अनुभव – नैनेश महाडिक

गोष्ट जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वीची माझ्या गावातली म्हणजे कोकणातली आहे.. तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. पण ही गोष्ट मला माझ्या चुलत भावाने, विशाल ने सांगितली होती. त्या वेळी आम्ही जॉइंट फॅमिली मध्ये राहायचो. आमच्या सोबत गडी म्हणून एक काका राहायचे. तेव्हा त्यांना येऊन अवघे २-३ महिने झाले असतील. स्वभावाने खूप चांगले असल्याने ते अल्पावधीत च घरातले सदस्य झाले. त्यांना ‘ रामू ‘ म्हणून सगळे हाक मारायचे. ते माझ्या आजोबांच्या आज्ञेत असायचे. आजोबा दिसायला अतिशय रुबाबदार होते आणि त्यांना गावात खूप मान, प्रतिष्ठा होती. त्यांना अण्णा म्हणून सगळे ओळखायचे. घरातही कोणी त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते. त्यामुळे गडी रामू ही त्यांनी सांगितलेले सगळे काम नियमित करायचा. कोणत्याही कामाला नाही बोलायचा नाही. आम्ही त्यांना प्रेमाने काका म्हणून हाक मारायचो. अण्णा ना ही ते अगदी लहान भावासारखे होते. कधी नॉन वेज चा बेत असला की त्या आधी ड्रिंक्स वैगरे सोबत घ्यायला त्यांच्या सोबत च बसायचे. 

एके दिवशी संध्याकाळी आमची एक गाय आणि तिचे वासरू बाकीच्या गुरांसोबत घरी परतले च नाही. काका त्यांना शोधायला निघणार होते पण घरातली इतर कामे आटोपे पर्यंत त्यांना उशीर झाला. पण तरीही ते जाऊन दोघांना शोधून घेऊन आले. घरी येताना २ वाटा आहेत. एक चांगला रस्ता आहे तर दुसरी जुनी वाट आहे, जिथून जास्त कोणी जात नाही. ते येताना जुन्या वाटेने आले आणि अण्णा नी त्यांना पाहिले. तसे ते म्हणाले की संध्याकाळ झाल्यानंतर त्या वाटे वरून येत जाऊ नकोस, ती वाट बरोबर नाही. त्या दिवशी रात्री ते ड्रिंक्स घ्यायला बसले तेव्हा अण्णा नी पुन्हा तोच विषय काढला आणि काकांना बजावून सांगितले की त्या जुन्या वाटेने अंधार पडल्यावर येऊ नकोस, त्या वाटेत एक जून मोठं आंब्याच झाड आहे, तिथे भुतांचा वास आहे. काकांना अश्या गोष्टीवर विश्वास नव्हता पण ते आजोबांना खूप मान द्यायचे म्हणून त्यांनी सगळे ऐकून घेतले. सगळे काही अगदी सुरळीत चालू होते. एके दिवशी त्यांनी जरा जास्त च ड्रिंक केले आणि जेवण न करताच झोपायला गेले. 

रात्री त्यांना पोटात अतिशय दुखू लागले त्यामुळे नीट झोप लागत नव्हती. त्यामुळे त्यांनी कंदील घेतला आणि असेच उठून बाहेर चालायला गेले. बाहेर पडताना वेळ पाहिली तर रात्री चा दीड वाजून गेला होता. मे महिना चालू असल्यामुळे घरात खूप गरम होत होते आणि त्या मानाने बाहेर जरा गारवा जाणवत होता. तसे ते घरा बाहेर पडले आणि फेरफटका मारू लागले. खूप अंधार असल्यामुळे ते चालत चालत त्या जुन्या वाटेवर निघून गेले आणि त्यांना कळलेच नाही. काही वेळानंतर एक सळसळ एकु आली तसे ते थांबले. तिथे मागच्या घरातून येणाऱ्या मंद प्रकाशात त्यांना एक मोठे झाड दिसले. ते त्या दिशेने थोडे पुढे चालत गेले. ते एक आंब्याचे झाड होते, अतिशय जुने भासत होते. एक विचित्र गोष्ट म्हणजे त्या झाडाला आंबे नव्हते. पण त्याच वाटेवर असणाऱ्या इतर तुलनेने लहान असणाऱ्या झाडांना मात्र आंबे होते. आणि हे त्यांनी दिवसा त्या वाटेवरून येताना पाहिले होते. तितक्यात त्यांना जोरात लघवी ला आली. तसे ते त्याच झाडाच्या बाजूला जाऊन उभे राहिले. त्यांची लघवी करून झाली आणि इतक्यात त्यांना त्यांच्या दिशेने एक जोडपे येताना दिसले. 

तसे त्यांच्या हातातील कंदीलाची ज्योत ही फडफडू लागली. ते जोडपे त्यांच्या जवळ आले आणि त्यांना ओरडू च लागले. “ओ साहेब, हे काय करताय इथे.. समजत नाही का.. ही काय लघवी करायची जागा आहे का.. पटकन निघा इथून, नाही तर आमच्या सोबत घेऊन जाऊ..”. काका जरा गोंधळले आणि म्हणाले “तुम्ही कोण हो दादा, आणि इतक्या रात्री इथे काय करत आहात..”. तसे ते जोडपे अजुन चिडत म्हणाले “तुला काय करायचे आहे, जेवढे सांगितले तेवढे कर.. निघ इथून..” काका जरा घाबरले. इतक्या रात्री हे दोघे इथे का आले असतील, हे दिसते तेवढे सोपे नाहीये हे बहुतेक त्यांना कळून चुकले. ते तिथून थेट घरी आले. दुसऱ्या दिवशी आजोबांनी त्यांना विचारले की तू काल रात्री बाहेर गेला होतास का..? मला दरवाज्याचा आवाज आला. मला वाटले मला भास झाला म्हणून मे दुर्लक्ष करून झोपून गेलो. पण नंतर थोड्या वेळाने पुन्हा आला.. तू बाहेर जाऊन आलास का..? तसे काका म्हणाले “हो अण्णा नु.. जरा चालायला गेलो होतो. आणि चुकून त्या जुन्या वाटेवर गेलो. तिथे लघवी आली म्हणून त्या मोठ्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली उभा राहिलो तर एक जोडपे आले आणि मला खूप ओरडले. 

अण्णा नी विचारले की कोणते जोडपे, एवढ्या रात्री कसे काय दिसले तुला.. तसे काकांनी त्यांचे वर्णन कडूनी सांगितले. एक माणूस होता सडपातळ अंग काठीचा.. सफेद शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट घातली होती. पायात कोल्हापुरी चप्पल होती. मी कंदिलाच्या प्रकाशात सगळे नीट पाहिले. त्याच्या सोबत एक ४०-४५ वर्षांची बाई होती, ती ही अंगकाठीने त्याच्या सारखीच होती. फिक्कट गुलाबी रंगाचे लुगडे नेसले होते, नाकात नथ आणि कपाळावर मोठी टिकली होती. तिचा डावा डोळा थोडा बारीक होता. काकांनी केलेले त्या जोडप्याचे वर्णन ऐकून आजोबांना धक्का च बसला. आजोबा तेव्हा काहीच बोलले नाहीत. बहुतेक ते विचार करत असावे की याला सगळे सांगावे की नाही. दुपारचे जेवण उरकल्यावर काकांना बोलावले आणि म्हणाले “रामू ये बस इथे.. मी सांगतोय ते नीट ऐक..” त्यांनी काकांच्या खांद्यावर हात ठेवला आणि समजावत पुढे म्हणाले ” काल तुला जे जोडपे दिसले, जे तुला ओरडले ते आपल्याच गावातले होते.. पण ४ महिन्या आधीच ते दोघे ही आकस्मित रित्या वारले..”. अण्णा चे असे बोलणे ऐकून काका थंड च पडले. त्यांच्या चेहऱ्यावर चा रंग उडाला. 

त्या दिवशी ते खूप शांत शांत होते. कोणाशीच जास्त बोलले नाहीत. ते खूप घाबरले होते. त्यांनी जरी आम्हाला काही सांगितले नसले तरी सुद्धा आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते. रात्री ही जास्त कोणाशी संवाद न साधता झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घर सोडून निघून गेले. त्यांना शोधायचा आम्ही खूप प्रयत्न केला पण ते परत कधीही दिसले नाहीत. मला वाटतं की त्यांना त्या प्रसंगाचा किंवा अण्णा नी सांगितलेल्या त्या एका वाक्याचा खूप मोठा धक्का बसला होता. त्यांना आमच्या घरात किंवा गावात राहणे खूप भीतीदायक वाटत असावे. म्हणून कोणालाही न सांगता ते कायमचे घर सोडून गेले. 

Leave a Reply