थांबले.

समोरचा मोकळा रस्ता आणि काही अंतरावरचा डोंगर इतकेच काय त्यांना त्या बाल्कनीतून दिसत होते. आजूबाजूला दुसरे बाकी काहीच नव्हते. हॉटेलच्या गेटच्या बाहेर लावलेल्या आपल्या स्कूटरकडे त्यांची नजर गेली. इतक्यात अचानक हॉटेलच्या भिंतीच्या बाजूने एक बाई गेट जवळ चालत आली. काकांना थोडे वेगळे वाटले पण हॉटेलच्या गेस्टपैकी ती एक असेल असं समजून त्यांनी कानाडोळा केला. इतक्यात त्या बाईने मान वर करत काकांकडे पाहिले. त्या दोघांची नजरानजर होताच ती बाई अचानक पायापासून जमिनीत रुतत जाऊन गायब झाली. हे दृश्य पाहून काकांची चांगलीच धांदल उडाली. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ते तसेच आपल्या खोलीतून गाडीची चावी घेऊन खाली पळत आले. पायऱ्या उतरताना एकाएकी हॉटेलची वीज गेली आणि तिथला कोणताच कर्मचारी त्यांना दिसला नाही. अख्ख हॉटेल ओसाड असल्याचे त्यांना जाणवले.

हा भुताटकीचा प्रकार आहे हे ओळखताच काका अजून घाबरले. त्यांनी हॉटेलच्या बाहेर धूम ठोकली. गेटला जोरात धक्का मारून ते तिथून बाहेर पडले.

इतक्यात मागून एक घोगरा आवाज घुमला.

“सर..सगळे गेस्ट आपापल्या खोलीत आहेत..पण कधी कधी एक जण मागे राहून जातो..”

तो आवाज मगाच्या कॅप्टनचा होता. त्याच्या आवाजा सोबत कित्येक लोकांचा एकत्र हसण्याचा कल्लोळ ऐकू आला.

काका घामाने डबडबले. त्यांनी कसाबसा खिश्यात हात घातला आणि स्कूटरची चावी गाडीला लावली.

कुठल्या दिशेला जायचं हा प्रश्न असताना काकांनी गाडी पुनः एकदा घाटाकडे वळवली. जेव्हा ते मगाच्या टपरीकडे आले तिथे त्या टपरीवाल्याने काकांची अवस्था पाहून त्यांना पाणी प्यायला दिले. त्यांनी थोडा दम खाऊन त्या टपरीवाल्याला झालेला प्रकार सांगितला. टपरीवाला ही कमालीचा घाबरला.

“साहेब हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे..तुम्ही रात्रभर इथंच आराम करा..सकाळी जाऊन ती जागा पहा आणि तुमचं बॅग सामान काय असेल तर घ्या..घाबरू नका..मी पण येतो संगतीला तुमच्या..”

काकांच्या जीवात जीव आला. ते त्या टपरीच्या बाकड्यावर पडून राहिले.

ती रात्र तशीच पुढे सरकत गेली.

सकाळी त्यांना थोडे हायसे वाटले. ते त्या टपरिवाल्याला घेऊन त्या हॉटेलकडे गेले पण तिथे काहीच नव्हते नुसत्या एका मोकळ्या जमिनीचा तुकडा होता ज्याच्या मधोमध त्यांची बॅग पडलेली त्यांना दिसली.

काकांनी दबक्या पावलाने जाऊन आपली बॅग उचलून तपासली. त्यातलं सगळं सामान आणि कागदपत्रे तसेच होते.

पण विशेष म्हणजे त्या बॅगेत एक धर्मग्रंथ होता जो कदाचित काकूने काकांच्या नकळत ठेवला होता, न सांगता येणाऱ्या सगळ्या संकटापासून त्यांच्या रक्षणासाठी !

Leave a Reply