अनुभव क्रमांक १ – समाधान बंडा

आमच्या घरामागे एक आजोबा राहतात. घरात एकटेच असतात. आम्ही त्यांच्या घराच्या अंगणात नेहमी खेळायला जात असतो. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे आम्ही सगळे मित्र तिथे खेळायला गेलो होतो. पण अचानक पाऊस सुरू झाला म्हणून आम्ही धावत त्यांच्या घरात गेलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडायचा काही थांबत नव्हता. म्हणून आम्ही त्यांना म्हणालो की आजोबा आम्हाला खूप कंटाळा येतोय तुम्ही आम्हाला तुमची एखादी जुनी गोष्ट सांगा ना. त्यांना ही आम्हा मुलांमध्ये रमायला आव डायचे. म्हणून ते लगेच तयार झाले आणि म्हणाले ठीक आहे सांगतो. कोणती गोष्ट ऐकायची आहे सांगा मला. तसे आम्ही सगळे एकत्रच म्हणालो “भुताची”. तसे ते म्हणाले ठीक आहे. आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

हा अनुभव माझ्या आजोबांचा आहे. खूप जुना म्हणजे अगदी अठराव्या शतकात ला. ते एके ठिकाणी नोकरी करायचे. पण नंतर जसा कामाचा व्याप वाढत गेला तसे काही दिवस त्यांना रात्र पाळी ही करायला सांगितले. त्या रात्री नेहमी प्रमाणे जेवण वैगरे करून ते ११ ला घराबाहेर पडले. रोज ते सायकल ने कामावर जायचे. त्यामुळे सायकल घेऊन ते निघाले. १० मिनिट झाले नाहीत तितक्यात सायकल चे टायर पंक्चर झाले. त्यामुळे ते तशीच सायकल ढकलत पुढे निघाले. गावाच्या वेशी वर पोहो चे पर्यंत त्यांना १२ वाजले. वेस ओलांडल्यावर थोडे पुढे गेल्यावर एक ढाबा रस्त्यात लागायचा.

त्यांनी तिथे चौकशी केली की सायकल ची ट्युब आहे का. त्यावर तिथल्या एका बाई ने सांगितले की हो आमच्या इथे आधी सायकल पंक्चर वाल्याचे दुकान होते. त्यामुळे त्याचे सगळे सामान इथेच आहे अजुन. त्या बाईचे बोलणे ऐकताच त्यांना जरा हायसे वाटले. नाहीतर त्यांना ६-७ किलोमीटर पुन्हा पायपीट करून जावे लागले असते. आधीच ते दमून आले होते म्हणून त्यांनी चहा ची ऑर्डर दिली. ते बाहेरच एका बाकावर बसले आणि ती बाई आत निघून गेली. बराच वेळ झाला पण ती बाई बाहेर आली नाही म्हणून आजोबांनी तिला हाक दिली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. आजोबा उठले आणि आत पाहायला गेले. आतले दृश्य पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

ती स्वतःचे पाय त्या चुलीच्या आगीत टाकून बसली होती. एखाद्या लकडासारखे तिचे पाय पेट घेत होते. पण ती मात्र अगदी शांत बसून त्यावर ठेवलेल्या भांड्यात डोकावून पाहत होती. तो भयानक प्रकार पाहून ते तिथून धावतच सुटले. मागून चित्र विचित्र आवाज येऊ लागला. पण त्यांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. ते बराच वेळ धावत राहिले पण भीतीने त्यांना भुरळ आली आणि ते बेशुध्द पडले. डोळे उघडले तेव्हा ते दुसऱ्या गावात होते. तिथल्या लोकांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा आजोबांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी घरचा पत्ता दिला तसे त्या गावातल्या लोकांनी आजोबांच्या घरच्यांना बोलावून आणले. त्या गावातले लोक म्हणाले की त्या बाई ला तिथल्या लोकांनी जिवंत जाळले होते तेव्हा पासून ती बाई लोकांना दिसते. 

अनुभव क्रमांक २

घटना माझ्या भावासोबत खूप वर्षांपूर्वी घडली होती. तो आणि त्याचे काही मित्र एके ठिकाणी ३१st ची पार्टी करायला आणि फिरायला गेले होते. ते १ दिवस आधीच तिथे गेले होते. म्हणजे त्या परिसरात फिरता येईल तो परिसर पाहता येईल या उद्देशाने. ३० तारखेला त्यांनी गाडी वैगरे बुक करून तो परिसर पहिला. अगदी मनासारखे झाले त्यामुळे ते सगळे मित्र खूप खुश होते. ३१st च्या दिवशी त्यांचा प्लॅन ठरला होता. दिवसभर बीच वर घालवायचा आणि मग रात्री फुल ऑन पार्टी. 

त्या संध्याकाळी ते सगळे जवळच्या बीच वर फुटबॉल खेळत होते. खेळात इतके मग्न झाले होते की अंधार पडला तरी त्यांचा खेळ चालूच होता. त्या भागात अंधार पडायला लागल्यावर पोलीस वैगरे यायचे आणि बीच चा परिसर रिकामा करायला सांगायचे. त्या दिवशी तर ३१st नाईट होती त्यामुळे तेच झाले. सगळे खेळून भरपूर दामले होते. ते सगळे रूम वर जायला निघाले तसे त्यांच्यातला एक मित्र लघवीला जातो सांगून एका झाडाजवळ धावत गेला. त्याच्या साठी सगळे जन थांबले होते. २-३ मिनिटात तो परत आला तसे सगळे सोबतच निघाले. 

रूम वर येऊन सगळे फ्रेश झाले आणि पार्टी साठी तयारी करू लागले. तासाभरात सगळे तयार होऊन बाहेर गार्डन मध्ये एकत्र जमले. काही वेळा नंतर त्यांच्या लक्षात आले की जो मित्र बीच वर लघवी करायला गेला होता तो मित्र रूम वर तर आला पण रूम मधून अजुन बाहेर आला नाहीये. थोड्यावेळ अजुन त्यांनी वाट पहिली पण तो काही आला नाही. तसे त्यांच्यातले दोन जण त्याला पाहायला रूम वर गेले. रूम चा दरवाजा उघडाच होता. ते आत शिरले आणि समोरचे दृश्य पाहतच राहिले. दारूची बाटली घेऊन डायरेक्ट तोंडाला लावत होता आणि दारू पीत होता. तर मध्येच समोरच्या ताटातली बिर्याणी खात होता.

यात काही विशेष वाटण्यासारखे नव्हते पण २ गोष्टी खूप विचित्र होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राने या आधी दारू ला कधी स्पर्श ही केला नव्हता आणि त्याने नॉन वेज ही कधीच खाल्ले नव्हते. त्यामुळे त्याला असे पाहून आम्हाला काही सुचेनासे झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ज्या पद्धतीने खात होता ते आम्हाला पाहवत ही नव्हते. एखाद्या अधा श्यासारखा तो खात होता जसे २-३ दिवस काहीच खाल्ले नाहीये. त्यात अगदी वेड्या सारखा वाटत होतं. सैरभैर झाल्यासारखं. असे वाटत होते की तो जे करतोय ते त्याला ही कळत नाहीये. त्याचा स्वतःच्या वागण्यावर ताबा नाहीये. 

त्यांनी बाकीच्या मित्रांनाही बोलवून घेतले. येताना तिथली केअर टेकर ला सोबत आणले. त्याला पाहून लगेच कळले की हा साधा सुधा प्रकार नाहीये. याला झपाटले य. त्या केअर टेकर ने तिथल्याच एका जाणकार व्यक्तीला फोन करून बोलवून घेतले. तो आल्यावर आम्हा सगळयांना रूम च्याच बाहेर जाऊन थांबायला सांगितले. मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेच आत थांबलो. त्या व्यक्तीने त्याला विचारायला सुरुवात केली तसे तो एका विचित्र आवाजात बोलू लागला “त्या झाडाखाली माझ्यासाठी उतारा काढून ठेवला होता आणि मी तो खात होतो. पण हा तिथे आला आणि त्यावर लघवी करून निघून गेला. माझे जेवण अर्धवट राहिले. याला आता सोडणार नाहीये मी”. ते बोलताना त्याचे शरीर वेडेवाकडे होत होते. 

ते त्या दोघांना पहावले नाही म्हणून रूम च्याच बाहेर निघून आले. पुढे त्या व्यक्तीने काही मंत्र वैगरे म्हणून त्याची बाधा दूर केली. त्या रात्री पार्टी वैगरे सगळी बाजूलाच राहिली. आम्ही ती रात्र कशी बशी काढून दुसऱ्या दिवशी पहाटे घरी निघून आलो. 

अनुभव क्रमांक ३ – चिराग गौरव

हा अनुभव साधारण २ वर्षांपूर्वीचा आहे. १७ मे २०१९ चा. आमचा एक बँजो ग्रुप आहे. त्यामुळे लग्नाची किंवा हळदीची ऑर्डर मिळाली की आम्ही सगळी कडे जात असतो. मे महिना म्हणजे लग्न सराईचा महिना. आम्हाला कोकणातून हळदी साठी ऑर्डर मिळाली होती. १७ तारखेला संध्याकाळी हळद होती. आम्हाला बराच प्रवास करून जावे लागणार होते. त्यामुळे १६ तारखेला आम्ही सकाळी निघालो. दुपारी आम्ही तिथे पोहोचलो आणि थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी कार्यक्रमात वाजवायचे होते. सगळे सुरळीत पार पडले. सगळी मंडळी अगदी मनसोक्त नाचली, सगळे खूप खुश होते. 

कायक्रम आटोपल्यावर निघायला बराच उशीर झाला. तशी ही सवय होतीच त्यामुळे त्यात नवीन काहीच नव्हते. पण आम्हाला बराच प्रवास करून जावे लागणार होते. जेवण करून झाल्यावर सामानाची बांधाबांध केली आणि साधारण १.३० ला आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. सगळे खूप दमलो होतो. त्यात आम्ही ज्या गावात आलो होतो ते गाव बरेच आतल्या भागात होते. गाडी माझा भाऊ चालवत होता आणि मी त्याच्या शेजारच्या सीट वर बसलो होतो. गावापासून साधारण ९-१० किलोमीटर लांब आलो असू. आम्हाला एक मोकळा रस्ता लागला. रस्त्या कडेला विजेचे खांब ही नव्हते. त्यामुळे आमच्या गाडीच्या हेड लाईट च्याच प्रकाशातच समोरचा रस्ता दिसत होता. 

तितक्यात गाडी समोरून एक मुंगूस गेले. मी आणि माझा भाऊ एकदम दचकलो. माझ्या चेहऱ्यावर लगेच भीती दाटून आली. पण भावाने नीट पाहिले म्हणून तो म्हणाला की काही नाही रे घाबरु नकोस. मुंगूस होत. तसे मी त्याच्याकडे पाहून सुटकेचा निःश्वास सोडला. पण पुढच्या काही मिनिटात अगदी तसेच त्याच रंगाचे मुंगूस पुन्हा रस्त्याच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला एका झुडपात शिरले. मी भावाकडे पाहत काही म्हणणार तितक्यात एक तपकिरी रंगाचा ससा गाडीच्या समोरून आम्ही जात होतो त्याच दिशेने धावू लागला. आम्ही दोघे ही त्याच्या कडे पाहू लागलो. मी भावाला हळूच म्हणालो “गाडी चा वेग कमी करू नकोस.. हा प्रकार काही तरी वेगळाच दिसतोय”. 

तो गाडी होती त्याच वेगात चालवत राहिला. पण तो ससा त्याच वेगात गाडी समोर धावत होता. ते दृश्य अतिशय विचित्र होते. कारण माझा भाऊ बऱ्यापैकी गाडी वेगात चालवत होता. काही अंतर पार केल्यावर आम्हाला समोर एक बाई उभी दिसली. रस्त्याच्या एका बाजूला होती पण मधोमध उभी नव्हती. तिच्या हातात १०-१२ फुटांचा एक बांबू होता. जशी आमची गाडी तिच्या जवळ येत गेली तसे मला त्या बाई चे रुप दिसले. फाटके कपडे, केस मोकळे सोडले होते. आम्हाला पाठमोरी असल्याने तिचा चेहरा नीट दिसला नाही. पण त्या निर्जन अंधाऱ्या जागेवर ती एकटी काय करत होती कोण जाणे. 

एव्हाना आमच्या पैकी सगळे जण आजूबाजूला घडत असलेला विचित्र प्रकार पाहत होते. मी दादा ला म्हणालो की गाडीचा वेग वाढव. त्याने जास्त विचार न करता वेग वाढवला. मी सगळ्यांना उद्देशून म्हणालो “मागे वळून पाहू नका”. पण तरीही एका मित्राने मागे वळून पाहिले. पण त्या रस्त्यावर कोणीही नव्हते. त्याने आम्हाला सांगितले की मागे कोणीच नाहीये, ती बाई कुठे दिसत नाहीये. आम्ही सगळ्यांनी पाहिले आणि खरच तो रस्ता अगदी सामसूम झाला होता. आम्हा सगळ्यांची झोप च उडाली होती. पहाटे पर्यंत आम्ही सगळे जागे होतो. आमच्या सोबत त्या रात्री नक्की काय घडले हे आम्हाला आज पर्यंत कळू शकले नाही. 

Leave a Reply