अनुभव क्रमांक – १ – सूरज बांदल

ही गोष्ट आहे १९८५ ची. जेव्हा मी साधारण १९-२० वर्षांचा असेन. मला अजूनही चांगलेच लक्षात आहे. तारीख होती २४ ऑगस्ट. आमच्या शेजारच्या गावात जत्रा भरली होती. आणि जत्रेचे विशेष म्हणजे रात्री चा तमाशा. आम्ही तरणी ताठी पोर मिळून तमाशाला जायचा बेत आखला. त्या दिवशी जेवण वैगरे लवकर आटोपून आम्ही सगळे जण एकत्र जमलो. साधारण १० वाजले असतील. शेजारचे गाव साधारण दीड किलोमीटर अंतरावर होते त्यामुळे सगळ्यांनी पायीच जायचा निर्णय घेतला. 

मस्त गप्पा, गोष्टी मजा मस्करी करत आम्ही सगळे चालत निघालो. साधारण ५ मिनिटानंतर आम्ही गावाची वेस ओलांडून दोन गावांच्या मध्ये लागणाऱ्या ओढ्यावर आलो. थंडगार वारा वाहत असल्याने थोडा वेळ तिथेच खोळंबलो. एक वेगळीच शांतता पसरली होती. ओढ्याच्या पाण्याचा खळखळणारा आवाज तेवढाच काय तो येत होता. पण तितक्यात ओढ्याच्या डाव्या बाजूच्या दिशेने कपडे धुण्याचा आवाज येऊ लागला. आम्हाला वाटले की इतक्या रात्री ओढ्यावर कोण कपडे धुतेय. ते पाहायला म्हणून आम्ही रस्त्यकडून थोडे खाली उतरलो आणि समोर नजर गेली. 

तिथे एक म्हातारी बाई एका मोठ्या दगडावर बसून कपडे धुत होती. कितीही झाले तरी ही गोष्ट जरा विचित्र च होती. इतक्या रात्री येऊन कपडे धुवायची काय गरज म्हणून आमच्यात कुजबुज सुरु झाली. तितक्यात त्या म्हातारीला बहुतेक आम्ही पाहत असल्याची चाहूल लागली. तशी ती थांबली आणि उभी राहून आमच्या दिशेला बघू लागली. बघता बघता तिचा चेहरा अतिशय क्रूर होऊ लागला. डोळे पांढरे फटक पडू लागले. तिच्या नाकातून डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्र्वासच बसत नव्हता की आम्ही हे काय पाहतोय. तिने आमच्याकडे पाहतच तोंडाचा जबडा उघडला आणि त्यातून अतिशय घाण लाळीसारखा चिकट पदार्थ बाहेर पडू लागला. तिच्याकडे बघून असे वाटतं होते की तिचा चेहरा कसल्या तरी अवजड वस्तू ने ठेचलाय. 

आमच्यातले काही मित्र तर कधीच पळून गेले होते. आम्ही दोघं तिघ उरलो होतो हे मला नंतर कळले. पण तो पर्यंत त्या म्हातारीने विचित्र आवाजात ओरडत त्या ओढ्यात उडी टाकली आणि अंधारात कुठे तरी दिसेनाशी झाली. आम्ही जीवांच्या आकांताने पळत घरी आलो. मी तर घरात शिरल्या शिरल्या आईला मिठीच मारली आणि बेशुध्द झालो. दुसऱ्या दिवशी मी सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. तेव्हा आजी म्हणाली की ती बाई आपल्याच गावातली होती. तिला तिच्या नवऱ्याने ओढ्या काठी नेऊन चेहरा दगडाने ठेचून मारून टाकले होते. ती त्या ओढ्याकाठी अजूनही दिसते असे सगळे म्हणतात. आज त्या प्रसंगाला कित्येक वर्ष उलटली तरी तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.

अनुभव क्रमांक – २ – नाव गुपित आहे.

हा अनुभव माझ्या काकांनी मला सांगितला होता. त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे ते घरी आराम करत होते. पण अचानक त्यांना एक फोन आला आणि अतिशय वाईट बातमी कळली. त्यांच्या अगदी लहानपणीच्या मित्राचा वाहन अपघातात मृत्यू झाला होता. बातमी ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. ते तडक निघाले. पोहोचे पर्यंत खूप उशीर झाला. त्याची डेडबोडी दवाखान्यातून आणायची होती. त्यांच्या बरोबर त्यांचे दोन मित्र संदीप आणि रवी ही होते. 

मध्य रात्र उलटल्यावर ते हॉस्पिटल मध्ये येऊन पोहोचले. रात्र असल्यामुळे तिथे कोणीही नव्हते. तसे ते आतल्या दिशेला चालत गेले पण त्यांचे २ मित्र दुसऱ्या दिशेला कोणी दिसते का ते पाहत होते. काकांना पुढे चालत आल्यावर दिसले की तिथे एक म्हातारी बाई खुर्चीवर बसून काही तरी खात होती. थोडीशी विचित्रच वाटली. खूप दिवसांनी खायला मिळाले असे खात होती. त्याकडे दुर्लक्ष करत ते तिच्या जवळ गेले आणि त्यांनी तिला विचारले “इथे पोस्ट मोर्टेम रूम कुठे आहे”. तसे ती उठली आणि म्हणाली चला माझ्या मागे मी दाखवते. त्यांना वाटले की तिथे रात्रपाळी ला काम करणारी एखादी बाई असावी आणि तिला बहुतेक माहीत असावे. 

ते तिच्या मागून चालू लागले. ती चालत हॉस्पिटल च्या मागच्या बाजूने बाहेर निघून त्यांना एका पडक्या इमारतीत घेऊन गेली. एक विचित्र गोष्ट म्हणजे तिथले जिने खालच्या बाजूला होते. म्हणजे इमारतीच्या खाली जाण्यासाठी पायऱ्या दिसत होत्या. ती म्हातारी बाई तिथून आत उतरू लागली तसे ते ही तिच्या मागून चालू लागले. काही पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोरच एक भिंत होती. त्यावर नखाने ओरबाडल्याच्या विचित्र खुणा होत्या. रक्ताचे डाग लागले होते. आणि तिथून पुढे उजव्या दिशेला एक रस्ता दिसत होता. काकांना उशिरा का होईना कळून चुकले होते की हा काही तरी विचित्र प्रकार आहे. 

तसे ते त्या म्हाताऱ्या बाईला म्हणाले “राहू द्या.. मी जातो”. ते मागे वळून पायऱ्या चढत पुन्हा वर जाऊ लागले तसे तिने झटकन त्यांचा हात धरला. त्यांनी मागे वळून तिच्याकडे पाहिले आणि शरीरातला सगळा त्राण च संपला. त्या म्हातारीने एक वेगळेच रूप धारण केले होते. तिचा चेहरा अतिशय आक्राळ विक्राळ दिसत होता. ते पाहू ही शकत नव्हते इतका विचित्र. त्याने हात झटकून पाळायचा प्रयत्न केला पण काही पायऱ्या चढून वर गेल्यावर तिने पुन्हा त्यांचा पाय पकडला आणि जोरात खेचून खाली फरफटत आणले. त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी काही मिनिट झटापट करत तिच्यापासून सुटका केली आणि धावत बाहेर आले. 

त्यांचे मित्र तिथेच थांबून त्यांची वाट पाहत होते. बाहेर येऊन त्यांना विचारणार इतक्यात ते म्हणाले “काय रे कुठे गेला होतास? कधी पासून आम्ही तुझी वाट पाहतोय”. त्यावर ते काही न बोलता एकच वाक्य म्हणाले “इथून निघूया आपण”. त्यांनी कोणाला काहीच सांगितले नाही. तिथे पुन्हा विचारपूस करून डेडबोडी ताब्यात घेतली आणि मित्राच्या घरी गेले. काही दिवसानंतर त्यांचा मित्र संदीप ने विचारले की त्या दिवशी तू अचानक कुठे गेला होता?. तर ते म्हणाला की “अरे ती म्हातारी बाई नव्हती का तिच्या मागे चालत गेलो”..

ते पुढे काही बोलणार तेवढ्यात मित्र म्हणाला “कोण बाई.. तू तर एकटाच चालत जात होतास..”

अनुभव क्रमांक – ३ – आसिफ खान

हा प्रसंग माझ्यासोबत साधारण ५ वर्षांपूर्वी घडला होता. त्या रात्री नेहमीप्रमाणे काम वैगरे आटोपून साधारण १ च्या सुमारास माझ्या घरी जायला निघालो. पेशाने डेंटिस्ट असल्याने दरवेळी कामानिमित्त बाहेर जावे लागायचे. आणि घरी परतताना नेहमीसारखा उशीर व्हायचा. त्यादिवशी मी खूप च थकलो होतो. पण थकून चालणार नव्हते. घरापर्यंत चा साधारण ४० किलोमीटर चा प्रवास काही करून करायचा होता. थंडीचे दिवस असल्याने हवेत चांगलाच गारवा होता. त्यामुळे इथे तिथे ना बघता सरळ गाडी चालवत होतो. 

साधारण ५ किलोमीटर चा प्रवास झाल्या नंतर रस्त्या कडेला मला चाळिशी ओलांडलेला माणूस दिसला. त्याने गाडीला हात केला आणि आसिफ म्हणून माझ्या नावाने हाक दिली. अंगात पांढऱ्या रंगाचा सदरा, सहा सव्वा सहा फूट उंची, चेहरा काही नीट दिसला नाही. त्याने मला इतक्या रात्री नावाने हाक मारल्याने मला देखील नवलच वाटले होते. मीही जास्त विचार न करता त्याच्या समोर येऊन थांबलो. इतकी रात्र झाली असताना देखील त्या माणसाच्या चेहऱ्यावर असे भर रस्त्यात चालत आल्याचा वैगरे कसलेही हावभाव दिसत नव्हते. मला त्याने विचारले “आसिफ घरी चालला आहेस ना, मला तिथेच जायचे आहे, सोडशिल का?” मी म्हणालो हो बसा. आता आपल्याला नावाने ओळखतो म्हंटल्यावर कोणीतरी ओळखीचा माणूस असेल असे वाटणे साहजिक होते. आपण त्याला ओळख न दाखवणे बरोबर वाटले नसते. 

काही मिनिटांनंतर मी त्याला विचारपूस सुरू केली. तुम्हाला इतका उशीर कसा झाला. तुम्ही नक्की कुठे राहता. पण मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तो माणूस देत नव्हता. मला ती व्यक्ती मागे असल्याचे जाणवत होते पण चेहरा आरश्या मध्ये नीट दिसत नव्हता. मी जास्त विचार न करता गाडी चालवत राहिलो. साधारण अर्ध्या तासाने मला त्या व्यक्तीने लघुशंके ला जायचे म्हणून गाडी थांबवायला सांगितली. पण मी थोड पुढे थांबू अस सांगितलं. तसे त्याने पुन्हा इथेच गाडी थांबव असे सांगितले. शेवटी मी गाडी थांबवली तसे तो व्यक्ती २ मिनिटात येतो सांगून रस्त्याकडे ला चालत गेला. 

मला तहान लागली होती म्हणून मी माझ्या बागेतून पाण्याची बॉटल काढून पाणी पिऊ लागलो. तोच तो व्यक्ती झपाटल्या सारखा झपकन समोरच्या झाडीत धावत गेला. माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. याला काय झाले असा विचार करत मी घाबरतच गाडीवरून उतरलो. झाडी बरीच रुंद होती. आसपास कोणते गाव ही नव्हते. मला काही क्षणासाठी कळलेच नाही काय झाले. मी त्या व्यक्तीला ४-५ मिनिट आवाज देत राहिलो. पण तितक्यात माझ्या मनात काही तरी वेगळे विचार आले आणि मला कळले की इथून निघायला हवे. एका क्षणाचा ही विलंब न करता मी गाडी काढून सुसाट निघालो. छाती भीतीने धड धडत होती. मला अचानक ताप भरला. त्या परिस्थितीत मला कधी काय होईल याचा नेम नव्हता. म्हणून जमेल तितक्या वेगात मी गाडी चालवत होतो. 

आरश्या मध्ये पहायची तर माझी हिम्मत च होत नव्हती. उरलेला प्रवास मी १० मिनिटात पूर्ण केला आणि घरी येऊन पोहोचलो. त्या वेळेस माझा अपघात होणे निश्चितच होते. कारण वाऱ्याच्या वेगाने मी गाडी चालवत होतो आणि अश्यात कोणी समोर आले असते तर.. पण देवाच्या कृपेने मला काहीच झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ठीक वाटत होते. पण त्या नंतर त्या मार्गाने रात्री अप रात्री पुन्हा कधीच प्रवास केला नाही.

https://www.youtube.com/watch?v=6W7hpxxaT6k

Leave a Reply