अनुभव – तुषार मनकर
हा अनुभव दिवाळीच्या सुट्ट्या मधला आहे. सुट्ट्या नुकत्याच लागल्या होत्या. घरात पूजेची तयारी चालू होती. बाहेर वाजणाऱ्या फटाक्यांचा आवाज कानावर पडत होता. मी सहज म्हणून घरा बाहेर आमच्या गॅलरी मध्ये येऊन उभा राहिलो. तासे मागून आई म्हणाली “कुठे चालला आहेस, पूजा होऊ दे.. ” पण मी तरीही बाहेर येऊन थांबलो. बाहेर आल्यावर उंच आकाशात जाऊन फुटणारे, डोळ्यांना दिपवून टाकणारे फाटके मी पाहतच राहिलो. तेव्हा मला त्याचे प्रचंड आकर्षण वाटायचे. त्यात आमच्या इथे दिवे सोडले जातात. ते ही बघायला मला खूप आवडते. मी रस्त्यावर उभा राहून आकाशात पाहत होतो. तितक्यात एक दिवा आमच्या घराच्या वरून हळु हाख खाली येताना दिसू लागला. मी पटकन त्याच्या मागे पळत गेलो. पण मला कळले नाही की मी घरापासून खूप लांब आलोय. आजुबाजुला पाहिले तर रस्ता अगदी सामसूम होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी ज्या दिव्याच्या मागे पळत आलो होतो तो दिवा ही आता कुठे तरी दिसेनासा झाला होता. मी त्या भागात एक नजर फिरवली. त्या रस्त्यावर दूर दूर वर कोणीही माणसे दिसत नव्हती. मला अजून एक गोष्ट जाणवली. मघापासून येणार फटाक्यांचा आवाज आता आचानक बंद झालाय. तसे वातावरणात आधीपासून गारवा होताच पण तो आता मला अधिकच जाणवू लागला. कुठून तरी अतिशय थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून गेली. जास्त विचार न करता मी सरळ घराकडे जायला निघालो. जसे मी चालायला सुरुवात केली तसे मला जाणवले की माझ्या मागून कोणी तरी चालत येतंय. मी झटकन मागे वळून पाहिले. एक लहान मुलगी माझ्या मागे उभी होती. तिचे केस मोकळे होते आणि काहीसे चेहऱ्यावर आले होते. चेहरा जेमतेम दिसत होता. मला कळले नाही की ही मुलगी अचानक इथे कशी काय आली. कारण बराच वेळ आजूबाजूच्या परिसरात मला कोणीही दिसत नव्हते.
मी तिच्या कडे पाहत होतो पण ती कसलीही हालचाल न करता रस्त्याच्या मधोमध उभी राहून माझ्याकडे पाहत होती. मी न राहवून तिला विचारले “तुझे नाव काय आहे.. कुठे राहतेस.. मी तुला घरी सोडून येऊ का..?.” पण ती काहीच बोलली नाही. विचित्र गोष्ट म्हणजे ती तशीच माझ्याकडे पाहत होती. आता मात्र मला जरा भीती वाटू लागली. मी मागे वळणार तितक्यात ती मान खाली घालून हातातले काही तरी वाचू लागली. आणि ती काही तरी वेगळीच हालचाल करत होती. मान वेगळीच फिरवत होती. मी इतका घाबरलो की नकळत एक दगड उचलून तिच्या दिशेने भिरकावला. तिला तो हलकासा लागला सुद्धा पण ती मात्र जागची हलली सुद्धा नाही. मी घाबरून घराच्या दिशेने धावत सुटलो. धावता धावता मागे वळून पाहिले पण ती मुलगी मागे दिसली नाही. अवघ्या काही सेकंदात ती त्या निर्मनुष्य रस्त्यावर कुठे तरी दिसेनाशी झाली. घरी येऊन मी माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. आई मला खूप ओरडली कारण मी पूजा सोडून बाहेर आलो होतो. मी घरी आलो तेव्हा पूजा चालू होती. सगळे झाल्यावर मला जरा बरे वाटले. पण नंतर मी त्या भागात कधीही एकटा गेलो नाही.