अनुभव – स्नेहा बस्तोडकर वाणी

साधारण ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी, माझा नवरा अद्वैत आणि आमचा छोटा २ वर्षांचा मुलगा शंतनु एका गावात लग्नाला गेलो होतो. अद्वैत च्या मित्राचे लग्न होते. जानेवारी महिना असल्याने वातावरण खूप गारवा पसरला होता. त्यात रात्रीची वेळ. पण वरातीतल्या लोकांना त्या थंडीमुळे फारसा काही फरक पडत नव्हता. हॉल च्या बाहेर मोठा डिजे सुरू होता आणि सगळे नाचण्यात मग्न होते. आमची मात्र थंडी मुळे अवस्था बिकट झाली होती कारण आम्हाला त्याची सवय नव्हती. 

तो हॉल गावापासून बराच लांब बाहेरच्या बाजूला होता. अतिशय मोकळे मैदान आणि आजूबाजूला वस्तीही अगदी तुरळक होती. रात्रीच्या अंधारात तर ती जागा अतिशय भुताटकी ची च वाटत होती. आम्ही हॉल च्या आतल्या बाजूला पाहुण्यांसाठी ठेवलेल्या जाड रजाया आणि पांघरूण मध्ये आत सरकून बसलो होतो. तिथे आमच्या सारखेच अद्वैत चे अजुन काही मित्र बसले होते. त्यातलाच एक मित्र वेदांत आणि त्याची बायको ही आमच्यासोबत होते. आणि जुने मित्रवजमले की गप्पा गोष्टी रंगणार हे काही वेगळे सांगायला नको. आमचा लहान मुलगा शंतनु आमच्या पासून काही अंतरावर खेळत होता. 

वेदांत नी त्याच गावातली एक जुनी भयानक घटना सांगायला सुरू केली. साधारण ६० वर्षांपूर्वीचा जुना किस्सा असावा. माझ्या आई चे माहेर या जागे हून थोडेच लांब होते. तिथे म्हणे एक हडळ तिथल्या लहान मुलांवर चेटूक करून त्यांचे आत्मे वश करायची. तिथे सगळे तिला मंदिरा डायन म्हणायचे. पण कोणी तिला कधी प्रत्यक्षात पाहिले नव्हते. असे म्हणायचे की ती लहान मुलांना नुसते पाहून असे काही करायची की ती मुलं आजारी पडून शेवटी त्यांचा मृत्यू व्हायचा. 

एकदा माझी आई आणि तिचा लहान भाऊ म्हणजे माझा मामा घरा बाहेर अंगणात खेळत होते. ते बरेच लहान असावेत. जेमतेम ३-४ वर्षांचे. तेव्हा एक गरीब म्हातारी बाई भिक मागायला त्यांच्या दारात आली. तसे माझी आजी तिला काही द्यायला म्हणून आत घरात गेली. तितक्या वेळात त्या म्हातारी ने माझ्या मामा ला जवळ बोलावले आणि आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले. तेवढ्यात माझ्या आजीने तिला शिळ्या चपात्या आणून दिल्या. त्या घेऊन ती म्हातारी तिथून निघून गेली. 

त्या दिवशी संध्याकाळ होत नाही तितक्यात मामा ने अंथरूण धरले. तीव्र तापाने तो फण फणू लागला. दिवसामागून दिवस जात होते आणि मामाची अवस्था खालावत होती. किती डॉकटर वैद्य केले पण त्याच्या तब्येतीत काही सुधारणा दिसत नव्हती. घरातले इतके लहान पोर आजारी पडल्यामुळे आजी अगदीच कावरी बावरी झाली होती. काय करावे तिला सुचत नव्हते. सगळ्या औषधांचा त्याच्यावर काही असरच होत नव्हता. दिवसरात्र तिच्या अश्रू च्या धारा वाहत च राहायच्या. 

आता या सगळ्या नंतर त्यांनी एका मांत्रिकाची मदत ही घेऊन पहिली. तो घरी आल्यावर त्याने मामाच्या कपाळावर हात ठेऊन सांगायला सुरुवात केली “या बाळाचा आत्मा तिनेच वश केलाय, ह्याचा मृत्यू अटळ आहे”. त्या मांत्रिकाचे बोलणे ऐकुन आजी जागेवरच कोसळली. तिला सावरत आजोबांनी विचारले “काही तरी उपाय काढा, असे हतबल होऊन आमच्या पोटच्या पोराला त्या हाडळीच्या तोंडी देऊ शकत नाही”. त्यावर त्या मांत्रिकाने सांगितले “याचा मृत्यू तर मी थांबवू शकत नाही पण त्याला जिवंत करण्याचा एक शेवटचा प्रयत्न आपण करू शकतो. असे म्हणतात की मृत्यूच्या रात्री ती लहान मुलांचे गाढलेले मृतदेह परत बाहेर काढून त्यात परत प्राण टाकून ते जिवंत करते आणि स्वतः सोबत घेऊन जाते. हे बाळ आज चा दिवस सुद्धा काढू शकणार नाही, पण हा शेवटचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”. इतके सांगून तो मांत्रिक निघून गेला.

सांगितल्याप्रमाणे माझ्या मामाने काही तासातच जीव सोडला. त्या गावातल्या प्रथेप्रमाणे त्याचा मृतदेह तिथल्या स्मशानात गाढला. माझे आजोबा, तो मांत्रिक आणि गावकरी तिथे स्मशानात दबा धरून बसले होते. सगळीकडे एक जीवघेणी शांतता पसरली होती. रात्रीचे ३ वाजायला आले तसे अचानक अंधाऱ्या कोपऱ्यातून सावली पुढे सरकताना दिसली आणि काळजात धस्स झाले. ती सावली तशीच पुढे सरकत येत त्या म ढ याजवळ येऊन थांबली. हाताच्या तीक्ष्ण नखांनी झापझप माती उकरायला सुरुवात केली. जणू एखादे वादळ आल्यासारखा वारा घोघांवू लागला. बघता बघता तिने काही फूट खड्डा हातानेच खणला आणि आतून प्रेत बाहेर काढले. त्या प्रेताला तसेच एका हातात धरून दुसऱ्या हाताने जवळच खोचलेली काचेची बाटली बाहेर काढली आणि त्याचे झाकण उघडले.

तसे त्यातून एक पांढरा शुभ्र धूर निघू लागला आणि त्याच्या शरीरात शिरला. पुढच्या क्षणी त्याने डोळे उघडले आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला. हे पाहताच झटक्या सरशी दडून बसलेले सगळे गावकरी तिच्या दिशेने धावून गेले. पण त्यांना येताना पाहून ती एका क्षणात दिसेनाशी झाली. त्यांच्या हातून ती हडळ निसटली असली तरी माझा मामा त्यांना सुखरूप अवस्थेत मिळाला होता हेच त्यांच्यासाठी खूप होते. असे म्हणतात की त्या नंतर ती हडळ पुन्हा कधी तिथे दिसली नाही. 

ही संपूर्ण गोष्ट ऐकून आमच्या ही अंगावर काटे उभे राहिले होते. लग्नात आलेल्या लोकांची वर्दळ ही कमी झाली होती. माझे आईचे काळीज आपसूक माझ्या चिमुकल्या कडे ओढले गेले. नकळतपणे माझ्या लहान मुलाकडे म्हणजे शंतनुकडे लक्ष गेले. तो तिथेच खेळत होता. पण अचानक खेळता खेळता थांबला आणि समोरच्या भिंतीकडे एक टक पाहू लागला. आम्ही सगळे त्याच्याकडेच पाहत होतो. त्याला हाक दिली तरी तो तिथेच एक टक पाहत होता. मी त्याला घ्यायला जाणार तोच तो धावत माझ्याकडे आला आणि त्या भिंतीकडे बोट करत सांगू लागला “तिथे एक बाई आहे, ती खूप घाण आहे. मम्मा तू तिला इथून जायला सांग ती खूप वाईट आहे”.

आम्हाला काही कळेनासं झालं. आम्ही तिथे पाहिले तर तिथे एकही कोणीही उभे नव्हते. तिथून जरा लांब लग्ना साठी आलेली एक बाई अतिशय मेक अप करून बसली होती. आम्ही त्याला विचारले की त्या बाईला पाहून घाबरला स का पण तो नाही नाही च म्हणत होता. आम्ही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होतो की तिथे कोणीही नाहीये. पण नंतर अद्वैत चा मित्र मला म्हणाला “वहिनी, तुम्ही त्या दिशेने बघून रागवू न खडसावून सांगा की जा इथून” मी ही जास्त विचार न करता त्याने सांगितल्या प्रमाणे केले. तेवढ्यात मला घट्ट मिठी मारून बसलेला माझा मुलगा शंतनु मागे पाहत म्हणाला “मम्मा, जाते य ती… गेली”.. इतके म्हणून पुन्हा आधी सारखा खेळू लागला. 

आम्ही सगळे घडलेला प्रकार पाहतच राहिलो. जे काही घडले त्याचा अर्थ नक्की काय होता. शंतनु या आधी कोणाला पाहून इतके कधीच घाबरला नव्हता. नुकताच ऐकलेल्या त्या हदलीच्या गोष्टी सोबत याचा काही संबंध होता का? की उगीच मन काही तरी वेगळाच अर्थ लावत होत माहीत नाही पण हे कोड आम्ही कधी त्या नंतर उलगडायचा प्रयत्न ही केला नाही.

Leave a Reply